मीट दी प्रेस : श्रमिक पत्रकार संघाचा कार्यक्रम
चंद्रपूर/प्रतिनिधी:
गेले पाच चंद्रपुरात प्रशासकीय सेवा देणारे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल उच्चशिक्षणासाठी जाणार असल्याने त्यांच्या जागेवर कोल्हापूरचे सीईओ कुणाल खेमनार रुजू झाले आहेत़ खेमनार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी सलिल यांच्याकडून कार्यभार स्वीकारल्यानंतर शनिवारी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांचा वार्तालाप कार्यक्रम श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केला होता़ यावेळी पाच वर्षांत चंद्रपूरकरांनी दिलेले प्रेम विसरणे अशक्य असून, येथील नागरिकांच्या सहकार्याने, सहकारी अधिकाऱ्यांच्या समन्वयाने विविध विकासकामे पूर्ण करू शकलो़ चंद्रपूर सोडून जात असताना चंद्रपूरची आठवण आपण हृदयात घेऊन जात असल्याचे सलिल यांनी सांगितले.
यावेळी मावळते जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी कुणाल खेमनार, संघाचे अध्यक्ष् संजय तुमराम, सचीव प्रशांत विग्नेश्वर ;याची उपस्थिती होती.
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मावळते जिल्हाधिकारी आशुतोष सलिल आणि नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांचा यावेळी सन्मानचिन्ह, शाल आणि पुस्तक भेट देत सत्कार करण्यात आला़ आशुतोष सलिल यांचा चंद्रपुरातील प्रशासकीय सेवेची वाटचाल एसडीओपासून जि़प.चे सीईओ आणि जिल्हाधिकारी असा राहिला आहे. पाच वर्ष त्यांनी चंद्रपुरात सेवा दिली आहे़ या पाच वर्षांत त्यांना आलेले अनुभव, त्यांनी राबविलेले उपक्रम, योजना आणि चंद्रपूरकरांचा मिळालेला प्रतिसाद या विषयावर त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी मनमोकळा संवाद साधला.
हॅलो चांदा असो की मिशन शौर्यची मोहीम असो, जिल्हाधिकारी सलिल यांनी यशस्वीपणे पार पाडली़ हॅलो चांदासारखा उपक्रम त्यांनी देशपातळीवर नेला. जिल्ह्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तम मार्गदर्शन करताना सहकार्य केले़ नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला़ अधिकाऱ्यांनी सहकार्य केले़ या सर्वांच्या समन्वयातून आपण विविध प्रकल्प, उपक्रम यशस्वीपणे राबवू शकल्याचे ते म्हणाले़ तर नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी सलिल यांनी राबविलेले उपक्रम तेवढ्याच गतीने पुढे नेण्याची ग्वाही दिली़ रोजगार वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करू, प्रशासनात पारदर्शक सेवा देण्याचा प्रयत्न करू अशी हमी दिली. संचालन सचिव प्रशांत विग्नेश्वर यांनी, तर आभार उपाध्यक्ष् प्रशांत देवतळे यांनी मानले.