चंद्रपूर - मागील दोन वर्षात 13 बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी पांढरकवडा येथे वनविभागाची चमू दाखल झाली आहे. शिकारीचे गुन्हे दाखल असलेल्या नवाब शूटरऐवजी वाघिणीला नागरिकांच्या हितासाठी बेशुद्ध करून पकडण्याच्या मागणीवर चंद्रपूर येथील इको प्रो संस्थेसह विविध स्वयंसेवी संस्थांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
मागील दोन वर्षात 13 बळी घेणाऱ्या या वाघिणीला करण्याचे आदेश वन विभागाने दिले होते. त्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने हल्लेखोर वाघीण धोकादायक असल्याने तिला योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. त्याविरुद्ध काही संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात ठार करण्याचे आदेश दिले. त्यामुळे संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत. दोन दिवसापूर्वीच नागपूर येथील काही संघटनांनी संविधान चौकात चेहऱ्यावर वाघाचे रेखाटने करून निदर्शने केली.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील वाघीण प्रकरणात मोठा गदारोळ झाल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. वनविभागाचे अख्ख्ये मुख्यालय पांढरकवडा येथे दाखल झाले असून, त्यांच्या आदेशानुसार वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात येणार आहे.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांचा हस्तक्षेप झाल्यावर हैदराबादचा शूटर नवाब अली खान व मध्य प्रदेशातून आली टिम परत गेल्याने सुरू असलेल्या या मोहिमेविषयी संभ्रम निर्माण झाला होता. प्रधान मुख्य वनसंरक्षक मिश्रा यांनी वन्यजीव विभागाचे अपर मुख्य संरक्षक सुनील लिमये सोबत पांढरकवडा येथे दौरा केला आहे.
