३१ मार्च २०१८ अखेर प्रलंबित असलेल्या कृषीपंप ग्राहकांना उच्चदाब वीज यंत्रणेतून वीजजोडणी मिळावी यासाठी महावितरणच्यावतीने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. या निविदा प्रकियेला देशातील नामांकित कंपन्यांनी प्रचंड सहभाग नोंदविला आहे.
राज्यातील कृषीपंप ग्राहकांना उच्चदाब वीज यंत्रणेतून वीजजोडणी देण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया यापूर्वी स्थानिक पातळीवर राबविण्यात आली. स्थानिकांना कामे मिळावेत या उद्देशाने ही निविदा प्रक्रिया काढण्यात आली होती. परंतु स्थानिक कंत्राटदारांनी या कामासाठी जास्त मोबदला मिळावा म्हणून ही कामे स्वीकारली नाहीत. शेवटी महावितरणने या कामासाठी मोठ्या कंपन्यांना निमंत्रित केले.
आता नामांकित कंपन्यांनी या कामासाठी आपला सहभाग नोंदविला असून यात प्रामुख्याने टाटा प्रोजेक्ट, नागार्जुन कंन्स्ट्रक्शन कंपनी, एल अँड टी, होल्टास, अग्रवाल पॉवर कंपनी लि, भारत इलेक्ट्रिीकल्स अशा १६ कंपन्यांनी सहभाग नोंदविला आहे. ज्या ठिकाणी या प्रक्रियेला प्रतिसाद मिळालेला नाही. त्या ठिकाणीसुध्दा मोठ्या कंपन्यांना निमंत्रित करण्याचा महावितरणचा मानस आहे.
महावितरणच्या औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, नंदूरबार, धुळे व जळगाव या मंडलांतील कामे फूल टर्नकी तत्वावर करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरिता ५ ते ८ निविदा महावितरणला प्राप्त झाल्या आहेत. नामांकित कंत्राटदारांच्या सहभागामुळे आता उच्चदाब वीज यंत्रणेतून शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याच्या कामाला गती मिळणार आहे.