मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांना 'ब्रेनस्ट्रोक' (अर्धांगवायू) चा शरीराच्या उजव्या बाजूला 'अटॅक' आल्यामुळे त्यांना सुरुवातीला ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना १0 जानेवारीला नागपुरातील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात आणण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर पंचकर्माचा उपचार सुरू असून, प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, डॉ. विलास उजवणे यांना ९ मे २0१७ रोजी 'ब्रेन स्ट्रोक'चा 'अटॅक' आल्यामुळे त्यांना ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करताच अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. काही दिवस उपचारानंतर ते चालायला-फिरायला लागले. परंतु, त्यांना पुढील उपचार पंचकर्माचा घ्यायचा असल्यामुळे त्यांनी नागपुरातील सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याची सूचना कुटुंबीयांना केली. डॉ. उजवणे यांच्या सूचनेनुसार कुटुंबीयांनी त्यांना १0 जानेवारीला नागपुरात उपचारासाठी आणले. आयुर्वेद रुग्णालयात त्यांच्या शरीराची मॉलिश व वाफारा देण्याचा उपचार झाला. ते रुग्णालयात भरती नसले तरी त्यांच्यावर दररोज पंचकर्माचे उपचार सुरू आहेत. या उपचारामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, ते आता चांगले बोलतही आहेत आणि चालतात व फिरतातसुद्धा. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. लुईस जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उजवणे यांच्यावर उपचार सुरू असून, डॉ. बोंबार्डे व डॉ. बाबर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
आणखी १५ ते २0 दिवस डॉ. उजवणेंवर पंचकर्माचा उपचार चालणार असल्याचे डॉ. लुईस जॉन यांनी सांगितले. डॉ. उजवणे हे सध्या नागपुरातील त्यांच्या भाच्याकडे थांबले आहेत. भाच्याच्या घरूनच ते रुग्णालयात जाऊन उपचार घेत आहेत. डॉ. उजवणे हे १९८३ च्या बॅचचे नागपूरच्याच आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, हे विशेष.