‘दुर्धर आजार’ रुग्णांसाठी आता आपली बसचे मोफत स्मार्ट कार्ड
नागपूर शहरातील ‘दुर्धर आजार’ म्हणून गणल्या जाणाऱ्या आजाराच्या रुग्णांसाठी नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे मोफत प्रवासासाठी ‘स्मार्ट कार्ड’ वितरीत करण्यात येणार आहे. या विषयाला सोमवारी (ता. २३) परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
नागपूर महानगर पालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आज (ता. २३) परिवहन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, समिती सदस्य प्रवीण भिसीकर, नितीन साठवणे, अर्चना पाठक, अभिरुची राजगिरे, मनिषा धावडे, उज्ज्वला शर्मा, वैशाली रोहणकर, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप उपस्थित होते.
बैठकीत दुर्धर आजार असलेल्यांना स्मार्ट कार्ड वितरीत करण्यासंदर्भातील विषय चर्चेला आला. ए.आर.टी. औषधे घेण्याकरिता ए.आर.टी. केंद्रात येणाऱ्या व्यक्तींना पैशाअभावी त्यांच्या औषधीत खंड पडू नये या मानवीय दृष्टिकोनातून मनपाद्वारे संचालित रेड शहर बस वाहतुकीच्या मोफत पास उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित असल्याचे परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी सांगितले. या प्रस्तावानुसार सर्व लाभार्थ्यांना एक मोफत स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल. लाभार्थ्यांना त्यांच्या राहत्या घरापासून ए.आर.टी. केंद्राकरिता महिन्यातून सहा वेळा मोफत प्रवासाची मुभा या स्मार्ट कार्ड अंतर्गत राहील. अर्थात ही मुभा नागपूर शहर आणि जिल्ह्यात ज्या हद्दीपर्यंत शहर बस सुरू आहे, तिथपर्यंत राहील. या पास धारकांना उपलब्ध असलेल्या वेळापत्रकानुसारच बसेसचा वापर करण्याची परवानगी राहील. कुठलीही अतिरिक्त किंवा जादा फेरी सोडणे बंधनकारक राहणार नाही. या स्मार्ट कार्ड अंतर्गत एका वर्षातील १२ महिन्यांमध्ये प्रवास करण्याची मुभा राहील. या पासचे दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली. या प्रस्तावाला सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी व समिती सदस्यांनी मंजुरी दिली.