সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, May 28, 2011

ताडोबा-अंधारी

ताडोबा-अंधारी

देशातल्या एकूण 39 टायगर रिझर्वपैकी ताडोबा-अंधारी हा महाराष्ट्रातला एक व्याघ्रप्रकल्प. ताडोबामध्येही यंदा वाघांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रानं ‘टायगर कॅपिटल’चा किताब यंदा मध्यप्रदेशकडून हिरावून घेतलाय. त्यामुळे केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी नागपूरला ‘टायगर कॅपिटल’ म्हणून विकसित करण्याचं आश्वासन दिलंय. इथं आसपास 60हून अधिक गावं आहेत. लोकसंख्या वाढतेय आणि जंगलाचं क्षेत्रफळ कमी होतंय. इथले टायगर कॉरिडोर अवैध कोळसा खाणींमुळे आधीच धोक्यात आलेत. पण या सर्वावर मात करून ताडोबा-अंधारी टायगर रिझर्वची परिस्थिती येत्या काळात अधिक सुधारलेली असेल, अशी आशा करायला हरकत नाही.




लांबलचक, अफाट पसरलेला अथांग ‘इराई डोह’ थेट मोहर्लीपर्यंत सोबत करतो. जंगलाकडे जाणा-या वाटेची दिशा दाखवली की जणू तो निश्चित होतो. विदर्भातल्या उन्हाळ्याला आता मनानं केव्हाच मागे टाकलेलं असतं आणि मन आता पुढल्या रानभुलीसाठी तयार झालेलं असतं. जंगलात बसलेला तारू देव आपल्यावर प्रसन्न व्हावा आणि मनासारखे प्राणी दिसावेत ही आपली प्रार्थना एव्हाना त्याच्यापर्यंत पोहोचलेली असते. पहिल्याच टप्प्यात तेलिया डोहावर मगर दाखवण्यासाठी म्हणून गाडी विसाव्याला उभी राहते. उन्हामध्ये तेलिया डोहाच्या चमचमत्या पाण्याकडे पाहता पाहता कधीतरी तंद्री लागते आणि क्वचित मृगजळासारखे भासही होतात. डोहाच्या पलिकडल्या मातकट हिरवळीवर वाघ चालतोय असाही भास होऊ लागतो. बरेचदा तो खरादेखील ठरतो. तेलियाच्या रस्त्यावर आधी लागणाऱ्या चिंचघाटातून जातानाही बाजूच्या काटेरी जाळीतून कोणीतरी समांतर चालत आपल्यावर नजर ठेवून असल्याचं जाणवतं आणि अकस्मात त्या माणिक डोळ्यांचा मालक, बिबटय़ा वाघ आपल्यासमोरच झेप घेऊन रस्ता क्रॉस करतो.
थोडी जिप्सी पुढं न्यावी तर काळीभोर केसाळ अस्वल (स्लोथ बेअर) मादी मोहाची फुलं हुंगत हुंगत येताना दिसते. आपल्याला पाहिल्यामुळे झाडावर चढण्याचा बेत तिने वरकरणी तरी रद्द केलेला असतो. पुढल्या वळणावरच्या टाक्यावर भेकराची मादी तहानेनं इतकी व्याकुळ झालेली असते की, जिप्सी पुढय़ात येऊन थांबली तरी ती दुर्लक्ष करते आणि चटचट पाणी पीत राहते. इतक्या सा-या जंगलजादूनंतर ताडोबाच्या रानाची झिंग चढू लागलेली असते. त्यात भर गाइडनं चाखायला दिलेल्या मोहाची फुलं नि टेंभूर्ली फळांची!
नुकतीच व्याघ्र गणनेची आकडेवारी हातात पडली होती. वनांचं क्षेत्रफळ कमी झालेलं असलं तरी वाघांची संख्या वाढलेली असल्यामुळे राज्यातल्या या दुस-या मोठय़ा व्याघ्र प्रकल्पात जाताना हुरूप होताच. सध्याच्या गणनेनुसार ताडोबा,अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या 60वर गेल्याचं अधिका-यांनी सांगितलं.
खातोडा गेटवरून एकावेळी 27-28 गाडय़ा आत सोडल्या जातात. अरण्याचा खूपसा भाग अजून ‘माणसाळलेला’ नाही आणि हेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं मोठं आकर्षण आहे. प्राणी हमखास दिसतील अशी अपेक्षा न बाळगता गेलो तर ताडोबा अभयारण्यासारखा दुसरा खजिना नाही.. प्राणी पाहण्यासाठी धीर आणि संयम हवाच. आम्हीही बराच पेशन्स गाठीशी बांधून होतो. काटेझरीत एका भल्याथोरल्या नर वाघानं आम्हाला मनसोक्त दर्शन दिलं. तिथं वाघ बसल्याची बातमी सकाळीच लागल्यानं सा-यांनीच तिकडे जिप्सी वळवल्या. समोर 20-25 गाडय़ा असताना हा वाघ आरामात जाळीत वामकुक्षी घेत होता. त्याच्या विश्रांतीत फारसा व्यत्यय न आणता त्याला रामराम करावा लागला.
जंगलात असंच चालतं. धावत्या जिप्सीतून नजरेला अनेक आकार दिसत असतात. जाळीमागे कोणीतरी नक्कीच दडलंय असे भास होत राहतात. आमच्यासमोर हिरव्यापिवळ्या जाळीमधून बिबटय़ा अवतरला, तो क्षणही असाच भासमयी! पण त्याची ऐटबाज सावध टप्प्याटप्प्याची चाल पाहून आम्ही भानावर आलो. दिवसा फारसा दृष्टीला न पडणारा बिबटय़ा दिसला, त्या वेळी वाघ दिसण्यापेक्षाही जास्त आनंद झाला. ताडोबाच्या सफरीत तीन वाघ पाहून झाले असल्यामुळे बिबटय़ा हा सर्वस्वी अनपेक्षित बोनस होता! मात्र बिबटय़ा दिसल्याचा आनंद आम्ही ताडोबाहून परतल्याच्या दुस-याच दिवशी आलेल्या एका बातमीनं हिरावून घेतला. अष्टभुजा गावाजवळ बिबटय़ाच्या एका तहानलेल्या सहा महिन्याच्या बच्च्याला गावक-यांनी अमानुष रीतीनं मारलं. पण या परिसरात अशा घटना नव्या नाहीत असं आमच्याबरोबर असलेल्या आणि ‘वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’मध्ये फील्ड ऑफिसर असणा-या आदित्य जोशीनं सांगितलं. त्याच्या मते अशा प्राण्यांना पकडून त्यांना सुखरूप त्यांच्या निवासात सोडण्यासाठी वनरक्षकांसोबत प्रशिक्षित लोकांचीही गरज आहे.
ताडोबा-अंधारी टायगर रिझर्वमध्ये आज वाघांची संख्या 69च्या आसपास आहे. ज्यात 25-28 बछडे आहेत. पण वाघाखेरीज इथं पक्षीनिरीक्षणही अप्रतिम होतं. पक्षीप्रेमींसाठी तर ताडोबा अभयारण्य म्हणजे तीर्थस्थानच. चेन्जेबल हॉक-इगल , क्रेस्टेडर्सपट इगल, इंडियन रोलर (नीलकंठ) , इंडियन पिटा, व्हाइट ब्रेस्टेड किंगफिशर, ग्रीन पिजन, इंडियन ग्रेहोर्नबील, जंगलफाउल असे नानाविध पक्षीआढळतात. किंगफिशर, रिव्हर लॅप्विंग, व्हाइट हेरॉन, र्सपट ईगल, रॉकेट टेल्ड ड्रँगो, फ्लेमबॅक वूडपेकर, व्हाइट शोल्डर्ड काइट, ग्रीन पिजन अशा कित्येक मनमोहक रंगांच्या पक्ष्यांची इथं मांदियाळी आहे. त्याशिवाय मगर, गवे, हरणं, नीलगाय, सांबर, रानटी कुत्रे, साळिंदर, चंदेरी पाठीचे अस्वल अशा प्राण्यांचेही हे आश्रयस्थान. डिकेमाली, बेहडा, हिरडा, बेलफळ, अर्जुन अशा अनेक वनौषधी या रानात आहेत. नुसतं अरण्यात जरी भटकायचं म्हटलं तरी आठवडा पुरत नाही. अशाच मोठय़ा भटकंतीनंतर आपोआपच इथल्या टेंभूर्लीच्या झाडाकडे जाणाऱ्या वाटा आपल्याला पाठ होतात आणि डोक्यावरून उडालेला पक्षी नीलकंठ होता की सोनेरी पाठीचा सुतार हे ओळखण्यासाठी गाईडची गरज भासत नाही. ताडोबाच्या जंगलाचा तारू देव आपल्याला एव्हाना प्रसन्न झालेला असतो!

Saturday, May 21, 2011

Thursday, May 19, 2011

प्राणायामाने दिला जगण्याचा "योग'

प्राणायामाने दिला जगण्याचा "योग'

देवनाथ गंडाटे

चंद्रपूर - कुणाच्या शरीरावर गाठ होती, कुणी पोटाच्या आजाराने त्रस्त झालेले. कुणाला झोपेतच बेशुद्ध पडण्याचा आजार, तर काही जन्मत: मूकबधिर, तर कुणी कर्करोगाने पीडित. हे सारेच विकार आता दूर झालेत. प्राणायामाने दिलेल्या जगण्याच्या "योगा'चे अनुभवकथन करीत रोगमुक्त झालेले स्वामी रामदेवबाबा महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.
बुधवारी पहाटे ठीक पाचला येथील वनराजिक महाविद्यालयाच्या प्रांगणात योगगुरू स्वामी रामदेवबाबा महाराज यांच्या योग शिबिराला सुरवात झाली. साडेसातपर्यंत चाललेल्या शिबिरात स्वामी रामदेव महाराजांनी योगाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकांसह सांगितले. यावेळी उपस्थित जनसमुदायाने योगाचे धडे गिरवित प्राणायाम केले. यानंतर स्वामी रामदेव महाराजांनी योगामुळे ज्यांना फायदे झाले, अशांना समोर बोलाविले. यावेळी अनेक व्याधींनी त्रस्त वृद्ध, तरुण आणि महिला समोर आल्या. किटाळी येथील मधुकर ताजणे यांच्या कानाजवळ मोठी गाठ होती. डॉक्‍टरांकडून उपचार घेऊनही गाठ गेली नाही. योग शिक्षकांच्या मार्गदर्शनात दररोज योग सुरू केल्याने गाठ कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

रितेश पेचे हा पाच वर्षांचा मुलगा जन्मत: बहिरा आणि मूकबधिर होता. रुग्णालयात दाखविण्यात आले. मात्र, उपचार शक्‍य नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. दूरचित्रवाणीवरून योगाचा कार्यक्रम पाहून प्राणायाम केले. आता रितेश बोलू लागला असून, त्याला ऐकूसुद्धा येत आहे. यावेळी त्याची आई स्वामींची भेट घेऊन नतमस्तक झाली.
बल्लारपूर येथील चहाविक्रेते विठ्ठल (वय 60) यांना तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग झाला होता. डॉक्‍टरांनी एक लाख रुपयांचा खर्च सांगितला. इतके पैसे कुठून आणणार? मग दररोज सकाळी प्राणायाम सुरू केले. आता बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. जेवणसुद्धा नीट होते. हे सर्व योगामुळे झाल्याचे विठ्ठलराव मोठ्या आनंदाने सांगत होते. राजकुमारी यादव यांच्या मेंदूला अपघातामुळे आघात झाला होता. योगामुळे आता त्या बऱ्या झाल्यात. गायत्रीदेवी यांना चार वर्षांपूर्वी पोटाचा आजार होता. रुग्णालयात बराच पैसा खर्च करूनही आजार बरा झाला नाही. डॉक्‍टरांनी मृत्यूची तारीखदेखील सांगितली. "प्राणासाठी यम' जवळ असताना योग करण्याची कल्पना सुचली आणि डॉक्‍टरांनी दिलेली मृत्यूची तारीख टळल्याचे गायत्रीदेवी म्हणाल्या. काशिनाथ क्षीरसागर (घुग्घुस) यांच्या पोटातील कर्करोग, तर प्रभाकर चहारे यांचा हत्तीरोग योगामुळे बरा झाला. सिंदेवाही येथील गणेश राठोड यांचे शरीर आणि वजन अवाढव्य वाढले होते. त्यांना रात्री झोपेत बेशुद्ध पडण्याचा आजार जडला होता. योग सुरू केल्यापासून या सर्व व्याधी बऱ्या झाल्या आहेत. योगामुळे जीवनदान मिळाल्याने गणेशने "बाबा, तुमच्यामुळेच वाचलो' असे जोरात सांगत बाबांच्या चरणी माथा टेकला.

क्षणचित्रे
- कार्यक्रमस्थळी मोफत आयुर्वेद तपासणी आणि औषधवितरण
- नांदाफाटा येथील श्री. गुरुदेव राष्ट्रसंत प्रचार समितीच्या 120 शिबिरार्थ्यांनी स्फूर्तिगान सादर केले.
- भारत स्वाभिमान यात्रेनिमित्त स्वामी रामदेव महाराजांनी प्रियदर्शिनी सभागृहात स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
- जनजागरण सभा आणि शिबिराला सहकार्य करणाऱ्यांना महाराजांनी माळ भेट देऊन स्वागत केले.
- नियमित योग करणाऱ्या आणि व्याधीमुक्त साधकांना पतंजली योगपीठाचे उत्पादन भेट.
- लहूजीनगर येथील तुषार ढोणे (वय 17) याने बाबांना योगाची विविध आसने करून दाखविली.



रामदेवबाबा म्हणाले...
पाच वर्षांनंतर चंद्रपुरात आलोय. येथील नागरिकांत तोच जोश आणि तीच श्रद्धा कायम आहे. लाचप्रकरणात सापडलेले डॉ. रमेश बांडेबुचे जर दोषी असतील, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भ्रष्टाचार निर्मूलन, वाईट सवयी, व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सत्याग्रह केला जाईल.

भद्रावतीत 15 मिनिटे

चंद्रपूर येथून चिमूरकडे प्रस्थान करताना सायंकाळी 4 वाजून 15 मिनिटांनी महामार्गावर उपस्थित 500 च्या आसपास नागरिक रामदेवबाबांच्या दर्शनासाठी थांबून होते. यावेळी रामदेवबाबांनी थांबून योग, प्राणायाम, भ्रष्टाचार, काळा पैसा यावर मार्गदर्शन केले. यावेळी भारत स्वाभिमान, पतंजली योगचे अनंता मत्ते, सुनील वैद्य, दादाजी मोरे, कोंगरे यांची उपस्थिती होती.

Wednesday, May 18, 2011

जागतिक परिचारिका दिन

जागतिक परिचारिका दिन

देवनाथ गंडाटे

चंद्रपूर - फ्लॉरेन्स नाईटिंगेल ही जगातील पहिली परिचारिका. युद्धकाळात तिने जखमींवर औषधोपचार करून सामाजिक सेवेला सुरवात केली. तेव्हापासून वैद्यकीय क्षेत्रात "नर्स'चा जन्म झाला. रुग्णसेवेकरिता "नर्स' घडविण्याचे काम पूर्व विदर्भात एकमेव जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहे. येथे दहावी-बारावी उत्तीर्ण 220 मुलींसह 20 तरुण मुले "परिचारिका' अभ्यासक्रमाचे धडे गिरवीत आहेत.

Tuesday, May 17, 2011

चंद्रपुरात साकारतोय लघुचित्रपट

चंद्रपुरात साकारतोय लघुचित्रपट

शेतकऱ्याच्या जीवनाची "कांजी'



देवनाथ गंडाटे
चंद्रपूर - काहीतरी जगावेगळे करण्याचा ध्यास बाळगलेल्या चंद्रपुरातील काही युवकांनी चित्रपट निर्मितीची चाकोरीबाहेरची वाट निवडली. ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब असलेल्या या चित्रपटात शेतकऱ्यांच्या जीवनाची होणारी होरपळ "कांजी' या लघुपटाच्या माध्यमातून दाखविली आहे. यात 24 कलावंत असून, ते सर्व वैदर्भीय आहेत. दिवसरात्र एक करून त्यांनी या चित्रपटाची निर्मिती सुरू केली असून, हा लघुपट त्यांना "कान्स' महोत्सवात सादर करायचा आहे.

निप्पो प्रॉडक्‍शनने साकारलेल्या या लघुपटाच्या चित्रीकरणाचा प्रारंभ चंद्रपूर शहरापासून जवळच असलेल्या जुनोना येथून करण्यात आला. येथील एका घरात सरपंचाचा वाडा दाखविण्यासाठी सेट तयार करण्यात आला. गावातील एका शेतकऱ्याच्या बैलावर सरपंचाची नजर असते आणि हा बैल मिळवण्यासाठी तो शेतकऱ्याचे जीवन कसे बरबाद करतो, हा या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात बेवारस गुरांना जिथे ठेवतात, त्याला "कोंडवाडा' म्हटले जाते. तर, याच कोंडवाड्याला विदर्भात "कांजी' असे संबोधतात. या शब्दातच विदर्भ दडला आहे. दुसरे म्हणजे "कांजी' हा शब्द शेतकऱ्यांशी जुळलेला आहे. या कांजीमुळेच एका शेतकऱ्याला त्याचे जीवन कसे संपवावे लागते, याचे भयाण चित्रण या लघुपटातून दिसते.

विदर्भ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी गाजत असताना त्याच पार्श्‍वभूमीवर या युवकांनी हा गंभीर विषय निवडावा, यातच त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेची साक्ष पटते. या चित्रपटात जिवंतपणा यावा, यासाठी ही सारी युवा मंडळी झटत आहे.

चंद्रपूर जिल्हा हा झाडीपट्टी रंगभूमीसाठी प्रसिद्ध आहे. सिनेसृष्टीतील अनेक मोठे कलावंत इथल्या रंगभूमीवर अवतरले. मात्र, इथे कधी चित्रपट निर्मिती झालेली नाही. त्याची कुणी हिंमतही केली नाही. सूरज खोब्रागडे या युवकाने मुंबईत बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला खरा; पण कुणीही गॉडफादर नसल्याने सहायक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटांपुरता तो मर्यादित राहिला. आता त्याला काहीतरी वेगळे करून दाखवायचे आहे. त्यासाठी त्याची ही धडपड आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट पाच लाख रुपयांचे असल्याने मोठी अडचण निर्माण झाली. मात्र, नितीन पोहाणे यांनी निर्माता म्हणून धुरा सांभाळली. हा लघुपट वैदर्भीय युवकांसाठी मोठी उपलब्धी असल्याचे चित्रपटातील सरपंचाची भूमिका रंगवणारे सुनील देशपांडे यांनी सांगितले.

या चित्रपटाचे निर्माते नितीन पोहाणे असून, दिग्दर्शन सूरज खोब्रागडे यांनी केले आहे. छायांकन योगेश सोनकुसरे, ध्वनियंत्रणा के. राजू यांची असून, कलावंतांमध्ये सुनील देशपांडे, रवींद्र धकाते, गौरव पराते, शौर्य, अभय अमृतकर, अभिषेक उराडे, प्रणाली शेंडे, केतकी देशपांडे, गौतम भडके यांच्यासह अन्य 24 कलावंतांचा सहभाग आहे.


सिंक साउंडचा प्रयोग मराठी चित्रपटात पहिल्यांदाच केला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न आणि त्यांच्या समस्या यावर प्रकाशझोत टाकणारा हा विषय आहे. शेतकऱ्यांची व्यथा आणि दशा या लघुचित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.


- सूरज मधुकर खोब्रागडे, दिग्दर्शक


चंद्रपूर जिल्ह्यात भात, कपाशीचे क्षेत्र वाढणार

चंद्रपूर जिल्ह्यात भात, कपाशीचे क्षेत्र वाढणार


देवनाथ गंडाटे
Agrowon
चंद्रपूर ः जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात चार लाख 48 हजार हेक्‍टरवर पीक लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरिपाचे क्षेत्र दोन हजार हेक्‍टरने वाढण्याची शक्‍यता आहे. भात हे जिल्ह्याचे प्रमुख पीक असून, यंदा एक लाख 60 हजार हेक्‍टरवर भाताची पेरणी अपेक्षित आहे. गतवर्षीच्या तुलनेत भाताचे क्षेत्र 20 टक्‍क्‍यांनी, कापसाचे क्षेत्र 15 टक्‍क्‍यांनी वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. सोयाबीन व तुरीचे क्षेत्र यंदा घटण्याची शक्‍यता आहे. यंदा कापसाची एक लाख 20 हेक्‍टरवर, तर सोयाबीनची एक लाख 25 हजार हेक्‍टरवर, तुरीची 42 हजार हेक्‍टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. खरिपासाठी एक लाख पाच हजार क्विंटल बियाणे आणि 97 हजार मेट्रिक टन विविध प्रकारची खते उपलब्ध होणार आहेत.

पीककर्ज म्हणून राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकेकडून 362 कोटींचे कर्ज दिले जाणार आहे. पीककर्ज वाटपाकरिता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने 2011-12 या खरीप हंगामाकरिता 195.62 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. ता. 30 एप्रिल 2011 पर्यंत 38.95 कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. चालू खरीप पीककर्जवाटप हंगामात शेतकरी सभासदांकडून मोठ्या प्रमाणात बॅंकेकडून पीककर्जाची मागणी होत आहे, मात्र पीककर्ज वाटपाकरिता नवीन सात-बाराची आवश्‍यकता असल्याने पीककर्ज वाटपाचा वेग मंदावलेला दिसतो.


"मागेल त्याला कर्ज'
जिल्हा बॅंकेने चालू महिन्यात आतापर्यंत 52 कोटी रुपये पीककर्जवाटप केले. या हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज देणारी विदर्भातील एकमेव बॅंक राहील. कोणत्याही शेतकऱ्याची जमीन पैशाअभावी पडीक राहणार नाही. यासाठी मागेल त्या शेतकऱ्याला या वर्षीपासून कर्ज देण्यात येणार आहे. बॅंकेच्या ठेवी वाढविण्याचा संकल्पसुद्धा या वर्षीपासून केला जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक कर्ज उपलब्ध करून देता येईल. गतवर्षी 22 कोटी 71 लक्ष बॅंकेचा निव्वळ नफा आहे. बॅंकेत सध्या जवळपास अकरा हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बाहेरचे कर्ज 159 कोटी 73 लक्ष रुपये आहे. आतापर्यंत सर्व प्रकाराचे मिळून 615 कोटी 51 लाख रुपये वितरित केले आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी 23 टक्‍क्‍यांवर असलेला एनपीए आता 14.14 टक्‍क्‍यांवर आला आहे


खताची मागणी अशी...
येत्या खरिपातील संभाव्य लागवड क्षेत्र आणि शेतकऱ्यांची मागणी गृहीत धरून या वर्षी आयुक्‍तालयाकडून 97 हजार मेट्रिक टन खतसाठा मंजूर झाला. गतवर्षी खरिपासाठी एकूण 98 हजार मेट्रिक टन खताची मागणी नोंदविण्यात आली होती. यात सुमारे पाच हजार टन राखीव साठ्याचा समावेश होता. गतवर्षी मागणीच्या 85 टक्के इतके खत जिल्ह्यास प्राप्त झाले. येत्या खरिपात लागवड क्षेत्रानुसार खताचा पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे, त्यानुसार या वर्षी सुरवातीला कृषी विभागाने आयुक्‍तालयाकडे एकूण एक लाख 17 हजार मेट्रिक टनांची मागणी नोंदविली. त्यापैकी 97 हजार मेट्रिक टन खत मंजूर करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या मागणीत 17 टक्‍क्‍यांनी वाढ करण्यात आली आहे. यात युरियाची 35 हजार 500, डीएपीची 27 हजार, सुपर फॉस्फेटची नऊ हजार 500, पोटॅशची तीन हजार, मिश्रखतांची 15 हजार, इतर खतांची 18 हजार मेट्रिक टन इतकी मागणी नोंदविण्यात आली.



16 भरारी पथकांची स्थापना
आंध्र प्रदेशाच्या सीमेलगत भागातील तालुक्‍यांमध्ये बियाणे आणि खतांचा काळाबाजार होतो. हा गैरप्रकार टाळण्यासाठी एकूण पंधरा तालुक्‍यांत 16 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा कृषी अधीक्षकांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय पथक असून, पंधरा पथके तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषी विकास अधिकारी यांच्या नेतृत्वात आहे. खते व बियाण्यांबाबत काही तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद कृषी अधिकारी कार्यालय ः 07172- 252708, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील ः 9422217849, किंवा 07172-253297, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय 07172- 274634 या क्रमांकावर संपर्क साधावा.
एसटी धावतेय जोरात





सकाळ वृत्तसेवा



Monday, May 09, 2011 AT 12:00 AM (IST)



Tags: st, income, growth, maharashtra, chandrapur, north maharashtra







श्रीकांत पेशट्टीवार : सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर - अवैध वाहतुकीला शह देण्यासोबत प्रवाशांना आपल्याकडे वळते करण्यासाठी एसटी महामंडळाने राबविलेल्या विविध प्रयत्नांचे परिणाम आता दिसू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या "प्रवासी वाढवा' अभियानाने महामंडळाच्या उत्पन्नात दुप्पट वाढ झाली आहे. यावर्षी तीन महिन्यांत चंद्रपूर विभागाला 28 कोटी 68 लाख 95 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागीलवर्षी हाच आकडा 24 कोटी 74 लाख 27 हजारांच्या घरात होता. दोन वर्षांत तीन कोटी 94 लाख 68 हजारांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.

जिल्ह्यात अवैध वाहतूक जोरात सुरू आहे. भाव कमी आणि सेवा चांगली, यामुळे काही वर्षे जिल्ह्यात खासगी वाहतुकीचाच बोलबाला होता. याच कारणामुळे प्रवाशांनी एसटीला पाठ दाखविली होती. याचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला. उत्पन्नात मोठी घट झाली होती. प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने 1999 च्या सुमारास "प्रवासी शतक' अभियान सुरू केले. महामंडळाला या अभियानाचे चांगले परिणाम काही वर्षांतच दिसू लागले होते. याच अभियानाच्या धरतीवर आता सुरू करण्यात आलेल्या प्रवासी वाढवा अभियानाला जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर विभागात चार जिल्हे येतात. यात नागपूर, भंडारा, वर्धा आणि चंद्रपूर विभागाचा समावेश आहे. चंद्रपूर विभागात सात डेपो आहेत, तर नागपुरात आठ, वर्धा सहा, भंडारा येथे सहा डेपो आहेत.



चंद्रपूर विभाग अव्वल

प्रवासी वाहतूक कमी असते, त्या काळात परिवहन महामंडळ प्रवासी वाढवा अभियान राबविते. साधारणतः जानेवारी ते मार्च महिन्यात हे अभियान राबविले जाते. या काळात विभागाला प्रवाशांचे "टार्गेट' असते. चंद्रपूर विभागाला जानेवारी महिन्याचे 54 लाख 55 हजारांचे उद्दिष्ट होते. या महिन्यात 57 लाख 19 हजार प्रवाशांनी जिल्ह्यातील विविध आगारातून प्रवास करून जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सहकार्य केले. फेब्रुवारी महिन्यात 47 लाख 45 हजारांचे उद्दिष्ट होते. तेही पूर्ण करण्यात चंद्रपूर विभागाला यश आले. या महिन्यात 50 लाख 69 हजार प्रवाशांनी बसला पसंती दिली. मार्च महिन्यात 51 लाख 90 हजारांचे उद्दिष्ट होते. तेही पूर्ण झाले. या महिन्यांत 54 लाख 20 हजार प्रवाशांनी सेवेचा लाभ घेतला.





बक्षीस योजना



या अभियानांतर्गत उद्दिष्टाची पूर्तता करणाऱ्या विभागाला महामंडळातर्फे बक्षिसे देण्यात येतात. दर महिन्यात समारंभ घेऊन बक्षिसे वितरित करण्यात येतात. 50, 25 आणि 15 हजार रुपये अशी बक्षिसे डेपोला देण्यात येत होती. आता या बक्षिसाच्या रकमेत वाढ झाली आहे. एक लाख, 75 हजार आणि 50 हजार, अशी ही बक्षिसे देण्यात येतात, तर विभागासाठी 50 हजार रुपयांचे बक्षीस आहे. चंद्रपूर विभागाने दोनदा बक्षीस प्राप्त केले आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वाहकासही बक्षीस दिले जाते.







तीन कोटी 94 लाखांची वाढ



प्रवासी वाढवा अभियानाने प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उत्पन्नातही वाढ झाली. मागीलवर्षी यातून 24 कोटी 74 लाख 27 हजारांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी हाच आकडा 28 कोटी 68 लाख 95 हजारांच्या घरात पोचला आहे. म्हणजे दोन वर्षांत तीन कोटी 94 लाख 68 हजारांनी उत्पन्न वाढले आहे.







प्रवासी वाढवा अभियानाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. दिलेले उद्दिष्ट आम्ही प्रवाशांच्या सहकार्यातून पूर्ण करू शकलो आहे. यामुळे उत्पन्नही वाढले आहे.





राजीव घाटोळे

विभागीय नियंत्रक, चंद्रपूर विभाग.

Wednesday, May 11, 2011

बदल्यांकडे लक्ष, मुलाखतींकडे दुर्लक्ष

बदल्यांकडे लक्ष, मुलाखतींकडे दुर्लक्ष

चंद्रपूर - संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत भरावयाच्या पदांच्या मुलाखतीसाठी उमेदवारांना मंगळवारी बोलावण्यात आले; मात्र अधिकाऱ्यांनी या मुलाखतींकडे दुर्लक्ष करीत बदलीकडे लक्ष दिले. या प्रकारामुळे अनेक जिल्ह्यांतून आलेल्या उमेदवारांना सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत ताटकळत राहावे लागले.


जिल्हापरिषदेच्या संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत केंद्रपुरस्कृत ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम राबविण्यासाठी युनिसेफ अर्थसाहाय्यित तत्त्वावर एक पद आणि संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत दोन पदे अशा एकूण तीन पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यात स्वच्छता, माहिती, शिक्षण व संवादतज्ज्ञ, संनियंत्रण व मूल्यमापनतज्ज्ञ या पदांचा समावेश आहे.
11 महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवर 15 हजार रुपये मासिक मानधन तत्त्वावर ही निवड केली जाणार होती. पाच एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. 13 एप्रिलला पात्रापात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली, 15 एप्रिलला आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख होती. त्यानंतर 21 एप्रिलला मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली. त्यानुसार 30 एप्रिलला मुलाखती घेण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली; मात्र काही कारणास्तव ती रद्द करण्यात आली. त्यानंतर 10 मे हा दिवस ठरविण्यात आला. जिल्हापरिषदेच्या कन्नमवार सभागृहात सकाळी 10 पासून मुलाखती होणार असल्याने जिल्ह्यासह गोंदिया, अमरावती, नागपूर, वर्धा, येथील उमेदवार दाखल झाले; मात्र दुपार होऊनही एकही अधिकारी फिरकले नाहीत. उलट 10 च्या मुलाखती साडेपाचला होतील, असे सांगण्यात आले. मुलाखतीसाठी थांबलेल्या उमेदवारांना दिवसभर ताटकळत ठेवण्यात आले. एकीकडे मुलाखतीचा कार्यक्रम आयोजिणाऱ्या अधिकाऱ्यांनीच प्रियदर्शिनी सभागृहात शिक्षकांच्या बदलीसंदर्भात विशेष सभा आयोजित केली. त्याच दिवशी दोन कार्यक्रम घेण्यात आल्याने हा गोंधळ झाला. यासंदर्भात जिल्हास्तरीय कार्यकारी समिती, संपूर्ण स्वच्छता कार्यक्रमाचे सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांच्याशी संपर्क साधला असता साडेपाचनंतर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या कक्षात मुलाखती घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.


तारीख लांबविण्याची मागणी
सकाळी 10 पासून मुलाखती होणार असल्याने जिल्ह्यासह गोंदिया, अमरावती, नागपूर, वर्धा, जिल्ह्यातून उमेदवार दाखल झाले; मात्र दुपार होऊनही एकही अधिकारी तेथे फिरकला नाही. जिल्हापरिषदेच्या या चुकीच्या नियोजनामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी पाचनंतर मुलाखतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने आलेल्या उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकारामुळे वेळेचा अपव्यय आणि आर्थिक भुर्दंड बसला. या मुलाखती आता 12 मे रोजी सकाळी 10 ला घेण्यात येणार असल्याचे श्री. राठोड यांनी उमेदवारांना सांगितले. मात्र, आज 200 ते 300 किलोमीटर अंतरावरून आलेले उमेदवार 12 मे रोजी मुलाखतीला परत कसे येतील, असा प्रश्‍न निर्माण झाला असून, या मुलाखती आता आठवडाभरानंतर घेण्याची मागणी उमेदवारांनी केली.




प्रतिक्रिया


On 11/05/2011 03:18 PM sajid nizami said:


ati utkrusht


On 11/05/2011 02:31 PM krushnakant said:


khupch छान

Thursday, May 05, 2011

पहाटेपासून राबतेय धाडसी " किरण'!

पहाटेपासून राबतेय धाडसी " किरण'!

वर्तमानपत्र वाटणारी जिल्ह्यातील पहिली मुलगीभद्रावती (जि. चंद्रपूर) - दीड महिन्यापूर्वीची गोष्ट. पहाटेच्या सुमारासच घरी वर्तमानपत्र आले. एरवी आठ, नऊ वाजल्याशिवाय वर्तमानपत्राचा पत्ता नसायचा. त्या दिवशी पहिल्यांदाच भल्या पहाटे वर्तमानपत्र मिळाले. आश्‍चर्य वाटले. मात्र, आश्‍चर्याचा खरा धक्का त्यानंतरच बसला. कारण वर्तमानपत्र घरी टाकायला येणारी "मुलगी' असल्याचे समजले. किरण शंकरराव पेटकर (17) असे तिचे नाव आहे. वर्तमानपत्र वाटणारी ती जिल्ह्यातील पहिलीच मुलगी.
ती आता परिसरात "पेपरगर्ल' म्हणून ओळखली जात आहे. किरण गवराळा येथील कर्मवीर विद्यालयातील बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. नुकतीच तिची परीक्षा आटोपली आहे. भद्रावतीलगतच्या सुमठाणा येथील महात्मा फुलेनगरातील ती रहिवासी आहे. तिचे आईवडील दोघेही मजुरीचे काम करून संसाराचा गाडा हाकत आहेत. याही परिस्थितीत किरणला त्यांनी शिकविले. बारावीचे वर्ष असल्यामुळे इच्छा असूनही किरण त्यांना मदत करू शकत नव्हती. मात्र, आईवडिलांची दगदग, धावपळ तिने बघितली. त्यामुळे परीक्षा झाली की काम करायचे, अशी खूणगाठ तिने मनाशी बांधली होती. शोध घेऊनही काम मिळाले नाही. शेवटी तिने येथील पतरंगे न्यूजपेपर एजन्सीशी संपर्क साधला. त्यांनीही सुरवातीला तिला हसण्यावर नेले. मुलगी आणि पेपर वाटण्याचे काम कसे करेल, असा प्रश्‍न त्यांनाही पडला. मात्र, किरणचा आत्मविश्‍वास बघून त्यांनी तिला संधी दिली.
पहाटे पाचलाच ती सेंटरवर पोचते. स्वत:ची सायकल घेऊन जीन्स व शर्टमध्ये ती पंचशील वॉर्ड, आनंदनगर, श्रीरामनगर, सुमठाणा या परिसरात घरोघरी जाऊन रोज 120 वर्तमानपत्रे वाटप करते.
वर्तमानपत्रे वाटून झाल्यानंतर किरण एका पॅथॉलॉजीमध्ये काम करते. सायंकाळी घरी आल्यानंतर आईला मदत करते. किरणची दिनचर्या अशी धावपळीची आहे. मात्र, आईवडिलांना मदत केल्याचे समाधान मिळत असल्याने तिला कसलाही त्रास जाणवत नाही.



कुणी कौतुक करतात; कुणी उडवते खिल्ली


घरोघरी वर्तमानपत्र वाटून महिन्याला 800 रुपये कमविणाऱ्या किरणकडे काही जण कौतुकाने बघतात, तर काही जण तिची खिल्ली उडविण्याचाही प्रयत्न करतात. तिच्या मैत्रिणीही वर्तमानपत्र वाटणे हे मुलीचे काम नाही, ते बरे दिसत नाही, असे समजावितात. किरण मात्र त्याकडे लक्ष देत नाही. कधीही कोणतीही परिस्थिती जीवनात येऊ शकते. कामाची लाज नसावी. प्रत्येक गोष्ट पुरुषानेच का करावी? मुलीनेही पुढाकार घेऊन प्रत्येक क्षेत्रात जाऊन काम करावे. या तिच्या उत्तरानंतर तिला विचारण्यासाठी प्रश्‍नच शिल्लक राहत नाही. भावी आयुष्यात परिचारिका बनून रुग्णांची सेवा करण्याची तिची इच्छा आहे. आता हेच काम "पार्ट टाइम जॉब' स्वरूपात सुरू ठेवण्यार आहे. पतरंगे न्यूजपेपर एजन्सीचे मालक विनायक पतरंगे यांनी मागील 22 वर्षांच्या कारकिर्दीत एखाद्या मुलीने "पेपरगर्ल'चे काम करावे, ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले. संबंधित बातम्या


प्रदूषणग्रस्त आठ उद्योगांची बॅंक गॅरंटी जप्त


पोलिस अधीक्षकांनी मागितली माफी


खापरखेड्याच्या विद्युत केंद्रातील ट्रान्सफॉर्मरला आग


चंद्रपुरात रिमझिम पाऊस


दुष्काळाच्या छायेत नाट्य"रंग' हरविले






प्रतिक्रिया


On 05/05/2011 09:30 AM satish said:


कोणतेही काम हे छोटे नसते. ती पेपर टाकते ह्यात काहीच वाईट नाही उलट तिच्या मेहनतीला सलाम. देव तुझे भले करो.


On 05/05/2011 09:26 AM prakash said:


अरेय इथे 5 वाजता सकाळी उठण्याची कल्पना पण सहन होत नाही ,,,, खूपच छान काम करते आहे ...


On 05/05/2011 09:25 AM datta patil said:


khupach chhan


On 05/05/2011 09:24 AM Rajashekhar Malge said:


किरण, सलाम. तू जे पाऊल उचलले आहेस आणि आई-वडील यांना मदत करतेस ते फारच वंदनीय आहे. कुठल्याही कामा मध्ये लाज बाळगू नये हे तू सिद्ध करून दाखविलेस आणि कुणीही निंदा करो त्याकडे दुर्लक्ष करणे हीच चांगली गोष्ट आहे. आणि एक दिवस नक्कीच तुला आशेचा किरण मिळेल. तुझ्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.


On 05/05/2011 09:23 AM asha Pravin Kadam said:


Good work Kiran ... keep it up :)


On 05/05/2011 09:20 AM darshan said:


खूपच छान... मुली समानतेच्या गोष्टी फक्त अशा मार्गानेच अस्तित्वात आणू शकतात.. फक्त सिगारेट आणि दारू पिऊन नाचणाऱ्या श्रीमंत बापाच्या मुलींची खरच कीव येते.


On 05/05/2011 09:01 AM savita said:


अभिनंदन किरण ,कुठलेही काम कमीद्रजाचे नसते. आत्मविश्वास असेल तर आपण सर्व साध्य करू शकतो.तुला यश मिळो. खूप शिक व ध्येय साध्य कर .आमच्या शुभेछा.......


On 05/05/2011 08:53 AM sham bagade said:


इतर तरुण तरुणींनी हाच आदर्श ठेवून आपल्या शैक्षणिक खर्चाचा पालकान वरील भार कमी करण्यास मदत करावी


On 05/05/2011 08:47 AM vishal said:


खूप छान किरण गुड गोइंग


On 05/05/2011 08:41 AM Arun Parkhi said:


अशा मुलीचा अभिमान वाटला पाहिजे .खूप छान


On 05/05/2011 08:39 AM sanjukokil. said:


इतक्या धाडसी मुलीचे कौतुकाच करायला पाहिजे. जे लोक तिची खिल्ली उडवतात त्यांनी २ दिवस असे काम करून आपल्या आई वडिलांना मदत करून दाखवावी. मुलगी असो वा मुलगा असो ठराविक वयानंतर संसार फक्त आई वडिलांचा नसतो. तो सगळ्यांचा आसतो. कॉलेजचे जीवन म्हणजे आई वडिलांच्या जीवावर मारायची मौज नसते हे आजच्या तरुणांना ह्या मुली मुले समजेल अशी आशा आहे. किरण तुझे कौतुकाच आहे. अशीच जाणीव ठेव.


On 05/05/2011 08:36 AM Ranjit said:


This is Real Strength.


On 05/05/2011 01:01 AM Ranjit S. said:


आपल्या नेत्यांच्या पोरीना पण सांगा जरा ४ दिवस पेपर तक म्हणावे... १० वाजेपर्यंत उठत नसतील बेड वरून..... Go ahead Kiran... तुझ्या नावाप्रमाणे एक दिवस चांगला आशेचा किरण भेटेल..... असे लाखो करोडो देशात आहेत....summary : curruption जागो भारत जागो


On 05/05/2011 12:30 AM suresh pawar said:


hats of to u


On 05.05.2011 12:19 Rohit said:


खूप छान !!! आजकालच्या किड्यांमध्ये एकतरी गहू आहे ))


On 05/05/2011 12:07 AM SHiv said:


कौतुकास्पद!!!!


Monday, May 02, 2011

मद्य, गुटख्यांची भाववाढ बनावट

मद्य, गुटख्यांची भाववाढ बनावट

चंद्रपूर - शासनाने कर वाढविल्याचे कारण पुढे करून दारू आणि तंबाखूजन्य पदार्थांची भरमसाट दराने विक्री केली जात आहे. सुधारित अध्यादेश येण्यापूर्वीच वाढीव करापेक्षा जादा दरवाढ केल्याने अनेकवेळा विक्रेते आणि ग्राहकांत वाद होऊ लागले आहेत. दरम्यान, या भाववाढीमुळे विक्रीवर मोठा परिणाम जाणवत आहे.
नुकत्याच सादर झालेल्या राज्य अर्थसंकल्पामध्ये दारू आणि गुटख्यावर कर वाढविण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या करवाढीचा अध्यादेश दुकानदारांपर्यंत अद्याप पोचला नाही. मात्र, दरवाढीचे निमित्त साधून दुकानदारांनी भरमसाट दराने विक्री सुरू केली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे या बेकायदेशीर दरवाढीकडे सोईस्कर दुर्लक्ष सुरू असल्याची चर्चा आहे. दरवाढीमुळे दारूविक्रीवर परिणाम झाला असून, शासनाचा महसूल बुडत आहे. अचानक भरमसाट दरवाढ झाल्याने काही ग्राहकांनी नेहमीचा ब्रॅंड बदलला आहे. काहींनी बिअरबारमध्ये बसून पिण्यापेक्षा दुकानातून पार्सल खरेदीवर भर दिला आहे. काही विदेशी ब्रॅंड पसंत करणारे जादा पैसे मोजण्यापेक्षा देशीदारूवर आपली तहान भागवत असल्याचे दिसून येत आहे. 80 ते 90 रुपयांना मिळणारी बिअर आता 130 ते 140 रुपये, 100 रुपयांना मिळणारी विस्की दारू 150 ते 160 रुपयांना विकली जात आहे. 12 रुपयांच्या पाण्याच्या बाटलीसाठीदेखील 18 रुपये मोजावे लागत आहेत. या सर्व बाटल्यांवरील उत्पादन किंमत कमी असतानादेखील जादा भाव घेतला जात आहे.

पानटपरीही महागली
बहुसंख्य पानटपऱ्यांवर कृत्रिम गुटखाटंचाई केली जात आहे. एक रुपयाला मिळणारी गुटख्याची पुडी आता पाच रुपयांना मिळत आहे. दीड-दोन रुपयांची पुडी आता पाच ते सहा रुपये, तर सहा रुपयांचा खर्रा आता सरळ दहा रुपये देऊन खरेदी करावा लागत आहे. 12 रुपयांचा गुटखा 35 ते 40 रुपये झाला आहे. या दरवाढीमुळे विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. गुटख्याच्या या बनावट दरवाढीमुळे काही नवीन कंपन्यांनी पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या कंपन्या कमी दर्जाचा गुटखा अत्यल्प किमतीत देऊन शौकिनांचा शौक भागवीत आहेत. अशा बनावट आणि कमी दर्जाच्या गुटख्यावर उत्पादन शुल्क, तारीख आणि एक्‍स्पायरी डेट नसते. त्यामुळे आजारदेखील होऊ शकतात.
मुदतबाह्य दारूही विक्रीला
दरवाढीच्या संकेतानुसार दारूविक्रेत्यांनी फेब्रुवारीमध्येच जास्तीचा साठा केला होता. दारूचा जुनाच साठा असल्याने छापील किंमत आणि उत्पादनाची तारीख नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातील आहे. दुसरीकडे मात्र दारूविक्रेते वाढीव दरवाढ अपेक्षित ग्राह्य धरून दारूची अधिक जादा दराने विक्री करीत आहेत. विशेष म्हणजे काही दुकानांत बिअरचा जुना माल असून, एक्‍स्पायरी डेट निघून गेली आहे.
प्रतिक्रिया
On 02/05/2011 12:51 PM ANIL RATHOD said:
daru gutakha nakore baba
On 01/05/2011 09:19 AM Mukund said:
हात जोडून कळकळीची विनंती ...... दारू , गुटखा , तंबाखू यांना चुकूनही हात लावू नका ...... अगदी फुकट मिळाले तरी ..............
ताडोबात जिप्सींना "नो-एंट्री'

ताडोबात जिप्सींना "नो-एंट्री'

चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांना "ताडोबादर्शन' घडविणाऱ्या विनापरवाना जिप्सी आज (ता. 1)पासून बंद करण्यात येणार आहेत. केवळ परिवहन विभागाची अधिकृत कागदपत्रे असलेली खासगी वाहने आणि टुरिस्ट परवाना असलेल्या भाडेतत्त्वावरील वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
देशभर ख्याती असलेल्या ताडोबातील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाघांसाठी देशात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात राज्यासह विदेशांतील पर्यटक येत असतात. दिवसभरात सुमारे 60 वाहनांतून जवळपास 300 पर्यटकांची गर्दी होत असते. त्यांना जंगलभ्रमंती सोयीची व्हावी म्हणून येथे 40 टुरिस्ट जिप्सी आहेत. स्थानिक आणि बाहेरच्या काही लोकांनी जिप्सी खरेदी करून आपला व्यवसाय सुरू केला आहे. यात आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथून नऊ ते 10 जिप्सी येथे आल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडे कोणताही पर्यटन परवाना नाही. परप्रांतांतून आलेल्या वाहनांची हस्तांतरण कागदपत्रे तयार करण्यात आलेली नाहीत. परिवहन खात्याचे नूतनीकरण झालेले प्रमाणपत्र त्यांच्याकडे नाही. 40 पैकी 36 जिप्सी खुल्या आहेत. विनापरवाना चालणाऱ्या याच वाहनांमुळे शासनाचा महसूलही बुडाला आहे. येथे चालविण्यात येणाऱ्या सारस, सारई आणि ताडोबा रिसॉर्ट यांच्याकडेही जिप्सी आहेत. मात्र, त्यांच्याकडेही परिवहन खात्याचे पत्र नसल्याचे समजते. यासंदर्भात उपपरिवहन अधिकाऱ्यांनी दोनदा छापे घातले होते. मात्र, छाप्याची आधीच चुणूक लागत असल्याने जिप्सीमालक आणि चालक सापडलेले नाही. परजिल्ह्यातील आणि आंध्रातील जिप्सीमालक इंटरनेटच्या माध्यमातून आधीच पर्यटकांची नोंदणी करून घेतात. त्यामुळे स्थानिक जिप्सीमालकांना पर्यटकच भेटत नव्हते. खासगी वाहनांनी येणाऱ्या पर्यटकांना जिप्सीचालकांच्या मनोपल्लीचा फटका बसू लागला.

यासंदर्भात अनेकदा वृत्त प्रकाशित झाले. मात्र, अधिकाऱ्यांनी थातूरमातूर कारवाई केली. दरम्यान, मागील आठवड्यात खासदार हंसराज अहीर यांना जिप्सीचालकांची मनोपल्ली डोळ्याने बघता आली. खासदारांच्या कार्यकर्त्यांचे जिप्सी संघटनेच्या लिपिकासोबत बाचाबाचीचे प्रकरण गाजले. अगदी हीच बाब हेरून खासदारांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यामुळे आता जिप्सीचालकांच्या व्यवसायावर गदा आली आहे. एक मेपासून विनापरवाना जिप्सी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी वाहनांनी जाताना चालकाजवळ परवाना, वाहनाची संपूर्ण कागदपत्रे जवळ असणे आवश्‍यक आहे. शिवाय भाडेतत्त्वावरील वाहनांना टुरिस्ट परवाना असणे बंधनकारक करण्यात आले आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर आता उपविभागीय परिवहन खात्याचे अधिकारी तैनात करण्यात येणार असून, ते कागदपत्रांची तपासणी करतील.
ताडोबातील गाइड करणार धरणे
चंद्रपूर - गाइड शुल्क शंभराहून दोनशे रुपये करण्यात यावे आणि अन्य मागण्यांना घेऊन ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील गाइड धरणे आंदोलन करणार आहेत. येत्या तीन मे रोजी ताडोबा-अंधारी वनसंरक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

वन्यपशू, पक्षी यांचे संवर्धन आणि संगोपन करण्यासाठी आरक्षित ठेवलेल्या राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांना त्रास न होऊ देता पर्यटकांना सुरक्षितरीत्या फिरविण्याचे काम गाइड करीत आहेत. मात्र, वाढत्या महागाईमुळे 100 रुपये दिवसभरात अपुरे पडतात. त्यामुळे सर्व गाइडला अंशकालीन शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन एक हजार रुपये मानधन देण्यात यावे. गाइड शुल्क शंभराहून दोनशे रुपये करण्यात यावे, भविष्य निर्वाह निधीसह निवृत्तियोजना लागू करण्यात यावी, गाइडला ओळखपत्र, टोपी बुटांसह गणवेश देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात येणार आहेत. वनसंरक्षक कार्यालयासमोर दुपारी बारा ते तीनपर्यंत धरणे देण्यात येणार असून, आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ वनकामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे करणार आहेत.