चंद्रपूर/प्रतिनिधी:
वनावरील अंवलबीत्व कमी करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या डॉ.शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील सात गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विचोडा, छोटा नागपूर, आंबोरा, चारगांव, पडोली, ताडाळी, मोरवा आदी गावांचा समावेश आहे.
वना लगतच्या गावामध्ये तेथील जन, जल, जंगल, जमिन या संसाधनाचा शाश्वत विकास साधून उत्पादकता वाढविणे. गावक-यांची वनावरील निर्भरता कमी करणे, शेतीला जोड धंदे निर्माण करणे, पर्याय रोजगार उपलब्ध करुन देणे या माध्यमातून मानव व प्राणी संघर्ष कमी करणे, यासाठी राज्य शासनाने डॉ.शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना सुरु केली आहे. चंद्रपूर तालुक्यात अनेक गावांमध्ये वाघ व अन्य हिस्त्र वन्य प्राणी यांचा वावर वाढल्यामुळे शेतीतल्या कामावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे या गावांचे वनावरील अंवलबींत्व कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी या गावांचा डॉ.शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे.