সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, August 29, 2015

अपंग मुलीला "शौचालय'ची रक्षाबंधन भेट

अपंग मुलीला "शौचालय'ची रक्षाबंधन भेट

चंद्रपूर : दोन्ही पायांनी अपंग असलेल्या एका मुस्लीम मुलीची व्यथा ऐकून चंद्रपूर महापालिकेचे माजी उपमहापौर आणि शिवसेना पदाधिकारी संदीप आवारी यांनी तिला स्वखर्चाने शौचालय बांधून दिले. एका मुस्लिम बहिणीचे खऱ्या अर्थाने रक्षण करून "या' भावाने रक्षाबंधनाची आगळीवेगळी भेट दिली आहे.

येथील इंदिरानगर भागात रुकसाना गनिशेख ही विधवा महिला मागील 22 वर्षांपासून वास्तव्यास आहे. दोन मुलींचा विवाह झाल्याने त्या सासरी आहेत. तर, उर्वरित दोन मुली आणि एक मुलगा तिच्याजवळ आहेत. कमरजहॉं.या 38 वर्षांच्या मुलीला जन्मापासूनच अपंगत्व आहे. त्यामुळे या मुलीच्या सर्व विधी आईलाच कराव्या लागत आहेत. या मुलीसाठी घरी शौचालय बांधावे असे वाटत होते. परंतु, घरची आर्थिक विवंचना आड येत होती. मुस्लिम समाजासाठी शौचालयाची कोणतीही योजना नसल्याचे सांगून सर्वांनीच हात वर केले.
पाच महिन्यांपूर्वी ही वृद्ध महिला पुन्हा महापालिकेत गेली. आयुक्तांना भेटली. पण नकारच मिळाला. त्यावेळी तेथे उपमहापौर असलेले शिवसेनेचे नेते संदीप आवारी पोहोचले. आयुक्तांनी त्यांना ही अडचण सांगितली. वृद्ध महिलेनेची करुण कहानी ऐकताच आवारी यांचं मन द्रवले. लगेच त्या महिलेला शौचालय स्वखर्चाने बांधून देण्याचा शब्द दिला. एरवी राजकारण्यांचा शब्द म्हणजे हवेतील तीर असतात. पण आवारी यांनी दिलेला शब्द पाळला. लगेच कंत्राटदारांशी संपर्क साधून बांधकामाला सुरवात करण्यास सांगितले. आज हे शौचालय बांधून तयार झाले आहे. त्यामुळे रुकसाना अतिशय भावुक झाली आहे. एका गरीब बहिणीच्या मदतीला देवदूत धावून आल्याची भावना त्यांच्या मनात आहे.
जातीपातीची बंधनं तोडून केवळ सामाजिक दायित्वाच्या भावनेतून केलेले आवारी यांचे हे कार्य निश्‍चितच प्रेरणादायी आहे. रक्षाबंधनाच्या औचित्यावर एका भावाने दिलेली ही भेट या निर्धन बहिणीसाठी लाखमोलाची ठरली. तिने आवारी यांना राखी बांधून आपली कृतज्ञता व्यक्त केली. मदत करणारे हात हिंदूंचे की मुस्लिमाचे, हे आपण पाहात नाही. मदत करणारा हा नेहमीच धर्माच्या पलीकडचा असतो, यावर या बहिणीचा विश्‍वास आहे. धर्मनिहाय गणनेवरून देशात विखारी चर्चा सुरू असताना या घटनेने त्यावर विराम घालण्याचा प्रयत्न केला आहे. एका छोट्याशा शहरातील ही छोटीशी घटना असली, तरी त्याचे मूल्य आणि महत्त्व सर्वव्यापी असेच आहे.

Wednesday, August 26, 2015

अशी गर्दी पुन्हा व्हावी!

अशी गर्दी पुन्हा व्हावी!

देवनाथ गंडाटे 
अशी गर्दी पुन्हा व्हावी, असे मला वाटते. पण, चांगल्या कामासाठी. अनेक तरुण मुलं अल्प पगारावर पत्रकार म्हणून काम करतात. कुटुंब पोसता येईल, इतकीदेखील रक्कम हाती येत नाही. कधी उसनवारी, तर कधी पोट मारून ही पोरं काम करतात. शिक्षण घेऊनही नोकरी न लागल्यानं या बातम्यांच्या ते धंद्याकडे वळले आणि कधी परत जाणार नाहीत, अशा दलदलीत येवून सापडलेत. आयुष्यभर दुसऱ्यांच्या पगारासाठी, किमान वेतनासाठी, तर कधी सेवानिवृत्ती, महागाई भत्ता, तर नक्षलभत्त्याच्या बातम्या मोठमोठ्या प्रकाशित करतात. पण, स्वत:च्या पगाराची अन्‌ सुविधांची मागणी कोणत्या पेपरात प्रकाशित होणार? की आयुष्यभर बातमी प्रकाशित करणे किंवा प्रकाशित न करण्याचेच पैसे घेत राहणार? जग स्मार्ट झालाय. ज्यांच्याकडे मोबाइल आला. तोदेखील पत्रकार झाला. तो आपली व्यथा सहजपणे आता जगापुढे मांडू शकतो. त्याला वाचकही मिळाला. पत्रकारितेचे विश्‍व बदलत आहे. बातम्यांची मार्केटींग, कामाची मार्केंटीग सुरू झाली. सामान्य माणूसदेखील स्मार्ट फोनच्या आधारे बातमी विकू लागला आहे. त्यामुळे सांगावेसे वाटते "जग बि घडलाय, तुम्ही बी घडाणा'. चंद्रपुरात निघालेला मोर्चा उर्त्स्फुत होता. अशी गर्दी पुन्हा व्हावी, ती आपल्या न्यायहक्‍कासाठी....

श्रमिक
पत्रकार विरुद्ध एल्गार
बापूजी ने कहा घर छोड दो, मां ने कहा पारो को छोड दो और पारो ने कहा दारू को छोड दो, हे वाक्‍य ऐकले की आठवतोय देवदास. मद्यपींना अनेक लेखकांनी वेगवेगळी नावे दिली. राम गणेश गडकरींनी त्याला तडीराम म्हटले. आमच्या गावाकडे हे दोन्ही शब्द नाहीत. पण, बेवडा म्हणतात. काहीजण दारुडे संबोधतात. शब्द काहीही असोत. नशा डोलणारीच असते. म्हणून देवदासमध्ये डोला रे... हे गाणं हिट झालं. पण, या दारुमुळे सारे बिघडले, तर काहींचे घडले. पिणारे, न पिणारे देखील नशेबद्दल मनसोक्त बोलतात. ज्यांनी आयुष्यात दारु प्राशन केली नाही, ते देखील दारुची नशा वाईट आहे, असे सांगतात. प्रत्येकांचा अनुभव वेगळा असलातरी जे सांगायचे ते सांगतात. देवदास हा मद्यपी. त्याला दारुपासून परावृत्त करण्यासाठी खटाटोप करणारी पारो. हे कथानक जरी चित्रपटातील असलेतरी परिणाम खऱ्याखुऱ्या आयुष्यातही दिसते. याच दारुपासून मुक्तता मिळविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीची मागणी रेटून धरल्यानंतर ती पूर्ण होईपर्यंत लढा देणाऱ्या श्रमिक एल्गारने "जया'चे श्रेय घेतले. ज्यांनी परिश्रम घेतले त्यांनी श्रेय घेतले. पण, आता दारुबंदीच्या पाच महिन्यांनी विदारक स्थिती निर्माण झाली. पहिल्या महिन्यात सिमारेषेवर झडती व्हायची. दारु पकडली जायची. कारवाई व्हायची. अवैध दारु नेणाऱ्यांत भिती निर्माण झाली. पण, आता कुणाला विचारल्यास, "भाऊ कोटी भेटते का गा.' तो सहज सांगतो, भेटत्ते काज्जी न. पण, एका निपले तिनशे रुप्पये. साऱ्यांचेच व्यवस्थित सुरू आहे. पण, ते लपून. आता ही दारु कोणी पकडून द्यावी आणि कोणाला पकडून द्यावी, हा प्रश्‍न आहे. कारण, ज्यांना पकडून दिली, ते गांधी नोट खिशात टाकून मोकळे होतात आणि ज्यांची पकडून दिली ते वैर करतात. मारण्याची धमकी देतात. पाहून घेण्याची भाषा करतात. मग, कशाला उगीचच कटकट.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून श्रमिक पत्रकार विरुद्ध श्रमिक एल्गार असा वाद रंगतोय. मला त्यात खोलवर बोलायचे नाही. पण, दोन्ही संघाना एकत्र केल्यास "श्रमिक पत्रकारांचा एल्गार' असा एकवाक्‍य होतो. वृत्तपत्रात बातमी छापून आली. ती खोटी आणि चुकीची असल्याचा एल्गारचा युक्तीवाद आणि बातमीवर पोलिसात तक्रार का दिली, हा पत्रकारांना आलेला राग. या वाद आणि रागातून मुकमोर्चा निघाला. जिल्ह्यातील शेकडो गावचे पत्रकार जिल्ह्याच्या ठिकाणी आले. खिशाला काळ्याफिती लावल्या. एल्गारविरुद्ध नारे दिले. चौथ्या स्तंभाला असलेल्या अधिकाराचा वापर वार्ताहराने केला आणि नागरिक म्हणून असलेला अधिकार एल्गारने वापरला. "कोण बरोबर, कोण चुक', हे आपणच ठरविले पाहिजे. जिल्ह्यात नवे पोलिस अधीक्षक आले. दारुबंदीवर आळा घालणे हा एकच उद्देश नव्या पोलिस अधीक्षकांना येथे आणण्याचा होतो, हे छातीठोकपणे सांगणे चुकीचे आहे. भलेही दारुबंदीचे आव्हान त्यांच्यापुढे होते. पण, केवळ दारु हाच एकच गुन्हेगारीतील विषय नाही. दारुबंदी झाल्यानंतरही दारु विकली जात असेलतर ज्या ज्या लोकांनी या यशस्वी लढ्याचे श्रेय लाटले असेल हा त्यांचा नाकर्तेपणा आहे का? की त्यांनीही आता दुसऱ्यावर खापर फोडावे.


बोगस पत्रकारांचा सुळसुळाट कधी थांबणार?
पत्रकार असल्याचे सांगून अधिकारी, कर्मचारी, तर कधी राजकीय पुढाऱ्याकडून पाचशे रुपये देखील घेणाऱ्या पत्रकारांची संख्या गावात कमी नाही. वस्तुस्थिती बघितली तर महिन्याला चारही अंक न काढणारा पत्रकार (स्वत:ला मालक समजून घेणारे) राज्यशासनाचा अधिस्वीकृती पत्र घेऊन फिरतो. एसटी बसमध्ये मोफत प्रवास करतो (आरक्षित आसनावर). विश्रामगृहात खोली बूक करतो आणि वाट्टेल ते रंगेल धंदे करतो, अशा बोगस पत्रकारांचा सुळसुळाट कधी थांबणार आहे. अशा निर्लज्ज प्रकारामुळे चांगल्या माणसांची मान शमनेनं खाली जात आहे, त्याचे काय? 
देहविक्रीच्या आर्थिक व्यवहारातून महिलेचा खून

देहविक्रीच्या आर्थिक व्यवहारातून महिलेचा खून

तरुणीसह दोघांना अटक : गोंडखैरी टोलनाक्‍याजवळ सापडला होता मृतदेह

कळमेश्‍वर : राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील गोंडखैरी टोलनाक्‍याजवळ पाल पेट्रोलपंपाच्या विरुद्ध बाजूला नऊ ऑगस्ट रोजी 35 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. तपासांत मृतदेहाची ओळख पटली. राणू ऊर्फ सुरेखा देवेंद्र बोरकर असे तिचे नाव आहे. ती इंदोरा, जरिपटका, नागपूर येथील रहिवासी होती. तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. हा खून देहविक्री व्यवसायाच्या आर्थिक व्यवहार व व्यवसायातील चढाओढीतून झाल्याचे स्पष्ट झाले.
गोंडखैरी टोलनाक्‍याजवळ सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळी पथके नेमली. सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल व सहकाऱ्यांनी नागपूर शहर व आसपासच्या परिसरात महिलेच्या फोटोच्या साहाय्याने शोध घेतला. वाडी येथे मृत महिलेचा मानलेला भाऊ सावन ऊर्फ भारत याने बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. त्यात तिचे नाव राणू ऊर्फ सुरेखा देवेंद्र बोरकर असल्याचे उघड झाले. ओळख पटल्यानंतर मृत महिला सुरेखा हिच्या जवळच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात आला. सायबर सेलचे नायब पोलिस शिपाई अजय तिवारी यांनी अधिक माहिती मिळविली. त्यात सुरेखा बोरकर हिची मैत्रीण पद्मा (काल्पनिक नाव) व तिचा प्रियकर राहुल टाके (रा. कळमेश्‍वर ह. मु. दाभा, वाडी) यांचा घटनेत संबंध असल्याचे उघड झाले. देहव्यापाराच्या आर्थिक वैमनस्यातून सुरेखा व पद्मा यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन ताणतणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी पद्मा व राहुल यांची वैयक्तिक माहिती संकलित केली. त्यांचा मूळ निमजी, फेटरी व सध्या राहत असलेल्या वाडी येथील आंबेडकरनगर, दाभा या परिसरात तपास करण्यात आला. घटनेनंतर दोघेही नागपुरात असल्याचे कळले. राहुल टाके याची मानलेली बहीण निर्मला राऊत (रा. सावनेर) यांच्या संपर्कात राहुल व पद्मा असल्याचे समजले. याच माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक अरविंद सराफ हे पथकासह 24 ऑगस्ट रोजी सावनेरला गेले. निर्मला राऊत यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्याकडून पद्मा व राहुल संदर्भात माहिती घेतली. तेव्हा ते दोघेही मालीपुरा (ता. आश्‍टा, जि. सिहोर, मध्य प्रदेश) येथे राहत असल्याचे समजले. मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने राहुल व पद्मा यांचा शोध घेण्यात आला. तेव्हा आष्टा येथील जगन्नाथ नारायणसिंह मेवाडा (वय 60) यांच्या घरी ते वास्तव्यास असल्याचे समजले. निवासस्थानी छापा घालून पद्मा व राहुल यांना ताब्यात घेतले. देहविक्री व्यवसायाच्या आर्थिक व्यवहार व व्यवसायातील चढाओढ या द्वेषापोटी खून केल्याची त्यांनी कबुली दिली.
पोलिसांनी राहुल व त्याची प्रेयसी पद्मा या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पुढील तपास कळमेश्‍वर पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीश गोवेकर, सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, अरविंद सराफ, कर्मचारी बनसोड, अविनाश राऊत, राजेश सनोढिया, शैलेश यादव, चेतन राऊत, अमोल वाघ, रोहणकर, बाबाराव केचे, लक्ष्मीप्रसाद दुबे, सूरज परमार, अजय तिवारी, ज्ञानेश्‍वर पाटील, संगीता वाघमारे यांनी केली.
----------------

अशी केली हत्या
आरोपी राहुल मुरलीधर टाके हा प्रकाश गीते यांच्या घरी किरायाने दाभा वाडी नागपूर येथे राहायचा. त्याची प्रेयसी पद्मा (वय 19) या दोघांनी संगनमत करून सुरेखा बोरकर हिला विश्‍वासात घेतले. आठ ऑगस्ट रोजी दुपारी देहव्यवसायासाठी आपल्या दाभा येथील राहत्या घरी बोलाविले. चहामध्ये झोपेची गोळी मिसळवून दिली. त्यामुळे सुरेखा बोरकर हिला गुंगी आल्यानंतर दोघांनी तिचा गळा आवळून खून केला. वास येऊ नये म्हणून नाकात कापसाचे बोळे टाकून रात्री अकराला पल्सर दुचाकी (क्र. एमएच- 40/एई - 5510) वर दोघांनी आपल्या मधोमध बसवून वाडीमार्गे गोंडखैरी येथे नेले. टोलनाका दिसल्यामुळे रस्त्याच्या कडेला सुरेखाचा मृतदेह फेकून दिला. तिच्याजवळील बॅग जवळच्या नाल्यात फेकण्यात आली.

मोबाईल, दगिने विकले
सुरेखा हिच्या जवळचा सॅमसंग मोबाईल, बोटातील दोन आर्टीफिशियल अंगठ्या व गळ्यातील सोन्याचा गोफ स्वतःजवळ ठेवून घेतला. त्यानंतर कळमेश्‍वर येथे सोन्याचा गोफ विकून मुंबई, पचमढी या ठिकाणी पळून गेले. काही दिवसांनी आष्टा (मध्य प्रदेश) येथे कामधंद्यानिमित्त खोटे कारण सांगून निर्मला राऊत यांच्या सासरी आश्रय घेतला. गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी सावनेर येथील नातेवाइकाकडे ठेवली.

Sunday, August 23, 2015

 स्पर्धक संपविण्यासाठी केली हत्या

स्पर्धक संपविण्यासाठी केली हत्या

नागपूर- वैरण विक्रीच्या व्यवसायातील स्पर्धा संपविण्यासाठी व्यापाऱ्याच्या मुलाने प्रतिस्पर्धी व्यावसायिक व त्याच्या मेहुण्याचा गळा चिरून हत्या केल्याचे तपासांत उघड झाले. रॉकी ऊर्फ अंकुश प्रभाकर शेंद्रे (वय 27) असे आरोपीचे नाव आहे. या दुहेरी हत्याकांडाचा 24 तासांत तपास करण्यात गुन्हे शाखेला यश आले.

Saturday, August 22, 2015

११ प्रजातीचे बेडूक आढळले

११ प्रजातीचे बेडूक आढळले

चंद्रपूर जिह्ल्यातील बेडकांवर प्राथमिक अभ्यास पूर्ण 

उन्हाळा संपताच सगळीकडे पावसाची वाट आतुरतेने बघतात,तसेच उभयचर प्राणी म्हणजेच बेडूक सुद्धा पावसाची वाट बघत असतात.बेडकांचे जीवनच पावसावरच अवलंबून असल्यासारखे आहे असे म्हटले तरी चालेल,पावसामुळे जीवसृष्टी अगदी न्हाऊन निघतात,सगळीकडे हिरवळ पसरते,झाडांना नवी पालवी फुटते.नद्या नाले,डबक्यात पाणी साचण्यास सुरवात होते व त्याच प्रमाणे बेडकांच्या कारकिर्दीची नव्याने सुरवात होते.

"शिव-प्रतिष्ठा ढोल ताशा पथक"

"शिव-प्रतिष्ठा ढोल ताशा पथक"

गणपति बापाच्या आगमनासाठी सर्व नागरिक जोरदार उत्साहाने तयारीत लागले आहेत या सगळ्यां बरोबरच नागपुरात "शिव-प्रतिष्ठा ढोल ताशा पथक" पण त्या साठी बजाज नगर येथे जोरदार तयारी करत आहे

आपल्या दैनंदिन जीवनातनुं थोडा वेळ समाजा साठी काढ़ने आणि महाराष्ट्राची एक जुनि परम्परा व संस्कृति जी नाहिशी होत चालली आहे तिला आपल्या येणाऱ्या युवा पीढ़ी पर्यन्त पोहचवने हाच या पथकचा उद्देश आहे.

Friday, August 21, 2015

विद्यापीठातील सिनेट निवडणुका पुढे ढकलल्या

विद्यापीठातील सिनेट निवडणुका पुढे ढकलल्या

नवीन प्रस्तावित विद्यापीठ कायद्यामुळे सरकारने काढला अध्यादेश

राज्यातील सर्व पारंपारिक विद्यापीठांसाठी सध्या असलेला महाराष्टÑ विद्यापीठ कायदा १९९४ हा रद्द करून नवीन सर्वसमावेशक असा कायदा राज्य सरकारकडून डिसेंबरमध्ये आणला जाणार असल्याने यापार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठासह राज्यातील अनेक विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या सिनेट, विद्यापीठ प्राधिकरणे, मंडळे आदींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासाठी राज्य सरकारने नवीन अध्यादेश जारी केला आहे. या महाराष्टÑ विद्यापीठे (विद्यापीठ प्राधिकरणे व इतर मंडळे यांच्या सदस्यांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे) अधिनियम, २०१५ असे या अध्यादेशाचे नाव आहे. या अध्यादेशामुळे मुंबई विद्यापीठाकडून सुरू असलेल्या सिनेटच्या निवडणूक प्रक्रियेवरही परिणाम होणार असून ही प्रक्रिया विद्यापीठाला आपोआपच थांबवावी लागणार आहे. तर विद्यापीठातील ज्या सिनेट सदस्यांची ३१ आॅगस्ट रोजी मुदत संपणार होती, त्यांनाही पुढील पाच ते सहा महिन्यांचा कालावधी मिळण्याची शक्यताही यातून निर्माण झाली आहे.

सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने विद्यमान सदस्यांना मुदत वाढवून मिळणार असून त्यासाठी नवीन कायदा संमत होईपर्यंत कोणत्याही प्रकारच्या निवडणुका विद्यापीठांमध्ये घेतल्या जाणार नाहीत. अथवा त्यासाठीचा कार्यक्रमही जाहीर केला जाणार नाही.
राज्य विधिमंडळाच्या डिसेंबरमध्ये होणाºया हिवाळी अधिवेशनात नवीन प्रस्तावित विद्यापीठ कायदा सरकारकडून आणला जाणार असून यामुळे नवीन अधिनियमांच्या तरतुदींनुसार विद्यापीठाची निरनिराठी प्राधिकरणे व मंडळे स्थान करण्याची आवश्यकताही उरणार नसल्याचेही या नवीन अध्यादेशात म्हटले आहे.

Saturday, August 15, 2015

नागपूरात पुरामुळे २५ हजार घरे प्रभावित

नागपूरात पुरामुळे २५ हजार घरे प्रभावित

-जिल्ह्यात ७, शहरात ४ लोकांचा मृत्यू

-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

नागपूर, १४ -बुधवार आणि गुरुवारी धो धो पाऊस बरसल्याने शहरातील ४ तर जिल्ह्यातील ७ लोकांचा मृत्यू झाला असून पुरामुळे २० ते २५ हजार घरे प्रभावित झाली आहेत. यासंदर्भात नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मनपा, नासुप्र व महसूल प्रशासनाला दिले असून नुकसानभरपाईचा अंतिम अहवाल सोमवारी प्राप्त होईल, अशी माहिती ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.

रविभवनात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, नागपूर शहरातील अंबाझरी तलाव, गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे पिवळी नदी, नागनदी, नाले तुडुंब भरली. नदीकाठाजवळील नारी, नारा, टेकानाका, गड्डीगोदाम, सुंदरबन, गोरेवाडा तलावाजवळील भाग, हुडकेश्‍वर, नरसाळा, महेशनगर, समतानगर, कामगारनगर, गुलशननगर, वनदेवी नगर, भरतवाडा, कळमना, बर्डी, झांशी राणी चौक, मोरभवन, नंदनवन झोपडपट्टी आदी भागात पाणी शिरले. २०११-१२ च्या मनपा, नासुप्रच्या नकाशावर असलेल्या शहरातील ९० टक्के नाल्यावर अतिक्रमण झाल्याने शहरात ही पूर परिस्थिती निर्माण झाली. भविष्यात आणखी गंभीर परिस्थिती उद्‌भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात येईल. शहर व जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मनपा, नासुप्र व महसूल प्रशासनाला दिले आहेत. १५ ऑगस्ट रोजी शासकीय सुटी असून शासकीय यंत्रणा या कामात राहील. सोमवारपर्यंत अंतिम अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर सायंकाळी उच्चस्तरीय बैठक घेऊन नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाईल, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

४ तासाच्या पावसात नागपूरची दैनावस्था झाली. २४ तास पाऊस पडल्यास शहरातील एकही घर वाचणार नाही. हा भविष्यातील धोका लक्षात घेऊन गुगल मॅपनुसार शहरातील नाल्याचा शोध घेतला जाईल. नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल. याशिवाय रस्ते रुंदीकरण, नाले साफसफाई मोहीमही राबविली जाईल. मानकापूर येथे रेल्वे उड्डाण बांधताना ओरिएंटेट कंपनीच्या चुकीमुळे नाल्याचा प्रवाहही बंद करण्यात आला. त्याचा फटका या भागातील घरांना बसला आहे. अनेक लोक रस्त्यांवर आले आहेत. त्यांच्या भोजनासाठी छावण्या लावण्यात आलेल्या आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने खावटी स्वरूपात मदत केली जाईल. पुरामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना ४ लाखांची तातडीने मदत केली जाईल. तसेच घरांची पडझड झालेल्या लोकांना अधिकाधिक मदत मिळावी म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठविणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मदतीची रक्कम निश्‍चित अधिक असेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

२००० पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे २००० पूर्वीचे नाल्यावरील अतिक्रमण काढण्यात येईल. पण त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी कालच दिल्ली येथे बैठक घेऊन २००० पूर्वीच्या अतिक्रमणासाठी घरकुल योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, याकडे ना. बावनकुळे यांनी लक्ष वेधले.

पत्रपरिषदेला आ. सुधाकरराव देशमुख, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, महापौर प्रवीण दटके, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, नासुप्र अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार आदी उपस्थित होते.

कळमेश्‍वर, सावनेर तालुक्यात पिकांना फटका

जिल्ह्यातील अतिवृष्टीचा धान पिकांना फायदा झालेला आहे. रोवणीसाठी आवश्यक असलेला पाऊस झाल्याने रोवणीच्या कामाला गती येईल. पण कळमेश्‍वर आणि सावनेर तालुक्यातील इतर पिकांना फटका बसलेला आहे. सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. कळमेश्‍वर तालुक्यातील धापेवाडा बु. येथील घर पडल्यामुळे संदीप दंदरे (वय ३२) यांचा मृत्यू झाला.. उमरेड तालुक्यातील वायगाव येथे १५० ते २०० लोकांना समाज मंदिर व पंचायत भवनात हलविण्यात आले असून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. सावनेर तालुक्यातील २०० व्यक्तींना नगर परिषद शाळेत हलविण्यात आले असून भोजनासाठी मसाले भाताची व्यवस्था केली आहे. कामठी तालुक्यातील ४ हजार घरांमध्ये पाणी शिरले. मोहप्याचे कृष्णा चापके हे गुमथी नाल्यात वाहून गेले. मौदा तालुक्यातील १५ ते २० गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून तेथील विस्थापितांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Monday, August 03, 2015

चंद्रपूर जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी पाऊणकर

चंद्रपूर जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी पाऊणकर

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनोहर पाऊणकर यांची अविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी संजय सिंगम निवडून आले. त्यांनी गजानन पाथोडे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. बॅंकेचे अध्यक्ष शेखर धोटे, उपाध्यक्ष डॉ. प्रभा वासाडे यांनी 21 जुलै रोजी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नव्या अध्यक्षांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली. 27 संचालक असलेल्या या बॅंकेत धोटे गटाकडे बहुमत होते. त्यांनी पाऊणकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्‍चित केले. उपाध्यक्षपदासाठी त्यांच्याकडून गजानन पाथोडे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, पाऊणकर यांच्या गटाचे पाथोडे यांच्या उपाध्यक्षपदाला संजय सिंगम यांनी आव्हान दिले. सिंगमसुद्धा सुरुवातीला धोटे गटाकडेच होते. ते अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. मात्र, पाऊणकर यांचे नाव निश्‍चित झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या गटाशी घरोबा केला. त्यामुळे उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाथोडे आणि सिंगम अशी लढत झाली. सिंगम यांना 14 मते मिळाली, तर पाथोडे यांना 13 मते मिळाली. पाऊणकर हे चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. 
 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

नागपूर : सप्टेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींसाठी उद्या, मंगळवारी (ता. 4) मतदान होत आहे. त्यासाठी 42 झोनअंतर्गत 484 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील उमरेड, भिवापूर, कुही, मौदा, रामटेक, पारशिवनी, सावनेर, नरखेड, काटोल, कळमेश्‍वर, हिंगणा, कामठी व नागपूर ग्रामीण या तालुक्‍यांतील 129 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मंगळवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल. संपूर्ण ग्रामपंचायत निवडणूक बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी म्हणून अपर पोलिस अधीक्षक अमित काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही मतदार केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू नये, याकरिता पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्तादरम्यान पोलिस ठाणेनिहाय प्रत्येक मतदान केंद्रावर पाळत ठेवण्यासाठी गस्त घालण्यात येईल. एकूण 22 पोलिस ठाण्यांतर्गत सुरक्षेसाठी कर्मचारी तैनात करण्यात येतील. यात सहा उपविभागीय पोलिस अधिकारी, 15 पोलिस निरीक्षक, 51 सहायक व पोलिस उपनिरीक्षक, 771 पोलिस कर्मचारी, एसआरपीएफचा समावेश आहे.



चंद्रपूर 610 ग्रामपंचायतींत मतदान
11 हजार 134 उमेदवार रिंगणात

जिल्ह्यातील 610 ग्रामपंचायतींत उद्या (ता. 4) निवडणूक होत आहे. तब्बल 11 हजार 134 उमेदवार रिंगणात असून, त्यांचा भाग्याचा फैसला शुक्रवारी (ता. चार) लागणार आहे.
जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी दोन हजार 150 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. निवडणूक काळात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिस विभागाने मतदानासाठी 3 हजार पोलिस, 800 होमगार्ड, एसआरपीएफच्या सहा तुकड्या आणि जिल्ह्याबाहेरून 800 कर्मचारी आणि 50 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात सात उपविभाग तयार करण्यात आले असून, या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. राजुरा, कोरपना व जिवती तालुक्‍यात सुमारे 76 असंवेदनशील केंद्रे आहेत. यासाठी वेगळे पथक तयार केले आहे. तसेच 74 सेक्‍टर आणि 28 ट्रॅकिंग फोर्स गठित करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार नामनिर्देशन मागविण्यात आले होते. 13 हजार 567 उमेदवारांनी सादर केलेल्या नामनिर्देशनाची छाननी करण्यात आली. त्यात 358 अर्ज अपात्र ठरले. दोन हजार 561 उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतले. सध्या 11 हजार 134 उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज मागे घेतल्याच्या तारखेनंतर प्रचाराला चांगलाच जोर चढला होता. उमेदवारांनी मतदारांना विविध आमिषे दाखवून आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल.

Saturday, August 01, 2015

गतीमान वैरण विकास कार्यक्रम राबविणार

गतीमान वैरण विकास कार्यक्रम राबविणार

पन्नास टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या तालुक्यात
२५ कोटी रुपये निधी मंजूर. लाभार्थ्याला मिळणार हेक्टरी रु.१५००


मुंबई, दि.१  :- महाराष्ट्रात आज अखेर पावसाची असमाधानकारक परिस्थिती पहाता आगामी काळात चारा टंचाईवर मात करण्यासाठी राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत गतीमान वैरण विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीस शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली असल्याचे कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

खडसे पुढे म्हणाले की, राज्यातील ज्या तालुक्यांमध्ये ३१ जुलै, २०१५ अखेर सरासरी पावसाच्या तुलनेत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा तालुक्यामध्ये – विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील गावांमध्ये हा कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात येईल व नंतर इतरत्र तो राबविला जाईल.

हा कार्यक्रम राबविण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत रुपये २५ कोटी (रु.पंचवीस कोटी) एवढा निधी मंजूर करण्यात आला असून किमान ०.२ हेक्टर ते कमाल १ (एक) हेक्टर क्षेत्रावर चारा पिकाच्या लागवडीकरीता प्रती हेक्टरी रुपये १,५००/- (रुपये एक हजार पाचशे) याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. पशुधन असलेल्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्याने या कार्यक्रमांतर्गत निवडण्यात येणार आहे, असेही खडसे यांनी सभागृहात सांगितले.
कट ऑफ डेट सात ऑगस्ट पर्यंत वाढविली

कट ऑफ डेट सात ऑगस्ट पर्यंत वाढविली

राष्ट्रीय कृषी विमा योजना: कृषी मंत्री एकनाथराव खडसे

जळगाव, दि.01 ऑगस्ट: राष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाच्या हप्त्याच्या मुदतीला (कट ऑफ डेट) केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी 7 (सात) ऑगस्ट 2015 पर्यंत मुदत वाढ दिली आहे, अशी माहिती कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज जळगांव येथे दिली.

खडसे यांनी पुढे सांगितले की, राज्य शासनाने केंद्राला लेखी पत्र पाठवून शेतकऱ्यांना विम्याचे हप्ते भरण्यासाठी किमान 15 दिवस मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती केली होती. मात्र, केंद्राने काल 31 जुलै राजी पत्र पाठवून ही मुदत अर्थात कट ऑफ डेट 07 (सात) ऑगस्ट पर्यंत वाढवल्याचे पत्र पाठवून कळविले आहे. या पत्रात स्पष्ट केले आहे की, एक विशेष बाब म्हणून आणि राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन काही अटींच्या अधिन राहून ही मुदत वाढ देण्यात आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीच्या काळात पीक विम्यासंबंधीचे प्रस्ताव संबंधित बँकेकडे आणि संबंधित यंत्रणेकडे नेहमी प्रमाणे पाठवावेत. तसेच, त्या सोबत संबंधित प्राधिकाऱ्याने दिलेले पेरणीसंबंधीचे प्रमाणपत्रही जोडावे.
केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी राष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत भरावयाच्या विमा हप्त्यांना दिलेली मुदतवाढ लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे कृषी मंत्री खडसे यांनी आवाहन केले.