तालुक्यातील स्मार्ट ग्राम बिबीने चंद्रपूर जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला होता. नागपूर विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी ग्रामपंचायत बिबीची निवड झाली असून नुकतीच विभागीय समितीने तपासणी केली. तपासणीअंती समितीने लोकांना मार्गदर्शन करताना गावाची प्रशंसा केली आहे.
प्रगती बहुउद्देशीय संस्था, राज्य मुख्य संसाधन संस्था, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्रचे संचालक व पथक प्रमुख जगदीश लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या चमूने शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, घर व गाव परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्मार्ट विलेज संकल्पनेनुसार उपलब्धी, लोकसहभाग आणि सामूहिक स्वयं पुढाकारातून नाविन्यपूर्ण उपक्रम इत्यादी आठ मुद्द्यांवर समितीने कसून तपासणी केली. गावात प्रत्येक वॉर्डमध्ये फिरून घरोघरी जाऊन लोकांना स्वच्छतेविषयी विचारणा केली. उघड्यावर शौचास जाणारे आढळून आले नाही. गावात परसबाग, वैयक्तिक शोषखड्डे, सार्वजनिक शोषखड्डे, बंद गटारे आदी विविध अशा विषयांवर पाहणी करण्यात आली. गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये देखील चमूने भेट देऊन तेथील व्यवस्थापन कसे सुरु आहे याविषयी संपूर्ण तपासणी करुन व गावकऱ्यांशी संवाद साधला.
गावातील पाणीपुरवठा योजना आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम, बोरवेल, प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना, गावातील एकूण सर्व पाणीपुरवठ्याच्या सुविधांमधील कुठेही पाणी अनावश्यक वाहत नाही, ब्लिचिंग पावडरचा नियमित वापर केला जातो, गेल्या तीन वर्षांत गावात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही, गावातील सांडपाण्याची शोषखड्डे, परसबाग, बंदिस्त गटारे इत्यादीद्वारे शास्त्रशुद्ध विल्हेवाट करण्यात आली असून जादुई शोषखड्डयांच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन करण्यात आले आहे. गावातील शाळा व सार्वजनिक इमारतीमध्ये पुरेशी शौचालय व हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावात ठिकठिकाणी कचराकुंड्या व घरोघरी कचरा पेट्या उपलब्ध आहे. नॅडेप बांधकामाच्या माध्यमातून खतनिर्मिती करण्यात येत आहे. गावातील रस्ते, गल्ल्या, घरासमोरील अंगने, परसदारे यांची रचना, स्वच्छता व सजावट, गाव व परिसरातील फुलझाडे, वृक्ष संवर्धन, गावातील जनावरांच्या मलमूत्राचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन अशा विविध गोष्टी पाहण्यात आल्या.
गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये संगणक सुविधा, इंटरनेट, वायफाय इत्यादीची उपलब्धता असून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायतला आयएसओ मानांकन प्राप्त आहे.
गावात धार्मिक एकात्मता असून कधीही धार्मिक तेढ निर्माण झाले नाहीत. विशेष म्हणजे गावांनी लोकसहभागातून पुनर्भरण, शाळा, पांदण रस्ता, जलसंधारण अशी अनेक कामे केलेली आहेत. तसेच वृक्ष संवर्धनासाठी सुरक्षा कठडे. ग्रामसफाई, क्रीडांगण सपाटीकरण, लोकवर्गणीतून तुकडोजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी असे विविध उपक्रम ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने राबविण्यात आले आहेत. तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा राबविण्यात आल्या आहेत.
समितीचे अध्यक्ष जगदीश लांडगे, तांत्रिक तज्ञ संदीप सोनेकर, स्थापत्य अभियंता व कृषी तज्ञ अभय सरोदे, जलस्वराज टप्पा २ चंद्रपूरचे कार्यक्रम समन्वयक श्रीकांत आंबेकर, समूह संघटक अनिल डाखरे आदींचा समावेश होता.
यावेळी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी प्रकाश उमक, पंचायत विस्तार अधिकारी प्रधान, सरपंच मंगलदास गेडाम उपसरपंच प्रा. आशिष देरकर, ग्रामविकास अधिकारी प्रताप ढुमणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर आस्वले, ग्रामपंचायत सदस्य सचिन सिडाम, संगीता ठाकरे, मुख्याध्यापक चिने, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्यासह गावातील शेकडो महिला, पुरुष व युवकांची उपस्थिती होती.