गोंदिया - संततधार पावसामुळे सोमवारी जनजीवन प्रभावित झाले होते. दरम्यान मंगळवारी काही काळ पावसाने उसंत दिल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले. बाघ नदीच्या पुरात चालकासह दूध टँकर वाहून गेल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. नदीला पूर आलेला असताना या टँकरचा चालक पुलावरुन टँकर नेत होता. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो त्यात वाहून गेला.मध्यप्रदेशच्या बालाघाटहून दुधाचा टँकर गोंदिया जिल्ह्यात येत होता. गोंदिया-आमगाव मार्गावर बाघ नदीला पूर आला होता. या पुरात हा टँकर चालकासह वाहून गेला. टँकर चालकाच्या शोधासाठी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथकासह रावनवाडी पोलीस प्रयत्न करत आहेत. मागील दोन दिवसांपासुन गोंदिया जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले तुडूंब भरुन वाहत आहे. रस्त्यांवरील नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटलेला आहे.

