चंद्रपूर/प्रतिनिधी:चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व गॅस धारकानी त्यांच्याकडे असलेल्या गॅस कनेक्शनची नोंद आपल्या रेशन कार्डवर करुण घेणे सक्तीचे करण्यात आले आहे.
त्याबाबत मा.उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांचे निर्देश असल्याने सर्व गॅस एजन्सीना त्यांचेकडील सर्व गॅस धारकांच्या रेशन कार्डवर शिक्के मारण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा विभागतर्फे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे घरी गॅस सिलेंडर घेऊन येणाऱ्या डिलीवरी बॉयला रेशन कार्ड दाखवून त्या कार्डवर शिक्का मारून घेण्यात यावे. तसेच जे गॅसधारक एजंसीमधून सिलेंडर घेत असतील त्यानी रेशन कार्डवर एजंसीकडून शिक्का मारून घ्यावा, असेही कळविण्यात आले.
ज्या रेशन कार्डधारकाकडे गॅस असून त्याना सवलतीच्या दराने वितरीत होणारे केरोसिन मिळत आहे. अशा कार्ड धारकानी गॅस असताना केरोसिनची उचल केल्यास त्यांचे विरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदयाचे कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे शासनाचे आदेश आहेत. तसेच ज्या रेशन कार्डधारकाकडे गॅस नसेल त्यानी केरोसिन परवानधारकाकडे उपलब्ध असलेले हमीपत्र भरून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गॅस धारकाना या शासकीय कामामध्ये सहकार्य करून केरोसिन वरील व्यर्थ होणाऱ्या सबसिडीची बचत करण्यास हातभार लावावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेन्द्र मिस्कीन यानी केले आहे.