সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, September 28, 2018

मनपा कर्मचाऱ्यांना कार्यक्षमता वृद्धीचे प्रशिक्षण

ऑक्टोबर अखेरपर्यंत होणार ४२५ कर्मचारी प्रशिक्षित 
नागपूर/प्रतिनिधी:

दररोज नागरिकांशी संबंध येणाऱ्या नागपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वृद्धींगत व्हावी, व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, सोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचे ज्ञान मिळावे यासाठी राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत नागपूर महानगरपालिकेतील सुमारे ४२५ कर्मचारी आक्टोबर अखेरपर्यंत प्रशिक्षित होणार आहेत. ४५ कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या तुकडीचे पाच दिवसीय प्रशिक्षण सध्या येथील वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत (वनामती) येथे सुरू आहे. यात लिपिकीय तथा तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‌घाटन मनपा स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या हस्ते पार पडले. तर पहिल्या तुकडीच्या समारोपाला उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्यासह प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, अपर आयुक्त राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त नितीन कापडणीस उपायुक्त रवींद्र देवतळे, राजेश मोहिते, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा यांची उपस्थिती होती. नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून दररोज संपर्कात येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधताना तो कसा असावा, त्यातून नागरिकांचे समाधान कसे होईल, याचे प्रशिक्षण महानगरपालिकेकडे नागरिकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यात सहाय्यभूत ठरेल, असे प्रतिपादन सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केले. उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनीही अशा प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतल्याबद्दल महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. 
दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षण २५ ते २९ ऑक्टोबरदरम्यान सुरू आहे. या प्रशिक्षण शिबिराला गुरुवारी (ता. २७) विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, अपर आयुक्त राम जोशी, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती संजय बंगाले, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला. अशा प्रकारच्या प्रशिक्षणाने आमच्यातील कार्यक्षमता नक्कीच वाढेल, सोबतच कामाकडे बघण्याचा आमचा दृष्टीकोन यामुळे बदलला असल्याचे मत प्रशिक्षणार्थ्यांनी मांडले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधताना विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे म्हणाले, मनपात कार्य करताना नागरिकांशी सरळ संबंध येतो. कधी-कधी संयमाचा बांधही फुटतो. मात्र अनुभवातून माणूस शिकत जातो. अनुभवाला प्रशिक्षणाची जोड मिळाली तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून मनपाच्या सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांना मिळतील. प्रशिक्षणानंतर कर्मचारी अधिक ऊर्जेने काम करेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. 
प्रभारी आयुक्त तथा वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे म्हणाले, शहरातील नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे, चांगल्या सेवा त्यांना देता याव्यात अशी आपली भूमिका असायला हवी. नागरिक आहेत म्हणून ही व्यवस्था आहे. ज्यांच्यासाठी ही व्यवस्था आहे त्यांना चांगल्या सोयी, सेवा अधिक प्रभावीपणे पोहचविण्यासाठी असे प्रशिक्षण सहाय्यभूत ठरतात, असे ते म्हणाले. रस्ते, पाणी, वीज ह्या सोयी म्हणजे विकासाची प्रक्रिया आहे. आता महानगरपालिका चिरंतर विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकते आहे. शिक्षण, आरोग्य, महिला हे घटक असाता चिरंतर विकासाच्या दृष्टीने विचारात घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. कारकून ते अधिकाऱ्यांना सर्वच दृष्टीने सक्षम करण्यासाठी ऑक्टोबर अखेरपर्यंत ४२५ कर्मचारी प्रशिक्षित होतील, अशी माहितीही त्यांनी दिली. 
स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले यांनीही अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता बोलून दाखविली. अपर आयुक्त राम जोशी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. 
प्रशिक्षणात ध्यान आणि योगाचाही समावेश 
दररोज १० ते ५.४५ कर्तव्य बजावणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात योग आणि चिंतन मनुष्याला कसे निरोगी आणि सुदृढ ठेवते, हे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. प्रशिक्षणादरम्यान दररोज सकाळी ६ ते ७ योगा, त्यानंतर ध्यान, राष्ट्रगीत, प्रार्थना यामाध्यमातून लाभार्थ्यांना मन:शांतीचे धडेही गिरविले जात आहे. यानंतर आदल्या दिवसाची उजळणी करून सकाळी १० वाजता प्रशिक्षणाला सुरुवात होते. रात्री ७ वाजता त्या दिवशीचे सत्र संपते. 

राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण 
सदर प्रशिक्षण वर्गात विविध विषयांतील राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. माहिती अधिकार क्षेत्रातले तज्ज्ञ प्रशांत चौधरी, अन्य विषयांतील तज्ज्ञ अनिरुद्ध चौधरी, पद्‌मनाथ वऱ्हाडपांडे यासारखे प्रशिक्षक प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणात तणावमुक्ती व्यवस्थापकन, वैयक्तिक मूल्ये व संस्थात्मक मूल्ये, माहितीचा अधिकार, प्रभावी संवाद व संवाद कौशल्य, सेवेच्या सर्वसाधारण अटी व शर्ती आणि सेवापुस्तकातील नोंदी, अभिलेख व्यवस्थापन, भावनिक बुद्धीमत्तेच्या दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्व विकास आदी विषयांसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. सत्र संचालक संदीप खोडवे, सुवर्णा पांडे, सुषमा देशमुख आदी प्रशिक्षणाची रूपरेषा सांभाळीत आहेत. प्रशिक्षणाची तिसरी तुकडी १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून त्यात तांत्रिक कर्मचारी-अधिकारी सहभागी होतील. चौथी तुकडी ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून त्यात लिपिकीय आणि तांत्रिक संवर्गातील कर्मचारी सहभागी होतील, अशी माहिती सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा यांनी दिली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.