शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांची घोषणा : शिक्षण विभागाच्या कामाचा घेतला आढावा
नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर महानगरपालिकेतर्फे ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान महापौर चषक ‘वंदे मातरम्’ समूहगान स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी दिली. सोमवारी (ता.२३) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात शिक्षण समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी समितीच्या उपसभापती भारती बुंदे, सदस्य राजेंद्र सोनकुसरे, रिता मुळे, प्रमिला मंथरानी, मो.ईब्राहिम तौफिक अहमद, उपायुक्त रवींद्र देवतळे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे यंदाही महापालिकेद्वारे ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट महापौर चषक वंदे मातरम् समूहगान स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा तीन गटात आयोजित करण्यात आली असून वर्ग ९ ते १० गट क्रमांक १, वर्ग ६ ते ८ गट क्रमांक २, वर्ग १ ते ५ गट क्रमांक ३ या प्रकारे गटरचना केली आहे. ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट दरम्यान सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली आहे. १४ ऑगस्टला स्पर्धेची अंतिम फेरी कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी यांनी दिली. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात यावे, असे निर्देश सभापती दिलीप दिवे यांनी दिले.
महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये बायोमॅट्रिक मशीन्स लावण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. याबाबत निविदा प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी दिली. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर देण्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून १८ सप्टेंबरपर्यंत स्वेटर सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना देण्याचे निर्देश सभापती दिलीप दिवे यांनी दिले. स्वेटरचा नमुना रंग व आकार तपासण्यासाठी साहित्य निवड स्वीकृती समितीकडे पाठविण्यात आला आहे. पुढील तीन दिवसात समितीचा अहवाल आल्यानंतरच स्वेटरबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी दिली. स्वेटरचा नमुना शिक्षण समितीपुढे सादर करण्यात यावा, असे निर्देश समिती सभापती दिलीप दिवे यांनी दिले.
मनपाच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यासाठी अक्षय पात्र ही योजना मनपाच्या सर्व शाळांमध्ये लागू करण्यात आल्याची माहिती सभापती दिलीप दिवे यांनी दिले. मनपाच्या सर्व शाळेमध्ये झोननिहाय झालेल्या पटनोंदणीबाबत आढावा यावेळी सभापतींनी घेतला. मनपाच्या सर्व शाळांमध्ये वृक्षारोपण करण्याचे निर्देशही सभापती दिलीप दिवे यांनी दिले.