12 जुलैला नवी दिल्लीत होणार
भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आयोजित देशातील स्वच्छ व सुंदर रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत चंद्रपूर आणि बल्लारपूर ही रेल्वे स्थानके देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानके म्हणून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहेत. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून तसेच पुढाकारातून ही दोन्ही रेल्वे स्थानके नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चित्रकलेतून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वन्यजीव सौंदर्य तसेच वनवैभव आणि जिल्हयातील लोककलेचे वैभव अधोरेखित करत देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानके म्हणून पुरस्कार प्राप्त ठरली आहेत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा 12 जुलै रोजी नवी दिल्लीत संपन्न होणार आहे. हे पारितोषिक स्विकारण्यासाठी रेल्वेचे अधिकारी, नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि राज्याच्या वनविभागाच्या सचिवांना या सोहळयात आमंत्रित करण्यात आले आहे.
चंद्रपूर रेल्वे स्टेशन वरुन जाणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांना बल्लारपूर आणि चंद्रपूर रेल्वे स्टेशन कायम स्मरणात राहील अशा पद्धतीची सजावट याठिकाणी करण्यात आली असून वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेवर रेल्वे मंत्रालयाची पुरस्काराची मोहोर उमटली आहे.
चंद्रपूर जिल्हयासाठी हा पुरस्कार आनंदाचा व अभिमानाचा असून प्रयत्नपूर्वक केलेल्या प्रयत्नांना आलेल्या यशाची कहाणी सुद्धा आहे. अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील या स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय झाला. वर्षभरापूर्वी याठिकाणी नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयामार्फत आदिवासींमध्ये असणाऱ्या लोककला आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवाच्या वैभवाला साकारण्यासाठी चित्रकारांच्या चमू कार्यरत झाल्या. आणि बघता बघता चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्टेशनचा कायापालट झाला. चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर आलेल्या प्रत्येक प्रवाशाला या ठिकाणी काढण्यात आलेल्या विविध वन्यजीवांचे चित्र आकर्षून घेते. बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर साक्षात ताडोबा मधील पराक्रमी वाघ पायऱ्यांवर साकारला असून हा एक सेल्फी पॉईंट झाला आहे. त्यामुळे बल्लारपूर स्टेशन वर गेलेला कुठलाही प्रवासी या ठिकाणी वाघाच्या समोर उभा राहिलेला सेल्फी काढल्याशिवाय बाहेर पडत नाही. गेल्या वर्षभरात यासाठी प्रयत्न करणारे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या रेल्वे स्थानकांचा गौरव केल्याबद्दल रेल्वेमंत्र्यांचे यासाठी आभार मानले आहे. नॅशनल ट्रान्सपोर्ट इनहाऊस स्टेशन ब्युटीफिकेशन स्पर्धेमध्ये चंद्रपूर आणि बल्लारपूर ही रेल्वेस्थानके प्रथम आली आहे.
वनमंत्री म्हणून आपली छाप सोडणारे सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळे बाग-बगीचे निर्माण केले आहे. नैसर्गिक सौदर्याची आवड असणाऱ्या या मंत्र्यांनी अगदी फुलपाखरांच्या बगीच्यापासून निर्माण होणाऱ्या प्रत्येक इमारतीमध्ये नैसर्गिक सजावटीवर भर दिली आहे. त्यांचे देखणेपण वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयाच्या चमूने या दोन रेल्वे स्टेशनला आकर्षक स्वरूप दिले असून त्याची नोंद या स्पर्धेमध्ये घेण्यात आली आहे. या यशाचे खरे श्रेय नागपूर येथील चित्रकला महाविद्यालयाच्या चमूला जात असून त्यांनी या ठिकाणच्या कलेला आणि या ठिकाणच्या वनवैभवाला चित्रात आणि हस्तकलेत अतिशय योग्य पद्धतीने साकारल्यामुळेच हे रेल्वेस्टेशन देशभरात ओळख घेऊन पुढे आले आहे. चंद्रपूरकरांसाठी ही अभिमानाची बाब असून यापुढे चंद्रपूरची ओळख देशातले सजावटीचे रेल्वे स्थानक अशी असेल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.