देशासाठी काहीतरी वेगळं करण्याच्या इच्छेने हर्ष पोद्दार यांना लंडनमधील लॉ फर्मची कॉर्पोरेट वकीलीची नोकरी सोडून भारतात नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यास भाग पाडले.
पोलीस, हा शब्द आपल्या डोळ्यासमोर येताच कधी आपण घाबरतो तर कधी पोलिसांच्या कामगिरीमुळे आपलं उर अभिमानाने भरून येतं. आज आपल्या देशाची बाह्य सीमा सैनिकांमुळे जर सुरक्षित असेल तर देशाच्या अंतर्गत सीमेची सुरक्षा पोलिसांच्या अथक परिश्रमामुळे सुरक्षित आहे. आज पोलीसांसमोर नक्षलवाद, सायबर सुरक्षा, जातीय दंगली, बालगुन्हेगारी असे अनेक गंभीर प्रश्न उभे ठाकले आहेत. भारतीय पोलीस सेवेमधील अधिकारी या सगळ्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी समर्थ आहेत. आज आपण अशाच एका अधिकाऱ्याची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्याने पोलीस हा कायदा व सुव्यवस्था यांच्यापुरता मर्यादित न ठेवता अनेक समाजोपयोगी उपक्रमांमधून पोलिसांना समोर आणलं व पोलीसिंग हे फक्त पोलिसांच काम नसून त्यामध्ये जनतेला सुद्धा सहभागी करून घेतलं. ही गोष्ट आहे मालेगावचे अपर पोलीस अधिक्षक आयपीएस हर्ष पोद्दार यांची.
आयपीएस हर्ष पोद्दार मुळचे कोलकत्ताचे व कायद्याचे पदवीधर. नॅशनल लॉ स्कूल कोलकत्ता मधून त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठामधून आंतरराष्ट्रीय व घटनात्मक कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. यानंतर काही काळ ते लंडनमधील क्लीफर्ड चान्स या लॉ फर्ममध्ये कॉर्पोरेट वकील म्हणून काम करत होते. परंतु काहीतरी वेगळं करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देईना. जिथे देशाची धोरणे ठरली जातात अशा क्षेत्रात किंवा संस्थेत त्यांना काम करण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी २०१० मध्ये लंडन सोडण्याचा निर्णय घेतला व भारतामध्ये येऊन नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरु केली.
हर्ष पोद्दार यांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली व त्यांची निवड भारतीय राजस्व सेवेसाठी झाली. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली व दुसऱ्या वेळी ३६१ रँक प्राप्त करून त्यांची निवड भारतीय पोलीस सेवेमध्ये झाली.
हर्ष पोद्दार यांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली व त्यांची निवड भारतीय राजस्व सेवेसाठी झाली. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली व दुसऱ्या वेळी ३६१ रँक प्राप्त करून त्यांची निवड भारतीय पोलीस सेवेमध्ये झाली.
ष्ट्रीय पोलीस अकादमी हैद्राबाद येथे प्रशिक्षणादरम्यान त्यांनी अंध मुलांसाठी एक कार्यशाळा आयोजित केली, ज्यामध्ये मुलांना छोटया गटांमध्ये विभागून त्यांना अपंगत्वावर एक कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितला. आयपीएस हर्ष पोद्दार यांच्या लक्षात आले की जर मुलांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले तर सखोल परीक्षणासाठी त्यांना प्रेरित केले जाऊ शकते व त्यांची स्वतःची एक स्वतंत्र यंत्रणा म्हणून काम केले जाऊ शकते. हीच पद्धत त्यांनी आपल्या पहिल्या नियुक्तीदरम्यान अवलंबली. त्यांची पहिली नियुक्ती ही औरंगाबाद ज़िल्ह्यामध्ये वैजापूर या ठिकाणी सहाय्यक पोलीस अधिक्षक म्हणून झाली.
आपण जर बालगुन्हेगारीचे आकडे बघितले तर महाराष्ट्र हा भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे जिथे बालगुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासाठी ही अतिशय लांच्छनास्पद गोष्ट आहे. याच संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने यात सुधारणा होण्यासाठी अधिकाऱ्यांकडून त्यांची मतं मागितली. त्यात हर्ष पोद्दार यांनी युवा संसद स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव ठेवला आणि तो स्वीकारला गेला. युवा संसद हा एक असा मंच आहे जिथे शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना गुन्हेगारी संबंधित एक विषय दिला जातो आणि त्या विषयाशी संबंधित त्यांच्याकडून सूचना मागवल्या जातात, की जर ते सरकार मध्ये असते तर त्यांनी तो विषय कशा प्रकारे हाताळला असता. आयपीएस हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचा “पायलट प्रोजेक्ट” औरंगाबाद मधील नाथ व्हॅली स्कूल व औरंगाबाद पब्लिक स्कूल मध्ये घेण्यात आला. वेगवेगळ्या टीम तयार करून प्रत्येकाला दहशतवाद, नक्षलवाद, सायबर गुन्हेगारी यासारखे विषय देण्यात आले. प्रत्येक टीमला पोलीस, सरकार व सामान्य माणूस म्हणून जबाबदाऱ्या देण्यात आल्या व टीम मधील एकाला दिल्या गेलेल्या विषयावर बोलण्याची संधी देण्यात आली. स्पर्धा यशस्वी झाल्यामुळे संपूर्ण राज्यात ही स्पर्धा घेण्याचा निर्णय पोलीस विभागाने घेतला. प्रथम ही स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या परिक्षेत्रात घेण्यात आली व यावर्षी नाशिक परिक्षेत्रामध्ये सुद्धा या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. याच कामासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सत्कार केला. आतापर्यंत ४२००० पेक्षा जास्त युवक-युवती या अभियानाशी जोडले गेले आहेत.
बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला जायचं म्हटलं की लोक नाक मुरडतात किंवा जाण्याचं टाळतात त्यामागे भीती हे तर एक मुख्य कारण आहेच परंतु पोलिसांकडून आपल्याला न्याय मिळेलंच याची नसलेली खात्री. याचा अभ्यास करता हर्ष पोद्दार यांच्या असं लक्षात आलं की काळानुसार पोलिसांनासुद्धा बदलण्याची गरज आहे म्हणून त्यांनी पोलीस इमारती व पोलिसांच्या वागणुकीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. याचाच परिणाम म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामधील वीरगाव व शिऊर पोलीस स्टेशनला आयएसओ नामांकन प्राप्त झाले. कोल्हापूर मधील करवीर विभागात सात पोलीस स्टेशन तसेच नाशिक मधील मालेगाव विभागात चार पोलीस स्टेशन,अपर पोलीस अधिक्षक कार्यालय व मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांना आयएसओ नामांकन प्राप्त करून देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. यामुळे पोलिसांकडे बघण्याचा सामान्य जनतेचा दृष्टिकोन बदलला व लोक आपली भीती बाजूला ठेवून आपल्या समस्या सांगू लागले व त्याचं निराकरण सुद्धा योग्य रितीने होऊ लागलं.
औरंगाबाद मधील वैजापूर व कोल्हापूर मधील करवीर येथे सहाय्यक पोलीस अधिक्षक म्हणून सेवा दिल्यानंतर त्यांची नियुक्ती नाशिक मधील मालेगाव येथे अपर पोलीस अधिक्षक या पदावर झाली. मालेगाव हे शहर अतिशय संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. २००१ साली झालेल्या दंगली तसेच २००६ व २००८ मध्ये झालेले बॉम्बस्फोट व त्यानंतर उसळलेल्या दंगली, याच दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे हल्ले करण्यात आले, या सगळ्यांमुळे तिथे बरेच अधिकारी जाण्याचं नाकारतात. परंतु हर्ष पोद्दार यांनी ही नियुक्ती आव्हान म्हणून स्वीकारली. गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी विविध समाजोपयोगी प्रकल्प मालेगावमध्ये राबवले. उडान सारखा प्रकल्प असेल ज्यामध्ये मालेगाव मधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल व इतरही परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले जाते. आपण जर मालेगाव मधील गुन्हेगारीचा अभ्यास केला तर त्यामध्ये तरुणांचं प्रमाण अधिक आहे.
१५ ते २५ या वयोगटातले तरुण गुन्हेगारी क्षेत्राकडे ओढल्या गेले आहेत. कोणत्याही प्रकारच ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर नसल्यामुळे ते गुन्हेगारीचा मार्ग पकडतात. अशा वेळी उडान सारखा प्रकल्प त्यांना एक दिशा देण्याचं काम करत. मालेगाव मॅरेथॉन सारखा आणखी एक प्रकल्प जिथे संपूर्ण मालेगावकर आपल्या सर्व जाती-धर्म विसरून मालेगावच्या एकता, सुरक्षा व शांतीसाठी धावले. यासारख्या उपक्रमामुळे जाती धर्म विरहित वातावरण मालेगावमधे निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या द्वारे दंगली घडवण्यासाठी पैसा पुरवला जातो किंवा जिथून दंगली घडतात अशा गोष्टींना पायबंद घालण्यात आला. मागील वर्षभरात अवैध व्यापार ज्यामध्ये दारू, जुगार, मटका, देहव्यापार, गोहत्या या गोष्टींवरती छापा टाकून त्यांना प्रतिबंध घालण्यात आला. मागील ११ महिन्यात ३ करोडचा माल पोलिसांकडून जप्त करण्यात आला. यामुळे मागील वर्षभरात गणपती उत्सव, ईद, नवरात्रोत्सव जे हिंदू-मुस्लिम धर्माचे सण आहेत ते अतिशय शांत वातावरणात पार पडले. कोणताही अनुचीत प्रकार किंवा जातीय तणाव मालेगाव मध्ये तयार झाला नाही.
मागच्या वर्षभरात देशामध्ये बरेच जातीय तणाव तयार होण्याचे प्रकार घडले, ज्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल किंबहुना काही ठिकाणी तर दोन समाजामध्ये दंगली पण झाल्या. भीमा कोरेगाव व औरंगाबाद हे त्यामागील काही उदाहरणे. परंतु अशा तणावपूर्ण स्थितीमध्ये सुद्धा असंवेदनशील म्हणवणाऱ्या मालेगावमध्ये कोणताही वाईट प्रकार घडला नाही आणि या सगळ्या वेळी मालेगाव शांत राहिलं. याच ताज उदाहरण द्यायचं झाल्यास नुकतंच धुळे जिल्ह्यामधील राईनपाडा या गावी मुलं चोरणारी टोळी आली या अफवेतून पाच जणांचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला. त्याच रात्री मालेगाव मध्ये सुद्धा असाच प्रसंग निर्माण झाला. त्याच अफवेचे शिकार परभणी जिल्ह्यातील काही लोक झाले. त्यांच्याकडचे पैसे संपल्यामुळे भिक्षा मागून ते आपल्या गावी परत जाणार होते. परंतु मुल चोरणारी टोळी समजून त्यांना जमावाने मारहाण करायला सुरुवात केली. ही बातमी मालेगाव मध्ये पसरली व छोट्याशा असणाऱ्या जमावाने रुद्ररूप धारण केले.
जवळपास २००० लोक तिथे जमा झाले व त्या लोकांना आमच्या ताब्यात द्या अशी घोषणा करू लागले. मालेगाव मधील काही समजूतदार लोकांनी शहाणपण दाखवत त्या पीडित कुटुंबाला आपल्या घरात आसरा दिला व आयपीएस हर्ष पोद्दार यांच्याकडे मदतीची विनंती केली. हर्ष पोद्दार यांनी क्षणाचाही विलंब न करता स्थानिक अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले व स्वतःसुद्धा आपल्या फौजफाट्यासह त्या ठिकाणी धाव घेतली. परंतु परिस्तिथी इतकी बिघडली की घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या गाड्या जमावाने उलथवून लावल्या, त्यामुळे लाठीचार्जचे आदेश देऊन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला व पीडित कुटुंबाला सुखरूपपणे जमावाच्या तावडीतून बाहेर काढण्यात आले. आयपीएस हर्ष पोद्दार व त्यांच्या टीमने परिस्थिती संयमीपणे हाताळल्याने तिथे कोणताही मोठा उद्रेक झाला नाही आणि राईनपाड्याची पुनरावृत्ती टळली. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान व धाडसासाठी ते अभिनंदनास नक्कीच पात्र ठरतात.
हर्ष पोद्दार यांनी पोलीस हा फक्त कायदा व सुव्यवस्था यांच्यापुरता न ठेवता अनेक समाजोपयोगी प्रकल्पांमधून पोलिसांना जनतेसमोर सादर करण्याचं बहुमूल्य काम केल आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे हे तर पोलिसांचे काम आहेच परंतु त्यामध्ये जनतेच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत याची जाणीव समाजाला वेळोवेळी करून देण्याचं काम आयपीएस हर्ष पोद्दार करत आहेत. आपण खूप नशीबवान आहोत कारण आपल्या सुरक्षेची जबाबदारी हर्ष पोद्दार यांच्या सारख्या आश्वासक व लोकाभिमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या या कार्याला आपण सर्वांनी सलाम केला पाहिजे आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन व त्याची प्रेरणा घेऊन आपण सुद्धा वाईट प्रवृत्तींविरोधात उभे राहू अशी शपथ घेतली पाहिजे.