आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांचे निर्देश : सतरंजीपुरा व लकडगंज झोनमध्ये आढावा बैठक
नागपूर/प्रतिनिधी:
डेंग्यूमुळे नागरिकांच्या मनात भीती असून साधारण तापाच्या उपचारासाठी खासगी दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांना डेंग्यूची भीती दाखवून रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देश आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी दिले.
आरोग्य समितीच्या झोननिहाय बैठकीअंतर्गत शुक्रवारी (ता. २८) सतरंजीपुरा व लकडगंज झोन कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांच्यासह सतरंजीपुरा झोनच्या सभापती यशश्री नंदनवार, नगरसेवक संजय महाजन, संजय चावरे, नगरसेविका अभिरुची राजगिरे, शकुंतला पारवे, वंदना चांदेकर, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, लकडगंज झोनमध्ये नगरसेवक प्रदीप पोहाणे, अनिल गेंडरे, नगरसेविका मनिषा धावडे, सरिता कावरे, जयश्री रारोकर, झोनचे आरोग्य अधिकारी डॉ. मोवाडे उपस्थित होते.
खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या भीतीचा प्रचार केला जात आहे. रुग्णांकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्यासाठीचा हा खासगी रुग्णालयांचा फंडा आहे. साधारण तापासाठी तपासणीकरिता खासगी रुग्णालयात रुग्ण गेल्यास त्याला डेंग्यूचे लक्षण असल्याचे सांगून भरती केले जाते. त्यानंतर महागड्या चाचण्या करून रुग्णांची आर्थिकदृष्ट्या लूट केली जाते. मात्र खासगी रुग्णालयांमधून ज्या प्रकारे भीतीचा प्रचार केला जात आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा खासगी रुग्णालयांकडून डेंग्यूबाबत महानगरपालिकेला अहवालही सादर केला जात नाही. या खासगी रुग्णालयांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात यावे व डेंग्यूच्या नावावर नागरिकांची लूबाडणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावे, असे यावेळी आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी निर्देशित केले.
बैठकीमध्ये आरोग्य सभापती मनोज चापले यांनी सतरंजीपुरा व लकडगंज झोनमधील डेंग्यूच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. फवारणीसाठी वेळापत्रक तयार करण्यात यावे व फवारणी आधी नगरसेवकांना माहिती देऊन त्यांच्या सूचनेवरून ठराविक भागांमध्ये फवारणी करण्यात यावी. डेंग्यूमुळे शहरात निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा घेत काही जण राजकारण करीत आहेत. मात्र या रोगावर मात करण्यासाठी राजकारणापेक्षा जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे व त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही सभापती मनोज चापले म्हणाले.
परिसरात अस्वच्छता, घरी, छपरावरील टायर, ड्रम आदी साधनांमध्ये साचणारे पाणी व परिसरात असणारा कचरा यामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास वाढते. हे सर्व आपल्याच निष्काळजीपणामुळे होते. डेंग्यूवर मात करण्यासाठी प्रत्येकाने निष्काळजीपणा सोडून स्वच्छता ही आपली जबाबदारी असल्याचे निश्चित करणे आवश्यक आहे. डेंग्यूबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेउन जनजागृती करणारे पत्रक छापून आपापल्या प्रभागात घरोघरी वितरीत करावे. याशिवाय झोनमधील मनपासह, शासकीय व खासगी अशा सर्व शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात यावेत. चिमुकल्या मुलांमार्फत होणारा प्रचार हा प्रभावी ठरत असल्याने शाळांमध्ये जनजागृतीवर भर द्या, असेही सभापती मनोज चापले यांनी यावेळी निर्दशित केले.