সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 29, 2011

मराठी साहित्य संमेलनस्थळी साकारणार गोंडकालीन वैभव

मराठी साहित्य संमेलनस्थळी साकारणार गोंडकालीन वैभव

चंद्रपूर - फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलेल्या 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळी गोंडकालीन वैभवाचे दर्शन घडविण्यात येणार आहे. चारही परकोट आणि महत्त्वपूर्ण वास्तूंच्या प्रतिकृती साकारण्यात येतील.
येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन होत असून, मुख्य संमेलनस्थळाला "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरी' असे नाव देण्यात येणार आहे. शहराच्या रचनेनुसार प्रवेशाच्या ठिकाणी चार दिशांना चार प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत. मुख्य प्रवेशद्वारास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव राहणार असून, अन्य प्रवेशद्वारांना लोकनेते दादासाहेब देवतळे, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हापरिषदेचे पहिले अध्यक्ष तथा माजी खासदार अब्दुल शफी यांचे नाव देण्यात येणार आहे.
मुख्य सभामंडपास महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री लोकनेते मा. सा. ऊर्फ दादासाहेब कन्नमवार यांचे नाव देण्यात येणार असून, मंडपाच्या दोन्ही द्वारांना दिवंगत राज्यमंत्री वामनराव गड्डमवार व दिवंगत आमदार नामदेवराव पोरेड्डीवार, तर दुसऱ्या सभामंडपास श्रीमती लताबेन छोटूभाई पटेल यांचे नाव देण्यात येणार आहे.
मुख्य सभामंडपाच्या व्यासपीठास 1857 नंतर गोंडवनातील स्वातंत्र्यसमराचे अग्रणी वीर बाबूराव शेडमाके यांचे नाव देण्यात येणार आहे. 1979 साली चंद्रपुरात संपन्न झालेल्या 53 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठास वीर बाबूराव शेडमाके यांचेच नाव देण्यात आले होते, हे विशेष!
संमेलनात ग्रंथप्रदर्शन प्रमुख आकर्षण असून, त्याला दिवंगत कवयित्री श्रीमती कमलादेवी दीक्षित यांचे नाव देण्यात येणार आहे. पत्रकार दालनास अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष विद्यावाचस्पती राम शेवाळकर यांचे नाव, भोजन दालनास दिवंगत नगराध्यक्ष राजमलजी पुगलिया यांचे नाव, कवी कट्ट्यास दिवंगत राज्यमंत्री यशोधरा बजाज यांचे, तर प्रकाशन कट्ट्यास दिवंगत राजे विश्‍वेश्‍वरराव महाराज यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाच्या आयोजन समितीतर्फे देण्यात आली आहे.

Wednesday, December 21, 2011

विकास आमटे यांना चंद्रपूर भूषण

विकास आमटे यांना चंद्रपूर भूषण

आनंदवन - वरोरा ( चंद्रपूर) , महारोगी सेवा समितीचे सचिव विकास आमटे यांना यंदाचा चंद्रपूर भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आत्मसन्मानाचा हुंकार जागवून त्यांना जगण्याचे नवे बळ देणारे बाबा आमटे आता आपल्यात नाहीत. पण त्यांची स्वप्ने, त्यांनी दिलेली प्रेरणा आजही विकास आमटे पुढे नेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना नाशिक येथे केसरी टूर तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला. चंद्रपूर भूषण पुरस्कार येत्या १ जानेवारीला समाज सेविका मेधा पाटकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येईल.


Friday, December 09, 2011

जन्मदिनाच्या आनंदावर मृत्यूची छाया

जन्मदिनाच्या आनंदावर मृत्यूची छाया

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
गोंदिया - एक डिसेंबर रोजी मनोज बिंझाडे यांचा 31 वा वाढदिवस होता. पत्नीने सकाळीच फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पोलिस सेवेत यश येवो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थनाही केली. मात्र, नियतीला त्यांच्या जन्मदिनाचा आनंद मान्य नव्हता. अवघ्या दोन-तीन तासांतच पुन्हा फोन खणखणला आणि पोलिस ठाण्यातून आलेल्या निरोपाने सर्वांच्या काळजाचे तुकडे झाले. मनोज शहीद झाल्याची बातमी कानावर पडली अन्‌ पत्नी अरुणासह कुटुंबीयांनी हंबरडाच फोडला.



देवरी तालुक्‍यातील धमदीटोला-गणूटोलाजवळील जंगलात माओवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मनोज आत्माराम बिंझाडे (वय 31) हा जवान गुरुवारी शहीद झाला. मनोज मूळचे गोंदिया तालुक्‍यातील चांदणीटोला येथील रहिवासी होते. चांदणीटोला हे गाव गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. चार वर्षांपूर्वी मनोज पोलिस सेवेत दाखल झाले. कवलेवाडा येथील अरुणासोबत त्यांनी काही वर्षांपूर्वीच विवाह केला होता. वडील आत्माराम बिंझाडे हे पोलिस मुख्यालयाच्या शेजारीच चप्पल दुरुस्तीचे काम करतात. आई आणि अन्य दोन भावंडे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा जन्म एक डिसेंबर 1980 रोजी झाला. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या मनोजला वायरिंग, जनरेटरचे काम अवगत होते. 29 सप्टेंबर 2007 मध्ये ते गोंदिया पोलिस दलात रुजू झाले. 26 मार्च 2010 रोजी सशस्त्र दूरक्षेत्र गणूटोला येथे नेमणूक झाली. नक्षलविरोधी अभियानात ते उत्कृष्ट दर्जाचे पायलट म्हणून कर्तव्य बजावत होते. बुधवारी (ता. 30) मनोज गावी येऊन गेले. तेथून कवलेवाडा येथे सासरीही गेले. दुसऱ्याच दिवशी एक डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसानिमित्त रजा घ्या, अशी विनंती पत्नी अरुणाने केली. मात्र, ड्यूटीमुळे त्यांना थांबता आले नाही. गुरुवारी वाढदिवसानिमित्त पत्नीने मनोजला फोन केला. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आई आणि वडिलांसोबतही ते बोलले. आपली खुशाली कळविली. मी लवकरच रजा घेऊन गावाकडे येईन, असे आश्‍वासन देत त्यांनी फोन ठेवला. वाढदिवसानिमित्त सर्वत्र आनंद असताना त्याच दिवशी काही विपरीत घडेल, असे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. मात्र, नियतीने आपला खेळ अखेर खेळला. देवरी तालुक्‍यातील गणूटोला येथील आउटपोस्ट चौकीवर कार्यरत मनोज आणि त्यांचे सहकारी शाळेवर लावलेले नक्षलपत्रक काढण्यासाठी गेले होते. यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यात ते जागीच शहीद झाले. या घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात देण्यात आली. ही दु:खद बातमी कानी पडल्यानंतर शहरापासून जवळच राहणाऱ्या चांदणीटोला येथील कुटुंबीयांना धक्काच बसला. मनोजच्या मागे पत्नी अरुणा (वय 25), आई मेहतरीन (वय 50), वडील आत्माराम (वय 55), मोठा भाऊ मयनलाल, लहानभाऊ चैनलाल, विवाहित बहीण सत्यशीला तरवरे असा परिवार आहे.



वडिलांचे स्वप्न

शहीद मनोजचे वडील आत्माराम बिंझाडे हे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या शेजारी चप्पल दुरुस्तीचे काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते खाकीवर्दीतील पोलिसांच्या बुटांना पॉलिश करताना आपलाही मुलगा पोलिस व्हावा, असे त्यांना वाटायचे. मनोजने ते स्वप्न पूर्ण केले. मात्र, बुटांना पॉलिश करीत असतानाच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून मनोज शहीद झाल्याची बातमी कानावर पडली आणि वृद्ध वडिलाच्या काळजाचे तुकडेच झाले. संबंधित बातम्या

गोंदिया जिल्ह्यात पोलिस-माओवाद्यांत चकमक
पोलिस चकमकीत दोन माओवादी ठार
मशानझुरवाच्या जंगलात पोलिस-माओवादी चकमक
खोटी माहिती देऊन साधला गेम
पोलिस- माओवाद्यांच्या चकमकीत एक जवान शहीद, पाच गंभीर



प्रतिक्रिया

On 03/12/2011 09:57 AM amit babhulkar said:

देशासाठी शहीद झालेल्या मनोज बिझांडे यांना सलाम वंदे मातरम

 
manoj binzade
गोंदिया जिल्ह्यात विशेष पथकाचे छापे

गोंदिया जिल्ह्यात विशेष पथकाचे छापे

सकाळ वृत्तसेवा
Tags: gondia, illegal business, vidarbha

गोंदिया - अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वात मागील पाच महिन्यांपासून कार्यरत विशेष पथकाने मोठी कामगिरी केली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वात 12 कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने नोव्हेंबर महिन्यात मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत. अवैध दारू, जुगार, वाळूचोरी, प्राण्यांची विक्री अशा सामाजिक गुन्ह्यांच्या संबंधित गैरप्रकारांवर आळा बसत असल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात तीन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे घालून पंचवीस आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख 43 हजार 465 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. गायत्रीनगर येथे आठ जणांना अटक करून 38 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. डांगोर्ली येथे आठ जुगाऱ्यांकडून दुचाकीसह 96 हजार रुपयांचा माल, एकोडी येथे नऊ आरोपींना अटक करण्यात आली.
जिल्ह्यात अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यावर आळा घालण्यासाठी 14 ठिकाणी छापे घालण्यात आले. यात 14 आरोपींकडून 57 हजार 532 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील जांभळी, पाटेकुर्रा, कामठा, भवानी चौक, सिंधी कॉलनी, आंबेडकर चौक, सिल्ली, गांगला, म्हसगाव, बनाथर, पारडीबांध, नवेझरी येथे छापा घालण्यात आली होती. यात काही महिला आरोपीही सापडल्या.



शहरातील अनेक हॉटेल्समध्ये घरगुती वापराचे गॅस वापरण्यात येते. बेकायदेशीररीत्या वापरण्यात येणाऱ्या या सिलिंडरवर आळा घालण्यासाठी दोन हॉटेल्सवर छापे घालून दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख 22 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. मागील महिन्यात स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ काळ्याबाजारात विकत असल्याची माहिती मिळाली होती. विशेष पथकाने पांजरा येथे छापा घालून तो माल जप्त केला. रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी छापे घालण्यात आले.
जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांशी जोडून असल्याने येथून जनावरांची अवैध वाहतूक होते. जनावरांची कत्तल रोखण्यासाठी पथकाने मुंडीपार, कोहमारा येथे गस्त घालून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दहा जनावरे जप्त करण्यात आली. शहरात वाहन चोरट्यांचेही प्रमाण मोठे आहे. त्यावरही नियंत्रण ठेवण्याचे काम हे विशेष पथक करीत आहे. विनापरवाना चालणाऱ्या चायनीज, नुडल्स, चिरंजी कारखान्यावर छापे घालण्यात आले. तिथून 72 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
गोंदियाचे माजी नगराध्यक्ष आजही झोपडीतच

गोंदियाचे माजी नगराध्यक्ष आजही झोपडीतच

देवनाथ गन्डते
गोंदिया - चारदा नगरसेवक आणि 12 महिने नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळून शहरात अनेक विकासात्मक योजना राबविल्या. मात्र, स्वतःच्या मोडक्‍या-तोडक्‍या झोपडीची कधी डागडुजी केली नाही. आजही त्याच कैलारू छपराच्या निवाऱ्यात आई आणि पत्नीसह जीवन जगत आहे. रमेश ठवरे असे या निःस्वार्थी राजकारणी पुढाऱ्यांचे नाव आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत ते प्रभाग नऊमधून उमेदवार असून, संपत्तीच्या घोषवाऱ्यात त्यांनी रोख किंवा बॅंकेत कोणतीही रक्कम नसल्याची माहिती दिली आहे.



राजकारण एक व्यसन आहे. त्यामुळे राजकारणात येणारा प्रत्येक माणूस आर्थिकदृष्ट्या संपन्नच असावा लागतो. निवडणूक काळात होणारा खर्च अनेक पुढारी सत्तेच्या खुर्चीवरून काढत असतात. शिवाय मत्तेदारी वाढवून छप्पराच्या घरांना सिमेंटचा थर चढवितात. राजकारणामुळे गरिबीतून गर्भश्रीमंत झालेले अनेक उदाहरण आहेत. मात्र, येथील माजी नगराध्यक्ष रमेश ठवरे अपवाद ठरले आहेत. 1984-85च्या काळात ते तरुण होते. पंचविशीतील तरुणांच्या आग्रहाखातर त्यांनी पहिल्यांदा पालिकेची निवडणूक अपक्ष लढविली. त्यात त्यांना यश आले. येथूनच त्यांच्या राजकीय कार्याला सुरवात झाली. पाच वर्षे वॉर्डातील नागरिकांच्या समस्या सोडविल्याने पुन्हा निवडणूक लढविण्याचा आग्रह झाला. अशी 20 वर्षे त्यांनी सतत एक रुपयासुद्धा खर्च न करता विजय मिळविला. यादरम्यान त्यांना राष्ट्रवादीने तिकीट दिली होती. 1995 मध्ये नगराध्यक्षपदी विराजमान करण्यात आले. इतकी वर्षे सत्तेत राहूनही त्यांनी राजकारणाचा बाणा अंगी बाळगला नाही. केवळ समाजकारण हेच उद्देश ठेवून मतदारांचे प्रेम जिंकले आहे. शास्त्री वॉर्डात त्यांचे जुने घर आहे. ते आजही त्याच कौलारू झोपडीत आई आणि पत्नीसह राहतात. नगरसेवक, सभापती आणि नगराध्यक्षपद भूषविल्यानंतरही त्यांनी कधी पैशाची लासला बाळगलेली नाही. त्यामुळे ते सतत विजयी होत राहिले. मात्र, घराची डागडुजी तशीच राहून गेली. त्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही. नगराध्यक्ष असतानादेखील शासकीय वाहनाचा खासगी कामासाठी वापर केलेला नाही. सक्रिय राजकारणातील हा आदर्श पाहून यंदाच्या पालिका निवडणुकीत भाजपने तिकीट दिली आहे. यातही ते कोणताही पैसा खर्च न करता प्रचार करीत आहेत.



पालिकेत इतकी वर्ष नगरसेवक, नगराध्यक्ष राहिले. मात्र, घराची दुरुस्ती, चैनीच्या वस्तू, दुचाकी घेण्याचा विचार त्यांनी केलेला नाही. त्यांच्या निःस्वार्थी समाजकार्यामुळे मी खूश आहे.


- अनुपमा ठवरे (पत्नी)