नागपूर/प्रतिनिधी:
महानिर्मितीच्या १९८० मेगावाट कोराडी औष्णिक विद्युत केंद्र परिसरात यंदा ४३५० झाडे लावण्यात येत असून यामध्ये २२०० बांबू व २१५० सावली देणाऱ्या वृक्षांचा समावेश आहे. नुकतेच महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन श्रीमाळी यांच्या शुभहस्ते रक्षक स्वयंचलित वृक्षारोपण करण्यात आले. तसेच महानिर्मितीचे सर्व उपस्थित संचालक, कार्यकारी संचालक व मुख्य अभियंते यांनी देखील वृक्षारोपण केले.
प्रारंभी रेनबो ग्रीनर्सचे श्री. मनोज टावरी यांनी रक्षक स्वयंचलित वृक्ष संकल्पनेची उपस्थित मान्यवरांना माहिती दिली. याप्रसंगी श्री. चंद्रकांत थोटवे संचालक(संचलन), श्री. विकास जयदेव संचालक (प्रकल्प), श्री. संतोष आंबेरकर संचालक(वित्त), कार्यकारी संचालक श्री. विनोद बोंदरे, श्री. कैलाश चिरूटकर, श्री. राजू बुरडे, श्री. प्रदीप शिंगाडे, मुख्य अभियंते श्री. अभय हरणे, श्री. राजकुमार तासकर, श्री. राजेश पाटील, श्री. अनंत देवतारे, श्री. प्रमोद नाफडे, श्री. सुनील आसमवार, श्री. पंकज सपाटे, श्री. डी.सी.पाटील, उपमुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते, विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्षक वृक्ष संकल्पना :
रक्षक संरक्षण व झाडांना पाणी देण्याची स्वयंचलित प्रणालीतून पाणी बचत, शत प्रतिशत झाडे जिवंत राहण्याची संभावना तर जनावरांपासून संरक्षण होते. आठ ते दहा फुट उंचीच्या झाडाला साधारणपणे ६ फुटी आवरण करण्यात आल्याने त्यात सुमारे १५ लिटर पाणी साठवण क्षमता असून झाडालगतच्या दोन फुट परिघात ठिबक सिंचन पद्धतीने पाणी पोहचते, त्यामुळे रक्षक झाडांना १५ ते २० दिवसातून एकदाच पाणी द्यावे लागते. कोणत्याही मौसमात वृक्षारोपण करता येते, यामध्ये विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. रक्षक झाडे हि संकल्पना भारतात प्रथमच नागपुरातील रेनबो ग्रीनर्सचे प्रोप्रायटर श्री. मनोज व श्री. सतीश टावरी यांनी सुरु केली हे विशेष. विदर्भात व अन्य राज्यात हा प्रयोग यशस्वी झाला आहे आणि उर्जामंत्री नामदार श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हि संकल्पना अधिक लोकाभिमुख होत असल्याचे श्री. मनोज टावरी यांनी सांगितले.