चंद्रपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात साचलेल्या पाण्यामध्ये भाजीपाला विकणा-या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने आता कारवाई केली आहे. अस्वच्छ पाण्यामध्ये भाजीपाला धुवून त्यासंदर्भातली बेपर्वाई विषद करणारी व्हिडीओ क्लिप १७ जुलै रोजी सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर कुंभकर्णी झोपेत असलेल्या स्थानिक अन्न व औषध प्रशासनाने याबाबत कडक पावले उचलली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा व्हिडीओत असंवेदनशील विक्रेते आपल्या कृत्याचे समर्थन करताना दिसून आले होते. त्यामुळे समाज जीवनामध्ये याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.
याच व्हिडीओच्या आधारे राज्य शासनाच्या अन्न औषधी प्रशासन विभागाने याबाबत कारवाई करत व्हिडिओ क्लिपमधील कप्तानसिंह सोनेलाल राजपूत, कैलास उर्फ दिनेश रामदास मडावी या दोघांची चौकशी करण्यात आली .या चौकशीत सदर क्लिप मधील व्यक्ती आपणच स्वतः असल्याबाबत कबुली त्यांनी दिली आहे.
सदर दोन्ही व्यक्ती कृषी उत्पन्न बाजार समितीतून भाजीपाला खरेदी करून ते हातगाडीवर भाजीपाल्याचे किरकोळ विक्रेते आहेत. या व्यक्तींकडून अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत नियम व नियमन 2011 अन्वये तपासणी करून कोथिंबीर या भाजीपाल्याचा एक-एक नमुना विश्लेषण करण्यासाठी अन्न व विश्लेषक प्रादेशिक लोक स्वास्थ प्रयोगशाळा नागपूर येथे विश्लेषणासाठी पाठविण्यात आला आहे.अश्या या तपासनीचा विश्लेषण अहवाल प्रलंबित आहे.
घडलेल्या प्रकारानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करणा-या कर्मचा-यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येत आहे. औषध प्रशासन विभागाने या परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांनी काय करावे व काय करू नये याबाबतचे मार्गदर्शन करणारे फलक सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले असलाचे सांगितल्या जाते. नागरिकांनी देखील अशा पद्धतीच्या चुकीच्या काम होत असल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाला लक्षात आणून द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नितीन मोहिते यांनी केलेले आहे. नागरिकांना अशा पद्धतीची कुठलीही तक्रार असेल वा कुठल्याही भेसळीची ज्या ठिकाणी शक्यता वाटते, अशा ठिकाणच्या संदर्भात चंद्रपूर येथे 07172-255612 या क्रमांकावर माहिती दिली जाऊ शकते, असेही या विभागाने स्पष्ट केले आहे.मात्र या व्हिडीओत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर नेमकी काय करवाई करण्यात आली आहे. हे मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाने अजूनही सांगितले नाही.