चंद्रपूरमध्ये माजी सैनिकांच्या सत्कारात शौर्य दिन साजरा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
कोणावर कधीही आक्रमण न करणारा भारत, गरज पडल्यास शत्रूच्या सिमेत घुसून आंतकवादयांचा नायनाट करु शकते, असा धडकी भरवणारा संदेश भारताने सर्जिकल स्ट्राईक माध्यमातून जगाला दिला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी आज येथे केले.
चंद्रपूर येथील आयएमए सभागृहात 29 सप्टेंबर, शौर्य दिनानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर व माजी सैनिक संघटना चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एका देशभक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलतांना त्यांनी भारताच्या संयमीवृत्तीचे जबाबदार उत्तर म्हणून सर्जिकल स्ट्राईक पुढील अनेक काळ देशवासियांच्यासह लक्षात राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताला गृहीत धरु नये. शांततावादी असणारा हा देश गरज पडल्यास सिमेमध्ये घुसून शत्रूवर प्रहार करण्याची हिंमत ठेवू शकतो. हा इशारा व त्याची प्रत्यक्ष कृती म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेली ही लष्करी कारवाई आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर त्यांनी चंद्रपूरच्या भुमीतून भारत मातेसाठी शहीद झालेल्या सुपूत्रांच्या विरमाता व विरपत्नींचा सत्कार केला. यावेळी व्यासपिठावर ब्रिगेडीयर सुनील गावपांडे, कॅप्टन सोहदा, सुभेदार शंकर मेंगरे शौर्यचक्र प्राप्त, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ डांगे, जिल्हा सैनिक कल्याण संघटक व जनमाहिती अधिकारी (निवृत्त) सुभेदार मेजर दिनेशकुमार गोवारे, विजय राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी श्रीमती व्यंकमा गोपाल भिमनपल्लीवार, श्रीमती छाया बालकृष्ण नवले, श्रीमती पार्वती वसंतराव डाहुले, सुभेदार गणपती मेंगरे या वीरमाता, वीरपत्नी व शौर्यचक्र प्राप्त सैनिकांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेशकुमार गोवारे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी बोलतांना आजचा दिवस तमाम भारतीयांसाठी गौरवाचा दिवस असल्याचे प्रतिपादन केले. डॉ.महेशर रेड्डी यांनी सर्जिकल स्ट्राईक मध्ये सहभागी होणे किती कष्टाचे असते, याची माहिती दिली. तर ब्रिगेडीयर सुनील गावपांडे यांनी सर्जिकल स्ट्राईक म्हणजे शत्रूच्या भागात जावून तेथे नेमकी कारवाई करत आंतकवांदी हालचाली करणा-या यत्रणेचा संपूर्ण नायनाट करणे होय. या कार्यवाहीमध्ये सामान्य नागरिकांच्या व तेथील इमारती व अन्य बाबींचे नुकसान न करता केवळ अतिरेकी कार्यवाया करणा-यांचा बिमोड केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगरसेविका सविता कांबळे यांनी केले.