সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, July 06, 2018

प्रशासनाच्या पुढाकाराने १० मजुरांची सुटका

        चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये 
अतिवृष्टीचा इशारा
 चंद्रपूर/प्रतिनिधी:

विदर्भात सर्वदूर कोसळत असलेल्या पावसाचा फटका चंद्रपूर जिल्ह्यालाही बसला आहे . चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे .वरोरा तालुक्यामधील खांबाळा ( पाथोरा नाला )या गावाजवळून वाहणाऱ्या पाथोरा नाल्यांमध्ये अडकलेल्या १० जणांना जीवदान देण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले असून या सर्व जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे .
      चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा व चिमूर या परिसरात आज सर्वाधिक पाऊस झालेला आहे. सकाळी ८ते दुपारी ४ पर्यत जिल्हयात ६४.१३ मि.मि. पाऊस झाला .बल्लारपूर व  ब्रह्मपुरी तालुक्यात देखील पाऊस झाला आहे. वरोरा येथील खंबाळा गावाच्या जवळून वाहणाऱ्या पाचोरा नाल्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्युत वाहिनीचे टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे .झारखंड आणि ओडिसा या राज्यातील कामगार या ठिकाणी काम करत आहे .जवळपास 40 मजूर या ठिकाणी काम करत होते. वरोराचे तहसीलदार सचिन गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार या नाल्याच्या मध्यभागी व बाजूला सुरू असलेल्या कामांमध्ये या सर्व मजुरांचा सहभाग होता. दुपारी झालेल्या अतिवृष्टीमुळे 40 मजुरांपैकी 30 च्या आसपास लोकांनी नाल्याचे पाणी वाढण्यापूर्वी स्वतःची सुटका करून घेतली. मात्र यातील १० मजूर वाढलेल्या पाण्यामुळे नाल्याच्या मध्ये अडकून पडले. दुपारी दीडच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी फोन करून जिल्हा प्रशासनाला या संदर्भात माहिती दिली. दुपारी अडीच वाजता पासून या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा आपत्ती निवारण कक्ष , जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन  असे मिळून २५ जणांच्या चमूने अडकून पडलेल्या १०मजुरांना सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.  हे १० मजूर नाल्याच्या मध्यभागी असणाऱ्या एका झाडावर आश्रय घेऊन होते.  जिल्हा प्रशासनाने यासाठी आवश्यक असणारी  बोट  व  प्रशिक्षित  कर्मचारी उपलब्ध केले होते. सुटका केलेल्या १o मजुरांना वरोरा येथील शासकीय इस्पितळामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी  दाखल करण्यात आले आहे.  सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्याकडून  माहिती घेण्याचे काम  तहसीलदार सचिन गोसावी करीत होते .
       पुढील दोन दिवस मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्हा व परिसरात पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. नागपूर मध्ये गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नागपूर महानगराचे जनजीवन विस्कळीत झालेले आहेत. नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्याला देखील याचा मोठा फटका बसला असून ग्रामीण भागातील रस्त्यांना देखील तडे गेलेले आहेत. जिल्हा प्रशासन या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असून प्रशासनाचे नियंत्रण कक्ष या काळात 24 तास काम करणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितले आहे .जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाचे प्रमाण वाढलेले असून महसूल यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. उदया दुपारपर्यंत जिल्हयात पावसामुळे झालेल्या नुकसानाची आकडेवारी येण्याची शक्यता आहे .




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.