সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, March 31, 2010

chandrapur,   mahakali,   vidarbha

chandrapur, mahakali, vidarbha

लाखो भाविक झाले महाकालीला नतमस्तक
March 31, 2010 AT 12:30 AM (IST)
चंद्रपूर - गत दहा दिवसांपासून सुरू असलेल्या देवी महाकाली यात्रेच्या मुख्य पूजेला मराठवाडा, विदर्भ, आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांनी हजेरी लावत दर्शन घेतले. चंद्रपूरनगरीचे आराध्य दैवत देवी महाकालीची मुख्य पूजा पहाटे साडेसहाच्या सुमारास मंदिराचे मुख्य व्यवस्थापक विजयराव नामदेव महाकाले यांच्या हस्ते झाली.

महाकाली ही विदर्भातील अष्टशक्ती पीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात भरते. मंदिराची स्थापना राणी हिराईच्या काळात झाली. 1905-06च्या आसपास नांदेड जिल्ह्यातील तळेगाव उमरी येथील राजाबाई देवकरीणच्या स्वप्नात देवी महाकाली गेली होती. देवकरीण जत्था घेऊन देवीच्या दर्शनासाठी चंद्रपुरात आली. तेव्हापासून येथे यात्रेला सुरवात झाली. अडीचशे वर्षांपासून सुरू असलेल्या यात्रेत नांदेड, परभणी, उस्मानाबाद, महू आणि आंध्रप्रदेशातील भक्त मोठ्या संख्येने येतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हिंदू नववर्षाच्या सुरवातीलाच म्हणजे 16 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या पर्वावर महाकाली यात्रेनिमित्त मंडपपूजन करण्यात आले. तेव्हापासूनच येथे यात्रेचे स्वरूप आले आहे. यंदा 21 मार्च रोजी देवीला नयनाभिराज साजश्रुंगार केल्यानंतर विधिवत पूजा करून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यात्रेच्या नऊ दिवसांत देवी व्रतस्थ असते. वरण, भात, पोळी असा नेवैद्य देवीला दिला जातो. चैत्र शुल्क षष्ठी ते पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या यात्रेला यंदा लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. आज (ता. 30) मूख्य पूजेचा दिवस होता. पौर्णिमेच्या पहाटे साडेसहाच्या सुमारास मंदिराचे मुख्य व्यवस्थापक विजयराव नामदेव महाकाले यांनी पुजाऱ्यांच्या उपस्थितीत देवीचे स्नान करून नववस्त्र परिधान केले. नयनाभिराज साजश्रुंगार चढविल्यानंतर पूजा, आरती करण्यात आली. या यात्रेचा समारोप चार एप्रिल रोजी होणार असून, रामनवमी ते हनुमान जयंती काळात भाविकांनी मोठ्या संख्येने देवीचे दर्शन घेतले.

आंध्रप्रदेश, नांदेड, लातूर, जालना, उस्मानाबाद, परभणी, कोल्हापूर, सोलापूर आणि विदर्भाच्या कानाकोपऱ्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. यंदा दोन लाखांच्या आसपास भाविकांची संख्या लक्षात घेऊन सोय करण्यात आली होती. भाविकांना उन्हापासून त्रास कमी व्हावा, यासाठी मंदिराच्या मागील परिसरात मंडप उभारण्यात आले. शिवाय फिक्रलिंकच्या माध्यमातून पाण्याचे फवारे सोडण्यात आले. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने दीड लाख भाविकांसाठी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली. यात्रा काळात भाविकांच्या सेवेसाठी विविध दुकाने सजली आहेत. देवीचा साजश्रुंगार, चादर, पूजेचे साहित्य, मिठाई आणि फोटोची दुकानेही येथे लागली आहेत. शिवाय मुख्य मार्गावर खेळणी, खाद्यपदार्थ, शीतपेयांची दुकानेही लागली आहेत. गेल्या 10 दिवसांपासून डफरीच्या तालावर पोतराजे महाकाली देवीचे गोडवे गात आहेत. अनेकांनी देवीला बोलल्याप्रमाणे नवसही फेडले. एकूणच चंद्रपूर शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे.

Thursday, March 25, 2010

पालावरचं जिणं- अशोक पवार

पालावरचं जिणं- अशोक पवार

पालावरचं जिणं

गावखोरी पालं उतरली की सरपंच-पाटलाजवळ मुसाफिरी लिहून देयाची. एका गावात तीन दिवसांचे वर राह्यला मुभा नसायाची. कोंबडं, बकरू दिलं की कसं तरी आठ-पंधरा दिवस ब्लॅकने राहाता यायाचं. पालाला पोलिसाचं मात्र खूपच भेव. आजूबाजूला कोठेही चोरी झाली की, पोलिसांची धाड येऊन पडायाची.. यावेळी ‘वाडीवस्ती’त पालावरचे अनुभव सांगत आहेत ‘बिराड’कार अशोक पवार.

भटक्याच्या जगात लक्ष्मण बेलदाराच्या पालात माझा जन्म झाला. माझा बा दगड-मातीने लोकांची घरं बांधून देण्याचा धंदा करायचा. घरासाठी दगडं खूप फोडायचा. ही दगडं माळातून माझी माय पुतळाबाई गाढवाईच्या पाठीवर वाहून गावात कामाच्या जागी आनायाची.


आमच्या बापजाद्यांनी असी आयुष्यभर लोकांची खूप घरं बांधून दिली. लोकांची सेवा केली. स्वत: मात्र बेघरच राहिले. हे मला पडलेलं न उलगडणारं कोडं. माझा बाप तर म्हणायचा, ताजमहल, राजेरजवाडय़ांचे किल्लेसुद्धा आम्ही भटक्या लोकांनीच उभे केले. शेवटी आमच्या वाटय़ाला काय आलं? मजल-दरमजल गाढवाच्या पाठीवर ‘बिराड’ लादून पोटासाठी बोंबलत हिंडने.


काम लागलं त्या गावाला आमचं बिराड जायाचं. गावनांदरीत ‘बिराड’ उतरायचं. दोन बेळ्या रोवून आडवा बासडा बांधायचा. यावरून पाल तानायचं की झालं आमचं घर. भटके लोक एकटे बिराड घेऊन कवाच फिरत नाहीत. दोन-चार बिराडं बारहामीस सोबत राहतातच. तसं आमची दोन-चार बिराडं संगच राह्यची. त्या गावातलं काम झालं की, बिराडं निगायाची दुस-या गावाला कामाच्या शोधात.


गाढवं राखता राखता माझं बालपण जाऊ लागलं. रपाड रानात आम्ही पोरं-पोरी ‘डाबडुब’ लपना-छपनी, नवरा-बायकोचा खेळ खेळायचो. कवा कवा चोर-पोलिसांचाखेळ खेळायचो. मी एकटाच चोर नि समदी पोलिस होऊन कवा-कवा माझ्या मागे लागायाचे. मी कवाच सापडायचो नाही. कवा कवा पालावरची बुजुर्ग मंडळीही आमचा चोर-पोलिसांचा खेळ बघायाची. चोर असावा तर मह्यावानी म्हणायाची. मला नवाजायाची.


आश्राया देवीचा नावकरी म्हणून मी जलमल्यावर देवाला नवस केलेला. माझं नाव ‘आश्रुबा’ मायबापान आवडीने ठेवलेलं. ही पालं आन् ही बिराडं. एवढीच आपली दुनिया हाय. याच्या पलीकडे जगच न्हाय, असं मला वाटायाचं. मी आपल्याच दुनियेत मश्गुल होतो.


मालेगाव, ता. जिंतुर, जि. परभणी नावाचं एक छोटं गाव. त्या गावात बाबानं विहीर बांधायाचं काम घेतलं होतं. गावखोरी आमचं ‘बिराड’ उतरलं तवा मी तेरा-चौदा वर्साचा असन. खुशाल गाढवं राखायाचो. जवळच शाळा होती. चौथीपर्यंत असेल. शाळेत एक मास्तर व मास्तरीन होते. ते जेवायला विहिरीवर यायाचे. दुपारचं जेवायला विहिरीवर आल्यावर मी त्यांच्या आवती-भवती हिंडायाचो. ते कोर फुटका देयाचे. त्यांच्या भाकरीला चव वाटायाची. आपली बेचव जिंदगी घेऊन रोजच दुपारी ते जेवायला आल्यावर त्यांच्या भौती मी कोर फुटक्यासाठी घुटमळायाचो.


एक दिवस मास्तर आन् मास्तरीनच्या मनात काय आलं की, ते सकाळी - सकाळी डायरेक्ट पालावर आले. बाबानं बसायला गोधडी टाकली. मायनं तीन दगडांच्या चुलीवर चहा बनवला. त्याहीनं घोट घोट चहा घेतला. पालावर पहिल्यांदा चहा पेणारे मास्तर आन् मास्तरीन हे पहिलेच लोक मी बघितले. त्याहीनं आईला समजून सांगितलं. आश्रुबाला शाळेत पाठवा म्हणाले.


दुस-या दिवशी लाजत लाजत मी शाळेत गेलो. शाळेत सगळय़ात मोठा मी पहिलीत बसलो. समदी मुलं-मुली मला हसत होती. पहिल्या दिवशी काहीच समजलं नाही; पण मास्तरानं सांगितल होतं शिकून सायब होशील.


मग मी आभ्यास करू लागलो. अबकडपासून उजळनी व पुस्तकतेनं वाचता येऊ लागलं. मास्तर, मास्तरीन नवाजत होते.


मग मास्तरांनी सहाच महिन्यांत सर्व नियम धाब्यावर बसवून माझं नाव एकदम चौथीत टाकलं. त्यांच्या या नियम मोडण्याच्या शौर्यामुळेच मी आश्रुबा पवारचा अशोक पवार झालो. नसता या पालवाल्याच्या जगात आनखीन एक पालं मांडून आयुष्यभर नरकयातना भोगत बसलो असतो.


पालात कशाचा आला लाइट? उजेडासाठी रॉकेलची चिमनी लावायचो. रात्री त्याच चिमनीवर आभ्यास करायाचो. वा-यानं विझू नये म्हणून भगोन्यात ठेवायाचो. जिकडून वारा आला त्याच्या विरुद्ध दिशेने भगुन्याचं तोंड करायाचो. जिवापाड आभ्यास करायाचो. अशातच चौथीची परीक्षा आली. बोर्डाची परीक्षा दिली. त्या गावातलं काम संपलं. बिराड दुस-या गावाला आलं. बाबानं गावनांदरीत पाल उभा केला. माझं मन लागायचं नाही. झाडावर आश्रुबा पवार असं नाव दगडाच्या चिपीन काढायाचो. मोठ्या दगडावर दगडानं नाव कोरायाचो. गाढवं वळायचो. काम नसलं की गावात हिंडायाचो. फाटका-फुटका कागद पडलेला दिसला की, उचलायाचो. जीव लावून वाचायाचो. हॉटेलची, दुकानाची नेम बोर्ड वाचायाचो.


पावसाळा सुरू झाला. शाळा सुरू झाल्या. मास्तराचे शब्द आठवले. शिकून सायब होयाचं. मला शाळेत धाड म्हणून मग बापाच्या मागे तगादा लावला. बाप शाळा शिकू नको म्हनायाचा. गाढवं वळ. हाताखाली काम कर म्हनायचा. मी मात्र शाळेत जायाचा घोशाच धरला. मायनं बापाला समजून सांगितलं. आन मी शाळेत जायाला तयार झालो. बाबाबी मला शाळेत पाठवायला राजी झाला. मास्तरानं समजावून सांगितलं. मग मी वसतिगृहात दाखल होऊन शिकू लागलो. शाळा आडगाव, ता. जिंतुर, जि. परभणी येथे.

उन्हाळ्याच्या आन् दिवाळीच्या सुट्टय़ांत मायबापाचा पाल हुडकत मी बिराडावर जायाचो. राह्याचो. मर मर राबूनही हाता-तोंडाची गाठ पडायची नाही. कवा-कवा कामच लागायचं नाही. माझे भाऊ आन् बहिणी आईसंग गावात भीक मागायला जायाचे. थंड पाण्यावर कवा कवा आलेला दिवस पुढे ढकलायाचे. माझ्या मायबापाच्या हाडाचे सापळे बघून जीव तीळ-तीळ तुटायाचा; पण माझ्या हातात काहीच नव्हतं. मी काय करणार, गुपचिप सहन करणं एवढंच माझ्या हातात होतं. या उपाशी राहण्यापेक्षा, भीक मागण्यापेक्षा शाळा बरी वाटायची. निदान वसतिगृहात भाकर तरी मिळते. पुन्हा मी शाळेत यायचो. नव्या जोमानं अभ्यास करायाचो.वीस-पंचवीस खेडय़ांतली मुलं-मुली आडगावच्या शाळेत यायाची. परिचय विचारताना मास्तर नाव-गाव विचारायचे. माझं तर विंचवाचं बिराड पाठीवर. मी कोनतं गाव सांगणार? मी भटक्या जमातीचा आहे. मला गाव नाही. असं सांगायची ताकद त्या वेळेस माझ्यात नव्हती. प्रत्येकाला घर आहे, गाव आहे. आपल्यालाही गाव असावं, घर असावं. खूप भारी नको, पण झोपडी तरी असावी. आपल्या मायबापांनी स्थायिक राहावं, असं मला मनोमन वाटायचं. पण भारतीय समाज व्यवस्थेने व शासनाने भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या पाठीवर लादलेलं अथांग वेदनांचं ओझं म्हणजे बिराड सुटायालाच तयार नाही. मग आपल्याला वाटून उपयोग काय असणार?
पालं म्हणजे आमचं घर. पाल नवा घेतला की दोनेकर्वष टिकायाचा. ऊन, वारा, पाऊस आन् थंडीपासून तो आमचं संरक्षण करायाचा. मला नेहमी या पालाचं आकर्षण वाटायाचं. एक डाव बाबा जवळ पैसा जमला नाही. जुनाच पाल थेगळी लावून, शिवून तेनं उभा केला. पावसाळय़ाचे दिवस होते. पाण्याचा फवारा लागू लागला. पाल जागोजाग गळू लागला. गळते त्या जागी ताट, तांब्या, वाटी तेन आम्ही ठेवायचो. पाऊस आला की आम्ही सहा बहीण भावंडं, आजोबा, बाबा, माय तेन आडवे-तिडवे निजुन रात काढायाचो. याचा पाय त्याच्या पायात जायाचा. त्याचा पाय याच्या पायात यायाचा. दिवसभर गोधडे पांघरून खुंड मुंड होऊन बसायाचो. उन्हाळ्याच्या दिवसात भीक मागून, आनलेलं अनाज उरायाचं. ते वाळू घालून थैल्या भरून ठेवायाचो. ते या दिवसात काढायाचो. खलबत्त्यात कुटून खायाचो.


एक दिवस आमची ‘बिराड’ केळी गावच्या नांदरीत होती. सुसाट वारा व झुंईझप पाऊस सुरू झाला. पालं टराटर फाटून गेली. गुडघ्याइतकं पाणी बिराडावरून वाहू लागलं. आम्ही जीव वाचवून माता माईच्या देवळात आलो. पाऊस जावस्तोर दोन दिवस तिथं थांबलो. पाऊस गेला. वारा थांबला. धावत वापस आलो. पालाच्या चिंधडय़ा झालेल्या. आमचा तवा नवाच पाल होता. बाबा धडधडा रडायला लागला. माय दोन दिवस जेवली नाही. तसेच आम्ही वाहून गेलेले भांडे गोळा केले. आर्धे निम्मेच सापडले होते. पुन्हा नव्यानं काम करून बाबानं पाल घेतला. संसार उभा केला.


गावखोरी पालं उतरली की सरपंच-पाटलाजवळ मुसाफिरी लिहून देयाची. एका गावात तीन दिवसांचे वर राह्यला मुभा नसायाची. कोंबडं, बकरू दिलं की कसं तरी आठ-पंधरा दिवस ब्लॅकने राहाता यायाचं. पालाला पोलिसाचं मात्र खूपच भेव. आजूबाजूला कोठेही चोरी झाली की, पोलिसांची धाड येऊन पडायाची. लेकराबाळांसकट समद्याला बदडायाचे. गाडीत टाकून पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जायाचे. न केलेल्या गुन्ह्यांत आडकवायाचे.


तसं पोलिस शाळेत यायचे. मला उचलून घेऊन जायाचे. फलान्या बिस्तान्याचं बिराड दाखव म्हणायाचे. खायाला चॉकलेट देयाचे. सातवी-आठवीपासूनच मी पोलिसाचा दोस्त झालातो. एक डाव माझ्या बापाचा पत्ता त्याहीनं विचारला. मध्यरात्री मी दाखवला. जेवारीचे कणसं चोरल्याचा गुन्हा बाबावर होता. चांदण्या राती पोलिस माझ्या बाबाला एवढं मारू लागले. मव्हा बाप कुत-यावानी आरडत होता. माझं काळीज जळून खाक झालं. मी जाऊन बाबाच्या आंगावर पाडलो. मलाभी खूप ठोकलं. पाठ फोडून काढली. शाळेतभी समदी पोरं मला चोर चोर म्हणून चिडवायाची. पुढं मी पोलिसानी नेलं की जायाचो. पण पाल दाखवायाचो नाही. इकडं-तिकडं फिरवत राह्याचो. पोलिसांची दिशाभूल करायचो. पोलिस मारायाचे. येथून माझ्या मार खाण्याला प्रारंभ झाला. आज माझ्या पाठीत गाठी आहेत. काही ऑप्रेशन करून माझ्या डॉक्टर मित्रांनी काढल्या.


कसा तरी दहावी पास झालो. डीएडला नंबर लागला. अर्धवट डीएड सुटलं. लग्न केलं. बिराडवाल्याच्या जगात पाल मांडला. करू लागलो रोज मजुरी. न संपणारी जिवनाची ससेहोलपट स्वीकारून. भुरट्या चो-या करायला जायाचो. सोबत्यासंग बंब देशी दारू पेयाचो. इकडं लोक चोर समाजायाचे. आम्हाला घर बांधायाचे काम लोक देईना. उपासी मरायाची पाळी आली. घेतलं डोक्यावर बिराड. बसलो रेल्वेत. आलो मुंबईला. ठाणे जिल्ह्यातील वाड्याजवळ कुडुसला रोडाचं काम चालू होतं. आम्ही रोडवर डांबर टाकायाचं काम करू लागलो. पैसा मिळायाचा. पण दोन दिवस काम चालायाचं. चार दिवस बंद राह्याचं. पुढची-मागची बरोबरी होयाची. हातात एक पैसा टिकायाचा नाही. रोडच्या काठाला आमची पालं होती. बाकीच्यांची लहान लहान मुलं बाळं घर राखायला राह्याची. आमचं कोणीच नव्हतं. दिवसभर काम करून संध्याकाळी पालावर गेला की, पालाचा धिंगाना होयाचा. कुतरे-डुकरं समदा पसारा अस्तव्यस्त करायाचे. काय करावं काही सुधारायाचं नाही.


एक दिवस खूप वादळ-वारा, पाऊस सुरू झाला. पालं उडून गेली. आम्हाला जीव वाचवनं आवघड झालं. जो तो आपला जीव घेऊन आस-याच्या शोधात पळाला. मी व ती एका टोलेजंग बंद दार असलेल्या भितीच्या आडोशाला येऊन उभं राहिलो. त्या दिवशी माझ्या डोक्यात विचार आला की, ही माणसं टोलजंग इमारतीत राहतात. लोकांना घरदार आहेत. आपल्याला घरदार का नाही. पाऊस संपला. पुन्हा नवी पाल उभी केली.

मग हळूहळू पुस्तकाकडे वळलो. दारू दूर झाली. पुस्तकं आयुष्यात आली. वाचन सुरू झालं. पुन्हा मुंबई सोडून मराठवाड्यात आलो. आडगावच्या गावखोरी जागा धरली. रोज मजुरी करून जगू लागलो. त्याचबरोबर भटक्या विमुक्तांसाठी काम करू लागलो. आम्ही स्थायिक होण्यासाठी पाच-सात झोपड्या उभ्या केल्या.
एक दिवस तेथे सरकारी दवाखान्याची इमारत उभी करायाची म्हणून गावगुंडांनी आमच्या झोपड्या तोडल्या. आमचं घरटं आमच्या डोळ्यादेखत विस्कटलं. खूप प्रयत्न करूनही झोपडी वाचविता आली नाही. आयुष्यात एक झोपडी या स्वतंत्र देशाच्या मातीत उभी करू शकलो नाही, याचं शल्य कायम मनात आहे. आता तुम्हाला मी माझं कोनता गाव सांगू. प्रत्येक गाव मला माझंच गाव वाटतं. ‘बिराड’ नावाचं आत्मकथन मी पालातच लिहिलं.


पहिली आवृत्ती प्रकाशित झाली तवा मी वर्तमानपत्रवाल्यांकडे बातम्या देयाला गेलो नाही. लोकनाथ यशवंत यांना पुस्तक पाठविलं होतं. ज्याच्या कविता मला आवडायाच्या ते लोकनाथ यशवंत, सुनील यावलीकर बिराडावर येऊन गेले. मी, किशोर काळेनी, प्रा. विलास पाटील यांनी पालावर रात्री काढल्या. बंब मासे शिजवून खाल्ले. आता माझे खूप मित्र आहेत. ना. विजयभाऊ बोट्टीवार माझ्या घरी येत राहतात. चर्चेत आम्ही जिवनाचा खूप आनंद घेतो.


‘बिराड’नंतर माझी ‘इळनमाळ’ कादंबरी प्रकाशित झाली. ‘बिराड’ व ‘इळनमाळ’ कादंबरीच्या लेखनासाठी राष्ट्रीय पातळीवरचा दिल्लीच्या ‘संस्कृती प्रतिष्ठान’चा ‘संस्कृती’ पुरस्कार मला मिळाला. नुकतीच पारध्यांच्या व्यथा-वेदना मांडणारी ‘दरकोस दर मुक्काम’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. या लेखनामुळे भालचंद्र नेमाडेंपर्यंत समद्यांशी माझी मैत्री आहे. आता मी छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहतो. दोन वेळेची भाकर मिळते; पण खूप काही राहून गेलं, असं वाटतं. अस्वस्थ होतो. हातात लेखनी घेतो नि लिहत राहतो.


मी बालपणापासून वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत मराठवाड्याच्या मातीत राहिलो. खूप दु:खाच्या अनेक घटना याच मातीत घडल्या तरी मला या मातीबद्दल आकर्षण वाटतं. मी मागे प्रा. विलास पाटलांना भेटायला गेलो होतो. तिथल्या एका गावात पूर्वी आमचं बिराड होतं. तेथे आता वडाचं झाड आहे. त्या झाडाखाली दोन दिवस बसलो. ज्या मातीत लोळलो, ती माती कपाळाला लावून घेतली. मनसोक्त रडलो. उठलो आन् पाटलांचा निरोप घेऊन प्रवासाला सुरुवात केली. पुस्तक वाचल्यावर समजेलच भटक्यांच्या जीवनात पालाला किती महत्त्व आहे ते!

Saturday, March 20, 2010

चंद्रपूर तापू लागलाय; पारा 40 अंशावर

चंद्रपूर तापू लागलाय; पारा 40 अंशावर

चंद्रपूर-मार्च महिन्याला सुरवात होत नाही तोच उष्णतेचे चटके बसू लागले असून, तापमापीच्या पाऱ्याने 40 अंशांची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे दुपारी साडेबारा ते चारपर्यंत शहरी रस्त्यावरील वाहतूक कमी होऊ लागली आहे.

कोळसा खाणी, महाऔष्णिक वीज केंद्र, सिमेंट उद्योग यामुळे चंद्रपूरचे तापमान नेहमीच जास्त असते. नेहमी वर्दळीमुळे ऐन दुपारी वाहतूक व्यवस्था विस्कळित करणाऱ्या चंद्रपूरच्या रस्त्यावर एप्रिल-मे महिन्यात दरवर्षी अघोषित संचारबंदीसदृश परिस्थिती निर्माण होत असते. देशातील अतिउष्ण शहरांमध्ये समावेश असलेल्या चंद्रपूरने मागील वर्षी 47 अंशापर्यंत पातळी गाठली होती. यंदा गत आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा जाणवायला लागला आहे. मागील दोन दिवसांपासून रस्त्यावरील गर्दी कमी होऊ लागली आहे. मागील वर्षी ब्रह्मपुरीत सर्वाधिक तापमानाची नोंद 10 मे रोजी 46.3 अंश सेल्सिअस झाली होती, तर चंद्रपूर शहरात 30 एप्रिल रोजी 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. 2009चा पावसाळा धोकादायक गेल्यानंतर हिवाळ्यात पाहिजे तशी थंडी पडली नाही.

त्यामुळे उन्हाळा चांगलाच तापण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आठवडाभरापासून शहराचे तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस अंशापर्यंत असते. लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाही दुकानांत गर्दी दिसत नाही. यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे. दररोजचे भारनियमन, पाणीटंचाई आणि त्यात ऊन यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील विहिरी आटल्या असून, नळाला पाणी येणेही बंद झाले आहे. लस्सी, कोल्ड्रिंक्‍स, लिंबूसरबत, उसाचा रस, आंब्याचे पन्हे, ताक आदी शीतपेयांची विक्री होऊ लागली आहे. उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने फ्रीज, कूलर, पंखे आणि थंड पाण्याच्या माठांची विक्री होत असते. या साहित्यांच्या खरेदीसाठीही शहरी नागरिक धाव घेत आहेत

Wednesday, March 17, 2010

भाववाढीने लस्सीही महागली

भाववाढीने लस्सीही महागली

चंद्रपूर - दूध आणि साखरेच्या भाववाढीमुळे सकाळच्या चहाची चव कडू झाल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेच्या दाहकतेला कमी करण्यासाठी मागणी असलेली लस्सीही महागली आहे. साखर 40 रुपये किलो, तर दूध 30 रुपये लिटर झाल्याने लस्सीचा ग्लास 20 रुपयांपर्यंत पोचला आहे.

मकरसंक्रांत संपली आणि सूर्याची तप्त किरणे आग ओकू लागली आहेत. रंगपंचमीपासून त्याची तीव्रता आणखीनच वाढू लागली आहे. या उन्हाळ्याच्या दिवसांत रोजगार मिळविणारी शहरातील शीतपेयांची दुकाने सजली आहेत. मात्र, यंदा महागाईचा फटका बसत आहे. यंदा साखर आणि दुग्धजन्य पदार्थांचे दर आभाळाला पोचले आहेत. त्यामुळे त्यापासून तयार होणारी थंड आणि गरम पेय महागली आहेत. चहाच्या कपाचे दर चार ते सहा रुपयांपर्यंत गेल्यानंतर अनेकांची जीभ कडू झाली. आता उन्हाळ्याच्या दिवसांत ही रक्कम थंडपेयांच्या माध्यमातून वसूल होणार आहे. चंद्रपूर शहरात गांधी चौक, श्रीकृष्ण टॉकीज, जटपुरा गेट येथील लस्सी प्रसिद्ध आहे. मात्र, येथील दर ग्लासाच्या आकारानुसार वेगवेगळे आहेत. गांधी चौकात 10 आणि 15 रुपये ग्लास, श्रीकृष्ण टॉकीजसमोर 20 ते 25 रुपये, तर जटपुरा गेट परिसरात 12 ते 18 रुपये ग्लास असे दर आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत पाच रुपयांनी भाववाढ झालेली दिसून येते. दुधाची वाढती टंचाई आणि भाववाढीमुळे दही महागले आहे. शिवाय दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीही वाढत आहेत. याशिवाय बर्फाच्या किमती वाढत आहेत. बर्फाची एक लादी 300 रुपयांची असल्याने एका तुकड्याची किंमत 30 रुपये मोजावी लागत आहे.