काव्यशिल्प Digital Media: महावितरण

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label महावितरण. Show all posts
Showing posts with label महावितरण. Show all posts

Thursday, October 18, 2018

 महावितरण अभियंतापदासाठी २० आणि २१ रोजी ऑनलाईन परीक्षा

महावितरण अभियंतापदासाठी २० आणि २१ रोजी ऑनलाईन परीक्षा

संबंधित इमेजनागपूर/प्रतिनिधी:
महावितरणमध्ये पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) आणि पदवीका अभियंता (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी येत्या २० आणि २१ ऑक्टोबर २०१८ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदासाठी दिनांक २० रोजी सकाळच्या सत्रात तर पदवीका अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदासाठी २१ रोजी सकाळ आणि दुपार अश्या दोन सत्रात ही परीक्षा होईल. विदर्भातील नागपूर,चंद्रपूर आणि अमरावती येथील १३ केंद्रावर या परीक्षा होणार आहेत. 
पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) आणि पदवीका अभियंता (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना आवंटीत केलेल्या परीक्षा केंद्राची माहिती प्रवेश पत्रावर देण्यात आली आहे. उमेदवाराने त्याचे प्रवेशपत्रावर स्वतःचा फोटो चिटकवून सोबत प्रवेश पत्रावरील असलेल्या नावाचे मूळ ओळखपत्र (ओळखपत्राचा सविस्तर उल्लेख प्रवेशपत्रावर केला आहे.)त्याच्या छायाप्रतीसह परीक्षा केंद्रात हजर राहणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी सकाळच्या सत्रात सकाळी ९.१५ वाजेपूर्वी तर दुपारी १.१५ पूर्वी दाखल होणे आवश्यक आहे. उशिरा येणाऱ्या किंवा मूळ ओळखपत्र आणि सोबत त्याची छायाप्रत सोबत नसलेल्या उमेदवारांना केंद्राच्या आत प्रवेश करता येणार नाही. 
नागपूरातील ५ केंद्रावर पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी)पदासाठी २,६३२ तर कनिष्ठ अभियंता पदवीका अभियंता (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी ३,९५४ उमेदवार परीक्षा देणार आहेत.अमरावती केंद्रावर १२५४ पदवीधारक तर २१७१ पदविकाधारक उमेदवार ४ केंद्रावर तर चंद्रपूर केंद्रावर ३८५ पदवीधारक ७६० पदविकाधारक उमेदवार ४ केंद्रावर परीक्षा देणार आहेत.

  नीता केळकर यांची मराविमं स्वतंत्र संचालक पदी नेमणूक

नीता केळकर यांची मराविमं स्वतंत्र संचालक पदी नेमणूक

 नागपूर/प्रतिनिधी:
श्रीमती नीता केळकर यांची मराविमं सूत्रधार कंपनीत स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. संचालक मंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते.
श्रीमती केळकर मुळच्या सांगलीच्या रहिवासी असून सिव्हील इंजिनियर आहेत. तसेच महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रमात सुध्दा त्यांचा सहभाग असतो.
श्रीमती केळकर यांच्या स्वतंत्र संचालक म्हणून केलेल्या नियुक्तीने मराविमं सूत्रधारी कंपनीत असलेली स्वतंत्र संचालकाची रिक्त जागा पुर्ण झाली आहे. संचालकांच्या बैठकीला ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावर, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महापारेषचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुटिया, सुनील पिंपळखुटे संचालक (वित्त), विश्वास पाठक, प्रकाश पागे व राजेंद्र गोयंका उपस्थित होते.

Tuesday, October 16, 2018

 महावितरणच्या नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल:देवेंद्र फडणवीस

महावितरणच्या नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल:देवेंद्र फडणवीस

नागपूर /प्रतिनिधी:
सौर ऊर्जेद्वारे शेतकऱ्यांना दिवसाही मुबलक वीज उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व कृषीपंपांना नवीन वीजजोडणीसह दर्जेदार वीजपुरवठा देणाऱ्या उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) या महावितरणच्या नव्या योजनांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान निश्चित उंचावेल अशी ग्वाही मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई:महावितरणच्या तीन नव्या योजनांचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस व उपस्थित मान्यवर.
मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात आज (दि. १६) आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना, उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजना व विद्युत वाहनांकरीता उभारण्यात आलेल्या महावितरणच्या चार्जिंग स्टेशन्स या तीन नव्या योजनांचे मुख्यमंत्री ना. श्री. फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री ना. श्री चंद्रकांतदादा पाटील, गृहनिर्माण मंत्री ना. श्री. प्रकाश मेहता, आदिवासी विकास मंत्री ना. श्री. विष्णू सावरा, सहकारमंत्री ना. श्री. सुभाष देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. श्री. गिरीश बापट, जलसंपदा मंत्री ना. श्री. गिरीश महाजन, ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटनमंत्री ना. श्री. जयकुमार रावल, गृह राज्यमंत्री ना. श्री. दीपक केसरकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, उद्योग राज्यमंत्री ना. श्री. प्रवीण पोटे, राज्याचे मुख्य सचिव श्री. डी.के. जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री ना. श्री. फडणवीस म्हणाले, की मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेद्वारे राज्यातील सुमारे ७ लाख ५० हजार शेतकऱ्यांना दिवसाही पुरेशी वीज मिळणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना स्वस्त दराने वीज उपलब्ध होणार असून उद्योगांवरील सबसीडीचा भार सुद्धा कमी होईल. मागील ४ वर्षांत महावितरणने ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी केलेल्या विविध प्रभावी उपाययोजनांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
यावेळी ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सौरकृषी वाहिनी योजना सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून महावितरणच्या या तिनही योजना राज्याचा कायापालट करणाऱ्या ठरणार आहेत, असे सांगितले. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला राज्यातील आमदार, ऊर्जा सचिव अरविंद सिंह व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Monday, October 15, 2018

महावितरणच्या तीन अभिनव योजनांचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महावितरणच्या तीन अभिनव योजनांचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर/प्रतिनिधी:
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले सौर ऊर्जा प्रकल्प, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स आणि उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस) कृषीपंपांना नवीन वीजजोडणी या तीन योजनांचे उद्घाटन मंगळवारी (दि. १६) दुपारी १२ वाजता राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.
मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील (मंत्री, महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)), मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार (मंत्री, वित्त आणि नियोजन, वने) मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे (मंत्री, ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क), मा. ना. श्री. मदन येरावार (राज्यमंत्री, ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषधी प्रशासन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) व सामान्य प्रशासन) आणि राज्याचे मुख्य सचिव श्री. डी. के. जैन हे उपस्थित राहणार आहेत. 

Friday, October 12, 2018

 विजेची वाढती मागणी लक्ष्यात घेऊन आराखडा तयार करा:प्रा.देशमुख

विजेची वाढती मागणी लक्ष्यात घेऊन आराखडा तयार करा:प्रा.देशमुख

नागपूर/प्रातिनिधी:
भविष्यातील विजेची वाढती मागणी लक्ष्यात घेऊन नागपूर जिल्ह्यात वीज वितरणाचे जाळे मजबूत करण्यासाठी पुढील १० वर्षाचा विकास आराखडा तयार करण्याची सूचना जिल्हा विदुत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख यांनी आज केली. 
महावितरणच्या काटोल रोड येथील कार्यालयात जिल्हा विदुत नियंत्रण समितीची बैठक झाली. यावेळी बोलताना प्रा. देशमुख म्हणाले, नागपूर जिल्ह्यात राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात ऊर्जा खात्याशी निगडित अनेक विकास कामे सुरु आहेत. यातील अनेक कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असून हि कामे पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखण्डित आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. पण भविष्यात विजेचे मागणी आणि वीज ग्राहकांची संख्या वाढणार आहे. यासाठी आतापासून नियोजन करणे गरजेचे आहे. 
वीज चोरांच्या विरोधात महावितरण आणि एसएनडीएलने कडक कारवाई करावी. वीज चोरांची हयगय करू नये. तसेच तक्रार निवारण केंद्रात येणाऱ्या वीज ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करून त्यांचे समाधान करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले .
या बैठीकीला महावितरण आणि एसएनडीएलचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी खामला येथील ३३/११ कि. व्हो. उपकेंद्राचा आढावा घेण्यात आला. सोबतच कन्हान येथील परिसरास वीज पुरवठा करण्यासाठी नवीन भूमिगत वाहिनी टाकण्यासाठी चर्चा करण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. पण कामे करतेवेळी संबधित यंत्रणा महावितरण अथवा एसएनडीएलला विश्वासात घेत नाही. परिणामी मोठा प्रमाणात वीज वाहिन्यांचे नुकसान होत आहे. या विषयावर चर्चा झाली. बैठीकीला मुख्य अभियंता दिलीप घुगल, अधीक्षक अभियंता मनीष वाठ, नारायण आमझरे, उमेश शहारे , एसएनडीएलचे बिझनेस हेड सोनल खुराणा यांच्यासह महावितरण आणि एसएनडीएलचेअधिकारी उपस्थित होते.
लोडशेडींगचं संकट चंद्रपूरावरही:जिल्ह्यात भारनियमन सुरु

लोडशेडींगचं संकट चंद्रपूरावरही:जिल्ह्यात भारनियमन सुरु

आता चंद्रपूरालाही सोसाव्या लागतील भारनियमनाच्या झळा
ज्यादा वीजहानीच्या G1,G 2,G 3 वाहिण्यावर भारनियमन सुरु 
नागपूर/ललित लांजेवार:
भारनियमन सुरु साठी इमेज परिणाम

राज्यातील चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा असल्यामुळे राज्यात अघोषित भारनियमन सुरू करण्यात आले आहे. जवळपास 3000 मेगावॅट विजेचा तुटवडा असल्यामुळे हे भारनियमन सुरु करण्यात आलं असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
त्यामुळे राज्यातील वीजग्राहकांना ऑक्टोबर हिट मधल्या भारनियमनाचा चांगलाच फटका बसणार असल्याचं दिसत आहे.सध्या तात्पुरत्या स्वरूपाचं भारनियमन लागू करण्याचा निर्णय महावीतरणनं घेतला आहे. यात G1, G2 आणि G3 या तीन गटात जवळपास ८ तासांचं भारनियमन लागू करण्यात आलं आहे.

सध्या राज्यात विजेची मागणी १९५०० ते २०५०० मे.वॉ. इतकी असून विजेची उपलब्धता हि १४५०० ते १५००० मे.वॉ.इतकी आहे. वातावरणातील बदलांमुळे वाढणारी विजेची मागणी व पुरवठा यातील तफावत कमी करण्यासाठी महावितरणने विजेचे नियोजन करून पॉवर एक्सचेंजमधून दररोज ३२०० मे.वॉ.पर्यंत तर लघुकालीन निविदेद्वारे १००० मे.वॉ. पर्यंत वीज खरेदी करत आहे.
कुठे असणार बत्ती गुल..
 चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर मंडळांतर्गत जीवती तालुक्यातील शेनगाव वाहिणीवर तर भद्रावती तालुक्यातील ताडोबा वाहिणीवर भारनियमन करण्यात येत आहे.त्यामुळे ताडोबा भ्रमंती करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना देखील या भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणार आहे.
तर गडचिरोली मंडळांतर्गत येणाऱ्या ब्रम्हपूरी तालुक्यातील गांगलवाडी, मेंडकी, मालडोंगरी, उदापूर, तळोधी , नवेगाव पांदूर, कांपा, टेलिफोन एक्सचेंज, घोडाझरी, मिंडाळा, गिरगाव, सरडपार, गंजुवाही व निफंद्रा तसेच
आलापल्ली विभागातील-टेकडा, बामणी, मेडारम, हर्डा, कोपरअल्ली, मुलचेरा, जिमलगटटा, जगमपूर, घारगाव,भेंडाळा, तडमगाव बोरी, घोटआमगाव, सोनापूर, दहेगाव, तडोधी, येडानूर, जैरामपूर, पेरीमिली, कोठी, कसमसूर, भामरागड, रेपनपल्ली,मललेरा तसेच पोर्ला,येवली,अमिर्झा, गुरूवला, वैरागड, घाटी, फुरसंडी, बेतकी, मुरूमगाव रोड, चातगाव व काटेझरी या सर्व वीजवाहिण्यांवर ५८ टक्यांपेक्षा जास्त वीजेची हानी असल्याने या वाहिन्यांवर जवळपास ०७ तास ४५ मिनीटे ते ९ तास १५ मिनीटांचे भारनियमन दोन टप्प्यांत करण्यात येत आहे.
ज्या ठिकाणी वीजबिलांचा भरणा नियमित करण्यात येत नाही अशा जी-1, जी-2 आणि जी-3 वीज वाहिन्यांवर केवळ ४०० ते ६०० मे.वॉ. विजेचे भारनियमन करण्यात येत आहे. तर नवरात्र उत्सव व सणासुदीच्या काळात राज्यात सायं.६.३० ते १२.०० वा.पर्यंत भारनियमन हे बंद करण्यात येणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात उन्हाच्या तडाख्यामुळे सर्वच राज्यांमधील वीज कंपन्यांची विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे कोळशाचा पुरवठा पुढील काही महिने तरी सुरळीत होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे महावितरणला थंडी सुरु होण्याची प्रतीक्षा असून त्यानंतर मागणी कमी होईल आणि भारनियमन कमी होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
या भारनियमनाचा फटका जिल्ह्यातील छोट्या मोठ्या उद्योगांना बसणार असून जिल्ह्यातील नागरिकांना भारनियमनाचा मोठा सामना करावा लागणार आहे. तसेच ऑक्टोबर हिट, कृषी पंप उपसा आणि सणासुदीमुळे विजेच्या मागणीत वाढ होत असतानाच अघोषित भारनियमन सुरु करण्यात आल्यामुळे राज्यातील जनतेनं निराशा व्यक्त केली आहे.




Wednesday, October 10, 2018

ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यावर वीज भारनियमनाचं संकट

ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यावर वीज भारनियमनाचं संकट

ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यावर वीज भारनियमनाचं संकट येऊन ठेपलंय... चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा आहे.. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपाचं भारनियमन लागू करण्याचा निर्णय महावितरणनं घेतलाय.. तीन गटांमध्ये वीज भारनियमन सध्या लागू करण्यात आलंय... सध्या औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परळी, नाशिक, मुंब्रा, भिवंडी या भागात मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग सुरु आहे.. काल मुंब्र्यात आधी 4 तासांचं भारनियमन करण्यात आलं पण पुढे तांत्रिक कारणामुळे ते 8 तासांपर्यंत वाढवण्यात आलं... त्यामुळे इतर राज्य अधिकच्या किमतीत महाराष्ट्राकडून वीज खरेदी करत असल्यानं राज्यात मोठा वीजतुटवडा होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
(सोर्स:ABP) 

Tuesday, October 09, 2018

 नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी अधिकृत वीज जोडणी

नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी अधिकृत वीज जोडणी

नागपूर/प्रतिनिधी:

आदिशक्तीची आराधना करणा-या ‘नवरात्र’ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना पवित्र बौद्ध धर्माची दिक्षा दिलेल्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’ च्या आगमनाला काही दिवसच शिल्ल्क असून हे दोन्ही उत्सव सर्वांना आनंददायी व निर्विघ्न पार पडावेत यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी धार्मिक उत्सवांसाठी वीजसुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात, याचसोबत लघुदाबासाठी प्रतियुनिट 4.55 रुपये (प्रति युनिट 3 रुपये 27 पैसे वीजशुल्क अधिक 1.28 पैसे वहन आकार) या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली अधिकृत व तात्पुरती वीजजोडणी घेत संभाव्य वीज अपघात टाळून सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. 
महाराष्ट्र विज नियामक आयोगाने महवितरणच्या अखत्यारीतील सर्वधर्मियांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या लघूदाब वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 27 पैसे अधिक 1 रुपया 28 पैसे वहन (व्हिलींग) आकार असा 4 रुपये 55 पैसे प्रति युनिट असे वीजदर निश्चित केले आहेत. वहन आकारासह हा दर घरगुती वीजदरापेक्षा केवळ 22 पैशांनी अधिक आहे तर वाणिज्यिक दरापेक्षा 2 रुपये 83 पैसे प्रतियुनिटने कमी आहे. त्यामुळे घरगुती किंवा वाणिज्यीक वीज जोडणीतून या धार्मिक उत्सवांसाठी अनधिकृत वीजपुरवठा घेतल्यास तो आर्थिकदृष्ट्या महाग राहणार आहे. धार्मिक उत्सवांकरिता अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीज जोडणीचा दर घरगुती वीजदराच्या समकक्ष ठेवण्यात आला आहे. नवरात्रातील रोषणाई, देखावे, मंडप महाप्रसाद तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त्तने करण्यात येणारी रोषणाई, भोजनदान, सांस्कृतिक व इतर कार्यक्रमासाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीजकंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता सार्वजनिक मंडळांनी 24 तास सुरू असणारे निशुल्क क्रमांक 19612, 18002333435 किंवा 18001023435 यावर संपर्क साधावा, याशिवाय संबंधित मंडळाच्या पदाधिका-यांनी महावितरणच्या त्या भागातील अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. 
सार्वजनिक सुरक्षा महत्वाची

नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि इतरही धार्मिक आयोजनादरम्यान मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात, त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना नयनरम्य देखाव्यांचा आनंद घेता यावा यासाठी सार्वजनिक मंडळांनी रोषणाई आणि मिरवणूकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी. 

 गरबा, जागर आदिचे आयोजन विद्युत यंत्रणेपासून लांब अंतरावर करावे.

दस-या प्रसंगी होणारे रावण दहन हे मोकळ्या मैदानात आणि वीज यंत्रणेपासून लांब करावे, फ़टाक्यांची आतिषबाजी करतांना आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात. 

वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे, वीजपुरवठा बंद असतांना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब बाहिनीत प्रवाहीत झाल्याने प्राणांकीत अपघात होण्याची शक्यता असते.

जवळच्या वीजखांबावरून किंवा वीजवाहिन्यांवर आकोडे टाकून वीजपुरवठा घेऊ नये, यामुळे जीवित व वित्त हानी होण्याचा धोका अधिक आहे.

वीज जोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी, तुटलेली किंवा लूज तार वापरू नये आणि वापरायची असल्यास प्रमाणित इन्सूलेशन टेप लाऊन जोडावी.
 राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत महावितरणच्या खात्यात सुवर्ण पदक

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत महावितरणच्या खात्यात सुवर्ण पदक

महावितरणच्या श्रीपाद काळे यांना सुवर्ण पदक
नागपूर/प्रतिनिधी:
सुवर्णपदक विजेते श्रीपाद काळे 
महाराष्ट्र स्टेट वेटर्न्स ॲक्वाटीक्स असोसिएशन्च्या अधिपत्त्यात गोंदीया जिल्हा मास्टर्स ॲक्वाटीक्स असोसिएशनतर्फ़े गोंदीया येथील जिल्हा क्रिडा संकूल तलाव येथे नुकत्याच पार पडलेल्या 21 व्या राज्यस्तरीय मास्टर्स ॲक्वाटीक्स स्पर्धेत श्रीपाद काळे यांनी 100 मीटर्स बॅकस्ट्रोक स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवित सुवर्ण पदक पटकाविले तर 100 मीटर्स फ़्री स्टाईल स्पर्धेत उपविजेते पद मिळवित रजत पदक पटकाविले.
राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री तथा गोंदीया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या शुभहस्ते श्रीपाद काळे यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. श्रीपाद काळे यांनी आजवर अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत नेत्रदिपक कामगिरी केलेली आहे. मागिल वर्षी कोल्हापूर येथे झालेल्या 20 व्या राज्यस्तरीय मास्टर्स ॲक्वाटीक्स स्पर्धेत त्यांनी कास्य पदक तर त्यापुर्वी वर्धा यथे झालेल्या 19व्या राज्यस्तरीय मास्टर्स ॲक्वाटीक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत असलेल्या उमरेड शहर (2) शाखा कार्यालयात सहाय्यक अभियंता कार्यर असलेल्या श्रीपाद काळे यांच्या या कामगिरीबद्दल महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, नागपूर ग्रामिण मंडलाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफ़ुल लांडे आणि त्यांच्या सहका-यांनी काळे यांचे अभिनंदन केले आहे.

Friday, October 05, 2018

महावितरणच्या अकोला परिमंडलाचे ‘बाबा, मी तुमचीच मुलगी आहे’ प्रथम

महावितरणच्या अकोला परिमंडलाचे ‘बाबा, मी तुमचीच मुलगी आहे’ प्रथम

महावितरणच्या आंतरपरिमंडल नाट्यस्पर्धा
नागपूर/प्रतिनिधी:
अकोला परिमंडलाच्या नाट्यचमूला विजेतेपदाचा चषक प्रदान करतांना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडलीय दोन दिवसीय नाट्यस्पर्धेत अकोला परिमंडलातर्फ़े सादर करण्यात आलेल्या ‘बाबा, मी तुमचीच मुलगी आहे’ या नाट्यप्रयोगाने पथम क्रमांक पटकाविला तर अमरावती परिमंडलातर्फ़े सादर करण्यात आलेल्या ‘ती रात्र’ हे नाटक उपविजेते ठरले. राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते स्पर्धेतील वीजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
वीज वितरण क्षेत्रात आपल्याला 24 तास काम करावे लागते अश्यावेळी अधिकारी-कर्मचारी यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी मधल्या काळात बंद झालेल्या नाटय आणि क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. महावितरणच्या नाटय स्पर्धा राज्य नाटय स्पर्धेच्या तोडीच्या असून येत्या काळात महावितरणच्या चमू राज्य नाटय स्पर्धेत आपला सहभाग नोंदवतील यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी दिली. 
ऊर्जामंत्र्यांनी केले महावितरणचे कौतूक
महावितरणच्या आंतरप्रिमंडलीय नाट्यस्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाप्रसंगी
अध्यक्षिय भाषण करतांना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे.

]महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी केलेल्या कठोर मेहनतीच्या बळावर महाराष्ट्राने आज ऊर्जा क्षेत्रात देशपातळीवर अव्वल स्थान मिळविले असून, येणाऱ्या काळात आपणास १०० टक्के हरित ऊर्जेचा वापर करावयचा आहे. सौर ऊर्जेत राज्याने आघाडी घेतली असून आहे, येणा-या काळात राज्यातील सर्व कृषी वाहिन्या सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्यात येणार असून त्या दृष्टीने योग्य पावले उचलली जात असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, वर्ष २०३० पर्यंत देशातील सर्व वाहने बँटरीवर येणार असून यासाठी मोठ्या प्रमाणात चार्जिंग केंद्रांची गरज भासणार आहे. यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी तयार राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. राज्यात कृषी पंप,सार्वजनिक पाणी पुरवठा योजना, पथदिवे यांची थकबाकी मोठ्या प्रमाणात असतांनाही वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार महावितरणने वितरण हानी १५ टक्क्यांच्या आत आणली आहे ही कौतुकास्पद बाब असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवर्जून सांगितले.
कर्तबगार कर्मचा-यांचा सत्कार
आपल्या कार्यालयीन कामात विशेष योगदान दिलेल्या खामगाव येथे कार्यरत सहाय्यक अभियंता शैलेश आकरे, कामठी येथील उपकार्यकारी अभियंता दिलीप मदने आणि वर्धा शाखा कार्यालयातील तंत्रज्ञ मधु शिव या कर्मचा-यांना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात दोन दिवस चाललेल्या या नाट्यस्पर्धेत चंद्रपूर परिमंडलातर्फ़े अशोक बुरबुरे लिखित ‘आग्टं’, अमरावती परिमंडलातर्फ़े हेमंत ऎदलाबादकर लिखित ‘ती रात्र’, गोंदीया परिमंडलातर्फ़े प्रशांत दळवी लिखित ‘चारचौघी’, अकोला परिमंडलातर्फ़े चंद्रकांत शिंदे लिखित ‘बाबा मी तुमचीच मुलगी आहे’ तर,नागपूर परिमंडलातर्फ़े दिपेश सावंत लोखित ‘ओय लेले’ या नाट्यप्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण प्रसंगी व्यासपीठावर महावितरणचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे, नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नाट्यस्पर्धेचे कार्याध्यक्ष तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अमरावती परिमंडलाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, गोंदीया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरेकर, सल्लागार (ग्राहक व्यवहार) गौरी चंद्रायण, जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा.गिरीश देशमुख, नाट्य परिक्षक कल्पना गडेकर-पांडे, पराग लुले, देवेंद्र बोंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन किशोर गलांडे यांनी तर आभार प्रदर्शन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे यांनी केले.

नाट्यस्पर्धेचा सविस्तर निकाल पुढिलप्रमाणे 

सर्वोत्कृष्ट नाटक – प्रथम – बाबा, मी तुमचीच मुलगी आहे (अकोला परिमंडल)
व्दितीय - ती रात्र (अमरावती परिमंडल)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - प्रथम - नितिन नांदुरकर (अकोला परिमंडल)
व्दितीय – हेमराज ढोके (अमरावती परिमंडल)
अभिनय (पुरूष) - प्रथम - अभिजित सदावर्ती (अमरावती परिमंडल) 
व्दितीय - गणेश राणे (अकोला परिमंडल)
अभिनय (स्त्री) - प्रथम - संध्या किरोलीकर (गोंदीया परिमंडल)
व्दितीय - नुतन दाभाडे (अकोला परिमंडल)
नेपथ्थ्य - प्रथम - जयंत पैकीने (अमरावती परिमंडल) 
व्दितीय - विजय महल्ले (नागपूर परिमंडल) 
प्रकाश योजना - प्रथम - धम्मदिप फ़ुलझेले (गोंदीया परिमंडल) 
व्दितीय - सुरज गणविर (नागपूर परिमंडल) 
संगित - प्रथम - अविनाश कुरेकर (चंद्रपूर परिमंडल) 
व्दितीय - आरती कानडे (नागपूर परिमंडल) 
रंगभूषा/वेषभूषा - प्रथम - ज्योती मुळे (अकोला परिमंडल)
व्दितीय - आनंद कुमरे (चंद्रपूर परिमंडल)
उत्तेजनार्थ पारितोषिक - आयुष बिरमवार (चंद्रपूर परिमंडल)
संतोष पाटील (अकोला परिमंडल)
अभय नवाथे (नागपूर परिमंडल)
समिधा लोहारे (गोंदीया परिमंडल)
विकास बांबल (अमरावती परिमंडल)





बाबा मी तुमचीच मुलगी आहे आणि ओय लेले ने रसिकांची मने जिंकली

बाबा मी तुमचीच मुलगी आहे आणि ओय लेले ने रसिकांची मने जिंकली

महावितरणची आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा 
नागपूर परिमंडलाकडून सादर करण्यात आलेल्या "ओय ले ले"
या नाटकातील एक क्षण
नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या दोन दिवसीय आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत आज अकोला परिमंडलाचे :बाबा, मी तुमचीच मुलगी आहे' आणि नागपूर परिमंडलाचे 'ओय लेले' ही नाटय प्रयोग सादर करण्यात आली. 
अत्यंत बहारदार अभिनय आणि सशक्त कथानक असलेक्ल्या या दोन्ही नाट्यप्रयोगांनी रसिकांची मने जिंकली. याप्रसंगी महावितरणचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे, प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नाट्यस्पर्धेचे कार्याध्यक्ष तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, अकोलाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे,. चंद्रपूरचे अरवींदभादीकर, अमरावतीच्या सुचित्रा गुजर आणि गोंदियाचे सुखदेव शेरेकर, गुणवत्ता नियंत्रणाचे सुहास रंगारी यांच्यासह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि नाट्यरसिकांनी या नाटकांचा मनमुराद आनंद घेतला.
स्त्रीभ्रुणहत्ये विरुद्धचा आणि महिला सक्षमीकरणाचा एल्गार असलेले अकोला परिमंडलातर्फ़े ‘बाबा, मी तुमचीच मुलगी आहे’ चा नाट्यप्रयोग आज सकाळच्या सत्रात सादर करण्यात आला. चंद्रकांत शिंदे लिखित आणि नितीन नांदुरकर दिग्दर्शित, डॉ. मुरहरी केळे यांची निर्मिती असलेल्या या नाट्यप्रयोगाने प्रत्येक मुलीच्या पित्याला आपण कन्यारत्नाचे वडील असल्याचा अभिमान वाटेल आणि ज्यांना मुलगी नाही अशां सर्व पित्यांची निश्चितच घालमेल होईल अशी अत्यंत भावस्पर्शी, ह्रदयस्पर्शी, उत्कंठावर्धक, मन हेलावून टाकणारी नाट्यकृती बघतांना नाट्यरसिकांचे डोळे पाणावले होते. गणेश राणे, नुतन दाभाडे, ज्योती मुळे, गणेश बंगाळे, जितेंद्र टप, संतोष पाटील, विलास मानवतकर, पराग गोगटे, अमित इंगळे, स्वाती राठोड, संध्या क-हाळे, ऋषीश्वर बोपडे, अण्णा जाधव, राहुल कुंभारे, संदीप निंबोळकर, योगेश जाढव, पुरुषोत्तम मेहसरे, व शिल्पा डुकरे यांच्या अभिनयाने नाट्य रसिकांना एक सर्वांगसुंदर कलाकृती बघायला मिळाली आहे.
नागपूर परिमंडलाने दिपेश सावंत लिखित, अभय अंजीकर दिग्दर्शित आणि दिलीप घुगल यांची निर्मिती असलेले ‘ओय लेले’ हा नाट्यप्रयोग सादर केला, नाट्यरसिकांना हेलावून सोडणा-या या नाट्यप्रयोगाने ‘ऑनलाईन खरेदी व विक्री’ च्या वेडातून थेट नातेसंबंधाचा व्यवहार आणि त्यातील अगतिकता या विषयाला अभय अंजीकर, स्नेहांजली तुंबडे, अभय नव्हाथे, नम्रता गायकवाड, सुमित खोरगडे, श्रीरंग दहासहस्त्र आणि अविनाश लोखंडे या कलावंतांनी अभिनयाव्दारे कथानकाला योग्य न्याय दिला. आरती कानडे यांचे संगित, नेहा हेमने यांची रंगभूषा, विजय महल्ले यांचे नेपथ्थ्य, प्रितिबाला चौव्हान यांची वेशभूषा आणि सुरज गणवीर यांची प्रकाश योजना कथानक अधिक प्रभावी ठरण्यास यशस्वी ठरली. 

 अकोला परिमंडलातर्फ़े ‘बाबा, मी तुमचीच मुलगी आहे’ या नाटकातील एक क्षण


Tuesday, October 02, 2018

 महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांना महावितरणचे अभिवादन

महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांना महावितरणचे अभिवादन

नागपूर /प्रतिनिधी:
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या काटोल रोड येथी विद्युत भवन या मुख्यालयात महावितरणतर्फ़े या महान विभुतींना आदरांजली अर्पण करण्यात आली.
तत्पुर्वी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या हस्ते विद्युत भवन येथील प्रांगणात धवजारोहण करण्यात आले, यावेळी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, प्रभारी मुख्य अभियंता (स्थापत्त्य) राकेश जनबंधू, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, उपमुख्य अभियंता (महानिर्मिती) शांताराम पवनीकर यांच्यासह महावितरण आणि महानिर्मितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तद्नंतर प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तर इतर उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.  
 महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांना अभिवादन करतांना महावितरणचे अधिकारी
जखमी सोनवणे यांची मुख्य अभियंत्याकडून विचारपूस

जखमी सोनवणे यांची मुख्य अभियंत्याकडून विचारपूस

नागपूर/प्रतिनिधी:
थकीत वीज देयकाची वसुली करण्यासाठी गेलेले महावितरणचे हुडकेश्वर शाखा कार्यालयातील तंत्रज्ञ रामा सोनवणे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले होते. सोमवार दिनांक १आँक्टोबर रोजी सदर घटना घडली होती. 
आज सकाळी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी जखमी सोनवणे यांची पिपळा फाटा येथील निवासस्थानी भेट घेऊन आस्थेने प्रकृतीची विचारपुस केली. तसेच या प्रकरणी महावितरण प्रशासन खंबीरपणे आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांच्या समवेत अधिक्षक अभियंता मनिष वाठ,नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता कुंदन भिसे उपस्थित होते.फोटो ओळ-रामा सोनवणे यांच्या प्रकृतीची विचारपूस करताना मुख्य अभियंता घुगल सोबत अन्य अधिकारी

Monday, October 01, 2018

महावितरणच्या प्रादेशिक संचालकांकडून जखमी कर्मचाऱ्यांची विचारपुस

महावितरणच्या प्रादेशिक संचालकांकडून जखमी कर्मचाऱ्यांची विचारपुस

वर्धा/नागपूर/प्रतिनिधी:
थकीत वीज देयकाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या वर्धा येथील तंत्रज्ञ दिपक जथरे यांचेवर प्राणघातक हल्ला करुन जखमी करण्यात आले होते. बुधवारी झालेल्या या हल्ल्यात जथरे यांच्या गालावर हल्लेखोरांनी ब्लेडने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. आज (शनिवार दि.29) महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी जथरे यांची वर्धा येथील निवासस्थानी भेट घेऊन आस्थेने त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना धीर दिला.
हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी महावितरण प्रशासनाकडून सर्व मदत देण्याची ग्वाही यावेळी प्रादेशिक संचालक खंडाईत यांनी दिली तसेच प्रशासनाकडून वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी वर्धा मंडल कार्यालयाचे अधिक्षक अभियंता सुनिल देशपांडे, कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे, संजय वाकडे आदी उपस्थित होते. 
महिला तंत्रज्ञाचे कौतुक
मागील आठवड्यात वर्धा शहरात थकबाकीदार ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करतेवेळी महिला तंत्रज्ञ मधू शिव यांना एका ग्राहकाने अश्लिल शिवीगाळ केली, मात्र त्यास अजिबात भीक न घालता शिव यांनी थेट पोलीस ठाणे गाठून त्या उपद्रवी ग्राहकाविरोधात तक्रार दाखल केली, एवढ्यावरच न थांबता आरोपीला अटक होईस्तोवर शिव यांनी सातत्याने पाठपुरावा केला, यामुळे पोलिसांनी सदर ग्राहकास अटक केली असून अद्यापही सदर ग्राहक अटकेत आहे, शिव यांच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी त्यांची भेट घेत त्यांची प्रशंसा केली. काही ग्राहक वीज बिलाचा नियमित भरणा करण्यास टाळाटाळ करून उलटपक्षी महावितरण कर्मचाऱ्याला दमदाटी आणि प्रसंगी मारहाण करतात अश्या वेळी त्यांना घाबरून न जाता आपले कर्तव्य यशस्वीपणे पार पडणाऱ्या मधू शिव आणि त्यांच्यासारख्या कर्मचाऱयांच्या पाठीशी महावितरण प्रशासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीही खंडाईत यांनी यावेळी दिली.
महावितरणच्या जनमित्रावर हल्ला

महावितरणच्या जनमित्रावर हल्ला

वसुलीपथकावर हल्याचे सत्र सुरूच  
नागपूर/प्रतिनिधी:
वर्धा आणि भंडारा येथील महावितरणच्या वसुली पथकावर हल्ला करण्याची घटना ताजी असतांनाच सोमवारी सकाळी नागपूर येथे
जीवघेणा हल्ला साठी इमेज परिणाम
थकीत वीज देयकाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या जनमित्रावर हुडकेश्वरमध्ये हल्ला करण्यात आला. सोमवारी सकाळी ११वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
महावितरणच्या हुडकेश्वर शाखा कार्यालयात कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ रामा सोनवणे हे थकबाकीदार वीज ग्राहकांची यादी घेऊन ताजेश्वर नगर येथील आशिष तळवेकर यांच्या घरी गेले. तळवेकर यांनी जुलै २०१८ पासून देयक भरले नव्हते. सोनवणे यांनी पैसे भरल्याची पावती मागीतली असता तळवेकर याने सोनवणे यांच्यावर हल्ला केला.यात सोनवणे जखमी झाले. घटनेची माहिती मिळतात शाखा अभियंता राजेश आकरे यांनी हुडकेश्वर पोलिस ठाणे गाठले. गेल्या १५ दिवसात विदर्भातील वर्धा,भंडारा अकोला,आणि नागपूर येथे महावितरणच्या वसुली पथकावर हल्ला करण्यात आला.यात वर्ध्यातील कर्मचाऱ्यावर चक्क ब्लेड ने गड्यावर वार केला गेला.तर महिला जनमित्राला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.या घटनेची रितसर तक्रार करण्यात आली आहे.पोलिसांनी भादवि कलम ३३२,३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपच्या कठोर शिक्षेसाठी महावितरण प्रशासन पाठपुरावा करीत आहे.

  बुधवारी नागपुरातील काही भागात वीजपुरवठा राहणार बंद

बुधवारी नागपुरातील काही भागात वीजपुरवठा राहणार बंद

नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या कॉग्रेसनगर विभागांतर्गत आपत्कालीन देखभाल व पायाभुत विकास योजनांच्या कामासाठी बुधवार, दि. 3 ऑक्टोबर 2018 रोजी रामदासपेठ, धरमपेठ, त्रिमुर्तीनगर आदीसह अनेक भागातील वीजपुरवठा अर्धा ते चार तासाकरिता खंडित ठेवला जाणार आहे. 
आपत्कालीन देखभाल व पायाभुत विकास योजनांच्या कामासाठी बुधवारी सकाळी 9 ते 10 या वेळेत पांडे लेआऊट, स्नेहनगर, नवीन स्नेहनगर, खामला रोड, मालवीयनगर, सीतानगर, गावंडे लेआऊट, नवजीवन कॉलनी, प्रगती कॉलनी, गजानननगर, ऊर्विला कॉलनी, समर्थनगर, छत्रपतीनगर, सहकार्य नाहर, प्रशांतनगर, हिंदुस्तान कॉलनी, राहुलनगर, राजीवनगर, पंचदीपनगर, डॉक्टर कॉलनी, मध्य रेल्वे, यशवंत स्टेडियम, मेहाडीया चौक, छोटी ढंतोली, धंतोलीचा काही भाग, पुष्पकुंज इमारत, सेंट्रल बाजार रोड, गुरुद्वारा, रामदासपेठचा काही भाग, इंदिरा अपार्टमेंट, सुभान एन्क्लेव, राहटे कॉलनी, फॉरेंसिक लॅबोरेटरी, अवंती हार्ट हॉस्पिटल, शतायू हॉस्पिटल, एलआयसी कॉलनी, विघ्नहर्ता अपार्टमेंट, टिकेकर रोड, कॉंग्रेसनगर, कालीमाता मंदिर, उज्ज्वल फ्लॅट्स, सेंट्रल बाजार रोड आदी भागातील वीजपुरवठा बाधित राहील याशिवाय जेल प्रेस, जेल क्वार्टर, चुना भट्टीचा भाग, वैनगंगा कॉलोनी, हम्पियार्ड रोडचा भाग, अजनी चौक, माउंट कार्मेल हायस्कूल, प्रशांतनगर, समर्थनगर, रोहेरा आर्केड आणि जवळपासचे क्षेत्र, मालवीय नगरचा काही भाग, पांडे लेआऊटचा भाग, योगेक्षेम लेआऊट, खामला चौक, नवीन स्नेहनगरचा काही भाग. छोटी ढंतोली, शासकीय मुद्रणालय, विजयनंद सोसायटी या भागातील वीजपुरवठा सकाळी 10 ते 11 या वेळेत बंद राहील. 
सकाळी 9 ते 12 या वेळेत वसंतनगर, लक्ष्मीनगर, शासकीय आयटीआय, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, आरपीटीएस रोड, अजनी, वर्धा रोड, वॅक्सिन इंनस्टिट्यूट, आठरस्ता, बालजगत, चित्रकला महाविद्यालय, उत्तर अंबाझरी रोड, शिवाजीनगर, सिमेंट रोडचा भाग, हिल रोड, रामनगर, गिरीपेठ, गोरेपेठ, वाल्मीकिनगर, गोकुलपेठ, टिळकनगर, टाइम्स ऑफ इंडिया, लॉ कॉलेज चौक, शंकरनगर, दांडिगे लेआऊट, काचीपुरा, आरसीएफ, खरे टाऊन, नागपूर नागरिक हॉस्पिटलच आणि जवळपासचा भाग, एसएमजी हॉस्पिटल, धरमपेठ, खरे टाऊन, भगवाघर, टांगास्टँड, वेस्ट हायकोर्ट रोड, अलंकार टॉकीज, रामनगर, बाजीप्रभुनगर, हिलटॉप, मुंजबाबा आश्रम, वर्मा लेआऊट, सुदामनागरी, उज्जवल सोसायटी, पांढरबोढी, संजयनगर, शिवाजीनगर, हिल रोड, सीमेंट रोड, शिवाजीनगर बागे जवळ, व्हीआयपी रोड, गोकुलपेठ, बास्केटबॉल ग्राउंड, धरमपेट एक्सटेंशन, गांधीनगर, एनआयटी, कॉर्पोरेशन कॉलनी, डागा लेआऊट, गोकुलपेठ मार्केट, धरमपेठ रोड, गायत्रीनगर, गोपालनगर, विजयनगर, परसोडी, जयताळा, प्रसादनगर, दुबे लेआऊट, अमर आशा, दाते लेआऊट, शारदानगर, घरकुल सोसायटी, प्रगतीनगर, अष्टविनायकनगर, संघनगर, कबीरनगर, रमाबाई आंभेडकर सोसायटी, जनहित सोसायटी, प्रज्ञा लेआऊट, भेंडे लेआऊट, पन्नास लेआऊट, मनीष लेआऊट, पाटील लेआऊट, स्वागत सोसायटी, इंद्रप्रस्थनगर, सीजीएच सोसायटी, जयबद्रीनाथ या परिसरातील तर सकाळी 11 ते 12 या वेळेत सीम्स हॉस्पिटल, सकाळी 11 ते 11.30 या वेळेत गांधीनगर, सिमेंट रोड, शिवाजीनगर, उत्तर अंबाझरी रोड, एनआयटी, हिल रोड, सकाळी 10.30 ते 11 या वेळेत माटे चौक, लक्ष्मी-केशव अपार्टमेंट, त्रिमूर्ती टॉवर, आठ रस्ता चौक, लक्ष्मी नगरचा भाग तर दुपारी 1 ते 4 या वेळेत अभ्यंकरनगर, बजाजनगर व माधवनगरचा भाग, श्रद्धानंदपेठ, शंकरनगरचा व कॉरपोरेशन कॉलनीचा भाग, एलएडी चौक या भागातील सकाळी 8 ते 12 या वेळेत लक्ष्मीनगर, बालजगत परिसर, व्हॉलीबॉल ग्राऊंड परिसरातील सकाळी 9 ते 11 या वेळेत धंत्प्ली व छोटी धंतोलीच्या काही भागातील तर सकाळी 10 ते 2 या वेळेत कॅनल रोड, रामदासपेठ, जैन मंदीर, अमर-ज्योती अपार्टमेंट, श्री-राम कॉम्प्लेक्स, श्री कृष्णा कॉम्प्लेक्स, विजयानंद अपार्टमेंट, श्रीवर्धन कॉम्प्लेक्स, सत्यम अपार्टमेंट, यशवंत स्टेडियम परिसर, मिडास हाईट, आकर्षण कॉम्प्लेक्स, श्री राम भवन, विद्यापीठ ग्रंथालय, गिरीपेठ, गोरेपेठ, वेस्ट हायकोर्ट रोड, लक्ष्मीभवन, धरमपेठ, आंबेडकरनगर, अंबाझरी रोडचा भाग, शास्त्री लेआऊट, अग्ने लेआऊट, जुने खामला, खामला, सिंधी कॉलनी, टेलीकॉमनगर, प्रतापनगर, रिंग रोड, सावरकर चौक, सेंट्रल एक्साइज कॉलनी, वेंकटेशनगर क्षेत्र, तलमले लेआऊट, भांगे विहार, शहाणे लेआऊट, सुर्वेनगर, एलआयजी, एमआयजी, त्रिमुर्तीनगर, गोरले लेआऊट, नेल्को सोसायटी, सुमितनगर, ताजेश्वरनगर, चंदनशेषनगर, कृष्णम नगरी, नरसाळा या भागातील वीजपुरवठा खंडित राहील. याशिवाय सकाळी 10 ते 1 या वेळेत द्रूगधामना, सुराबर्डी, वढधामना, सकाळी 1 ते 3 या वेळेत तिळकनगर, अमरावती रोड, गोरेपेठ, गिरिपेठ या भागातील वीजपुरवठा खंडित राहील. 
वीज बंद असल्याची पुर्वसुचना महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या या भागातील वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येणार असून ग्राहकांनी यावेळेत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
  महावितरणच्या कंत्राटदारांना ईआरपी प्रणालीद्वारेच कार्यादेश आणि देयके

महावितरणच्या कंत्राटदारांना ईआरपी प्रणालीद्वारेच कार्यादेश आणि देयके

नागपूर/प्रतिनिधी:
ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा मिळावी यासाठी महावितरणकडून सातत्याने विविध नवनवीन उपाययोजना करण्यात येतात. तसेच महावितरणमध्ये विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या देयके आणि कार्यादेश प्रक्रियेतही पारदर्शकता आणि गतिमानता राहावी म्हणून ही सर्व प्रक्रिया ईआरपी प्रणालीद्वारेच करण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे प्रक्रिया पूर्ण न केल्यास कुठल्याही देयकाची अदायगी करु नये असे स्पष्ट आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.
महावितरणच्यावतीने विविध दैनंदिन आर्थिक व्यवहार ईआरपी प्रणालीद्वारेच करण्यात येतात. याबाबत महावितरणने 31 मार्च 2018 ला परिपत्रकही जारी केले आहे. त्यानुसार कंत्राटदाराला कामाचा कार्यादेश (वर्क ऑर्डर) ईआरपी प्रणालीच्या माध्यमातूनच निर्मित करुन द्यावयाची असून या कार्यादेशात पीओ (पर्चेस ऑर्डर) क्रमांकाचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आलेला आहे. या क्रमांकाचा उल्लेख नसल्यास देयकाला मंजूरी मिळणार नाही. तसेच संबंधित कंत्राटदाराला कामाच्या देयकाची अदायगीही मिळणार नाही. याबाबतची सूचना कंत्राटदारांना पत्राद्वारे देण्यात आलेली आहे.
या प्रणालीमुळे महावितरणच्या कामकाजात गती आणि पारदर्शकता आली असून कंत्राटदारांना त्यांची देयके निश्चित कालावधीत मिळत असल्याने विविध विकास कामांना अधिक गती मिळाली आहे.

Saturday, September 29, 2018

 महावितरण आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा 3 ऑक्टोंबरपासून

महावितरण आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा 3 ऑक्टोंबरपासून

महावितरणची नाट्य रसिकांना मेजवानी 
  नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडलीय दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग, नागपूर येथे बुधवार दि. 3 ऑक्टोबर 2018 पासून करण्यात येत आहे. या स्पर्धेत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या पाचही परिमंडलांतर्फ़े नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे. 
या स्पर्धेचा शुभारंभ बुधवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजता महावितरणचे कार्यकारी संचालक (पायाभुत आराखडा) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते करण्यात येईल, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत हे राहतील, याप्रसंगी अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अमरावती परिमंडलाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर आणि गोंदीया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरेकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील. 

या स्पर्धेत बुधवार दि. 3 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 9 वाजता चंद्रपूर परिमंडलातर्फ़े अशोक बुरबुरे लिखित ‘आग्टं’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल, दुपारी 2 वाजता हेमंत ऎदलाबादकर यांनी लिहीलेले ‘ती रात्र’ हा नाट्यप्रयोग अमरावती परिमंडलातर्फ़े सादर करण्यात येईल, तर सायंकाळी 6.30 वाजता प्रशांत दळवी लिखित ‘चारचौघी’ हा नाट्यप्रयोग गोंदीया परिमंडलातर्फ़े सादर करण्यात येईल. गुरुवार दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता अकोला परिमंडलातर्फ़े चंद्रकांत शिंदे लिखित ‘बाबा मी तुमचीच मुलगी आहे’ हा नाट्यप्रयोग तर दुपारी 1.30 वाजता दिपेश सावंत यांनी लिहिलेले ‘ओय लेले’ चा नाट्यप्रयोग नागपूर परिमंडलातर्फ़े सादर केला जाईल. 

या नाट्यस्पर्धेचे पारितोषिक वितरण गुरुवार दि. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेत होणा-या या कार्यक्रमाला कार्यकारी संचालक (मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे आणि प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांची प्रमुख उपस्थिती राहील. या स्पर्धेत सादर करण्यात येणारे सर्व प्रयोग विनामुल्य आहेत. नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने या प्रयोगांना उपस्थित राहून महावितरणच्या कलावंतांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन नाट्यस्पर्धेचे स्वागताध्यक्ष तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केले आहे.
 S.E.A तर्फ़े मंगळवारी अभियंता दिनाचे आयोजन

S.E.A तर्फ़े मंगळवारी अभियंता दिनाचे आयोजन

नागपूर/प्रतिनिधी:
सबऑर्डीनेट इंजिनियर असोसिएशन (एमएसईबी), नागपूर परिमंडलाच्या विद्यमाने भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या सामाजिक उत्थानासाठी केलेल्या कार्याला अभिवादन करण्यासाठी ‘अभियंता दिन’ कार्यक्रमाचे आयोजन कवी कुलगूरु कालीदास सभागृह, आयटी पार्क, उत्तर अंबाझरी मार्ग, नागपूर येथे मंगळवार दि. 2 ऑक्टोबर 2018 रोजी सायंकाळी 5.30 वाजता करण्यात आले आहे. यावेळी इंडीया स्मार्ट ग्रीड फ़ोरमचे सदस्य सुहास धापारे हे प्रमुख वक्ते म्हणून ‘स्मार्ट ग्रीड आणि स्मार्ट मीटर’ या विषयावर मार्गदर्शन करतील.
राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सबऑर्डीनेट इंजिनियर असोसिएशन (एसईए) चे अध्यक्ष संजय ठाकूर हे राहणार असून याप्रसंगी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, महापारेषणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता विकास बढे, महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचेसह एसईए चे उपाध्यक्ष संजय पाटील, महासचिव सुनिल जगताप, आयोजन सचिव देदार रेळेकर आदी मान्यवर उपस्थित राहतील असे आयोजन समितीचे अविनाश लोखंडे, भुपेंद्र रंध्ये आणि राजेंद्र पैठे यांनी कळविले आहे. 


Friday, September 28, 2018

महावितरणच्या प्रादेशिक संचालकांनी दोन दिवसात पिंजून काढ़ला नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा

महावितरणच्या प्रादेशिक संचालकांनी दोन दिवसात पिंजून काढ़ला नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा

15 ऑक्टॉबर पर्यंत लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्याचे नियोजन
सौभाग्य योजनेतील उर्वरीत वीज जोडण्यांचा मार्ग मोकळा
नागपूर/प्रतिनिधी:
ऊर्जा क्रांतीचे प्रतिक ठरणाऱ्या सौभाग्य योजनेमुळे देशातील प्रत्येक घरांना वीज जोडणी देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना – सौभाग्य’ ला यशस्वी करण्यासाठी येत्या 15 ऑक्टोंबर पर्यत गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक संभाव्य लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्याचे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक, भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहेत. ह्या योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रादेशिक संचालकांनी मागिल दोन दिवसांत संपूर्ण गडचिरोली जिल्हा पिंजून काढित जिल्ह्याच्या कानाकोप-यातील दुर्गम भागांना भेटी देत वीज जोडणीच्या संभाव्य कामांची पाहणी करून संबंधित अधिका-यांना याबाबत दिशानिर्देश दिले आहेत.

प्रादेशिक संचालक यांच्या नेतृत्वात नागपूर प्रादेशिक कार्यालयातील वरिष्ठ अधिका-यांसमवेत चंद्रपूर परिमंडल आणि गडचिरिली मंडलातील काही निवडक अधिका-यांनी मंगळवार आणि बुधवारी जिल्ह्यात सर्वत्र भेटी देत तेथे सुरु असलेल्या सौभाग्य योजनेच्या कामांची पाहणी केली, तेथील गावक-यांशी आणि संबंधित अधिका-यांशी संवाधही साधला. येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील सर्व संभाव्य लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यासाठी एका विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सोबतच प्रादेशिक स्तरावरही एका विशेष समितीचे गठन करण्यात आले असून ही समिती गडचिरोली जिह्यात होणा-या सौभाग्य योजनेच्या दैनंदिन कामांचा आढावा घेणार आहे.

सौभाग्य योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील ऊर्वरीत वीज जोडण्या देण्यात येत असलेल्या अडचणींवर मार्ग काढून नियोजित वेळात ही कामे पुर्ण व्हावीत याअनुषंगाने त्यांचे नियोजनही सर्व संबंधित अधिका-यांसोबत घेतलेल्या बैठकीचे वेळी करण्यात आले असूनही कामे वेळीच पुर्ण करण्यासाठीस्थानिक कंत्राटदारांचा ही कामे वाटपात समावेश करण्याच्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या. देशाच्या ऊर्जा क्रांतीचे प्रतिक ठरणाऱ्या सौभाग्य योजनेमुळे प्रत्येक घरांना वीज जोडणी देण्यात येत आहे, या योजनेअंतर्गत ज्या गावात अद्याप वीज पोहचली नाही, तेथे वीज पोहचविण्याचे काम गतीने सुरु आहे. त्यासाठी विद्युत वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण केले जात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार हे स्वत: प्रयत्नरत असून राज्यातील अतिदुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक घरात वीज पोहचावी यासाठी महावितरण युद्धस्तरावर कार्यरत आहे.
यावेळी प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्यासमवेत महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, गडचिरोली मंडलाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, गडचिरोली मंडल आणि नागपूर प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते