সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

गडचिरोली

गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४,४१४ चौ.कि.मी आहे.

फार प्राचीन काळी ह्या प्रदेशावर राष्ट्कूट यांचे राज्य होते. त्यानंतर चालुक्य वंशाचे व नंतर देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. यानंतर गडचिरोलीवर गोंड राजांनी राज्य केले. तेराव्या शतकात, खंडक्या बल्लाळ शाह यांनी चंद्रपूरची स्थापना केली. त्यांनी आपली राजधानी सिरपूर येथून चंद्रपूर येथे हलविली. याच काळात चंद्रपूर प्रदेश हा मराठ्याच्या सत्तेखाली आला. १८५३ मध्ये, बेरार हा चंद्रपूर (पूर्वीचे चांदा) प्रदेशाचा भाग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. १८५४ मध्ये चंद्रपूर हा बेरार या प्रदेशामधला स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. ब्रिटिशांनी १९०५ मध्ये चंद्रपूरमधील व ब्रह्मपुरीमधील जमीनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तालुक्याची निर्मिती केली. राज्याची पुनर्रचना होण्यापूर्वी हा भाग १९५६ पर्यंत केंद्रीय अधिपत्याखाली होता. त्यानंतर राज्यपुनर्रचनेनुसार चंद्रपूर बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. १९६०मध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, त्यांत चंद्रपूर हा जिल्हा समाविष्ट झाला. १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला.

भौगोलिक स्थान
गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्यात ईशान्येला असून आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमा त्याला लागून आहेत. हा जिल्हा नक्सल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्हा जवळपास ७६ % जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्सल समर्थित लोक आश्रय घेतात.

पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या गोदावरी नदीचे पात्र जिल्ह्याच्या सीमेला लागून असून तिच्या दक्षिणेला हा जिल्हा वसलेला आहे. प्राणहिता (वैनगंगा व वर्धा या नद्यांच्या संगमाने बनलेली नदी) व इंद्रावती ह्या गोदावरीच्या उपनद्या जिल्ह्याच्या सीमाभागात वाहतात.
जिल्ह्याच्या ईशान्य भागात, धानोरा, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा हे तालुके असून ते घनदाट जंगलाने व्याप्त आहेत. जिल्ह्याच्या भामरागड, टिपागड, पलसगड व सुरजागड भागात उंच टेकड्या आहेत.
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा हा आदिवासी, मागासलेला, डोंगरदऱ्यांनी व घनदाट जंगलाने व्याप्त असून अविकसित समजला जातो. जिल्ह्याच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी ७५.९६ टक्के भागात जंगल आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे हवामान उन्हाळ्यात खूप उष्ण तर हिवाळ्यात खूप थंड असते. जिल्ह्याची सरासरी आर्द्रता ६२ टक्के आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २० मे १९९२ रोजी ला सर्वात जास्त ४६.३ अंश.से. एवढे व ५ जानेवारी १९९२ रोजी सर्वात कमी ५.० अंश से. एवढे तापमान नोंदले गेलेले आहे.

लोकजीवन
जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या १,०८,८२४ एवढी असून तिची एकूण टक्केवारी ११.२ होते. आदिवासी जमातींच्या लोकांची संख्या ३,७१,६९६ एवढी असून त्यांचे प्रमाण जिल्ह्यात जास्त आहे. त्यांची टक्केवारी ३८.३० एवढी आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी ३८ टक्के लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची असल्याने हा जिल्हा महाराष्ट्रातला आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनुसूचित जमातीमध्ये मुख्यत्वे गोंड, कोलाम, माडिया, परधान इत्यादी जमातीचे लोक आहेत. त्यांच्या बोलीभाषा "गोंडी, माडिया" ह्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये यांशिवाय मराठी, हिंदी, तेलुगू, बंगाली व छत्तीसगडी इत्यादी भाषा बोलल्या जातात.

जिल्ह्यातील आदिवासीची विशिष्ट अशी संस्कृती आहे. येथील आदिवासी लोकांचे "पेरसा पेन" हे दैवत आहे. ही लोक शुभकार्यप्रसंगी किवा पिकांचे उत्पादन झाल्यावर "रेला" नावाचे नृत्य करून आनंद व्यक्त करतात. " ढोल " हे सुद्धा त्यांचे आवडीचे नृत्य आहे. होळी, दसरा व दिवाळी हे त्यांचे मुख्य सण आहेत. आदिवासी जमात ही मुख्यतः जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वास्तव्य करून आहे.
जिल्ह्यातील इतर जातीतील लोक त्यांचे गणपती, दसरा, दिवाळी, होळी इत्यादी सण साजरे करतात. जिल्ह्याच्या काही भागात झाडीपट्टीतील प्रसिद्ध "नाटक, तमाशा" इत्यादी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे गणपती, दसरा, होळी या सणाचे वेळी तसेच शंकरपटाच्या निमित्ताने आयोजन होते.

हा जिल्हा बांबूची झाडे व तेंदूपानांकरिता प्रसिद्ध आहे. भात हे जिल्ह्याचे मुख्य पीक आहे. याव्यतिरिक्त तूर, गहू, ज्वारी, सोयाबीन, जवस इत्यादी कृषी उत्पादने घेतली जातात. जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यामध्ये आष्टी येथे पेपर मिल चा कारखाना असून इतर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहित. यामुळे, जिल्हा हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. जिल्ह्यात भाताचे उत्पादन जास्त होत असल्याने भात गिरण्यांची संख्या जास्त आहे. भातसडीचे उद्योग व कागद कारखाने जिल्ह्यात आहे पण मोठे उद्योग नाहीत. जिल्ह्यात कोसाचे उत्पादन होत असून कोसा उत्पादन केंद्र आरमोरी येथे आहे. जिल्ह्यात फक्त १८.५ कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग असून देसाईगंज येथे रेल्वेचे स्टेशन आहे.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये सहा प्रशासकीय उपविभाग (गडचिरोली, वडसा, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली, कुरखेडा) आहेत. प्रत्येक उपविभागात दोन, असे एकूण १२ तालुके आहेत. जिल्ह्यात ४६७ ग्रामपंचायती असून १६८८ राजस्व गावे अस्तित्वात आहेत. जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा व एक लोकसभा क्षेत्र (चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग मिळून) असून १२ पंचायत समित्या आहेत. जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज ही दोन शहरे असून येथे नगरपालिका आहेत.

जिल्ह्यातील तालुके
  1. अहेरी
  2. आरमोरी
  3. एटापल्ली
  4. कुरखेडा
  5. कोरची
  6. गडचिरोली
  7. चामोर्शी
  8. देसाईगंज (वडसा)
  9. धानोरा
  10. भामरागड
  11. मुलचेरा
  12. सिरोंचा
  • आकडेवारी
  • जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र :१४,४१२ चौ.कि.मी.
  • जिल्ह्याचे पृथ्वीवरील स्थान : १८.४३ ते २१.५० उत्तर अक्षांश आणि ७९.४५ ते ८०.५३ पूर्व रेखांश
  • समुद्रसपाटीपासून सरासरी उंची - २१७ मीटर (७१५ फूट )
  • जिल्ह्याचे तापमान (इ.स. १९९८) : सर्वात कमी ११.३ अंश सेल्शियस. सर्वात जास्त ४७.७ अंश सेल्शियस.
  • सरासरी पर्जन्यमान (२०११) : ८४०.७ मिलिमीटर
  • जिल्ह्यातील एकूण उपविभाग (६) १.गडचिरोली २. देसाईगंज (वडसा) ३. अहेरी ४. कुरखेडा ५. चामोर्शी ६. एटापल्ली
  • जिल्ह्यातील एकूण तालुके १२
  • जिल्ह्यातील एकूण गावे १,६७९
  • जिल्ह्यातील एकूण शहरे २ ( गडचिरोली, देसाईगंज)
  • जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती ४६७
  • एकूण नगरपालिका (२) १. गडचिरोली २. देसाईगंज
  • लोकसभा निर्वाचन क्षेत्र (१) चिमूर-गडचिरोली
  • विधानसभा निर्वांचन क्षेत्रे (३) गडचिरोली, आरमोरी, अहेरी
  • एकूण पोलिस स्टेशन्स २९
  • पोलिस आऊट पोस्ट ३१
  • लोकसंख्या (२००१)
  • एकूण ९,७०,२९४
  • पैकी पुरुष ४,९१,१०१
  • आणि स्त्रिया ४,७९,१९३
  • लोकसंख्या घनता ६७ प्रति चौरस किलोमीटर स्त्रिया / पुरुष प्रमाण ९७६/ १०००
  • साक्षरता (इ.स. २००१ च्या खानेसुमारीप्रमाणे)
  • एकूण ६०.१ %
  • पुरुष ७१.९ %
  • स्त्रिया ४८.१ %