राज्य शासनाने शेतकऱ्यांना या हंगामामध्ये खरीप पीक कर्ज वाटप करण्याबाबत बँकाँना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. तथापि, काही बँका यामध्ये मागे पडल्या असून या बँकांनी येणाऱ्या काळामध्ये तातडीने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावेत, असे स्पष्ट निर्देश नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री.कुणाल खेमणार यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये आज झालेल्या बैठकीमध्ये या संदर्भात जिल्ह्यातील बँकेच्या प्रमुख समन्वयकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. सदर बैठकीमध्ये सर्व बँकांनी उद्दिष्टाप्रमाणे 31 जुलै 2018 पर्यंत जास्तीत जास्त कर्ज वाटप करण्याचे सूचित करण्यात आले. 31 जुलैपर्यंत कर्जवाटप करण्याकरता काही उपायोजना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविल्या. यामध्ये 24 जुलैला मंगळवारी प्रत्येक बँकेच्या शाखेमध्ये खरीप पीक कर्ज वाटप मेळावा घेण्यात येणार आहे. यासंदर्भात बँकांनी नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. तालुका समन्वय समितीने गावपातळीवर समन्वय करण्याबाबत स्पष्ट केले आहे. कर्जमाफी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारा, नमुना 8अ, आधार कार्ड, तर कुठल्याही अनुषंगिक कागदपत्राची कमतरता असल्यास महसूल विभागाने लक्ष घालण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक असल्याने तसेच सदर पिक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 जुलै 2018 असल्याने जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केलेले आहे. कर्जवाटपाच्या अनुषंगाने तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती गठित करण्यात आलेली असून सदर समितीमार्फत तालुका मेळाव्याचे नियोजन तसेच शाखानिहाय पीक कर्जवाटप व समन्वय समिती मार्फत केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाखांना 24 तारखेला पिक कर्ज वाटपाचे फक्त काम करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले आहे.