रानावनातील आदिवासी बांधवांनी पहिल्यांदाच बघितला पूर्वजाचा किल्ला
जागतिक पर्यटन दिन - लोकबिरादरी प्रकल्प व इको-प्रो चा उपक्रम
चंद्रपुर/प्रतिनिधी:
शिक्षणाचा गंध नाही, इतिहासाची कल्पना नाही, विकासाचा पत्ता नाही.... बदलत्या जगाच्या घडामोडीपासून कोसोदूर राहिलेल्या या भामरागडसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील आदिवासी बांधवांनी पहिल्यांदा चंद्रपूर शहर बघितले. इतकेच नव्हे तर गोंडकालीन त्यांच्याच पूर्वजांनी बांधलेला किल्ला आणि वास्तू बघून मन भारावून गेले होते. इतिहासाची माहिती जाणून घेताना आपल्याच पूर्वजांनी येथे राज्य केल्याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.


चंद्रपूर पर्यटनासाठी आलेल्या आदीवासी बांधवाना चंद्रपूर शहराचा वैभवशाली गोंडकालीन इतिहास आणी विवीध गोंडराजे यांची माहीती पठाणपुरा गेट, अंचलेश्वर गेट, जटपुरा गेट, विर बाबुराव पुलेश्वर शेडमाके, गोंडराजे राजमहल-कारागृह, बगड खिडकी जवळील देखना बुरूज, गोंडराजे समाधीस्थळ, पुरातन विहीर, अंचलेश्वर मंदीर व महाकाली मंदीर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत या संपुर्ण वास्तुचा इतिहास इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी सर्व उपस्थित आदीवासी बांधवाना सांगीतला. हा संपुर्ण इतिहास ऐकुन आदीवासी बांधव हरकुन गेले. त्यांनी उपक्रमाचे मनापासुन स्वागत केले. इतके वर्षापासुन हा वारसा असुन आम्ही अजुन बघितला नव्हता यांची खंत सुध्दा व्यक्त केली.
या उपक्रमाचे आयोजन लोकबिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे आणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केले होते. यामुळे चंद्रपूरचा ऐतिहासिक वारसा हेमलकसा सारख्या दुर्गम भागातील आदीवासी बांधवाना जवळुन बघता आला, अनुभवता आला. यावेळी लोकबिरादरी प्रकल्पाचे मनोहर अंपलवार, मुंशी दूर्वा, राहुल भसारकर, जोगा गोटा इको-प्रो संस्थेचे अनिल अडगुरवार, अमोल उटटृलवार, हरीश मेश्राम, अक्षय खनके सहभागी होते.