काव्यशिल्प Digital Media: अपहरण

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label अपहरण. Show all posts
Showing posts with label अपहरण. Show all posts

Thursday, February 22, 2018

गडचिरोलीत शिक्षिकेच्या प्रसंगावधानाने टळले बालिकेचे अपहरण

गडचिरोलीत शिक्षिकेच्या प्रसंगावधानाने टळले बालिकेचे अपहरण

Plan of kidnapping a girl child is failure due to teacher's presence of mind in Gadchiroli | गडचिरोलीत शिक्षिकेच्या प्रसंगावधानाने टळले बालिकेचे अपहरण
गडचिरोली/प्रतिनिधी: 

शहरातील ब्रह्मपुरी मार्गावरील एका कॉन्व्हेंट स्कूलमधून तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. शाळेच्या शिक्षिकेने समयसूचकता दाखवत बालिकेच्या वडिलांना फोन करून माहिती दिल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला.
प्राप्त माहितीनुसार, देसाईगंज शहरातील उद्योजक आकाश अग्रवाल यांच्या एकुलत्या एक तीन वर्षीय कन्येला पालकांनी नेहमीप्रमाणे गुरूवारी (दि.१५) ब्रम्हपुरी रोडवरील लिटील फ्लॉवर स्कूलमध्ये सोडून दिले. सकाळी ११.५० च्या दरम्यान चेहरा दुपट्ट्याने बांधलेले दोन इसम दुचाकीवरून शाळेत आले. नायरा अग्रवालला नेण्यासाठी आलो आहोत अशी बतावणी त्यांनी केली. मात्र शिक्षिका अनिसा लालानी यांनी नायराचे वडील आकाश अग्रवाल यांना विचारुन सांगते, असे म्हणून त्या आत गेल्या आणि मोबाईलवरून अग्रवाल यांना नायराला घेण्यासाठी कोणाला पाठविले का, असे विचारले. मात्र आपण कोणालाही पाठविले नसून रोज तिची आजी तिला घेण्यासाठी येते. आम्ही कुणालाही पाठवले नाही, असे उत्तर मिळाल्याने शिक्षिका लालानी त्या इसमांना पाहण्यासाठी बाहेर आल्या. मात्र त्या बाहेर येण्यापूर्वीत दुचाकीवरून आलेले ते दोघेही पसार झाले होते. त्यामुळे नायराचे अपहरण करण्याचा त्यांचा डाव होता, हे स्पष्ट झाले.
६ फेब्रुवारीला आंबेडकर वॉर्डातील नगर परिषद शाळेतील पाच विद्यार्थ्यांचे अपहरण करुन सहा बुरखाधारी अपहरणकर्त्यांनी अनिकेत शाळेच्या मागील भाटीया पटेल यांच्या शेतातील ओसाड घरात त्यांना तब्बल पाच तास डांबून ठेवले होते, मात्र अपहरणकर्त्यांची गाडी वेळेवर न आल्याने अपहरण करण्यासाठीचा डाव उधळल्या गेला होता. त्या प्रकरणाला १० दिवस लोटत नाही तोच पुन्हा अपहरणाचा प्रयत्न करण्याची घटना घडल्यामुळे देसाईगंज शहरात अपहरण करणारी टोळी सक्रिय असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस त्यांना केव्हा शोधून काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अपहरकर्ते ओळखीचेच?
अग्रवाल यांच्या मुलीला जवळचे नातेवाईक व मित्रपरिवारात परी या नावानेच ओळखतात. नायरा हे तिचे शाळेतील नाव आहे. हे नाव फक्त घरातील मंडळी व शाळेच्या शिक्षिकांनाच माहित आहे. मात्र नायराला नेण्यासाठी आलेल्या त्या दोन इसमांनी थेट ‘नायरा’ हिला घेण्यासाठी आम्हाला पाठविले असे सांगितल्याने ते कुणीतरी ओळखीतलेच असावे, अथवा संपूर्ण माहिती काढलेल्या व्यक्तीने हे कटकारस्थान रचले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.