সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, September 16, 2018

शेतक-यांनी निसर्गपूरक झिरो बजेट शेतीकडे वळावे

  •  पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर
  • चला निसर्गाकडे’ एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर

नागपूर, दि. 16 : शेतकऱ्यांनी शेती उत्पादन घेतांना रासायनिक खते, किटकनाशकांऐवजी गाईच्या शेणाचा खत म्हणून वापर केल्यास जमिनीची उत्पादन क्षमता टिकून राहते. यामुळे शेतीतील उत्पादनासाठी लागणारा खर्च ही कमी होतो. शेतकरी गाईच्या शेण या नैसर्गिक साधनाचा वापर करुन ‘झिरो बजट शेती’ करू शकतात. त्यामुळे रसायनविरहित खाद्यपदार्थांचा सकस आहारात वापर होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा मिळतो, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांनी केले.

वसंतराव देशपांडे सभागृह येथे नागपूर नॅचरल संस्थेच्या वतीने एक दिवसीय ‘चला निसर्गाकडे’ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कॅन्सर विशेषज्ञ डॉ. कृष्णा कांबळे, नागपूर नॅचरल संस्थेचे प्रणेता हेमंतसिंग चौहान आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

देशात 35 कोटी एकर जमीन उपलब्ध आहे. 126 कोटी लोकसंख्येसाठी 26 कोटी मेट्रीक टन धान्याचे उत्पादन या जमिनीवर घेतले जाते. येत्या काळात वाढणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध जमिनीवर 50 कोटी मेट्रीक टन धान्याचे उत्पादन घ्यावे लागेल, तेव्हाच लोकसंख्येची अन्नाची गरज भागेल.

वाढत्या लोकसंख्येला पूरक शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी घातक किटकनाशके, रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता आणि मानवी शरीरावर अशा रसायनांचा विपरित परिणाम होतो. तो टाळण्यासाठी प्रत्येकाने नियमित जीवनात नैसर्गिक संसाधनाचा वापर करावा. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा लाभ मिळेल. त्यामुळे जमीन व पर्यायाने मानवी शरीर संपदेचे जतन करता येईल, असे मत पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केले.

मनुष्याची दिनचर्या आधुनिक होत आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण विविध आधुनिक साधनाचा वापर करतो. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होत आहे. हा ऱ्हास थांबवायचा असेल तर प्रत्येक नागरिकांनी नैसर्गिक साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. जसे- टुथब्रथ किंवा पेस्टऐवजी दंतमंजनचा वापर करणे, साबणाऐवजी मुलतानी माती किंवा चिक्कन मातीचा वापर करावा. अशा विविध निसर्गात आढळणाऱ्या वस्तुचा वापर केल्यास त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो.

बाजार मिळणाऱ्या विविध आधुनिक वस्तुचे उत्पादन हे विदेशात घेतले जाते किंवा असे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे व्यवहार विदेशी गुंतवणुकीशी असल्याने आपण घेतलेल्या प्रत्येक वस्तुचा आर्थिक व्यय हा विदेशी तिजोरीत जमा होतो. त्याऐवजी देशात उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक साधनांचा वापर केला तर त्यापासून गरजूंना रोजगार उपलब्ध होतोच शिवाय क्रय-विक्रयाचा व्यवहार देखील देशात चालतो. यामुळे देशाची कोलमडलेली अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत मिळते, असे पद्मश्री डॉ. पाळेकर म्हणाले.

कॅन्सर चिकित्सक डॉ. कृष्णा कांबळे यांनी शेती उत्पादनावर होणाऱ्या रासायनिक खते व किटकनाशकाच्या वापराचा परिणाम याविषयी मार्गदर्शन दिले. रासायनिक खते, किटकनाशकांमुळे कॅन्सर सारख्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मानवी शरीराला घातक अशा रसायनांचा वापर टाळणे योग्य असा सल्लाही त्यांनी दिला. कार्यक्रमाचे संचालन विरेंद्र बरबटे यांनी केले. यावेळी गडचिरोलीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.