पंचायत समिती नागपूर अंतर्गत असलेल्या समूह साधन केंद्र वाडी व बाजारगाव केंद्रस्तरीय जिल्हा परिषद शिक्षकांची अध्ययन निष्पत्ती शिक्षण परिषद गुरुवार २६ जुलै रोजी पार पडली . शिक्षण परिषदचे उदघाटन प्राचार्य पंकज भुजाडे यांनी केले यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर, केंद्रप्रमुख शरद भांडारकर, मुख्याध्यापिका अन्नू पाल ,मुख्याध्यापक भास्कर क्षीरसागर प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून केंद्रप्रमुख शरद भांडारकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात घडत असलेल्या बदलांची माहिती दिली. सद्यस्थितीत अँड्रॉईड मोबाईल, संगणक, इंटरनेट चा वापर करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्यावत करण्याचे व अध्ययन निष्पत्ती डोळ्यासमोर ठेवून अध्यापन करण्याची भूमिका विशद केली. शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर यांनी शिक्षकांनी बालस्नेही राहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे व प्रत्येक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी परिषदेच्या प्रथम सत्रात अध्ययन स्तर निश्चिती व कृती आराखडा तर दुसऱ्या सत्रात अध्ययन निष्पत्ती व प्रश्ननिर्मिती याबाबत तज्ज्ञाच्या मदतीने मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली.
शालेय शिक्षण विभागाच्या के आरए बद्दल चर्चा करून वर्ग १ ली ते ८ वीच्या विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीनुसार राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण नुसार मेंदूला चालना देणारे व विचारप्रवर्तक प्रश्नाच्या निर्मिती बाबत नमुना उदाहरणे सादर केली. यानंतर दीक्षा व महास्टूडन्ट ऍप बद्दल सुलभक प्रवीण थेटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
गट साधन केंद्र अपंग समावेशीत शिक्षण विभागाच्या समन्वयक सेजल करवाडे यांनी दिव्यांगाचे २१ प्रकाराबद्दल माहिती दिली तर प्रणाली पाटील यांनी मतिमंद मुलं कसे हाताळावे याबद्दल सांगितले.
परिषदेला बाजारगाव केंद्रातील ४३ पैकी ३५ व वाडी केंद्रातील ८० पैकी ७० जि. प .शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे तिसऱ्या सत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मनीषा चौधरी(प्रा .शा. दवलामेटी), आशा दावळे (प्रा . शा .दृगधामना), प्रकाश कोल्हे (उ .प्रा .शा. सोनेगाव नि .), दीपक तिडके (उ .प्रा .शा. सोनबानगर), सुदाम नागपुरे ( प्रा .शा .शिवा) यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन आशा दावळे यांनी केले तर आभार विजय बरडे यांनी मानले.