नागपूर/प्रतिनिधी:
वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल आणि मानवी जीवनावरील प्रतिकूल परिणामांची गंभीरता लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवले आहे. यापैकी, महानिर्मितीला यावर्षी सुमारे ५५००० वृक्ष लागवडीचे ध्येय निश्चित करून देण्यात आल्याने महानिर्मितीच्या विविध वीज केंद्र व प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड उत्साहात करण्यात येत आहे. मात्र, मुंबई शहरातील नागरिकांनी वृक्षारोपण कुठे करायचे, जागेचा अभाव असल्याने इच्छा असूनही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करता येत नाही. नेमके या समस्येवर महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रभावी उत्तर शोधले, ते म्हणजे "मानव निर्मित हिरवागार डोंगर".
मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या टेटावली, रबाळे(नवी मुंबई) येथील ओसाढ डोंगराळ जमिनीवर पर्यावरण क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या हरियाली फाउंडेशन ठाणे या संस्थेच्या सहकार्याने महानिर्मितीच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील सुमारे ३० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संपूर्ण डोंगरावर १३८ झाडे लावली यामध्ये आंबा, जांभूळ, फणस, वड, पिंपळ तसेच फळझाडांचा प्रामुख्याने अंतर्भाव आहे.
मुंबईतील वातानुकुलीन वातावरणात काम करणाऱ्या मनुष्यबळाची निसर्गाविषयीची विलक्षण आत्मीयता, मातीशी असलेली नाळ या उपक्रमातून दिसून आली. आपणही, निसर्गाला काही देणं लागतो या दातृत्व भावनेतून आगामी काळात या ओसाढ जमिनीवर मानव निर्मित महानिर्मितीचा हिरवागार डोंगर साकारणार असल्याचे समाधान व सार्थ अभिमान श्री. नितीन चांदूरकर यांनी व्यक्त केले. एरवी संगणक किंवा सॉफटवेअरचे काम करणारी हि नव्या पिढीची तज्ज्ञ मंडळी कुदळ, फावडे हातात घेऊन तर खतांच्या पिशव्या खांद्यावर घेऊन वृक्षारोपणाचा मनस्वी आनंद लुटताना दिसून येत होती. प्रारंभी, हरियाली फाउंडेशनचे श्री. अशोक गोंधळे आणि श्री.श्रीनिवास साठे यांनी झाडांचे महत्व,जमीन,खत,वृक्षारोपणाची शास्त्रीय पद्धत याची उपस्थितांना माहिती सांगितली व त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले.विशेष म्हणजे, हरियाली फाउंडेशनतर्फे या झाडांची निगा राखल्या जाणार आहे व याकरिता महानिर्मितीला कुठल्याही प्रकारचा आर्थिक भार देखील येणार नाही. अभिनव संकल्पनेवर आधारित या वृक्षारोपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि निश्चितच हा उपक्रम प्रेरणादायी देखील आहे.
महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(माहिती तंत्रज्ञान) श्री. नितीन चांदूरकर यांच्या कुशल नेतृत्वात श्री.अविस मिर्झा, श्री.प्रशांत रंगदाळ, श्री.सुशील साखरे, सौ.रचना साळुंखे, श्री.सुमित पाटील, श्री.गणेश गुल्हाने, श्री.राजू खारूल, श्री.अण्णा बागडे, श्री.गौरव क्षीरसागर, श्री.हर्षद संख्ये, श्री.जयेश ठाकरे, श्री.सौरभ चिंचणकर, श्री.राजेश पौडवाल व टीम महाजेनको माहिती तंत्रज्ञान यांचा सदर वृक्षारोपणात सक्रीय सहभाग होता.