सहा.आयुक्तांच्या गाडीसमोर ठेलेवाल्यांचा १ तास ठिय्या
चंद्रपुरात प्लास्टिक बंदीच्या कारवाई वरून सुरु झालेल्या मनपाच्या कारवाईला गुरुवारी वेगळेच वळण मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार प्लास्टिक बंदी झाल्यानंतर शहरात मनपा प्लास्टिक बंदी मोहिमेसाठी धडक मोहीम राबवीत आहे,अश्यातच गुरुवारी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक परिसरात मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एका पानठेल्यातून प्लास्टिक जप्त केला व त्यावर कायदेशीर कारवाई केली असे मनपाचे कर्मचारी यांचे म्हणणे आहे,दोषी पानठेला मालकावर दंड आकारण्यात आला होता.मात्र पानठेला चालकाला हे मंजूर नव्हते. हि कारवाई सुरु असतांनाच हॉकर्स असोसिएशनच्या काही लोकांनी ठेलेवाल्यांच्या बाजूने बचावात या कारवाईत उडी घेतली,येथे एका नवीनच वादाला तोंड फुटले. ह्या कारवाईला पुढे नेत मनपा अधिकारयांचा मोर्चा हा शहरातील वरोरा नाका परिसरातील पत्रकार भवन येथे वळला. या ठिकाणी मनपाची अतिक्रमण विरोधात कारवाई सुरु असतांना एका व्हाईट कॉलर नेत्याने ठेलेवाल्यांना एकत्र करत या कारवाईला विरोध केला,मात्र हा अतिक्रमनाचा वाद अधिकच चिघळला,
अतिक्रमण विभागाची कारवाई सुरु असतांना कारवाई दरम्यान कारवाई स्थळावर शासकीय वाहनाने आलेल्या सहा.आयुक्त शितल वाकडे यांची गाडी परिसरातील संपूर्ण हात ठेलेवाल्यांनी रस्त्यावर अडवत सहा.आयुक्त शितल वाकडे यांना तब्बल एका तास घेराव घातला. या ठेलेवाल्यांनी सहा.आयुक्त वाकडे यांच्या गाडी समोर मागे-पुढे ठिय्याच मांडला. शेवटी गाडीत बसलेल्या शीतल वाकडे ह्या गाडीतून बाहेर येत काही अंतरावर उभ्या राहिल्या. स्थिती आणखीनच चिघळत दिसल्याचे समजताच आयुक्त यांनी अतिरिक्त आयुक्त सचिन बहेरे यांना संपर्क करत अतिरिक्त आयुक्त सचिन बहेरे व उपायुक्त विजय देवलीकर यांनी पोलिसांचा फौज फाटा घटना स्थळावर मदत म्हणून मागविला .वरोरा नाका परिसरात दिवसेंदिवस चायनीज आणि पानठेल्यांची संख्येत वाढ होत आहे.
अश्या आशयाची तक्रार मनपा अतिक्रमण विभागाला मिळाली होती.याच तक्रारीच्या आधारे मनपाच्या अतिक्रमण विभागाने हि कारवाई केली. दरम्यान या कारवाईत अतिरिक्त आयुक्त सचिन बहेरे, उपायुक्त विजय देवलीकर, अतिक्रमण व जब्ती विभागाचे भाऊराव सोनटक्के, नामदेव राऊत व रामनगर पोलिसांचा मोठा फौज फाटा होता. हा वाद इथेच थांबला नसून रामनगर पोलिसात गेला आहे. या संपूर्ण प्रकरणाला आता काय वळण लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.