तेली समाजाच्या बॅनर मनपाने काढल्याच्या वादात आता शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख किशोर जोरगेवार यांनी उडी घेतली आहे. तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री शिरोमणी जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात विविध ठिकाणी बॅनर लावण्याची परवानगी तेली समाजातर्फे मागण्यात आली होती. शहराचे विद्रूपिकरण होते, असे कारण देत बॅनर लावण्यास मनपाने नकार दिला होता. त्यानंतरही लावलेले बॅनर मनपाने काढले. मात्र सत्ताधारी राजकीय पक्षाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावले जात आहेत. हे मनपातील अतिकर्तव्यदक्ष अधिकारी आणि पदाधिकाऱ्याना दिसत नाही का? बॅनर लावण्यासाठी रितसर परवानगी मागुनही ती नाकारली. मात्र सत्ताधाऱ्यांचे बॅनर्स लावले जातात. यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडत आहे का? असा प्रश्न करीत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख किशोर जोरगेवार यांनी मनपाच्या धोरणाचा निषेध केला आहे.
