चंद्रपूर
बाजारातील फळ पिकविण्यासाठी व्यापार्यांतर्फे विषारी असलेल्या कॅल्शियम कार्बाईडसारख्या रासायनिक द्रव्याचा मोठय़ा प्रमाणात वापर होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना याबाबत माहिती नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हजारो क्विंटल आंबे रासायनिक द्रव्याचा वापर करून पिकविण्यात आले. ते बाजारात विक्रीसाठी आणल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळताच धाड घालून दोन व्यापार्यांकडून ६ हजार किलो आंबे व कॅल्शियम कार्बाईडचे पॅकेट जप्त करण्यात आले. ही कारवाई आज गुरुवार (२९ मे)ला दुपारच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने स्थानिक व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या उन्हाळय़ाचे दिवस सुरू असून चंद्रपुरात नवतपाचे चटके सहन करावे लागत आहे. दुसरीकडे रासायनिक द्रव्याचा वापर करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले जात आहे. स्थानिक व्यापार्यांकडून उन्हाळय़ात आंबा या फळाचे सर्वाधिक विक्री होते. या पार्श्वभूमीवर व्यापार्यांनी रासायनिक द्रव्याचा वापर करून आंबे पिकविण्याचा प्रकार सर्रास सुरु केला आहे. हे आंबे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पिकवून शहरातील बाजारपेठेत पुरवठा केला जात होता. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग तहसील कार्यालय व पोलिस प्रशासनाला मिळताच त्यांनी आज दुपारी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील शकील अहमद अब्दुल हमीद यांच्या शकील ग्रृप कंपनी नावाच्या दुकानात धाड टाकली. येथे जवळपास ३ हजार किलो आंबे कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून पिकविण्यासाठी ठेवले होते. अधिकार्यांनी सर्व आंबे व आठ किलो कॅल्शियम कार्बाईडचे पॅकेट जप्त केले. याची किंमत जवळपास ४९ हजार ९७0 रु. आहे. यासोबतच याच परिसरातील अब्दुल मजिद अब्दुल अजित यांच्या दुकानावरही कारवाई करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे एस.पी. नंदनवार, जी.टी. सातकर, एम.पी. चहांदे, एस.बी. हजारे, विठ्ठल अंदनकर, पोलिस निरीक्षक खराबे, मंगेश काळे, अरुण मोते, दौलत चालखुरे, अविनाश तुराणकर यांनी केली. ल्ल |
