धुळे, दि. 26 : धुळे जिल्ह्याला नवसंजीवनी ठरणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचा बळीराजा जलसंजीवनी योजनेत समावेश करण्यात आला असून या योजनेची कामे लवकरात लवकर पुर्ण व्हावे या करिता भुसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. याकरिता केंद्र शासनाकडून 56 कोटी तर राज्य शासनाचा 44 कोटी रुपयांचा हिस्सा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात धुळे जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठक मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार अमरिश पाटील, कुणाल पाटील, अनिल गोटे, डी.एस.अहिरे, काशिराम पावरा, शिरीष चौधरी, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.गंगाथरण, महापालीकेचे आयुक्त सुधाकर देशमुख आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याने राज्य शासनाने दुष्काळाच्या सवलती लागू केल्या असून दुष्काळी परिस्थितीत राबवावयाच्या उपाययोजना प्रशासकीय यंत्रणेने संवेदनशील राहून राबवाव्यात. जिल्ह्यातील जलाशयांमध्ये केवळ44 टक्के पाणीसाठी उपलब्ध असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यातील उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाने 429 लक्ष रुपयांचा कृती आराखडा तयार केला असून यामध्ये 67 गावांसाठी 73 उपाययोजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यातील 10 गावांसाठी 8 टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे, तर 52 गावांसाठी 60 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे वैरण विकास योजनेतंर्गत चारा बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. त्याच बरोबर गाळपेरा क्षेत्रावर चारा लागवड करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अपुर्ण व बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. त्याच बरोबर पिण्याच्या पाण्यासाठी चिमठाणे व 35 गावे पाणी पुरवठा ग्रीड योजनेला मंजूरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
धुळे शहराची हद्द वाढ झाल्याने शहराला मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी अक्कलपाडा धरणातुन प्रस्तावित अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना पुर्णत्वास नेण्यात येणार असून त्यासाठी 142 कोटी रुपयांचा प्रारुप प्रस्तावास मान्यता देण्यात येईल. नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना हक्काची घरकुले उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. धुळे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी व पारधी घरकुल योजनेतंर्गत जिल्ह्याला 19 हजार 174 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 13 हजार821 घरकुले पुर्ण झाली व अपुर्ण घरकुलांची कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. पंडीत दिनदयाल उपाध्याय योजनेतंर्गत स्वमालकीची जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरी भागातील पात्र लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिकांनी प्रकल्प विकास आराखडा तातडीने मंजूरीसाठी पाठवावा, यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
धुळे शहरातील अधिकाधिक पात्र झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 850 घरांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर नगरपालिका क्षेत्रातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातील रस्ते, भुयारी गटार व पाणी पुरवठ्याच्या योजनांची कामे सुरु आहेत. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातंर्गत सर्व गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत सन2017-18 मध्ये 95 गावांमध्ये 1520 कामे प्रस्तावीत असून त्यापैकी 1424 कामे पुर्ण झाली आहेत, तर उर्वरित कामे प्रगतीपथावर असून या कामांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठा जलसाठा होण्यास मदत होत आहे. मागेल त्याला शेततळे योजनेचे उद्दिष्ट पुर्ण करावे, त्याचबरोबर दुष्काळी परिस्थितीमुळे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामांचे नियोजन करावे. तसेच वन विभागाच्या हद्दीतील पाझर तलावांमधील गाळ शेतकऱ्यांना नेता यावा यासाठी जलसंधारण विभागांच्या सचिवांनी वन विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेऊन याबाबतची नियमावली तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मनरेगा अंतर्गत जिल्ह्यात शेल्फवरील कामे सुरू करून नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात 27 कोटी 94 लाख रुपयांची 37 योजनांची कामे सुरु असून 22 योजनांची कामे पुर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात 26 योजनांची कामे सुरु असून 9 योजनांची कामे पुर्ण झाली आहेत या योजनांच्या अंमलबजावणीत जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याने मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेतंर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडून प्राप्त झालेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले तर डिबीटी योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटपही लवकरात लवकर करावे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत जिल्ह्यातील 2 लाख 44 हजार खातेधारकांना 481 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून 465 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत जिल्ह्यात 650 कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या कामांना मंजूरी देण्यात आली असून 208 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत.
त्याच बरोबर महाराष्ट्र सुवर्ण जयंती राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेतंर्गत धुळे शहरातील मुख्य रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, गटारी,दुभाजक, पथदिवे आदि 40 कोटी रुपयांची कामे पुर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत अधिकाधिक क्षेत्र हे सिंचनाखाली येण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यात सुक्ष्मसिंचनाला प्राधान्य देण्यात येत आहे.
यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते पशुसंजीवनी ॲप, टपाल व फाईल ट्रॅकींग सेवेचा, ऑनलाईन बालस्वास्थ कार्यक्रम तसेच ग्रामपंचायतीचे महा ई-सेवा केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांचा आढावा घेतला तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचे सादरीकरण केले.