काव्यशिल्प Digital Media: नागपूर.मनपा

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label नागपूर.मनपा. Show all posts
Showing posts with label नागपूर.मनपा. Show all posts

Tuesday, October 09, 2018

४ नोव्हेंबरला धावणार नागपुरकर

४ नोव्हेंबरला धावणार नागपुरकर

आयुर्वेद अनुसंधान संस्थान आणि मनपाचे आयोजन
 पाच हजारांवर नागरिकांचा राहणार सहभाग
नागपूर/प्रातिनिधी:
केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद नवी दिल्ली द्वारा संचालित क्षेत्रिय आयुर्वेदीय मातृ व शिशु स्वास्थ अनुसंधान संस्थान आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीने तिसऱ्या आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून ४ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता कस्तुरचंद पार्क येथून ‘हेल्थ रन’ (आयुर्वेदा दौड स्वास्थ की ओर) चे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भातील तयारीचा आढावा मंगळवारी (ता. ९) महापौर नंदा जिचकार यांनी घेतला. 
नागपूर महानगरपालिका मुख्यालय सिव्हील लाईन येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, भाजपच्या मनपातील उपनेत्या वर्षा ठाकरे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, वैद्यकीय अधिकारी (मे.) डॉ. विजय जोशी, आयोजक डॉ. आर. गोविंद रेड्डी, डॉ. सविता शर्मा, डॉ. राजेश गुरु, डॉ. मितेश रामभिया उपस्थित होते. 
प्रारंभी डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी ‘हेल्थ रन’ आयोजनासंदर्भातील संपूर्ण माहिती दिली. आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी ही दौड आयोजित करण्यात आली असून ‘सार्वजनिक आरोग्यात आयुष’ (AYUSH in public health) ह्या संकल्पनेवर ही दौड राहील. सुमारे पाच हजारांवर नागरिक यामध्ये सहभागी होतील. संपूर्ण नोंदणी ऑनलाईन असून पाच किलोमीटर आणि आठ किलोमीटर दौडचे यात आयोजन असेल, असेही त्यांनी सांगितले. 

यासंदर्भात बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी नागपूर महानगरपालिकेचा अगदी जवळचा संबंध आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी नागपूर महानगरपालिका सदैव प्रयत्नरत असते. त्याबाबत जनजागृतीही करीत असते. नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणारे स्वच्छता अभियान हे लोकसहभागानेच राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने आयोजित ‘हेल्थ रन’मध्ये नागपूर महानगरपालिका स्वत: आयोजक म्हणून भूमिका निभावत आहे. यामध्ये नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या शाळांतील विद्यार्थीही सहभागी होतील. महापालिकेची संपूर्ण यंत्रणा आयोजनाच्या यशस्वीतेकरिता कार्यरत असेल. यामध्ये शहरातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्याबाबतचा संदेश द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
बैठकीला कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, डॉ. मिनाक्षई सिंग, डॉ. देवराव दांडेकर, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. शीतल मालखंडाले, डॉ. उमेश मोवाडे आदी उपस्थित होते.

Tuesday, October 02, 2018

नागपूर मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केला कार्यालय परिसर

नागपूर मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केला कार्यालय परिसर

गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत उपक्रम : आतील परिसराचीही स्वच्छता
नागपूर/प्रतिनिधी:
 दैनंदिन कामातून उसंत घेत मंगळवारी (ता. २) नागपूर महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनपाच्या सिव्हील लाईन मुख्यालयाचा परिसर हातात झाडू, फावडे घेऊन स्वच्छ केला. बाह्य परिसरासोबतच इमारतीच्या आतील कार्यालयातही कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करून नवा आदर्श नागपूरकरांसमोर ठेवला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून आज सकाळी ८ वाजता मनपा सिव्हील लाईन मुख्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी कार्यालयात हजर झाले. ‘स्वच्छता ही सेवा’ ह्या राष्ट्रव्यापी उपक्रमाच्या समारोपाच्या निमित्ताने सर्वच कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेतला. विविध विभागाच्या विभागप्रमुखांच्या नेतृत्वात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेचे नेतृत्व सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा यांनी केले. प्रत्येक विभागाची टीम तयार करण्यात आली. या टीमला सिव्हील लाईन मुख्यालय परिसराचा एक-एक भाग स्वच्छतेकरिता देण्यात आला. मुख्यालयाबाहेरील फुटपाथ स्वच्छतेचीही जबाबदारी एका टीमला देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीसमोरील आणि बाजूचा परिसर, मनपा मुख्यालयाच्या जुन्या इमारतीसमोरील परिसर, आरोग्य विभाग आणि उद्यान विभाग, नागरी सुविधा केंद्र असलेल्या दोन्ही इमारतींचा परिसर, अग्निशमन विभाग इमारतीसमोरील परिसर, पार्किंग, उद्यान आदी ठिकाणी प्रारंभी कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या-त्यांच्या विभागात स्वच्छता मोहीम राबविली.
सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या स्वच्छता मोहिमेत कार्यकारी अभियंता सर्वश्री संजय जयस्वाल, राजेश भूतकर, गिरीश वासनिक, अविनाश बाराहाते, अमीन अख्तर, आसाराम बोदिले, अनिलकुमार नागदिवे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्हाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. आतिक खान, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, कारखाना विभागाचे योगेश लुंगे, निगम अधीक्षक मदन सुभेदार, बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सहायक आयुक्त विजय हुमणे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, दिलीप तांदळे, कामगार नेते राजेश हाथीबेड, डोमाजी भडंग, दिलीप देवगडे, आर.जी. खोत, गौतम गेडाम, शेषपाल हजारे यांच्यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. महिला कर्मचारीही मोठ्या संख्येने स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.


गांधीजींच्या तैलचित्राला मालार्पण
तत्त्पूर्वी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिका सिव्हील लाईन केंद्रीय कार्यालयातील महापौर कक्षात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तैलचित्राला सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

झोन कार्यालय आणि प्रभागातही स्वच्छता अभियान
महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत दहाही झोन कार्यालयात आणि विविध प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सर्व झोन सहायक आयुक्तांच्या नेतृत्वात अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकही यामध्ये सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी मनपा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. सतरंजीपुरा झोनमध्ये उपमहापौर दीपराज पार्डीकर, सभापती यशश्री नंदनवार, नगरसेविका अभिरुची राजगिरे, मनिषा कोठे, शकुंतला पारवे, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, झोन सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, मंगळवारी झोनमध्ये सभापती संगीता गिऱ्हे, कर व कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, झोन सहायक आयुक्त हरिश राऊत, आसीनगर झोनमध्ये झोन सभापती वंदना चांदेकर, आमदार डॉ. मिलिंद माने, झोन सहायक आयुक्त गणेश राठोड, लकडगंज झोनमध्ये झोन सभापती दीपक वाडीभस्मे, नगरसेविका कांता रारोकर, जयश्री रारोकर, वैशाली रोहणकर, झोन सहायक आयुक्त सुभाष जयदेव यांच्यासह आपुलकी वस्ती सुधार संस्था, स्वरांजली वस्ती सुधार संस्था, गजानन बचत गट या स्वयंसेवी संस्थाही सहभागी झाल्या होत्या. 

नेहरूनगर झोनअंतर्गत ताजबाग परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये झोन सभापती रिता मुळे, क्रीडा सभापती नागेश सहारे, नगरसेविका स्नेहल बिहारे, ताजबाग ट्रस्टचे प्रशासक कुबडे, माजी नगरसेवक अमान, झोन सहायक आयुक्त राजेश कराडे सहभागी झाले होते. धंतोली झोनअंतर्गत विविध प्रभागात तीन ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सभापती विशाखा बांते, नगरसेविका हर्षला साबळे, सहायक आयुक्त स्मिता काळे यांच्यासह अन्य नगरसेवक मोहिमेत सहभागी झाले होते. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत कामागार कॉलनी येथे सहायक आयुक्त सुवर्णा दखने यांच्या नेतृत्वात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्व अधिकारी, कर्मचारी, झोनल अधिकारी, आरोग्य निरीक्षक यामध्ये सहभागी झाले होते. अन्य झोनमध्येही संबंधित झोन सभापती, प्रभागातील नगरसेवक व सहायक आयुक्त सहभागी झाले होते. 

Monday, October 01, 2018

भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठविणार!

भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठविणार!

धोबी समाजच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याची मागणी 
नागपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्रात धोबी समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा, यावर अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या भांडे समितीचा अहवाल लवकरच केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोबी समाजाच्या शिष्टमंडळाला दिले. 
आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्यासह समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे राज्य परीट (धोबी) सेवा मंडळाचे प्रदेश मुख्य संघटक संजय भिलकर व मनीष वानखेड़े यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याना भेटले. सी. पी. एंड बेरार मध्ये मध्यप्रदेश ची राजधानी नागपूर असताना बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यातील धोबी समाज बांधवांना अनुसूचित जातीअंतर्गत आरक्षणाचा लाभ मिळत होता. सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर धोबी समाजाचे आरक्षण रद्द करण्यात आले. या समाजाला ओबीसीचा दर्जा देण्यात आला. यामुळे समाजाला अनुसूचित जाती अंतर्गत मिळणाऱ्या सवलती मिळणे बंद झाले.१९७६ च्या अनुसूचित जाती दुरुस्ती विधेयकानुसार धोबी समाजासाठी क्षेत्राचे बंधन शिथिल करून महाराष्ट्रात धोबी समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा मिळायला हवा होता.यासाठी २७ मार्च २००१ रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. परिणामी ५ सप्टेंबर २००१ रोजी तत्कालीन आमदार डॉ. दशरथ भांडे यांच्या अध्यक्षतेत धोबी समाज पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली. २६ फेब्रुवारी २००२ रोजी समितीने राज्य शासनाकडे अहवाल सुपूर्द केला. शिफारशीसह हा अहवाल राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवायला हवा होता.मात्र त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन समितीचाही अहवाल तयार करण्यात आला, ज्यात धोबी समाजाला अस्पृश्याचे निकष लागू होत नसल्याचे नोंदविले आहे. यासंदर्भात समाज बांधवानी सन २००६ आणि २०१७ मध्ये विधिमंडळावर मोर्चा काढून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापही निर्णय झाला नाही. अखेर आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्या पुढाकाराने समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व म्हणणे मांडले.समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे, प्रतिभा गवळी यांच्या मार्गदर्शनात शिष्टमंडळात विजय देसाई, प्रमोद चांदुरकर, संजय वाल्हे, अरुण मोतीकर, सुरेश तिड़के यांचा समावेश होता.

Saturday, September 29, 2018

‘सर्जिकल स्ट्राईक’ येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारी बाब : महापौर नंदा जिचकार

‘सर्जिकल स्ट्राईक’ येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारी बाब : महापौर नंदा जिचकार

अंबाझरी उद्यानात ‘पराक्रम पर्व’ साजरे 
नागपूर/प्रतिनिधी:

 देशातील वाढते आतंकवादी हल्ले, परकीय राष्ट्रांमधून होणारी घुसखोरी या सर्व कारवायांसाठी सर्जिकल स्ट्राईक हे चोख उत्तर ठरले. भारतीय सैन्याच्या या पराक्रमामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावली. सर्जिकल स्ट्राईक ही येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारी बाब आहे, असे गौरवोद्‌गार महापौर नंदा जिचकार यांनी काढले. 
पाकिस्तान विरोधात भारतीय सैन्यामार्फत करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने शहरातील अंबाझरी उद्यानात ‘पराक्रम पर्व’ साजरा करण्यात आला. यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासह सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, विजय होले, रवि हलकंदर, गुंडूभाऊ मसुरकर, मनिष गेडाम, विनोद चवरे, संगीता चंद्रायण, कविता देशमुख, रश्मी नसीने, योगिता धार्मिक, अनुसया गुप्ता आदी उपस्थित होते. 

२९ सप्टेंबर २०१६ ला दोन वर्षापूर्वी भारतीय सैन्याने आपल्या देशात घुसखोरी करून देशात आतंकवादी कारवाया करीत देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्यांचे तोंड बंद केले. सीमेवर अहोरात्र देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्याने केलेली ही कामगिरी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. सैन्याच्या या पराक्रमामुळे अनेक तरुणांच्या मनात देशरक्षणाची बिजे रोवली गेली. देशाच्या भवितव्याची धुरा असणाऱ्या तरुणाईने आपण भारतीय असल्याचा अभिमान बाळगावा व आपल्या कार्यामुळे देशाचे नाव लौकीक होईल, असेच कार्य करावे, असे आवाहनही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले. 

देशाच्या सीमेवर शत्रुकडून येणारी गोळी झेलून त्याला प्रत्युत्तर देण्यास तत्पर असणाऱ्या सैन्यामुळे आपण घरामध्ये सुखाने राहू शकतो. भारतीय सैनिक हेच देशातील खरे हिरो आहेत. तिरंग्याच्या सन्मानासाठी प्राण पणाला लावणाऱ्या आपल्या सैन्यांचा प्रत्येकाने आदर राखावा, असेही महापौर नंदा जिचकार यावेळी म्हणाल्या. कार्यक्रमाला अंबाझरी परिसरातील नागरिकांसह, उद्यानातील कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. 

डेंग्यूच्या नावावर पैसे उखळणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा

डेंग्यूच्या नावावर पैसे उखळणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा

आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांचे निर्देश : सतरंजीपुरा व लकडगंज झोनमध्ये आढावा बैठक 
नागपूर/प्रतिनिधी:
डेंग्यूमुळे नागरिकांच्या मनात भीती असून साधारण तापाच्या उपचारासाठी खासगी दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांना डेंग्यूची भीती दाखवून रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देश आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी दिले. 
आरोग्य समितीच्या झोननिहाय बैठकीअंतर्गत शुक्रवारी (ता. २८) सतरंजीपुरा व लकडगंज झोन कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांच्यासह सतरंजीपुरा झोनच्या सभापती यशश्री नंदनवार, नगरसेवक संजय महाजन, संजय चावरे, नगरसेविका अभिरुची राजगिरे, शकुंतला पारवे, वंदना चांदेकर, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, लकडगंज झोनमध्ये नगरसेवक प्रदीप पोहाणे, अनिल गेंडरे, नगरसेविका मनिषा धावडे, सरिता कावरे, जयश्री रारोकर, झोनचे आरोग्य अधिकारी डॉ. मोवाडे उपस्थित होते. 
खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या भीतीचा प्रचार केला जात आहे. रुग्णांकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्यासाठीचा हा खासगी रुग्णालयांचा फंडा आहे. साधारण तापासाठी तपासणीकरिता खासगी रुग्णालयात रुग्ण गेल्यास त्याला डेंग्यूचे लक्षण असल्याचे सांगून भरती केले जाते. त्यानंतर महागड्या चाचण्या करून रुग्णांची आर्थिकदृष्ट्या लूट केली जाते. मात्र खासगी रुग्णालयांमधून ज्या प्रकारे भीतीचा प्रचार केला जात आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा खासगी रुग्णालयांकडून डेंग्यूबाबत महानगरपालिकेला अहवालही सादर केला जात नाही. या खासगी रुग्णालयांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात यावे व डेंग्यूच्या नावावर नागरिकांची लूबाडणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावे, असे यावेळी आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी निर्देशित केले. 

बैठकीमध्ये आरोग्य सभापती मनोज चापले यांनी सतरंजीपुरा व लकडगंज झोनमधील डेंग्यूच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. फवारणीसाठी वेळापत्रक तयार करण्यात यावे व फवारणी आधी नगरसेवकांना माहिती देऊन त्यांच्या सूचनेवरून ठराविक भागांमध्ये फवारणी करण्यात यावी. डेंग्यूमुळे शहरात निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा घेत काही जण राजकारण करीत आहेत. मात्र या रोगावर मात करण्यासाठी राजकारणापेक्षा जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे व त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही सभापती मनोज चापले म्हणाले. 
परिसरात अस्वच्छता, घरी, छपरावरील टायर, ड्रम आदी साधनांमध्ये साचणारे पाणी व परिसरात असणारा कचरा यामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास वाढते. हे सर्व आपल्याच निष्काळजीपणामुळे होते. डेंग्यूवर मात करण्यासाठी प्रत्येकाने निष्काळजीपणा सोडून स्वच्छता ही आपली जबाबदारी असल्याचे निश्चित करणे आवश्यक आहे. डेंग्यूबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेउन जनजागृती करणारे पत्रक छापून आपापल्या प्रभागात घरोघरी वितरीत करावे. याशिवाय झोनमधील मनपासह, शासकीय व खासगी अशा सर्व शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात यावेत. चिमुकल्या मुलांमार्फत होणारा प्रचार हा प्रभावी ठरत असल्याने शाळांमध्ये जनजागृतीवर भर द्या, असेही सभापती मनोज चापले यांनी यावेळी निर्दशित केले.

Thursday, September 27, 2018

गोवर व रुबेला उच्चाटनासाठी मनपातर्फे नोव्‍हेंबरमध्ये लसीकरण मोहीम

गोवर व रुबेला उच्चाटनासाठी मनपातर्फे नोव्‍हेंबरमध्ये लसीकरण मोहीम

३० ठिकाणी मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण
नागपूर/प्रतिनिधी:
गोवर व रुबेला या रोगांच्या उच्चाटनासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार येत्या नोव्‍हेंबर महिन्यापासून नागपूर महानगरपालिकेच्यावतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेंतर्गत शहरातील महानगरपालिकेच्या शाळांसह सरकारी व खासगी शाळा तसेच ९ ते १५ वर्ष वयोगटातील सर्व मुलांना एम.आर. लस देण्यात येणार आहे. 
या मोहिमेसाठी शहरातील शिक्षण विभागातील यू.आर.सी.१ (प्राथमिक) व यू.आर.सी.२ (माध्यमिक) शाळा केंद्रांमध्ये आणि महानगरपालिका शिक्षण विभाग अशा एकूण ३० ठिकाणी मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणाला शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते. आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्‍हाणे, जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. साजिद खान, नोडल अधिकारी डॉ. सुनील घुरडे, डॉ. नंदकिशोर राठी, डॉ. विजय जोशी, डॉ. नरेंद्र बहिरवार, समन्वयक दिपाली नागरे यांच्यासह दहाही झोनचे वैद्यकीय अधिकारी लसीकरण मोहिमेच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले होते.

 डेंग्यू प्रतिबंधात्मक फवारणीचा वेळ वाढवून घ्या

डेंग्यू प्रतिबंधात्मक फवारणीचा वेळ वाढवून घ्या

आरोग्य सभापती मनोज चापले यांचे निर्देश : धंतोली झोनमध्ये आढावा बैठक 

नागपूर/प्रतिनिधी:
 शहरात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यादृष्टीने झोनमधील प्रत्येक प्रभागात फवारणीवर विशेष लक्ष द्या. प्रत्येक भागांमध्ये फवारणी गाडी पोहोचावी याकडे लक्ष देऊन फवारणीचा वेळही वाढवून घ्या, असे असे निर्देश मनपा आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले यांनी दिले. 
आरोग्य समितीच्या झोननिहाय बैठकीअंतर्गत बुधवारी (ता. २६) धंतोली झोन कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांच्यासह धंतोली झोनच्या सभापती विशाखा बांते, नगरसेवक विजय चुटेले, नगरसेविका लता काटगाये, सहायक आयुक्त स्मिता काळे, वैद्यकीय अधिकारी विजय जोशी यांच्यासह झोनमधील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 
बैठकीमध्ये आरोग्य सभापती मनोज चापले यांनी धंतोली झोनअंतर्गत असलेल्या डेंग्यूच्या रुग्णांची माहिती घेतली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करा व ज्या घरी लारवी आढळली त्या घरी पुन्हा ती वाढू नये यासाठी विशेष काळजी घ्या, असेही निर्देश त्यांनी दिले. मनपातर्फे वॉर्डावॉर्डात वेळोवेळी फवारणी होते अथवा नाही, यावर लक्ष द्या. वार्डांमध्ये २०-२० दिवसांनी फवारणी करा व त्यासंबंधी प्रभागातील नगरसेवकांना दोन दिवसांपूर्वी माहिती देण्यात यावी. या सर्व प्रक्रियेचा अहवाल प्रत्येक आठवड्याला आरोग्य समिती सभापती व झोनचे सहायक आयुक्त यांना सादर करा, असेही सभापती मनोज चापले यांनी निर्देशित केले. 
‘मोबाईल व्हॅन’ आजपासून सुरू 
डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये भीती असून त्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिकेतर्फे ‘मोबाईल व्हॅन’ बुधवार (ता. २६) सुरू करण्यात आली आहे. या ‘मोबाईल व्हॅन’च्या माध्यमातून शहरातील चौकाचौकांसह शाळांमध्ये चित्रफित दाखवून डेंग्यूची विस्तृत माहिती व त्यापासून बचावासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे, असे यावेळी आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी यावेळी सांगतिले. याशिवाय डेंग्यूच्या लारवीची पाहणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चमूने झोनमधील शाळांसह इतर भागातही जनजागृती करावी, असेही त्यांनी निर्देश दिले. 
बाभूळखेडा रुग्णालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव सादर करा 
बाभुळखेडा होमिओपॅथी रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली आहे. नागरिकांना उत्तम आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी या रुग्णालयाची नव्याने निर्मिती होणे आवश्यक आहे. बाभूळखेडा होमिओपॅथी रुग्णालय इमारतीच्या बांधकामाची फाईल तयार करून त्या संबंधीचा प्रस्ताव सादर करा, असेही निर्देश सभापती मनोज चापले यांनी दिले. याशिवाय मनपाच्या आयसोलेशन रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीच्या जागेवर अद्ययावत इमारत उभारण्यात येणार असून यासंबंधीही प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी निर्देशित केले.
सेंट्रल बाजार रोडवर ‘पौर्णिमा दिवसा’निमित्त जनजागृती

सेंट्रल बाजार रोडवर ‘पौर्णिमा दिवसा’निमित्त जनजागृती

मनपा-ग्रीन व्हिजीलचा उपक्रम : अनावश्यक वीज दिवे एक तासासाठी केले बंद 

नागपूर/प्रतिनिधी:
 ऊर्जा बचतीसाठी नागपूर महानगरपालिकेने तत्कालिन महापौर आमदार प्रा. अनिल सोले ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सहकार्याने काही वर्षांपूर्वी सुरू केलेला ‘पोर्णिमा दिवस’ उपक्रम आता नागपुरात चळवळीचे रूप घेत आहे. पोर्णिमा दिवसाचे आवाहन होताच ज्या परिसरात स्वयंसेवक जातात त्या परिसरातील व्यापारी आणि नागरिक स्वत: रात्री ८ ते ९ दरम्यान अनावश्यक विद्युत उपकरणे बंद करतात. असाच काहीसा अनुभव मंगळवारी (ता. २५) पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने आला. 
नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक २५ सप्टेंबर रोजी रामदासपेठ परिसरातील सेंट्रल बाजार मार्गावरील कल्पना बिल्डिंग चौकात जनजागृतीसाठी पूर्वी केलेल्या आवाहनाप्रमाणे रात्री ८ वाजता पोहचले. नेहमीप्रमाणे जनजागृतीसाठी आणि पोर्णिमा दिवस उपक्रम तसेच ऊर्जा बचतीचे सांगण्यासाठी जेव्हा ग्रीन व्हिजीलचे स्वयंसेवक व्यापारी प्रतिष्ठानात जाऊ लागले तेव्हा त्यांनी या उपक्रमाविषयी कल्पना असल्याचे सांगितले. आम्ही स्वयंप्रेरणेने अनावश्यक वीज उपकरणे बंद केल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे प्रत्येक पोर्णिमा दिवसाला आम्ही किमान एक तास वीज उपकरणे बंद ठेवू, असे आश्वासन स्वयंसेवकांना दिले. 
विशेष म्हणजे, यावेळी पौर्णिमा दिवसाला नागपूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने परिसरातील पथदिवेही एक तासाकरिता बंद केले होते. यावेळी मनपाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जैस्वाल, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, ग्रीन व्हिजीलच्या टीम लीडर सुरभी जैस्वाल यांच्या नेतृत्वात मनपाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी वीज बचतीविषयी जनजागृती केली. 
स्वयंसेवकांनी यावेळी परिसरातील व्यापारी प्रतिष्ठान, रुग्णालये, तसेच घराघरांत जाऊन वीज बचतीचे महत्त्व सांगितले. पौर्णिमा दिवस या उपक्रमाबद्दल माहिती दिली. पौर्णिमेची रात्र ही उजेडी रात्र असते. चंद्राचा प्रकाश भरपूर असतो. हे निमित्त साधून आपल्या परिसरातील दिवे किमान एक तास बंद ठेवले तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज बचत होते, असे सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो यूनीट विजेची बचत झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये नागपुरातील या उपक्रमाचा उल्लेख केल्याची माहिती स्वयंसेवकांनी व्यापारी आणि नागरिकांना दिली. स्वयंसेवकांच्या आवाहनाला दाद देत व्यापाऱ्यांनी त्यांच्या प्रतिष्ठानातील अनावश्यक वीज दिवे रात्री ८ ते ९ या कालावधीत बंद ठेवले. 
या उपक्रमात मनपाचे सहायक अभियंता अजय मानकर, कनिष्ठ अभियंता गजेंद्र तारापुरे, राजेंद्र राठोड, सचिन फाटे, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, विष्णुदेव यादव, दादाराव मोहोड, सौरभ अंबादे व मनपाच्या विद्युत विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.
नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी जपान देणार पैसा

नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी जपान देणार पैसा

‘जिका’च्या प्रमुखांची प्रतिनिधी मंडळासह मनपाला भेट 
नोव्हेंबरमध्ये सुरू होणार सर्वेक्षण 
नागपूर/प्रतिनिधी:
 ‘नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पा’ला जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ अर्थसहाय्य करणार आहे. त्यादृष्टीने प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रकल्प अहवाल आणि प्रकल्पातील अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी ‘जिका’ प्रमुख आणि चमू नागपुरात आली असून बुधवारी (ता. २६) आयुक्त सभा कक्ष प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन येथे महापौर नंदा जिचकार, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
महापौर नंदा जिचकार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला जिकाचे प्रमुख काटसू मॅटसुमोटो (Katsuo Matsumoto), जिकाचे भारतातील चीफ डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट एम.पी. सिंग (M.P. Singh), जिकाच्या प्रोग्राम स्पेशालिस्ट काओरी होंडा (Ms. Kaori Honda), जिकाच्या ओजेटी हारुका कोयामा (Ms. Haruka Koyama) यांच्यासह मनपाचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, एनईएसएलचे संचालक डॉ. रिजवान सिद्दिकी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, राजेश मोहिते, मुख्य अभियंता मनोज तालेवार, तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. ईसराईल, नगररचना सहसंचालक प्रमोद गावंडे, मुंबई येथील एनजेएसचे संचालक विद्याधर सोनटक्के, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, मोती कुकरेजा, मनोज गणवीर, राजेश भूतकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, वित्त विभागातील अधिकारी विलास कावळे उपस्थित होते. 

प्रारंभी तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. ईसराईल यांनी नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी असून या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात चार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. सन २०३४ पर्यंत नाग नदी सांडपाणीमुक्त होईल, असे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी दिली असून केंद्र शासनाची अधिकृत वित्तीय संस्था ‘जिका’द्वारे अर्थसहाय्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. 

या संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतल्यानंतर जिकाचे प्रमुख काटसू मॅटसुमोटो यांनी प्रकल्प अहवाला काही गोष्टी समाविष्ट करण्याच्या सूचना केल्या. या प्रकल्पासाठी सेंट्रल मॉनिटरींग ॲण्ड कंट्रोल सिस्टीम असावी, घनकचरा व्यवस्थापनसंदर्भात काय उपाययोजना आहेत, त्याचे व्यवस्थापन कशा प्रकारे करण्यात येईल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जागेची उपलब्धता काय, ह्या संपूर्ण प्रकल्पावर महानगरपालिकेचे नियंत्रण असेल की एनईएसएलचे असेल याची संपूर्ण माहिती प्रकल्प अहवालात नमूद करण्याची सूचना त्यांनी केली. नोव्हेंबर २०१८ पर्यंत सर्वेक्षणासाठी चमूची नियुक्ती करून डिसेंबरमध्ये सर्वेक्षणाचे कार्य सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली. जपानची चमू सर्वेक्षणासाठी येईल, असेही त्यांनी सांगितले. सर्वेक्षणानंतर मंजुरीकरिता जपानहून एक स्वतंत्र चमू येईल. त्यांच्या मंजुरीनंतर जपान सरकारची अंतिम मंजुरी मिळेल. अंतिम मंजुरीनंतर अर्थसहाय्य देण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या होतील. ही सर्व प्रक्रिया फेब्रुवारी २०१९ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती जिकाचे प्रमुख काटसू मॅटसुमोटो यांनी दिली. 

यावर बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, सध्या नागपुरात उभारण्यात आलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हा संपूर्ण देशातील पथदर्शी प्रकल्प आहे. त्याच धर्तीवर नागनदीच्या तीरावर असे चार प्रकल्प उभारून नाग नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. ह्या प्रकल्पाला गती मिळण्यासाठी एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पुढील नियोजनाच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया लवकर आटोपून जिकाने जानेवारी २०१९ पर्यंत अर्थसहाय्य करारावर स्वाक्षऱ्या कराव्यात, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. 
प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी प्रकल्पाला गती प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प हा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प असून नागपूरची वाहिनी असलेले नाग नदीचे चित्र यामुळे बदलेल. जिकानेसुद्धा आवश्यक ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी विनंती त्यांनी केली. 
तत्पूर्वी जिकाच्या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी तुळशीचे रोपटे देऊन केले. महापौर नंदा जिचकार यांचेही त्यांनी स्वागत केले. नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या प्रकल्पाचीही माहिती दिली. बैठकीला सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रकाश वऱ्हाडे, विजय हुमणे, गणेश राठोड, हरिश राऊत, राजेश कराडे, सुवर्णा दखणे, स्मिता काळे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांच्यासह अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते. 
केंद्राला ६० आणि राज्याला २५ टक्के 
नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला ‘जिका’ ८५ टक्के अर्थसहाय्य करणार आहे. त्यापैकी केंद्र सरकारला ६० टक्के आणि राज्य सरकारला २५ टक्के अर्थसहाय्य करेल. केंद्र आणि राज्य सरकारकडून ने नागपूर महानगरपालिकेला देण्यात येईल. १५ टक्के वाटा हा नागपूर महानगरपालिकेचा असेल. 
प्रस्तावित एसटीपी च्या जागांना भेट 
नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पांतर्गत असलेल्या प्रस्तावित एसटीपी प्रकल्पाच्या जागांना ‘जिका’चे प्रतिनिधी मंडळाने भेट दिली. सर्वप्रथम नाग नदीचे उगमस्थान असलेल्या अंबाझरी ओव्हरफ्लो प्वाईंटला भेट दिली. त्यानंतर सीताबर्डी, संगम चाळ येथील प्रस्तावित जागांना भेटी दिल्या. 


Wednesday, September 26, 2018

 डेंग्यू नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करा

डेंग्यू नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करा

आरोग्य सभापती मनोज चापले यांचे निर्देश : लक्ष्मीनगर, धरमपेठ झोनचा घेतला आढावा 
Image result for डेंगूनागपूर/प्रतिनिधी:
  शहरात डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मनपाचा आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तरीही आता सर्व घरांच्या सर्वेक्षणासोबतच अतिरिक्त यंत्रणेच्या माध्यमातून डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्यासाठी प्रयत्न करा. आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करा, असे निर्देश मनपा आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले यांनी दिले. 
आरोग्य समितीच्या झोननिहाय बैठकांना मंगळवारपासून (ता. २५) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी लक्ष्मीनगर झोनचा आढावा घेण्यात आला. लक्ष्मीनगर झोनमध्ये आयोजित बैठकीला सभापती मनोज चापले यांच्यासह लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, सहायक आयुक्त सुवर्णा दखने, अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती लहुकुमार बेहते, नगरसेविका विशाखा बांते, उज्ज्वला बनकर, वनिता दांडेकर, नगरसेवक लखन येरावार, वैद्यकीय अधिकारी विजय जोशी उपस्थित होते. 
सदर बैठकीत डेंग्यूवर गंभीर चर्चा करण्यात आली. आरोग्य सभापती मनोज चापले यांनी लक्ष्मीनगर झोनअंतर्गत असलेल्या रुग्णांची माहिती घेतली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून जेथे डेंग्यूच्या अळ्या आढळतील, त्या नष्ट करा, असे निर्देश त्यांनी दिले. मनपातर्फे वॉर्डावॉर्डात फवारणी करण्यात येते. मात्र, त्याची माहिती नगरसेवकांना देण्यात यावी, हा मुद्दा उपस्थित नगरसेवकांनी मांडताच फवारणीचे २०-२० दिवसांचे वेळापत्रक तयार करण्यात आले. ज्या प्रभागात ज्या दिवशी फवारणी होईल, त्याच्या तीन दिवस अगोदर फवारणीचे वेळापत्रक नगरसेवकांना देण्यात येईल, अशी माहिती सभापती मनोज चापले यांनी दिली. 
यानंतर स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी स्वच्छ सर्वेक्षणाचे जे निकष आहेत त्यावर चर्चा करून लक्ष्मीनगर झोनमध्ये त्याची काय तयारी आहे, याची माहिती आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सभापतींना दिली. १८ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने तेथे सुरू केलेल्या तयारीचा आढावाही सभापती मनोज चापले यांनी घेतला. देशविदेशातून दीक्षाभूमीवर नागरिक येत असल्यामुळे त्यांच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश सभापती चापले यांनी दिले. डेंग्यू, स्क्रब टायफस सारख्या रोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन, त्यादृष्टीने आरोग्य विभागाची चमू सज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 
खामला आणि सोमलवाडा येथील दवाखान्याचे नूतनीकरण करण्यासाठी आणि तेथील आरोग्य सेवेला उत्कृष्ट बनविण्यासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून काही करता येईल का, यावरही बैठकीत चर्चा झाली. बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
'आपली बस' सेवा सुरळीत

'आपली बस' सेवा सुरळीत

Image result for आपली बसनागपूर/प्रतिनिधी:
 डिझल बस ऑपरेटरच्या थकीत देयकामुळे शनिवार २२ सप्टेंबरपासून बंद असलेली ‘आपली बस’च्या प्रश्नावर यशस्वी तोडगा निघाल्याने ही सेवा सुरळीत सुरू झाली आहे. बुधवार २६ सप्टेंबरपासून नागपूर शहरातील ‘आपली बस’च्या सर्व सेवा सुरळीत सुरू होतील.
ऑपरेटरने बस सेवा बंद केल्यानंतर अनेकदा चर्चा करूनही समस्येवर तोडगा निघाला नव्हता. अखेर आज मनपाचे परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी सर्व बस ऑपरेटरला पाचारण केले. सभापती बंटी कुकडे यांच्यासह सत्तापक्ष नेते संदीप जोशी, उपायुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी नितीन कापडणीस यांनी तीनही बस ऑपरेटरसोबत जनतेच्या सुविधेच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा केली. तीनही बस ऑपरेटरला तात्काळ प्रत्येकी दोन-दोन कोटी रुपये देण्याचे ठरविण्यात आले. उर्वरीत थकीत रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येईल, असे आश्वासनही प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. ऑपरेटर्सनी या निर्णयाला सहमती दर्शवित प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने २५ सप्टेंबर रात्री ९ वाजतापासून ‘आपली बस’ सुरळीत सुरू केली.
सदर बैठकीत परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रमअधिकारी अरुण पिपुर्डे, लेखाधिकारी विजय भारद्वाज उपस्थित होते.
  पं. दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त महापौरांनी केला ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

पं. दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त महापौरांनी केला ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

नागपूर/प्रतीनिधी:
 पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त महापौर नंदा जिचकार यांनी प्रभाग क्र. ३७ मधील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. विशेष म्हणजे कार्यक्रमात येण्यास असमर्थ असलेल्या काही ज्येष्ठ व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांचा गौरव केला.
महापौर नंदा जिचकार यांनी स्वतः या 'गौरव सोहळ्याचे आयोजन बुटी ले-आऊट येथील सिद्ध गणेश मंदिरात केले होते. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून माजी उपमहापौर तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ लोखंडे, प्रतापनगर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. शुक्ला उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीड़ा समिती उपसभापती प्रमोद तभाने, गिरीश देशमुख, विमल श्रीवास्तव, गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष नानासाहेब चिंचोळकर, सुनील अलोनी उपस्थित होते. यावेळी महापौर नंदा जिचकार व प्रमुख अतिथींच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना शाल, श्रीफळ आणि अटलबिहारी बाजपेयी यांच्याशी संबंधित पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्त्यानी आपल्या भाषणातून ज्येष्ठाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आजच्या पिढीवर टाकलेल्या संस्कारबद्दल आभार मानले. ज्येष्ठ व्यक्तींचा अनुभव आणि मार्गदर्शन हे आम्हाला जगण्याची आणि परोपकाराची दिशा दाखविणारे असते. त्यांचा आदर सत्कार म्हणजे त्यांनी आमच्यावर केलेल्या उपकाराचे ऋण फेडण्यासारखे आहे, या शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी ज्येष्ठाचा गौरव केला.
कार्यक्रमात येऊ न शकलेल्या ज्येष्ठाचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र.३७ चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Saturday, September 15, 2018

नागपूर मनपाची यंत्रणा सज्ज ठेवून भाविकांना सर्व सोयी उपलब्ध करून द्या

नागपूर मनपाची यंत्रणा सज्ज ठेवून भाविकांना सर्व सोयी उपलब्ध करून द्या

कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांचे निर्देश 
विसर्जनाकरिता कृत्रिम टाक्यांची संख्या वाढवा : वीरेंद्र कुकरेजा 
नाईक तलाव, सक्करदरा तलाव, गांधीसागर तलावावरील विसर्जनस्थळांचे 
कार्यकारी महापौर व स्थायी समिती सभापतींकडून निरीक्षण 
नागपूर/प्रतिनिधी:
गणेश विसर्जनासाठी विसर्जनस्थळी कृत्रिम टाक्यासह प्लास्टीकचे कृत्रिम टँक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विसर्जन स्थळी निर्माल्य संकलनासाठी मोठे कलष, मोठे ड्रम, विद्युतव्यवस्थेसह परिसरातील नियमीत सफाई करिता कर्मचारी यांच्यासह सर्व यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले.  
गणेश विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेचे शनिवारी (ता.१५) कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी निरीक्षण केले. शहरातील नाईक तलाव, सक्करदरा तलाव व गांधीसागर तलावावरील गणेश विसर्जनस्थळांची पाहणी करून कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला. 
यावेळी आरोग्य समिती सभापती मनोज चापले, नगरसेवक प्रमोद चिपले, नगरसेवक रमेश पुणेकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनीक, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, नेहरू नगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, खिलेंद्र बिटलेकर, युवराज कांबळे आदी उपस्थित होते. 
नाईक तलावामध्ये परिसरातील नागरिकांकडून सांडपाणी सोडले जाते, त्यामुळे तलाव अस्वच्छ होत आहे. ज्या नागरिकांच्या सांडपाण्याच्या पाईपलाईन तलावापर्यंत येत आहेत, त्या सर्व लाईन तात्काळ बंद करा, असे निर्देश यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. हरातालिका विसर्जन व यानंतर गणेश विसर्जनामुळे तलावाचे आरोग्य बिघडत आहे. तलावाचे सौंदर्य कायम राहावे, यासाठी पुढील वर्षीपासून नाईक तलाव सक्करदरा तलाव मागील वर्षीपासून गणेश विसर्जनासाठी पूर्णत: बंद आहे. त्यामुळे येथे १२ कृत्रिम तलाव व ३ खड्डे करून तलाव तयार करण्यात आले आहेत. कृत्रिम तलाव उभारताना परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले जातात. त्यामुळे परिसराच्या सौंदर्यात बाधा निर्माण होते. यावर उपाय म्हणून पुढील वर्षीपासून स्थायी स्वरूपाच्या कृत्रिम टँक तयार करण्यात याव्यात, असेही कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी निर्देशित केले. सक्करदरा तलावाप्रमाणेच गांधीसागर तलावामध्येही विसर्जनास बंदी आहे. त्यामुळे येथील टँकसह कृत्रिम तलावांची व्यवस्था चोख ठेवण्यात यावी. कृत्रिम तलावामध्ये हरतालिका व दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन करण्यात आल्याने, येथील स्वच्छता वेळोवेळी करण्यात यावी. कृत्रिम तलाव स्वच्छ करताना आवश्यक असणारे जास्तीत पंम्प लवकरात लवकर उपलब्ध करून ‍कृत्रिम तलाव स्वच्छ करा, असेही निर्देश महापौर दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी यावेळी दिले. 
सर्व विसर्जनस्थळी प्रवेश द्वारावरच निर्माल्य संकलन करण्याची व्यवस्था करण्यात यावी. सक्करदरा, गांधीसागर आणि सोनेगाव तलावामध्ये गणेश मूर्ती विसर्जन पूर्णत: बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी उसळते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याचेही कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी निर्देशित केले. यावेळी तिन्ही झोनमधील अग्निशमन विभागाचे स्थानक प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

Monday, September 03, 2018

नागपूर मनपाच्या २४ कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सत्कार

नागपूर मनपाच्या २४ कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सत्कार

 नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभुळकर यांच्यासह २४ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीबद्दल महापालिका प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर महानगरपालिकेत विविध विभागात कार्यरत २४ अधिकारी-कर्मचारी आज (ता. ३१) सेवानिवृत्त झाले. त्यांचा शाल, श्रीफळ, तुळशीचे रोपटे, स्मृतिचिन्ह व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, निगम अधीक्षक मदन सुभेदार, यावेळी उपस्थित होते.
सेवानिवृत्त अधिकारी कार्यकारी अभियंता डी.डी. जांभुळकर यांचा अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सत्कार केला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता स्थापत्य चंद्रशेखर धकाते, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आर. एम. राठोड, मुख्याध्यापिका कीर्ति वरकडे, सहायक शिक्षिका स्वयंप्रभा खातरकर, शालिनी ॲन्थोनी, अरुणा नगरारे, मेहनाज बेगम, ज्येष्ठ श्रेणी लिपिक माधुरी भालेराव, स्वच्छता निरीक्षक आर.जी. घोरमाडे, लिडींग फायरमन एच.आर. तळवेकर, कनिष्ठ लिपिक आर. ए. पाचघरे, गार्ड यादव वानखेडे, चपराशी सुरेश ठाकरे, दिलीप परिहार, खलाशी सूर्यभान सहारे, मजदूर पुंडलिक अवचट, हरिश्चंद्र नरड, चपराशी नर्मदा भेंडे, सफाई कामगार विजय मेश्राम, शोभा चिघोरे, तिजिया बक्सरिया सदाशीव वाहाणे यांचा समावेश होता.
सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे म्हणाले, आयुष्यभर केलेल्या सेवेची ही पावती आहे. मनपाच्या सेवेतून आज आपण निवृत्त होत असलो तरी कर्तव्यातून मात्र निवृत्त होता येत नाही. आपण आयुष्यभर नोकरीच्या माध्यमातून केलेल्या सेवेचा आम्ही आदर करतो. अशीच सेवा यापुढेही सुरू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना कार्यकारी अभियंता डी. डी. जांभुळकर यांनी मनपाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, नागपूर महानगरपालिकेला मी नेहमी आपले पालक समजले. प्रामाणिक काम करण्याची सवय महापालिकेनेच लावली. आपल्या कामातून वरिष्ठांचा विश्वास संपादन करू शकलो. येथील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्याला खूप प्रेम दिले. त्याबद्दल ऋणी असल्याचे ते म्हणाले. 
कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.आभार डोमाजी भडंग यांनी मानले. यावेळी सहायक अधीक्षक मनोज कर्णिक, सहायक अधीक्षक दत्तात्रय डहाके, दिलीप देवगडे, दिलीप तांदळे यांच्यासह बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यात उभारण्यात येणार ३५० स्टेडियम

नागपूर जिल्ह्यात उभारण्यात येणार ३५० स्टेडियम

बॉक्सिंग प्रशिक्षण : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
महापौर चषक सबज्यूनिअर गर्ल्स नॅशनल बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन थाटात
नागपूर/प्रतिनिधी:
 दिवसेंदिवस बॉक्सिंग मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. त्यामुळे या खेळामध्ये युवकांचा सहभागही वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंगमध्ये देशाची पदक संख्या वाढावी यासाठी खेळाडूंना अद्ययावत सुविधा मिळणे आवश्यक आहे. नागपूरात साकारत असलेल्या १५० कोटीच्या ‘स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ (साई)च्या केंद्रामध्ये बॉक्सिंगचा समावेश करून येथे बॉक्सिंग प्रशिक्षण सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय सडक परिवहन, राजमार्ग व जहाजराणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

नागपूर महानगरपालिका, नागपूर महानगर बॉक्सिंग असोसिएशन, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देशातील पहिली महापौर चषक सबज्यूनिअर गर्ल्स नॅशनल बॉक्सिंग स्पर्धेचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. सिव्हील लाईन्स येथील राणी कोठी येथे आयोजित उद्घाटन समारंभाला विशेष अतिथी म्हणून राज्याचे उर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, गिरीश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक व आयोजन समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, बसपा गटनेता मोहम्मद जमाल, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक संजय महाजन, मनपा उपायुक्त रविंद्र देवतळे, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव जय कवळी, स्पर्धा निरीक्षक सी.बी. राजे, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे महासचिव भरत व्हावळ, भारतीय बॉक्सिंग संघाचे माजी व्यवस्थापक के.के. बोरो, अर्जुन पुरस्कार विजेते डी.एफ.आय.चे मुख्य निवडकर्ता कॅप्टन गोपाल देवांग, अर्जुन पुरस्कार विजेते एस. जयराम, मनोज पिंगळे, राजेंद्रप्रसाद, भारतीय महिला बॉक्सिंग संघाच्या मुख्य प्रशिक्षक अमनप्रीत कौर, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आय. व्यंकटेश्वर राव, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे दत्ता पंजाब, नागपूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सज्जड हुसैन, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रेम चंद, विभागीय सचिव व बॉक्सिंग प्रशिक्षक गणेश पुरोहित, नागपूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव अरुण बुटे, राजेश देसाई, दादर नगर हवेली बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल लोखंडकर, अनुराग वर्मा, पारस कोतवाल, डॉ. विजय इंगोले, नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड उपस्थित होते. 
नागपूर शहर व जिल्ह्यात ३५० स्टेडियम उभारणार
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ग्रामिण भागातील व झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुले व मुलीमध्ये चांगली प्रतिभा असते. त्यांच्यातील कौशल्याला योग्य मार्गदर्शन व योग्य सुविधांची जोड मिळाल्यास ते स्वत:सह देशाचे नाव लौकीक करू शकतात. असे खेळाडू आपल्या नागपूर शहर व जिल्ह्यातूनही घडावे यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. येत्या काळात नागपूर शहर व नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी ३५० स्टेडियम उभारण्याचा मानस आहे. या स्टेडियममध्ये विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नगरसेवक व आयोजन समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केले. ७ सप्टेंबरपर्यंत रंगणा-या या स्पर्धेमध्ये देशातील विविध ३१ राज्यांतील सुमारे ४०० खेळाडू सहभागी झाले आहेत. खेळाडूंसह प्रशिक्षक व विविध ५५० अधिकाऱ्यांची आमदार निवास येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. सर्बिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशाला रौप्य पदक मिळवून देत जगात नागपूरचे नाव लौकीक करणारी आंतरराष्ट्रीय बॉक्सर अल्फीया पठाणचे यावेळी केंद्रीय मंत्री यांनी स्वागत करून सन्मानित केले. याशिवाय स्पर्धेचे ब्रँड अॅम्बेसेडर माय एफएमचे राजन यांनाही केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी सन्मानित केले. यावेळी मनपाचे क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथुल, जितेंद्र गायकवाड यांच्यासह बॉक्सिंग असोसिएशनचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Saturday, August 18, 2018

नागपुरात घर बांधकामाचा विचार करत असाल तर लागू होणार हा नियम

नागपुरात घर बांधकामाचा विचार करत असाल तर लागू होणार हा नियम

१२५ चौ. मी. पेक्षा अधिक बांधकामासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आवश्यक
जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांची माहिती : समितीचा घेतला आढावा

नागपूर/प्रतिनिधी: 

रेन वाटर हार्वेस्टिंग के लिए इमेज परिणाम
 घर बांधकाम जर १२५ चौ.मी. किंवा १५०० चौ.फूट पेक्षा अधिक असेल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक आहे. त्यानुसारच नकाशे मंजूर करण्यात येतील, अशी माहिती जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी दिली.
शनिवारी (ता.१८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात जलप्रदाय समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, उपसभापती श्रद्धा पाठक, सदस्या जयश्री रारोकर, सदस्य हरिश ग्वालबंशी, संजय बुर्रेवार, कार्यकारी अभियंता (पेंच प्रकल्प) अनिरूद्ध चौगंजकर, प्रभारी कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) प्रदीप राजगिरे, उपअभियंता मनोज गणवीर, ओसीडब्ल्यूचे उपसंचालक राजेश कालरा प्रामुख्याने उपस्थित होते.
भविष्यातील पाणी टंचाई रोखण्यासाठी आतापासून पाणी बचतीसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे आवश्यक असल्याचा निर्णय जलप्रदाय समितीने घेतला आहे. यापुढे १२५ चौ.मी. पेक्षा जास्त घर बांधकाम असेल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग आवश्यक राहणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाकडून त्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. याबाबत समितीचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सभागृहाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
जलप्रदाय समितीच्या झोननिहाय आढावा बैठकीचा अहवाल तयार केला की नाही याचा आढावा सभापती पिंटू झलके यांनी घेतला. ज्या तक्रारी बैठकीमध्ये आढळल्या होत्या त्याचे निवारण केले की नाही, याचीही माहिती सभापतींनी घेतली. धरमपेठ व मंगळवारी झोनमधील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोणाच्या आदेशावरून बदलविण्यात आले, असा सवाल सदस्य हरिश ग्वालबंशी यांनी विचारला. त्यावर बोलताना सभापती पिंटू झलके म्हणाले, यानंतर ओसीडब्ल्यूने कोणताही निर्णय घेताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्यावे, असे निर्देश दिले. 
नालंदा नगरची पाण्याची टाकी पूर्ण झाली आहे. आता दक्षिण-पश्चिम नागपूरचा पाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तातडीच्या पाणी पुरवठा उपाययोजनासंबंधीचा आढावा सभापती पिंटू झलके यांनी घेतला. शासकीय कार्यालयाच्या पाणी देयकाबाबत आढावा घेण्यात आला. पोलिस विभागाचे क्वॉर्टर्स, मुख्यालयाची देयके मोठ्या प्रमाणावर असल्याचे निदर्शनास आले. यावर बोलताना सभापती श्री.झलके यांनी मनपा आयुक्तांमार्फत सर्वांना पत्र पाठविण्यात यावे, असे सूचित केले.
शहरात सुरू करण्यात आलेल्या २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेचादेखिल आढावा सभापतींनी घेतला. सद्यस्थितीत १६ स्पॉट्स (कमांड एरिया) तयार झालेले आहे. आणखी काही स्पॉटस्‌ वाढवून पुढील कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिली. 
नागरिकांना मोठ्या प्रमाणावर देयके प्राप्त होत आहे. त्यासंबंधी काही उपाययोजना करता येईल का, यावर विचार करण्यात यावा, असे सभापतींनी सांगितले. मागील वर्षात पाण्याच्या देयकाची किती वसुली झाली याचादेखिल आढावा बैठकीमध्ये घेण्यात आला. या वर्षी २०० कोटीची वसुली झालीच पाहिजे, असे सभापती श्री .झलके यांनी सांगितले. 
बैठकीला ओसीडब्ल्यूचे अधिकारी व कर्मचारी, मनपाचे डेलिगेट्स यांच्यासह जलप्रदाय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


शहरात विविध ठिकाणी ‘वॉटर एटीएम’ उभारणार 
नागपूर शहरातील विविध ठिकाणी वर्दळीच्या जागेवर ‘वॉटर एटीएम’ उभारण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये राबविण्यात येत आहे. यासाठी लक्ष्मीनगर झोनची निवड करण्यात आली आहे. दरांविषयी एक धोरण निश्चित करून पुढील कार्यवाहीसाठी पुढे पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता मनोज गणवीर यांनी दिली.  

Wednesday, May 16, 2018

नागपूर मनपानेपाण्यात सोडले पाच हजार गप्पी मासे

नागपूर मनपानेपाण्यात सोडले पाच हजार गप्पी मासे

डेंग्यू दिवस:हिवताप व हत्तीरोगविभागातर्फे 
दहाही झोनमध्ये प्रभातफेरी
नागपूर/प्रतिनिधी:

राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे दहाही झोनमध्ये ‘गप्पीमासे वितरण काढण्यात आली. या दरम्यान शहरभरात निरनिराळ्या ठिकाणच्या पाण्यामध्ये सुमारे पाच हजारांवर गप्पी मासे सोडण्यात आले.
दहाही झोनअंतर्गत काढण्यात आलेल्या प्रभातफेरीमध्ये स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, नगरसेविका रेखा साकोरे, वनिता दांडेकर, रूपा राय, शीतल कामडे, जयश्री वाडीभस्मे, दिव्या धुरडे, झिशान मुमताज अंसारी, आशा ऊईके, सैय्यदा बेगम, कांता रारोकर, भावना संतोष लोणारे, मंगला योगेश लांजेवार, नगरसेवक सुनील हिरणवार, सतीश होले, संजय चावरे, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, राजू वराटे, विजय काळे सहभागी झाले होते. 
प्रभातफेरीच्या प्रारंभी उपस्थित नागरिकांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कीटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्याबाबतची शपथ घेली. प्रभातफेरीचे आयोजन लक्ष्मीनगर झोनमध्ये सोमलवाडा रुग्णालयातून, धरमपेठ झोनमध्ये रामदासपेठ येथून, हनुमान नगर झोनमध्ये झोन कार्यालयातून, धंतोली झोनमध्ये पार्वतीनगर येथून, नेहरूनगर झोनमध्ये नवीन नंदनवन पाण्याच्या टाकीजवळून, गांधीबाग झोनमध्ये मोमीनपुरा येथून, सतरंजीपुरा झोनमध्ये मेहंदीबाग येथून, लकडगंज झोनमध्ये वर्धमाननगर येथून, आशीनगर झोनमध्ये रिपब्लिकन नगर येथून तर मंगळवारी झोनमध्ये जरीपटका येथून प्रभातफेरी करण्यात आले होते. दरम्यान नागरिकांना आरोग्य शिक्षण व कीटकजन्य आजाराबाबत माहिती देण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान पत्रके वाटून, स्टीकर, पोस्टर लावून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर गप्पीमासे वाटप कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक झोनमध्ये करण्यात आले होते. 
पाच हजारांवर मासे वाटप
प्रभातफेरीदरम्यान सर्व झोनमधून एकूण ३१०० घरांना भेटी देण्यात आल्या. या भेटीत कुलरमध्ये ३८३०, निरुपयोगी विहिरींमध्ये २७, टाक्यांमध्ये ८१९, मातीच्या भांड्यांमध्ये १५५, कारंज्यांमध्ये सात, मोठ्या नाल्यांमध्ये सात, लहान नाल्यांमध्ये नऊ, तळघरांमध्ये पाच, रिकाम्या भूखंडांवर तीन, बांधकामाच्या स्थळी असलेल्या लिफ्टच्या खड्ड्यांमध्ये तीन, वेगवेगळ्या प्रकारच्या खड्ड्यांमध्ये १२ आणि अन्य ठिकाणी २०७ असे एकंदर पाच हजारांवर गप्पी मासे सोडण्यात आले.























                               -----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
.Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo