गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी आज गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागाची पहाणी केली. ज्या ठिकाणी सी-६० कंमांडोच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता तिथल्या घटनास्थळाचीही गृहमंत्र्यांनी पाहाणी केली. तसेच शहिदांच्या कुटुंबियांनाही भेट दिली. रविवारी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे नक्षलवाद्यांनी सी-६० कमांडोच्या गाडीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 7 जवान शहिद झाले होते. तर, अनेक जवान जखमी झाले होते. मुरमुरी गावाजवळ भूसुरुंग स्फोटात शहीद झालेल्या 7 पोलीस जवानांपैकी शहीद जवान रोहन हनुमंत डंबारे चामोर्शी, दुर्योधन मारोती नाकतोडे कुरुड यांच्या घरी जाऊन गृहमंत्री तथा पालकमंत्री आर.आर. पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली व त्यांना धीर दिला.
चामोर्शी तालुक्यातील मुरमुरी गावाजवळ झालेल्या नक्षल्यांच्या भूसुरुंग स्फोटाच्या शहीद झालेल्या सी-60 पथकातील पोलीस जवानांच्या परिवाराला सांत्वना देण्यासाठी पालकमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रणजीत कुमार, पेालीस अधीक्षक मो. सुवेझ हक आदी उपस्थित होते. दवाखान्यात उपचारासाठी दाखल असलेल्या शहीद दुर्योधन नाकतोडे यांच्या पत्नीशीही गृहमंत्र्यांनी संवाद साधला. उपचारादरम्यान कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्यास जिल्हा पोलीस प्रशासन शहीद कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे. तसचे शहीद कुटुंबाला दिला जाणारा सर्व मोबदला सर्व शहिदांच्या कुटुंबीयांना दिला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. प्रथम ज्याठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी जाऊन पालकमंत्र्यांनी पाहणी केली. त्यावेळी प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.