बाबा आमटे नेहेमी म्हणत, “आनंदवन हे समृद्धीचे बेट होऊ नये; आनंदवनाच्या कार्याचा उपयोग समाजातल्या इतर वंचित घटकांच्या विकासासाठी झाला पाहिजे”. याच प्रेरणेतून सुरु झालेल्या ‘आनंदवन समाजभान अभियान’ या ‘आऊटरिच इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून गावखेड्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधात असतांना असे लक्षात आले की, इतर समस्यांसोबत ‘पाण्याची’ समस्या प्रत्येक ठिकाणी ‘सामायिक’ आहे. या समस्येचे मूळ नेमके कशात आहे? याचा शोध घेतांना आम्ही अग्रगण्य भूजलतज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या ‘ॲक्वाडॅम’ या पुणेस्थित स्वयंसेवी संस्थेच्या संपर्कात आलो. ‘ॲक्वाडॅम’च्या मार्गदर्शनातून ध्यानात आले की, पाणी समस्येचे खरे मूळ खालील गोष्टींमध्ये दडले आहे –
१.भूजल’ ही ‘वैयक्तीक मालमत्ता’ नसून ‘सामूहिक संसाधन’ आहे याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत सुरु असलेला अतिरेकी आणि अनिर्बंध भूजल उपसा
२.भूजलविज्ञानाचा दाखला न घेता राबवले जाणारे पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रम
हा विषय प्राथमिकतेने आणि त्वरेने हाताळणे गरजेचे आहे याची जाणीव आम्हाला झाली. या संदर्भात काम करू इच्छिणाऱ्या मंडळींसाठी २१ आणि २२ नोव्हेंबर असे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर ‘आनंदवन’ मध्ये ‘ॲक्वाडॅम’ मार्फ़त आयोजित करण्यात येत आहे. सदर शिबिरास रोहिणी निलेकणी यांच्या ‘अर्घ्यम’ या स्वयंसेवी संस्थेचेही पाठबळ आहे.
भूजल व्यवस्थापनाचे काम आपापल्या भागात राबवू इच्छिणाऱ्या व्यक्तिंनी / संस्था प्रमुखांनी / प्रतिनिधिंनी सदर शिबिरात सहभागी होण्यासाठी माझ्याशी संपर्क साधावा, ही विनंती.
कौस्तुभ विकास आमटे
9922550006