সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, June 26, 2010

स्मशानभूमीच्या वाटेवरही मरणयातना

स्मशानभूमीच्या वाटेवरही मरणयातना

सकाळ वृत्तसेवा

Friday, June 25, 2010 AT 01:00 AM (IST)

Tags: crematorium, smashan, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - जीवनाचा अंतिम श्‍वास घेतल्यानंतर स्मशानभूमीकडे प्रवास सुरू होतो. या प्रवासात आप्त, सगेसोयरे आणि मित्रमंडळींची रांग असते. आत्म्याला शांती लाभावी म्हणून दोन मिनिटे मौन पाळून ईश्‍वराकडे याचना केली जाते. मात्र, कायमचे डोळे मिटून जगाचा निरोप घेतलेल्या मृतदेहाला स्मशानभूमीच्या वाटेवरून नेताना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांतील स्मशानभूमी दूरवर असून, जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. टिनांचे शेड किंवा चिताग्नीसाठी व्यवस्थाच नसल्याने मोठी गैरसोय होऊ लागली आहे.
चंद्रपूर शहरात दाताळा मार्गावरील इरई नदीच्या तीरावर मृतदेह जाळले जातात. या ठिकाणी कशाचीच व्यवस्था नाही. नगरपालिकेकडे स्मशानभूमीच्या विकासासाठी दरवर्षी दहा ते बारा लाखांचा निधी असतो. मात्र, हा निधी नेमका कुठे जातो, हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे. बिनबा गेटबाहेर इरई नदीच्या तीरावर शांतिधाम ट्रस्टच्या वतीने स्मशानभूमी बांधण्यात आली. शहरात ही एकमेव स्मशानभूमी चांगल्या अवस्थेत आहे. मात्र, याही ठिकाणी आता निधीअभावी अडचणी निर्माण झाल्या आहेत. या ठिकाणी शेडची आवश्‍यकता आहे. ट्रस्टकडे पैसे नाहीत. 2006 ला आलेल्या पुरात नदीकाठावरचा सिंमेटने बांधलेला घाट वाहून गेला. तोही तशाच स्थितीत आहे.
हिंदू धर्मीयांमध्ये मृतदेहाची राख नदीत विसर्जित करण्याची प्रथा आहे. त्यामुळे बहुतांश स्मशानभूमी या गावाच्या बाहेर नदी, नाल्याच्या काठावर आहेत. गाव तिथे स्मशानभूमी असतेच. त्यामुळे स्मशानभूमीच्या विकासासाठी शासनाने धोरण आखले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. सोबतच स्मशानभूमीत टिनांचे शेड असावे, पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप असावे, यासाठीही निधीची तरतूद आहे. काही ठिकाणी रस्त्याचे बांधकाम झाले. मात्र, ते निकृष्ट दर्जाचे असल्याने वर्षभरात उखडले. ज्या ठिकाणी हातपंप बांधण्यात आले, तिथे आता पाणीच नाही. शेडच्या टिना चोरीला गेल्या आहेत. ही परिस्थिती बहुतांश तालुक्‍यांच्या स्थळी आणि मोठ्या गावांत आहे. मात्र, या महत्त्वाच्या प्रश्‍नाचे कुणालाच गांभीर्य नाही. परिणामी पावसाळ्यात स्मशानभूमीपर्यंत मृतदेह नेताना मृताच्या नातेवाइकांना अक्षरश: मरणयातना भोगाव्या लागतात. शेडच नसल्याने मृतदेह जाळण्यासाठीही अडचणी निर्माण होतात.

Wednesday, June 23, 2010

लग्नासाठी झाली महागाईतही लाखोंची उलाढाल

लग्नासाठी झाली महागाईतही लाखोंची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा

Wednesday, June 23, 2010 AT 12:30 AM (IST)

Tags: marriage, dearness, chandrapur, vidarbha

चंद्रपूर - यंदा महागाई आहे म्हणून खर्च जपून करावा लागणार, असे प्रत्येकजण म्हणत होता. मात्र, वर-वधूपित्यांनी लाखोंची उलाढाल करीत लग्नाचा बार उडविला. गतवर्षी दिवाळीपासून सुरू झालेले विवाहसोहळे पावसाळ्यातही सुरूच असल्याने जिकडे-तिकडे ढोल-ताशे आणि सनईचा आवाज येत आहे. त्यामुळेच बाजारातील सोने, साड्या, कपडे, भांडी, खाद्यपदार्थ, फर्निचर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आदी वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.



यावर्षी महागाईने कमाल केली. सोन्याचे दर आकाशाला भिडले होते. धान्य, भांडीकुंडी, खाद्यपदार्थ, मंगलकार्यालयाचे भाडे सगळ्यातच चढती होती. असे असतानादेखील वधूपित्यांनी हार न मानता विवाहसोहळे थाटात पार पाडले. विवाह हा एक पवित्र संस्कार मानण्यात येतो. विवाहाने दोन मनेच नव्हेतर दोन कुटुंबांचे मीलन होते. परंतु, सध्या विवाह म्हणजे प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. त्यासाठी सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, उंची वस्त्रे, फर्निचर, जेवण्यासाठी थाट मांडण्यात येतो. अमाप पैसा खर्च करून प्रतिष्ठेचे दर्शन घडविण्याची चढाओढच विवाहसोहळ्यात दिसून येते. पाहुण्यांना मिष्टान्नाची मेजवानी, मानपान आदी सोपस्कारही न चुकता होताना दिसते. वधूच्या साड्या, नवरदेवाचे कपडे, संसारोपयोगी भांडी, पूजेचे साहित्य, पंखे, कपाट, वॉशिंग मशिन, फ्रीज, सोफासेट, डायनिंग, ड्रेसिंग टेबल आदी वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. लग्नात लाडू, चिवडा, चकली, करंजा, चंपाकली, अनारसे असे फराळाचे पदार्थ कुणी घरी केले, तर काहींनी बाजारातून विकत आणले. रुखवंताचाही थाट चांगला व्हावा म्हणून अनेकांनी तयार पदार्थांची मागणी केली. पोस्टर, फ्रेम, फ्लॉवर पॉट, वॉलपीस अशा शोभिवंत वस्तूही रेडिमेड आणून रुखवंतात ठेवल्या होत्या. त्यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाली. एकूणच लग्नाच्या सोहळ्यात किमान खर्च एक लाख होता.



यंदा शहरातील मंगलकार्यालये बुकिंग होती. यात प्रामुख्याने कन्यका परमेश्‍वर मंदिर, गुजराथी भवन, साईकृपा मंगल, श्री मंगल कार्यालय, बुरडकर सभागृह, राधिका सभागृह, आंबेडकर सभागृह, जोडदेऊळ, पाचदेऊळ, संताजी सभागृहाची यंदा मागणी होती. मुहूर्त साधण्यासाठी शहरातील मंगलकार्यालये यंदा हाऊसफुल होती. शहरात जवळपास 20 मंगलकार्यालये आहेत. सायंकाळचे विवाह प्रामुख्याने मोकळ्या हिरवळीवर लॉनमध्येच झाले. त्याचे भाडे किमान पाच ते 25 हजारांपर्यंत होते. यंदा अक्षय मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेला अनेकांनी रमेशीगाठी बांधल्या. जुलैपर्यंत काही मुहूर्त आहेत. आता पावसाळा लागल्याने विवाह मुहूर्त संपत आले आहेत. अखेरच्या मुहूर्तावर लग्नकार्य उरकून घेण्याची घाई दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यातील काही लग्नासाठी आतापासूनच बुकिंग झालेले दिसते.



लग्नाचा खर्च किमान कमाल

सभागृह- पाच हजार......25 हजार

सोन्याचे दागिने- 25 हजार........एक लाख

वधूच्या साड्या, वस्त्रे- पाच हजार ... 25 हजार

नवरदेव कपडे, अन्य सामान- सहा हजार .... 30 हजार

मानपान, अहेर- 10 हजार ... 50 हजार

प्रापंचिक वस्तू- 20 हजार .... 50 हजार

जेवणावळ- 20 हजार .... 45 हजार

मेकअप, मेहंदी- 500 रुपये .... पाच हजार

Wednesday, June 16, 2010

अखेर मॉन्सूनपूर्व पाऊस बरसला

अखेर मॉन्सूनपूर्व पाऊस बरसला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: rain, mansoon, chandrapur

चंद्रपूर - विजांची रोषणाई, ढगांचा गडगडाट, ढोलताशांचा आवाज अन्‌ सुसाट वाऱ्यातून निघणाऱ्या संगीतमैफलीत मॉन्सूनच्या पहिल्या पावसाचे आज (ता. 13) मध्यरात्री जोरदार आगमन झाले. या पावसामुळे तहानलेली जमीन तृप्त झाली; आणि मातीचा सुगंध सर्वत्र दरवळला. जिल्ह्यात एकूण 645. 5 मिलीमीटर पाऊस झाला. ब्रह्मपुरीत तो सर्वाधिक 80 मिलीमीटर; तर सर्वांत कमी पावसाची नोंद राजुरा येथे 14.2 मिलीमीटर झाली.

जिल्ह्यातील जीवनमान शेती आणि त्यावरील पूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण केवळ खरीप पिकांवरच अवलंबून आहे. त्यामुळे याच हंगामावर जास्त जोर असतो. गेल्या दोन वर्षांत दुष्काळी परिस्थिती आणि किडींच्या प्रादुर्भावात खरीप हंगाम पूर्णतः बुडाला होता. यंदातरी निसर्ग साथ देईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. हवामान खात्याने 10 ते 15 जूनदरम्यान जिल्ह्यात पाऊस येईल, असा अंदाज वर्तविला होता. या अंदाजानुसार शेवटच्या दिवसांत मॉन्सून बरसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मृगनक्षत्र लागून आठवडा झाल्यानंतर मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास सुसाट वारे वाहू लागले व आकाशात ढगांची गर्दी सुरू झाली. विजांच्या कडकडाटासह मॉन्सूनने हजेरी लावली. नागभीड येथे मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरवात झाली. शेतीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सकाळीसच शेतीकडे धाव घेतली. सिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल तालुक्‍यातही पहाटे दोनच्यादरम्यान पावसाने हजेरी लावली. सावली, पोंभूर्णा, गोंडपिंपरी या पट्ट्यात तीनला दमदार पाऊस झाला. चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, भद्रावती या तालुक्‍यांत तीनपासून सकाळी सातपर्यंत पाऊस सुरूच होता. जिल्ह्यात सर्वत्र शेतीयोग्य दमदार पाऊस झाला. मात्र, वरोरा तालुक्‍याला रिमझिम सरींवरच समाधान मानावे लागले. मूल येथे अडीचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. हा पाऊस सकाळी सातपर्यंत सुरूच होता. चिमूर येथे दोनच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. जिल्ह्यात एकूण 645. 5 मिलीमीटर पाऊस झाला. त्याची सरासरी 40.3 मिलीमीटर आहे. 1 ते 14 जूनपर्यंत आलेल्या पावसाची सरासरी 43.3 मिलीमीटर आहे


अंदाज फोल; मॉन्सूनची हुलकावणी
सकाळ वृत्तसेवा
Monday, June 14, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: monsoon, rain, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनने हजेरी लावल्यानंतर विदर्भात आज ना उद्या पाऊस येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, मॉन्सूनच्या वाऱ्यांनी सर्व अंदाज आणि अनुमान फोल ठरवत सर्वांना हुलकावणी दिली. दरम्यान, रविवारी (ता. 13) पहाटेपासून आकाशात ढगाळ वातावरण होऊन हवेत गारवा होता. दुपारी तीन वाजेनंतर सर्व ढग दिसेनासे झाले आणि पहिल्या पावसाची आशा मावळली.

जिल्ह्यात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळण्याची शक्‍यता विज्ञान आणि प्रौद्योगिक विभाग, राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान अंदाज केंद्राने वर्तविल्याची माहिती पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सिंदेवाही येथील कृषी विज्ञान व हवामान सल्ला केंद्राने होती. याशिवाय भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) ने जारी केलेल्या नकाशात गुजरात, मध्यप्रदेश आणि विदर्भात 10 ते 15 जूनदरम्यान पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. मात्र, 13 जूनपर्यंत मॉन्सूनचे आगमन झालेले नाही. पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाच्या धो-धो धारा बरसत असताना; मात्र चंद्रपूर जिल्हा 42 ते 45 अंश सेल्सिअंश तापमानातच आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कमाल तापमानात किंचित घट झाली होती. मात्र, दिवसभराचा उकाडा संपलेला नाही. रात्रीच्या वेळी सुसाट वारे वाहत असतात. मात्र, पावसाचे कोणतीही चिन्हे दिसून आलेली नाहीत. या आठवड्यात कमाल तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 28 ते 31 अंश सेल्सिअस होते. सकाळच्या वेळी आर्द्रतेचे प्रमाण 38 ते 45 टक्के, तर दुपारच्या वेळी 22 ते 29 टक्के होते. खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांनी बी-बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, विषाणू संवर्धके आदी आवश्‍यक सामग्रींची जुळवाजुळव सुरू केली आहे. मात्र, पाऊसच नसल्याने प्रत्यक्ष कामाला सुरवात झालेली नाही

Friday, June 11, 2010

चंद्रपूर पालिका साकारणार सौरऊर्जा प्रकल्प

चंद्रपूर पालिका साकारणार सौरऊर्जा प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
Friday, June 04, 2010 AT 01:30 AM (IST)
Tags: chandrapur, power project, solar energy
चंद्रपूर - विजेची वाढती टंचाई, भारनियमनाचा त्रास आणि वीजबिलांमध्ये होणारा अपव्यय टाळण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मानस नगरपालिकेने ठेवला आहे. या प्रकल्पातून एक मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येईल. या कामाला प्रत्यक्ष सुरवात झाली नसली तरी पालिकेच्या स्थायी बैठकीने त्यास मंजुरी दिल्याची माहिती आहे.


नगरपालिकेला वीजबिलापोटी वर्षाकाठी दीड कोटी रुपयांची रक्कम भरावी लागते. त्यातच वारंवार होणाऱ्या भारनियमनामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत असतो. पालिकेला प्रशासकीय इमारत, नगरपालिका शाळा, रस्त्यावरील वीजदिवे, ट्रॅफिक सिग्नल यांचेही बिल भरावे लागते. या सर्वांसाठी मोठा खर्च होत असल्याने तिजोरीला चुना लागत आहे. हा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कमी खर्चात जास्त काळ टिकणारा सौरऊर्जा प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाबूपेठ बायपास मार्गावरील सहा एकर जागाही त्यासाठी निर्धारित करण्यात आली आहे. ही योजना १५ ते १६ कोटी रुपयांच्या खर्चाची आहे.


सुवर्णजयंती नगर पुनरुत्थान योजनेतून हे काम हाती घेण्यात येईल. ही योजना सुरू झाल्यास एक मेगावॉट वीज उपलब्ध होणार आहे. त्यात पालिका इमारत आणि रस्त्यावरील वीजदिवे लावण्यात येणार आहेत. या योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असून, मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्प साकारण्यात येईल.