चंद्रपुरात दारूबंदीला तीन वर्ष लोटूनही सर्वत्र दारूच दारू आहे. अशात काही भागात पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर दारूबंदीसाठी प्रभावी अंमलबजावणी केली. गोंडपिपरीचे ठाणेदार प्रविण बोरकुटे यांनी गेल्या वर्षभरात दारूबंदीसाठी विविध उपक्रम राबविले. बड्या मद्यतस्करांवर कारवाईचे सत्र चालविले. शांततेत बाधा आणणाऱ्या कंटकाविरोधात तडीपाराचा प्रस्ताव बनविला. यामुळे तालुक्यात दारूचा मोठाच दुष्काळ आहे. ठाणेदार बोरकुटे यांच्या कामगिरीची दखल नागपुरचे विशेष पोलिस महानिरिक्षक मल्लीकार्जुन प्रसन्ना यांनी घेतली आहे.
पोलीस मुख्यालयात नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी प्रविण बोरकुटेंचा सन्मान केला.चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदीबाबत नेहमीच मोठी चर्चा होते. बंदीनंतरही जिल्ह्यात दारू उपलब्ध असल्याने दारूबंदी फसवी ठरल्याचा आरोप होत आहे. तीन वर्षात नव्वद कोटी रूपयाची दारू जप्त करण्यात असून या काळात हजारो कारवाया झाल्या तरीसुद्धा दारूला आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला यश आले नाही. याउलट तेलंगणा राज्याच्या सीमेला लागलेल्या गोंडपिपरी तालुक्यात गेल्या वर्षभरापासून दारुबंदी प्रभावी ठरली आहे. गोंडपिपरीचे ठाणेदार प्रविण बोरकुटे यांच्या जबरदस्त अंमलबजावणीने दारूविक्रीला मोठा लगाम लागला आहे.(स.से)