महावितरणचे दिवसेंदिवस यशप्राप्तीकडे वाटचाल
महावितरणने शनिवारी दि. 15 सप्टेंबर 2018 रोजी 20 हजार 330 मे.वॅ. अखंडित विजेचा यशस्वीपणे पुरवठा केला आहे. ही वीजमागणी आजपर्यन्त नोंद झालेल्या विक्रमी कमाल वीजमागणीच्या जवळपास आहे. यापूर्वी दि. 23 एप्रिल 2018 ला 20 हजार 340 मे.वॅ. एवढ्या कमाल वीज मागणीची नोंद करण्यात आली होती. सदर मागणी ही मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या कमाल मागणीच्या तुलनेत जवळपास 3 हजार 500 मे.वॅ. (22 टक्के) इतकी जास्त आहे. वातावरणातील बदलामुळे कृषीपंपाकरिता लागणाऱ्या विजेच्या मागणीतील वाढीमुळे एकूण विजेच्या मागणीत वाढ झालेली आहे.
विद्यमान परिस्थितीतील कोळशाच्या तुतवड्यामुळे महावितरण कंपनीशी दीर्घकालीन वीज करार झालेल्या कंपन्यांकडून कमी वीजपुरवठा होत असूनही महावितरणने यशस्वीपणे सदरील मागणीची पूर्तता केलेली आहे.
दीर्घकालीन वीज खरेदी करार असलेल्या वीजनिर्मिती कंपन्यांकडून एकूण करारीत 29 हजार 840 मे.वॅ. क्षमतेपैकी साधारणपणे 14 हजार 354 मे.वॅ. इतकी विजेची उपलब्धता होती. महानिर्मिती कंपनीकडून एकूण करारीत 10 हजार 842 मे.वॅ. क्षमतेपैकी 5 हजार 116 मे.वॅ. तसेच एनटीपीसी कंपनीकडून एकूण करारीत 4 हजार 862 मे.वॅ. क्षमतेपैकी 3 हजार 536 मे.वॅ. व अणु वीज प्रकल्पाकडून (एनपीसीआयएल) एकूण करारीत 757 मे.वॅ. क्षमतेपैकी 461 मे.वॅ. इतक्या विजेची उपलब्धता झाली. तसेच अदानी पॉवरकडून एकूण करारीत 3 हजार 85 मे.वॅ. क्षमतेपैकी 2 हजार 394 मे.वॅ. व रतन इंडियाकडून करारीत क्षमतेएवढी म्हणजे 1 हजार 200 मे.वॅ. वीज उपलब्ध झाली. या व्यतिरिक्त सीजीपीएलकडून 588 मे.वॅ., जेएसडब्ल्यूकडून 280 मे.वॅ. व एम्कोकडून 87 मे.वॅ. एवढी वीज उपलब्ध झाली आहे.
नवीन व नवीकरणीय ऊजेच्या स्त्रोतापैकी सौर ऊर्जेवर आधारीत प्रकल्पांमधून एकूण करारीत 1 हजार 42 मे.वॅ. क्षमतेपैकी 628 मे.वॅ. इतकी वीज मिळाली. परंतु गेल्या 7-8 दिवसांपासून पवन ऊर्जेवर आधारीत प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेमध्ये अचानक कमतरता आल्याने या प्रकल्पांमधून 3 हजार 765 मे.वॅ. इतक्या करारीत क्षमतेपैकी फक्त 115 मे.वॅ. वीज उपलब्ध झाली आहे.
वीज मागणीच्या वाढीतील अपेक्षित वाढ व दीर्घकालीन करारातील वीज निर्मिती कंपन्यांकडून उपलब्ध होणारी कमी वीज लक्षात घेता महावितरणने विजेच्या मागणीतील तफावत भरून काढण्यासाठी द्विपक्षीय लघु निविदेद्वारे व इंडियन एनर्जी एक्चेंजद्वारे वीज खरेदी करण्याची सोय केली होती.
दि. 15 सप्टेंबर 2018 रोजी महावितरणने साधारणत: 5 हजार 200 मे.वॅ. इतक्या विजेच्या तफावतीपैकी 275 मे.वॅ. वीज द्विपक्षीय लघु निविदेद्वारे व 3 हजार 200 मे.वॅ. इंडियन एनर्जी एक्चेंजद्वारे वीज खरेदी करून उर्वरित 1 हजार 675 मे.वॅ. कोयना जल विद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती करून निर्माण झालेली विजेची तूट भरून काढली आहे.
अशाप्रकारे महावितरणने अचानक वाढलेल्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी उपलब्ध सर्व स्त्रोतांचा प्रभावीपणे वापर करून महावितरणच्या वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला आहे.