সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, May 02, 2010

चंद्रपुर समृद्ध जिल्हा

ताडोबा राष्ट्रीय उद्यान, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, देशातील प्रमुख कागद कारखाना, खनिजदृष्ट्या समृद्धी, जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३५ टक्क्यांहून अधिक असलेले वनक्षेत्राने चंद्रपूर जिल्हा समृद्ध आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या अतुलनीय कार्य आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी कठोर समाज तपस्येने पावन झालेली भूमी म्हणून चंद्रपुर जिल्हा प्रसिद्ध आहे

इतिहासाच्या पानातील चंद्रपूर

१९६४ मध्ये चांदा शहराचे नाव बदलून चंद्रपूर करण्यात आले. चांदा जिल्ह्यासही पुढे ‘चंद्रपूर’ जिल्हा या नावाने ओळखले जाऊ लागले. प्राचीन काळी चंद्रपूर हा जिल्हा लोकापुरा आणि त्यानंतर इंद्रपूर या नावांनी ओळखला जात असे. ब्रिटिश राजवटीत आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे हा जिल्हा ‘चांदा’ या नावाने ओळखला जात होता. नवव्या शतकात या प्रदेशावर प्रथम नागवंशीय राजांची आणि त्यानंतर गोंड राजांची सत्ता होती असे ऐतिहासिक दाखले आढळतात. नागवंशीय बौद्ध राजा गहलू याने भद्रावतीपासून ८०कि.मी. अंतरावर माणिकगड हा किल्ला बांधला असे म्हणतात. पुढे अठराव्या शतकाच्या आसपास या प्रदेशावर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित झाली. नागपूरच्या भोसले घराण्यातील राजे रघुजी भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांना वारस नसल्याने ते राज्य खालसा करून कारण दाखवून हा प्रदेश ब्रिटिश साम्राज्यास जोडला गेला.

भूगोलावर एक नजर

चंद्रपूरच्या उत्तरेस भंडारा आणि नागपूर, दक्षिणेस आंध्रप्रदेशातील अदिलाबाद, पूर्वेस गडचिरोली, पश्चिमेस यवतमाळ, असे हे जिल्हे वसलेले आहेत. २६ ऑगस्ट, १९८२ पर्यंत चंद्रपूर हा क्षेत्रफळाने महाराष्ट्रात सर्वात मोठा तर भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा जिल्हा होता. याच दिवशी या मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या दोन स्वतंत्र जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. जिल्ह्याच्या नैऋत्य कोपर्‍यात डोंगर पसरलेले आहेत. उर्वरित जिल्हा मंद उताराचा असून अधूनमधून डोंगररांगा आणि टेकड्या आहेत. प्राकृतिक रचनेनुसार जिल्ह्याचे मूल-चिमूर टेकड्यांचा प्रदेश, वर्धा-वैनगंगा खोर्‍याचा प्रदेश आणि चांदूरगडचा डोंगराळ प्रदेश असे तीन विभाग पडतात.


वनक्षेत्र -
चंद्रपूर जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३५ टक्क्यांहून अधिक भाग जंगलांनी व्यापला आहे. वनांचा विचार करता गडचिरोली आणि नंदुरबार या जिल्ह्यांनंतर चंद्रपूर हा राज्यात तिसर्‍या क्रमांकाचा महत्त्वाचा जिल्हा ठरतो. उत्तम प्रकारचे सागवान, तेंदूची पाने, बांबू, मोहाची फुले ही येथील प्रमुख वनउत्पादने आहेत. चिरोल आणि नवेगाव टेकड्यांवर असलेला परिसर ‘आलापल्ली अरण्य’ म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या २१टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आदिवासी जमातींची आहे. त्यामुळे हा जिल्हा ‘आदिवासी जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. येथील दाट जंगलांच्या आणि डोंगराळ भागात कोळंब (कोलाम) जमातीचे लोक रहातात. परधान या जमातीचे लोकही काही प्रमाणात येथे आढळतात. केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेल्या ‘माडिया गोंड’ या आदिवासी जमातीचे लोकही या जिल्ह्यात आहे.

समृद्ध खनिजसंपत्ती -
महाराष्ट्रातल्या खनिज संपत्तीच्या मुख्य क्षेत्रांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश होतो. राज्यातील तांब्याचे सर्वाधिक साठे या जिल्ह्यामध्ये आहेत. वर्धा खोरे दगडी कोळशाच्या दृष्टीने महत्त्वाचे क्षेत्र आहे. चंद्रपूर तालुक्यात घुगुस आणि बल्लारपूर; राजुरा तालुक्यात साष्टी; भद्रावती तालुक्यात माजरी आणि वरोरा येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत. चिमूर तालुक्यात पिंपळगाव, भिसी, आणि असोला (गुंजेवाही) येथे आणि ब्रह्मपुरी तालुक्यात रत्नापूर आणि लोहार डोंगरी येथे लोहखनिजाच्या खाणी आहेत. जिल्ह्यात मुख्यतः वरोरा तालुक्यात चुनखडक सापडतो. तसेच राजुरा तालुक्यातही बर्‍याच भागांत चुनखडकाचे पट्टे आहेत. तसेच ग्रॅनाइट, वालुकाश्म, जांभा यांसारखी खनिजे आणि खडकही जिल्ह्यातील काही भागांत आढळतात.

जलस्त्रोत -
बारमाही पाणी असलेली वर्धा ही चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. पुढे ही नदी पैनगंगा आणि वैनगंगा या दोन नद्यांना जाऊन मिळते. इरई ही वर्धा नदीची उपनदी आहे. तर मूल ही वैनगंगेची महत्त्वाची उपनदी आहे. राजुरा, घुगुस आणि बल्लारपूर ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसलेली आहेत. चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण इरई नदीकाठी वसले आहे. सिंदेवाही तालुक्यात असोलमेंढा येथे, नागभीड तालुक्यात नळेश्वर आणि घोडेझरी येथे तसेच राजुरा तालुक्यात अमलनाला येथे काही धरणे आहेत. महाराष्ट्राचा तलावांचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागात चंद्रपूर जिल्ह्याचाही समावेश होतो. या जिल्ह्यात सर्वात महत्त्वाचा ताडोबा तलाव आहे. तसेच घोडेझरी तलाव आणि असोलमेंढा तलावही आहेत.

प्रशासन

चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, भद्रावती, बल्लारपूर, राजुरा, मूल, ब्रह्मपुरी, वरोरा या सात नगरपालिका, चंद्रपूर ही जिल्हापरिषद, राजुरा, चंद्रपूर, वरोरा, नागभीड, सिंदेवाही, मूल, बल्लारपूर, कोरपना, भद्रावती, चिमूर, ब्रह्मपुरी, सावली, गोंडपिंपरी, पोंभूर्णा या १४ पंचायत समित्या आणि एकूण १४७२ लोकवस्ती असलेल्या गावांपैकी ८४८ गावांमध्ये ग्रामपंचायती आहेत. सध्या चंद्रपूर जिल्हा १५ तालुक्यांचा मिळून बनला आहे. त्यातील मे, २००२ मध्ये जिवती हा तालुका अस्तित्वात आला आहे. त्यातील १४ तालुके त्यांचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या.

क्र तालुका क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) लोकसंख्या

१ वरोरा ८८९.६ १६५,८४३

२ चिमुर ९५७.० १५६.७७२

३ नागभिर ५१८.० १२४,४२५

४ ब्रह्मपुरी ५९३.९ १५३,४८६

५ सावली ४९४.० १०४,६८६

६ सिंदेवाही ३७४.० १०६,२७५

७ भद्रावती ७८४.० १५६,९९५

८ चंद्रपूर ५७६.० ४४०,८९७

९ मूल ४८६.२ ११०,१०९

१० पोंभूर्णा २७२.० ४७,९०६

११ बल्लारपूर २०९.५ १३३.७२२

१२ कोरपना ८२९.१ १४३,२१०

१३ राजुरा १,०७७.८ १५२,२१६

१४ गोंडपिंपरी ४४३.० ७४,५५९

राजकीय पटलावर

लोकसभा मतदारसंघ (२) :
१. चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर आणि वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी, अर्णी हे विधानसभा मतदारसंघ मिळून चंद्रपूर हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे.

२. गडचिरोली - चिमूर - ब्रम्हपुरी आणि चिमुर चंद्रपूर हे दोन विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झाले आहेत.

विधानसभा मतदारसंघ (६) :

राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रम्हपुरी, चिमूर आणि वरोरा असे आहेत.

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे ५७ मतदारसंघ असून पंचायत समितीचे ११४ मतदारसंघ आहेत.

शेती आणि उद्योग

संपूर्ण महाराष्ट्रात भाताच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक आहे. चिमूर या भागात अत्यल्प प्रमाणात गहू पिकवला जातो. त्याचप्रमाणे काही प्रमाणात ज्वारीचे उत्पादनही केले जाते. वर्धा नदीच्या खोर्‍यात कापूस पिकवला जातो. याशिवाय तीळाची लागवडही या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण हे १२१४ मि.मी. इतके आहे

देशातील सर्वांत मोठे औष्णिक केंद्र चंद्रपूर औष्णिक केंद्र (चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन -CSTPS) आहे. २३४० मेगावॅट इतकी उर्जा निर्मितीची क्षमता असलेल्या या केंद्रात राज्यातील २५% उर्जेचे उत्पादन होते. जगातल्या १०० सर्वात मोठ्या कागद उत्पादन करणार्‍या कारखान्यांपैकी एक भारतातील सर्वात मोठा असलेली बल्लारपूर इंडस्ट्रीज (बील्ट) याच जिल्ह्यात आहे. चंद्रपूरमध्ये राज्यातील सर्वाधिक सिमेंट कारखाने आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात दगडी कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे येथे दगडी कोळशाच्या आधारे औष्णिक विद्युत निर्माण करतात. चंद्रपूर आणि भद्रावती येथे चिनी भांडी तयार करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. याचबरोबर भद्रावती येथे युद्धनिर्मिती साहित्याचा कारखाना आहे. भातगिरण्या हा देखील जिल्ह्यातील महत्त्वाचा उद्योग आहे. नागभीड आणि सावली येथे कोशाच्या कापडाचा उद्योग विकसित होतो आहे येथील सुरया देखील प्रसिद्ध आहेत. तसेच नागभीड तालुक्यातील विसापूर येथे लाकडापासून प्लायवूड तयार करण्याचा कारखाना आहे. राज्यातील पहिला लोह-पोलाद प्रकल्प चंद्रपूर येथे प्रस्तावित आहे. वरोरा येथे पी. व्ही. सी. पाईप आणि रेफ्रीजरेटर (फ्रीज) यांची निर्मिती केली जाते. याशिवाय जिल्ह्यात चंद्रपूर, घुगुस आणि मूल येथे औद्योगिक वसाहती आहेत.

इथे कसे पोहचाल

चंद्रपूर जिल्ह्यातून दिल्ली - चेन्नई हा लोहमार्ग गेला आहे. चंद्रपूर, नागभीड, तडळी आणि मांजरी ही जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानके आहेत.

काही शहरापासूनचे अंदाजे अंतर

...पासून अंतर(कि.मी.)

मुंबई ९५०

नागपूर १५२

औरंगाबाद ५३२

रत्नागिरी ९६८

पुणे ७५८

कुठे फिराल

ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान (व्याघ्र प्रकल्प) - ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचे एकूण क्षेत्र ११५.१४ चौ. किलोमीटर एवढे आहे. या अरण्यात ‘ताडोबा’ नावाचा आदिवासींचा देव आहे, त्यामुळेच या राष्ट्रीय उद्यानास ‘ताडोबा’ असे नाव देण्यात आले. हे वाघ संरक्षित क्षेत्र आहे. ताडोबा हे पानझडीचे वन आहे. या उद्यानात मोर, धनेश, गरूड, नीळकंठ, चंडोल, सुगरणी इत्यादी साधारण २५० प्रकारचे पक्षी आहेत. तसेच वाघ, सांबर, नीलगाय, गवा, अस्वल, चितळ, भेकर असे अनेक वन्यप्राणी आहेत. याशिवाय ताडोबातले ‘मगरपालन केंद्र’ आशिया खंडातले एक महत्त्वाचे आणि उत्तम मगरपालन केंद्र आहे. येथील ताडोबा सरोवराचा परिसर अतिशय रमणीय आहे. संध्याकाळी वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येथे येतात. या सरोवराशिवाय अनेक लहान-लहान पाणवठे येथे आहेत. उद्यानात एका सुंदर झोपडीत वन्य प्राण्यांचे संग्रहालय आहे. संग्रहालयात अस्वल, रानडुक्कर इत्यादी प्राण्यांचे सांगाडे आहेत. पक्ष्यांनी विणलेली सुंदर घरटी ठेवलेली आहेत. अनेक पक्ष्यांची सुंदर छायाचित्रे येथे आहेत. पाखरे आणि वन्यप्राणी यांचा मुक्त संचार असलेले आणि हिरव्या झाडांच्या सौंदर्याने बहरलेले हे ताडोबाचे उद्यान स्थानिक पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटकांचेही आकर्षण ठरले आहे.

चंद्रपूर - एक ऐतिहासिक शहर अशी चंद्रपूर शहराची ओळख करून देता येईल. येथील गोंडकालीन किल्ला प्रेक्षणीय आहे. गोंड राजा ‘खांडक्या बल्लरशहा’ याने हा किल्ला बांधला असे म्हणतात. तसेच येथे असलेले महाकाली आणि अचलेश्वराचे मंदिरही प्रसिद्ध आहे. अलीकडे हे शहर औद्योगिकदृष्ट्याही विकसित होत आहे.

नागभीड - नागभीडजवळील सर्व परिसर अतिशय निसर्गसमृद्ध आहे. येथील सातबहिनी, मुक्ताबाई आणि महादेव टेकड्यांवरील निसर्गरम्य वातावरणामुळे हे पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. येथे जवळच घोडेझरी हा तलाव आहे. तलावाच्या शेजारीच पूर्वी तलावात सापडलेल्या घोड्याचे मंदिरही आहे.

बल्लारपूर - गोंड राजवटीत बल्लारपूर हे काही काळ राजधानीचे ठिकाण होते. वर्धा नदीच्या काठावर ४०० वर्षांपूर्वी बांधलेला येथील किल्ला प्रसिद्ध असून तो बांधण्याचे श्रेय गोंड राजा खांडक्या बल्लर शाह यास दिले जाते. या किल्ल्यातील राणीमहाल हा प्रेक्षणीय मानला जातो.

भद्रावती - येथील भद्रनाथ मंदिर आणि पार्श्वनाथ मंदिर पाहण्यासारखे आहे. येथून जवळ असलेल्या विजासन टेकडीवर बौद्धकालीन लेणी आहेत.

सोमनाथ - सोमनाथ हे मूल तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण असून येथे महादेवाचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. अपंग आणि कुष्ठरोगी यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी चालविला जाणारा बाबा आमटेप्रणीत प्रकल्प येथे ही कार्यरत आहे.

सामाजिक बांधणी

राजुरा आणि गोंडपिंपरी, मूल आणि चंद्रपूर या तालुक्यांच्या काही भागांत महाराष्ट्र राज्य शासनाची ‘विशेष कृती योजना’ कार्यान्वित केली आहे. ही योजना राबवताना जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, तेथील जीवनपद्धती, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण या बाबींचा प्रकर्षाने विचार केला आहे. जिल्ह्यातील नक्षलवादाचा प्रभाव वाढत असताना आर्थिक आणि सामाजिक न्यायाच्या आणि सर्वांगीण विकासाच्या मार्गाने उत्तर देण्याचा एक स्तुत्य प्रयत्न म्हणून या योजनेकडे पाहता येईल.

मार्च-एप्रिल च्या काळात चंद्रपूर येथे महाकाली मंदिराची यात्रा प्रसिद्ध आहे. घोडा जत्रा ही बालाजी मंदिराची जत्रा चिमूर येथे जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान भरते.

वरोरा येथील आनंदवन - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. याच ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांचे सेवाकार्य गेली ५७ वर्षे चालू आहे. बाबा आमट्यांनी जून १९५१ मध्ये महारोगी सेवा समितीच्या वतीने कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी ‘आनंदवन’ ह्या प्रकल्पाची स्थापना केली. आणि आता या कार्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचे सुपुत्र डॉ. विकास आमटे आणि सून डॉ.भारती आमटे समर्थपणे सांभाळत आहेत. या आदर्श सेवाकार्याची जागतिक पातळीवर आवर्जून नोंद घेतली जाते.

शिक्षण:
चंद्रपूर येथे सेंट्रल फॉरेस्ट रेंजर्स महाविद्यालय कार्यरत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण महाविद्यालयात वनउत्पादने (लाकूड वगळता), वन संरक्षण, वन-धोरण, वन्य प्राण्यांचे जीवन आणि वन व्यवस्थापन या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. अलीकडच्या काळात महिलाही येथे प्रशिक्षण घेऊन वनाधिकारी बनत आहेत. चंद्रपूर जिल्हा नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. जिल्ह्यामधे सुमारे ६१ महाविद्यालये आहेत. जिल्ह्यात ‘सिंदेवाही’ येथे ग्रामसेवक आणि ग्रामसेविका यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र चालविले जाते.

मानबिंदू

आमटे कुटुंबीयांची (बाबा, डॉ. विकास, डॉ. भारती) कर्मभूमी असे या जिल्ह्याला म्हणता येईल. सामाजिक सेवा प्रकल्प उभे करून आमटे परिवाराने (विशेषत: बाबांनी) चंद्रपूरचे नाव जगाच्या नकाशावर ठळक केले.

दादासाहेब कन्नमवार - यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील असून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९२० पासून ते स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते. तसेच जून, १९४८ साली ते नागपूर प्रदेशाचे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. जुन्या मध्य प्रदेशात १९५२ मध्ये त्यांची आरोग्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६० साली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड केली गेली आणि नोव्हेंबर १९६२ मध्ये त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला.

*************************************************************

गडचिरोली

गडचिरोली म्हटलं की जंगलाबरोबरच आपल्या डोळ्यासमोर येतो तो आदरणीय बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला लोकबिरादरी प्रकल्प. घनदाट जंगले, विरळ लोकसंख्या अन्‌ त्यामुळे निसर्गरम्यतेबरोबरच अतीव शांतता हे या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे आणि डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग हे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या समाजकार्याने आदिवासींचे जीवनमान काही प्रमाणात का होईना उंचावले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली आहे. प्राचीन काळात गडचिरोली परिसर नाग आणि माणवंशीय राजांच्या अधिपत्याखाली होता. सध्याच्या आरमोरी तालुक्यातील वैरागड आणि धानोरी तालुक्यातील टिपागड ही पूर्वीच्या काळातील राजवटींची प्रमुख केंद्रे होती. आजही या भागात जुन्या राजवटींच्या अस्तित्वाच्या खुणा आढळतात. शाह या राजाने चंद्रपूरची स्थापना केली. नागवंशीय, गोंड, माणवंशीय यांच्यासह राष्ट्रकूट, यादव आणि चालुक्य राजांचीही सत्ता चंद्रपूर - गडचिरोली भागांवर होती. विविध काळांतील विविध राजवटींनंतर १८५३ पर्यंत हा भाग मराठ्यांच्या अधिपत्याखाली होता. १८५४ मध्ये चंद्रपूर- गडचिरोली हा भाग बेरार प्रांतात होता. याचवेळी चंद्रपूर हा स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आला. १९०५ मध्ये ‘गडचिरोली’ हा स्वतंत्र तालुका ब्रिटिशांनी निर्माण केला. पुढील काळात प्रशासकीय सोयींसाठी गडचिरोली हा स्वतंत्र जिल्हाच अस्तित्वात आला. गडचिरोली पूर्वेकडील जिल्हा असून त्याच्या उत्तरेला गोंदिया जिल्हा, पूर्वेला छत्तीसगड राज्य, दक्षिणेला आणि नैऋत्येला आंध्र प्रदेश राज्य, पश्चिमेला चंद्रपूर आणि वायव्येला भंडारा जिल्हा अशी याची भौगोलिक रचना आहे.
भामरागड हा महाराष्ट्रातील पूर्वेकडील सर्वांत शेवटचा तालुका आहे. तसेच जिल्ह्याच्या दक्षिणेकडील सिरोंचा तालुक्याला छत्तीसगड आणि आंध्रच्या सीमा जोडलेल्या आहेत. जिल्ह्यातील ७५ टक्के भाग जंगलांनी व्यापलेला असल्याने हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. वनसंपत्ती -
जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ७५.९६% क्षेत्र वनांखाली आहे. इटापल्ली, अहेरी, धानोरा आणि कुरखेडा या तालुक्यांतील वने तुलनेने अधिक दाट आहेत. जिल्ह्यातील चपराळा अभयारण्य चामोर्शी तालुक्यात विस्तारलेले आहे. इथल्या जंगलांमध्ये १००वर्षांपेक्षा जास्त जुने आणि ३५ ते ४० मीटर उंचीचे सागाचे वृक्ष आहेत आणि त्याबरोबर बांबूही मोठ्या प्रमाणात आढळतो. येथील जंगलांमध्ये वाघ, अस्वल, तरस, गवा, सांबर, हरीण आणि नीलगाय हे वन्यपशू आणि मोर, पोपट आदी पक्षी आढळतात. सागाचे लाकूड, बांबू , मोह, डिंक, लाख, काही औषधी वनस्पती ही येथील वनोत्पादने आहेत.

गडचिरोलीमध्ये वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती आणि गोदावरी ह्या प्रमुख नद्या आहेत. आढवी, खोब्रागडी, काठाणी, सिवनी, पोर आणि दार्शनी या अन्य नद्या जिल्ह्यातून वाहतात. ह्या भागात दीना नदीवरचे दीना धरण, पोटफोडी नदीवरचे कारवाफा आणि खोब्रागडी नदीचे तुलतुली धरण ही मुख्य धरणे आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ‘इटियाडोह’ या धरणाचा लाभही काही प्रमाणात या जिल्ह्याला झाला आहे.

जिल्ह्यातील बहुतेक नद्या बारमाही वाहणार्‍या आहेत. त्यामुळे उपसा जलसिंचनाचे अनेक प्रकल्प या जिल्ह्यात राबवले गेले आहेत. याशिवाय नैसर्गिक आणि कृत्रिम असे अनेक तलाव ह्या जिल्ह्यात आहेत. आग्नेयेला गोदावरी आणि इंद्रावती या नद्यांचा संगम जिल्ह्याच्या आग्नेयेला सिरोंचा तालुक्यात झालेला आहे. तसेच जिल्ह्याच्या पश्चिमेला वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमानंतर प्राणिहिता हा एकत्रित प्रवाह जिल्ह्याच्या पश्चिमेकडून वाहतो. प्राणिहिता पुढे जिल्ह्याच्या नैऋत्य टोकाला गोदावरीला जाऊन मिळते.

इंद्रावती नदीच्या प्रवाहाचा उपयोग सागाचे मोठे ओंडके वाहून नेण्यासाठी केला जातो.

खनिजे -
खनिनदृष्या अतिशय संपन्न जिल्हा होय. जिल्ह्यात लोह, चुनखडी, दगडी कोळसा आणि तांबे ही खनिजे प्रामुख्याने सापडतात. सुरजागड, भामरागड, दमकोट आणि पडवी येथे उत्तम प्रतीचे लोह-खनिज सापडते. गडचिरोली-देऊळगाव परिसर लोह खनिजासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. चामोर्शी जवळ मारोडा, रेगडी, शिरकाटोला येथे तांब्याचे साठे आढळतात. तसेच सिरोंचा तालुक्यात चुनखडकाचे साठे आहेत. गडचिरोली तालुक्यात, कठाणी नदीच्या परिसरात दगडी कोळशाचे साठे आहेत.

समुद्रकिनारा वजा केलेले कोकण म्हणजे गडचिरोली असे हवामानाच्या दृष्टीने म्हणता येईल. पण गडचिरोलीतील उन्हाळा अतिशय कडक (सुमारे ४५-४७ अंश से.) असतो. येथील हवामान उष्ण, दमट आणि काहीसे विषम असते. येथील थंडीही कडक (४-५ अंश से.) असते. जिल्ह्यात दमदार पाऊस पडतो. पर्जन्यमान सरासरी १४५-१५० से. मी. (वार्षिक) इतके आहे.

प्रशासन :

१२ तालुक्यांची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ

क्र. तालुका क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) लोकसंख्या

१ देसाईगंज (वडसा) २४९.७ ७६,१५४

२ आरमोरी ४१९.० ९०,८४६

३ कुरखेडा ६८६.० ७७,९३६

४ कोरची ५९३.० ४०,७३६

५ धानोरा १,३८९.० ७७,३४६

६ गडचिरोली ६४९.३ १,२६,३१३

७ चामोर्शी ८०७.० १,६५,५१४

८ मूलचेरा २२०.० ३९,६११

९ इटापल्ली १,८४१.० ७०,६२७

१० भामरागड १,३१३.० ३१,६७९

११ अहेरी ९६६.० १,०३,७५९

१२ सिरोंचा ४०३.० ६९,७७३

नागरी आणि ग्रामीण प्रशासन :-

गडचिरोली आणि देसाईगंज (वडसा) या दोन नगरपालिका आहे. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज-वडसा, चामोर्शी, मूलचेरा, कुरखेडा, कोर्ची, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, धानोरी या बारा पंचायत समित्या प्रशासकीय जबाबद-या सांभाळता. लोकवस्ती असलेली १५२१ जिल्ह्यात एकूण गावे असून ४६७ ग्रामपंचायती आहेत.

राजकीय पटलावर

लोकसभा मतदारसंघ -: गोंदिया जिल्ह्यातील आमगांव तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी, चिमूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली, अहेरी हे विधानसभा मतदारसंघ मिळून गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे.

विधानसभा मतदारसंघ - (३) : आरमोरी, गडचिरोली, अहेरी
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ५१ मतदारसंघ असून पंचायत समितीचे १०२ मतदारसंघ आहेत.

शेती आणि उद्योग

जिल्ह्यात सुमारे १५ टक्के भाग लागवडीखाली आहे. एकूण १६,८९०० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ११,३९०० जिरायती, तर उर्वरीत म्हणजे ५५००० हेक्टर बागायती आहे. भात (धान) हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा आणि धानोरा हे तालुके भाताच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्याच बरोबर ऊस, तंबाखू आणि शिंगाड्याचे उत्पादनही जिल्ह्यात घेतले जाते. आंबा, सीताफळ, काजू, पेरू, जांभूळ ही फेंळेही जिल्ह्यात काही प्रमाणात पिकवली जातात. आरमोरी, कुरखेडा आणि कोरची भागात प्रामुख्याने आंबा घेतला जातो. अलीकडच्या काळात आंब्याचे क्षेत्र वाढते आहे.

शासनाने हा जिल्हा उद्योगविरहीत घोषित केल्याने जिल्ह्यात उद्योगांची संख्या अतिशय कमी आहे. तरी वडसा आणि देसाईगंज येथे औद्योगिक वसाहती आहेत. आरमोरी येथे हातमाग उद्योग असून आरमोरीमधील कोशा कापड (रेशीम) प्रसिध्द आहे. याच बरोबर वडसा येथे खत उद्योग आहे त्याचबरोबर भात गिरण्यादेखील आहेत. जंगल अच्छादीत भाग असल्यामुळे लाकूडकटाई मोठ्या प्रमाणात केली जाते. अल्लापल्ली, गडचिरोली, चामोशी, कुरखेडा देसाईगंज येथे लाकूडकटाई हा उद्योग चालतो. देसाईगंज आणि आष्टी येथे कागद गिरण्या आहेत. जिल्ह्यातील आमगाव, कोटगल, इंदाळा इत्यादी ठिकाणी घोंगड्या बनवण्याचा उद्योग चालतो.

इथे कसे पोहचाल

जिल्ह्याला सर्वात जवळचे विमानतळ नागपूर येथे आहे. जिल्ह्यातील सर्व तालुके राज्य महामार्गांनी जोडले आहेत. जिल्ह्यात एकही रेल्वे स्थानक नाही. परंतु चंद्रपूर-गोंदिया हा रेल्वेमार्ग जिल्ह्यातून जातो. सर्वांत जवळचे रेल्वे स्थानक चंद्रपूर हे आहे.

काही महत्त्वाच्या शहरांपासूनचे अंदाजे अंतर

...पासून अंतर (कि.मी.)

मुंबई १०३३

नागपूर १७०

औरंगाबाद ६१५

रत्नगिरी १०५१

पुणे ८४१

कुठे फिराल

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा हे प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. येथे विलक्षण नाजूक कोरीव काम असलेले, महादेवाचे हेमाडपंती देऊळ आहे. येथील देवास मार्कंडदेव असेही म्हणतात. याच्या भोवतालचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.

गोदावरी आणि प्राणहिता नद्यांच्या संगमावरील सिरोंचा हे एक पवित्र स्थान आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ पर्वानिमित्त एक मोठी यात्रा भरते. देशभरातून अनेक नागरिक ह्यामधे सहभागी होत असतात. जिल्ह्यातील शिवणी येथे वैनगंगा आणि वर्धा या नद्यांचा संगम झाला असून सिरोंचा तालुक्यातच सोमनूर येथे इंद्रावती आणि गोदावरी या नद्यांचा संगम झालेला आहे.

अलापल्ली येथील ‘वनवैभव’ हे जंगल प्रसिद्ध आहे. या जंगलासह जिल्ह्यातील घनदाट जंगले ही वन्यप्राणी - पक्षांच्या अभ्यासकांना आणि धाडसी पर्यटकांना नेहमीच खुणावतात.

चपराळा हे चामोर्शी तालुक्यातील, वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ वसलेले पवित्र क्षेत्र आहे. यास प्रशांतधाम असेही म्हणतात. येथील हनुमानाचे मंदिर प्रेक्षणीय आहे. येथे हनुमान जयंतीला मोठा उत्सव साजरा केला जातो.

महाल आमगाव हे चामोर्शी तालुक्यातील ठिकाण असून येथे उत्कृष्ट शिल्पकला असलेली अनेक मंदिरे पाहायला मिळतात. वैरागड हे आरमोरी तालुक्यातील ऐतिहासिक गाव आहे. येथे गोंड राजा विराट याची राजधानी असलेला वैरागड किल्ला आहे. तसेच येथे भंडारेश्वर आणि गोरजाईची हेमाडपंती देवालये आहेत. या भागात खोदकाम आणि बांधकाम करताना येथील प्रशासनाची विशेष परवानगी घ्यावी लागते. कारण पुरातत्त्वकालीन महत्त्वाच्या वस्तू किंवा मौल्यवान वस्तू सापडण्याची शक्यता या भागात आजही अधिक आहे.

भामरागड - इंद्रावती, पामुलगोतम आणि परलेकोटा या नद्यांचा त्रिवेणी संगम झालेले हे स्थान आहे. बिनागोंडा येथे धबधबा असून हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे.

आमटे कुटुंबीयांचा लोकबिरादरी प्रकल्प आणि बंग दांपत्याचा शोधग्राम प्रकल्प ही आधुनिक काळातील - जरूर भेट द्यावीत अशी - पर्यटन स्थळेच आहेत.
सामाजिक बांधणी

जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या ३८.३१% लोकसंख्या आदिवासी जमीतीची आहे. आदिवासी लोकसंख्येच्या टक्केवारीचा विचार करता राज्यातील हा दुसर्‍या क्रमांकाचा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असणार्‍या या जिल्ह्यात मुख्यतः सातनाला, टिपागड, चिरोली, भामरागड आणि सुरजागड येथील वनव्याप्त डोंगराळ प्रदेशात आदिवासी लोक बहुख्येने राहतात. गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, कुरखेडा, धानोरा आणि सिरोंचा हे तालुके आदिवासी तालुके म्हणूनच ओळखले जातात. माडिया गोंड, राजगोंड, हळबा, कोलाम, कोया आणि परधान ह्या गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमाती होत.
गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आदिवासींच्या घराला ‘टोळा’ असे म्हणतात. गोंड वस्तीच्या गावांमध्ये गावाच्या मध्यभागी ‘युवागृह’ असते. याला ‘गोटूल’ असे म्हणतात. या ‘गोटूल’ मध्ये तरुण - तरुणी एकमेकांना भेटतात, गावकरी एकत्र येतात, तसेच समूहातील समस्या - भांडणेही सोडवली जातात. गोंडांच्या ग्रामप्रमुखास ‘गायता’ असे म्हणतात.

गोंडी, माडिया, मराठी, हिंदी, तेलगू, बंगाली आणि छत्तीसगडी या सात भाषा ह्या जिल्ह्यात बोलल्या जातात.
हा जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. या विद्यापीठाच्या अंतर्गत जिल्ह्यात एकूण ४० विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. जिल्ह्यात एकूण १०० आदिवासी आश्रमशाळा आहेत.

मानबिंदू

गडचिरोली म्हटलं की जंगलाबरोबरच आपल्या डोळ्यासमोर येतो तो आदरणीय बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला लोकबिरादरी प्रकल्प. डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी सौ मंदा आमटे हे हा प्रकल्प हेमलकसामधील नागेपल्ली, भामरागड येथे गेली ३५ वर्षे चालवत आहेत. ह्या प्रकल्पांतर्गत माडिया आणि गोंड आदिवासींना वैद्यकीय उपचारांची सेवा दिली जाते आणि मुलामुलींकरीता आश्रमशाळा चालवली जाते. ह्याचबरोबर जवळपासच्या जंगलात असलेल्या प्राण्यांचा सांभाळदेखील केला जातो. या अनौपचारिक प्रकल्पाला ‘प्राण्यांचे अनाथालय’ असे नाव दिले आहे.

महाराष्ट्रात होणा-या बालमृत्यूंचा सखोल अभ्यास करणारे आणि त्या संदर्भात अनेक उपाययोजना राबवणारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते डॉ. अभय बंग आणि त्यांची पत्नी डॉ. राणी बंग यांची कर्मभूमी गडचिरोली जिल्हाच होय. शोधग्रामच्या माध्यमातून त्यांनी गडचिरोली येथे प्रकल्प उभा केला आहे. शोधग्राममध्ये ग्रामीण रुग्णालय, व्यसनमुक्ती केंद्र असून आरोग्याबद्दल संशोधनही येथे चालते. डॉ. बंग दांपत्याने स्थापन केलेल्या सर्च या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातीलच स्त्रियांना आरोग्यविषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. सुमारे ४० स्त्री आरोग्यदूत आणि १५० प्रशिक्षित सुईणी बाळंतपणानंतर स्त्रियांची काळजी, नवजात अर्भकाचे आरोग्य, गर्भवती स्त्रियांचे आरोग्य... आदी बाबतीत दर्जेदार कार्य करत आहेत. डॉ. अभय आणि डॉ. राणी त्यांच्या कार्यकर्त्यांसह गेली सुमारे २० वर्षे येथे कार्यरत आहेत.

धानोरा तालुक्यात लेखा-मेंढा येथून श्री. देवजी र्तोफा आदिवासींमध्ये आत्मविश्र्वास जागृत करण्याचे कार्य करीत आहेत. ‘आमच्या गावात आम्ही सरकार’ ही संकल्पना घेऊन ते वाड्यावस्त्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.