चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हयातील वाहनांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. हे एक ऐतिहासिक शहर असून या ठिकाणी रस्त्यांच्या काही भागात मर्यादा पडतात. त्यामुळे शहरातील वाहन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी अपघात प्रवण क्षेत्राची (ब्लॅक स्पॉट) निवड करण्यात यावी व त्या ठिकाणी अपघात होणार नाही, अशा पध्दतीच्या उपाय योजना करण्यात याव्यात यावी, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी केली.
केंद्र सरकारच्या अधिसुचनेनुसार जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्षपद जिल्हयाचे लोकसभा सदस्य म्हणून ना. हंसराज अहीर यांच्याकडे आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक आज 28 सप्टेंबर रोजी पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे पार पडली.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष म्हणून पहिल्या सभेचे कामकाज पार पाडतांना अधिका-यांना अपघात प्रवण क्षेत्रा (ब्लॅक स्पॉट) निवडलेल्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना दोन महिन्यांत करून अपघाताचे प्रमाण कमी करण्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी निर्देश दिले.
यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, मनपाचे आयुक्त संजय काकडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंबर शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्या सुषमा साखरवडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल व एस.आर.जाधव, राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता व अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
समोर आलेल्या माहितीनुसार सन 2015 ते 2017 या वर्षात चंद्रपूर जिल्हयात अपघात व मृत्यू यांचे प्रमाण सतत वाढत आहे. भारतात वर्षाला दीड लक्ष लोकांचा अपघाती मृत्यू होत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी करण्याची गरज भासली असून यावर उपाययोजना म्हणून जिल्हयात एकुण 28 ठिकाणी अपघात पवण क्षेत्रा म्हणून अभ्यासपूर्ण निवड परिवहन विभागाने केली असून त्यावर उपाययोजना सुचविलेल्या आहेत. बैठकीत काही उपाययोजना दोन महिन्यांच्या कालावधीत तर काही दोन महिन्यांच्या कालावधीत होण्यासारख्या असल्याने दोन महिन्यात काम पूर्ण करण्याचे ना. अहीर यांनी निर्देश दिले. महानगराच्या महापौर अंजली घोटेकर यांनी वाहतूक नियमनासाठी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांची विनामुल्य मदत घेण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर ना.अहीर यांनी दुजोरा देवून असा प्रयोग करता येईल अशा सुचना केल्या.
जिल्हयात अवैध बस वाहतूक, वेकोलि व सिमेंटच्या ओवरलोड ट्रक व त्यांच्यामुळे होणारे प्रदुषण याकडे सभेचे लक्ष वेधून त्यावर चर्चा केली व अशा वाहतुकीवर कडक कार्यवाही करावी असे निर्देश दिले. चंद्रपूर जिल्हयात 5 लक्ष 74 हजार वाहने असून त्यात दुचाक्या 4 लक्ष 70 हजार इतक्या आहेत. इतक्या मोठया प्रमाणात वाहणे असल्याने परिवहन नियमन करणे जिकरीचे होत आहे. जिल्हयातून 107 कोटी इतका मोठा महसुल परिवहन विभागाकडून राज्य सरकारला जात असल्याने परिवहन विभागाचे सक्षमिकरण दर्जोन्नती करण्यावर यापुढे भर देण्यात येईल असे श्री. अहीर यांनी सांगितले.
साधारणपणे ही बैठक तीन महिन्यातुन एकदा घ्यावयाची असली तरी ब्लॅकस्पाॅटवर करावयाच्या उपाययोजना व अपघाताचे प्रमाण कमी तातडीने उद्दीष्टय डोळयासमोर असल्याने पुढील बैठक दोन महिन्यांच्या आत घेण्यात येईल असे विभागास सांगून तोपर्यंत सर्व विभागाने दोन महिन्यांच्या आत सोपविलेली कामे पूर्ण करावीत असे सक्त निर्देश दिले.