शांताराम पोटदुखे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
चंद्रपूर/प्रतिनिधी:
कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, राजकारण, समाजकारण, पत्रकारिता आदी सर्व क्षेत्रात उल्लेखनिय योगदान मागे ठेवत. ज्येष्ठ काँग्रेस नेते देशाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे आज अनंतात विलीन झाले. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास बिनबा गेट शांतीवन येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. चारवेळा चंद्रपूरचे खासदार राहीलेल्या या लोकनेत्याला हजारोच्या समुदायानी साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.
चंद्रपूर शहराच्या विकासासाठी सतत झटणा-या या अजात शत्रूच्या व्यक्तिमत्वाच्या अंत्ययात्रेमध्ये सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सकाळपासून साईमंदिर सिव्हील लाईन स्थित घरामध्ये चंद्रपूरकरांची रिघ लागली होती. वटवृक्ष झालेल्या शैक्षणिक संस्था आणि हजारोच्या आयुष्यात आपल्या कर्तृत्वाने बदल घडवून आणणा-या या हसतमुख व्यक्तिमत्वाला निरोप देण्यासाठी सर्व वयोगटातील अनेक पिढयांनी सिव्हील लाईन परिसरात गर्दी केली होती. दुपारी 12 नंतर सजवलेल्या रथातून शहराच्या मुख्य मार्गावरुन अंत्ययात्रा काढण्यात आली.
23 सप्टेंबर रोजी दुपारी 3.23 मिनीटांनी नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांचे वय 86 वर्षे होते. त्यांनी 1980 ते 1984, 1984 ते 1988, 1989 ते 1991, 1991 ते 1996 असे सलग चारवेळा लोकसभेमध्ये चंद्रपूर जिल्हयाचे प्रतिनिधीत्व केले. पी.व्ही.नरसिंहराव सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. डॉ.मनमोहनसिंग हे अर्थमंत्री होते. तर त्यांच्यासोबत अर्थराज्यमंत्री म्हणून शांताराम पोटदुखे यांनी काम बघितले. त्याच्या पश्चात पत्नी सुधा, मुलगा भरत, स्नुषा रमा गोळवलकर, मुलगी भारती चवरे, जावई व नातवंड असा मोठा परिवार आहे.
राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. त्यांनी रात्री मुंबईला निघण्याचा दौरा रद्द केला. रात्री त्यांनी निवासस्थानी जावून भेट दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी देखील आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. राज्य शासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी देखील 11 वाजताच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार ॲड.संजय धोटे, काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलीया, माजी खासदार नानाभाऊ पडोळे, आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री संजय देवतळे, माजी मंत्री रंजीत देशमुख, माजी खासदार विजयराव मुडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी आदी मान्यवर उपस्थित होते.