53 शहारसह चंद्रपूरचा समावेश
थोर समाजसेवक डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईसह राज्यातील अनेक शहरात स्वच्छता मोहीम राबवली जातेय. निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने या स्वच्छता मोहीमेचं आयोजन करण्यात आलंय. कसलाही गाजावाजा न करता मुंबईसह चंद्रपुरात सकाळी साडेसात वाजता या स्वच्छता मोहीमेला सुरूवात झाली.
या स्वच्छता मोहीमेअंतर्गत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, पालघर, डहाणू, आसनगाव, बदलापूर, शहापूर, वसई-विरार, अंबरनाथ, महाड, उरण, पेण, पनवेल, माथेरान, कर्जत, वाडा, जव्हार, खोपोली, रोहा, पाली, माणगाव, पोलादपूर, खेड, श्रीवर्धन, अलीबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गुहागर, चिपळूण, नाशिक, जळगाव, भुसावळ, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, लोणावळा, म्हसवड फलटण, बारामती, सोलापूर, पंढरपूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, किनवट आणि चंद्रपूर अशा सुमारे 53 शहारंमध्ये आज दिवसभरात ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.
या स्वच्छता मोहीमेत 3350 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सफाई केली जाणार आहे. त्यासाठी 63 हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक स्वयंप्रेरणेने या सफाई मोहीमेत सहभागी होणार आहेत. स्वच्छतेतून आरोग्य आणि आरोग्यातून पर्यावरणाचे संवर्धन हा निरूपणकार अप्पासाहेबांचा संदेश समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम प्रतिष्ठानने हाती घेतला आहे.
सर्वात महत्वाचं आजची स्वच्छता मोहीम होत असलेल्या ठिकाणी कुठेही स्थानिक प्रशासनाची मदत घेण्यात आलेली नाही. रस्त्याची सफाई सुरू असताना तिथे महापालिका किंवा नगरपालिकेची कचरा उचलणारी गाडी आली तर त्यामध्ये कचरा टाकला जाणार आहे अन्यथा हे स्वयंसेवक स्वतःच्या गाडीतून त्या परिसरातील डंपिंग ग्राऊंडवर जमा झालेला कचरा नेऊन टाकणार आहेत.
या मोहीमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना झाडू, मास्क, कचरा उचलण्याचं साहित्य प्रतिष्ठानमार्फतच पुरवण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासनावर त्यासाठी कोणताही बोजा टाकला जाणार नाही.