शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांना प्रत्यक्षात उतरवून मानवाच्या कल्याणासाठी अभियंत्यांचे कार्य असून अभियंत्यांचे उत्पन्न हे देशाच्या तथा मानवाच्या प्रगतीवर अवलंबून असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी केले.
मनाप्रमाणे विभाग बदलवून मिळण्याची अपेक्षा न बाळगता, मिळालेल्या कार्यास देशसेवेची संधी समजून उत्तम कार्य केल्यास निश्चितच व्यक्तिगत प्रगती साधनें सुकर होते.
नव्याने रुजू झालेल्या अभियंत्यांपैकी दोन अभियंत्यांना मंचावर स्थान देण्याच्या संकल्पनेचे विशेष कौतुक करीत, पर्यावरण रक्षणाचे आवाहन आजच्या अभियंत्यांनी स्वीकारणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे आर. सूब्रमणिअन, कार्यकारी संचालक, भेल यांनी केले.
याप्रसंगी,नाविन्यपूर्ण संकल्पनांचे विशेष कौतुक करीत, चौकटीच्या बाहेर पडून विचार केल्याशिवाय नवनवीन कल्पना सुचूच शकत नाहीत असे वेकोलीचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक दिवाकर गोखले यांनी मत मांडले.प्रारंभी, दीप प्रज्वलन व भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
नाविन्यपूर्ण संकल्पना स्पर्धेतील दोन विजेत्या अभियंत्यांच्या संकल्पना कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रस्तुत करण्यात आल्या. मंचावर उपस्थित व नव्यानेच रुजू झालेले दोन अभियंते कु. प्रिती कोला व विशाल बनसोडे यांनी महानिर्मिती मधील कार्यप्रणाली, खुले वातावरण व स्त्रीयांना मिळणारी सन्मानजनक वागणूक याची भरभरून स्तुती केली.सैनिकांप्रमाणे देशाकरीता प्राण देण्याची संधी नसली, तरी देशाचा मान उंचावण्याची संधी महानिर्मितीमधे निश्चितच उपलब्ध आहे, असे भावनात्मक वक्तव्य विशालने आपल्या भाषणातुन केले.
तोलामोलाच्या तब्बल छत्तीस चमुंच्या सहभागामुळे व वारंवार विविध स्तरांवर बरोबरी साधल्यामुळे अत्यंत चुरशीच्या व प्रेक्षणीय ठरलेल्या, मात्र आयोजकांचीच परीक्षा घेणाऱ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे व इतर स्पर्धांचे बक्षीस वितरण या कार्यक्रमा दरम्यान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनावर आधारित व महानिर्मिती बद्दल प्रेरणादायी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आल्या. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे उप मुख्य अभियंते राजेंद्र राऊत, प्रदीप फूलझेले व मनोहर खांडेकर मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच BHEL चे महाव्यवस्थापक टी लाल, बी स्वायन, एस मंडल तर वरिष्ठ उप महाव्यवस्थापक एस एम बोरकर, वेकोलीचे जनसंपर्क अधिकारी आशिष तायल हे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन स्नेहा लालमुंडे व ज्ञानदीप कोकाटे यांनी केले.