সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, June 08, 2018

नागपूर ग्रामीण पोलिसांनी दाखल केली पहिली ‘डिजिटल चार्जशिट’

नागपूर/प्रतिनिधी:
गुन्हा सिद्ध करण्यासाठी चार्जशिट महत्त्वपूर्ण असते. मात्र बऱ्याचदा साक्षीदार आणि पंच फितूर झाल्याने, साक्ष बदलविल्याने आरोपी मोकाट सुटतात. यावर आता आळा बसणार आहे. आरोपी निर्दोष सुटू नये आणि संबंधिताला न्याय मिळावा यासाठी डिजिटल चार्जशिटकडे पोलिसांनी पाऊल टाकले आहे. अशाप्रकारची डिजिटल चार्जशिट नागपूर ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दाखल केली. लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीविरोधात डिजिटल चार्जशिट दाखल करण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे, हे विशेष!
बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुईखैरी येथील गुन्ह्याची ही घटना आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही घरी एकटीच असताना आरोपी तुकाराम नारायण गलपलवार (३८, रा. शेळगाव - गौरी, ता. नायगाव, जि. नांदेड ह.मु. वॉर्ड क्र. २, छोटी बुटीबोरी (रुईखैरी), ता. जि. नागपूर) याने तिचा लैंगिक छळ केला. याबाबत फिर्यादीने बुटीबोरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४५२, ३५४ (अ) (१), (२) सहकलम बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात आरोपीला २९ मार्च २०१८ रोजी रात्री ११:०५ वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली.
अनेक गुन्ह्यामध्ये साक्षीदार, पंच हे फितूर होऊन मोकळे सुटतात. नंतर ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळतात. त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्याची एफआयआर, घटनास्थळाचा पंचनामा, साक्षीदाराचे बयाण, दोषारोपपत्र अशा सर्व कागदपत्राचे स्कॅनिंग करून पीडीएफ (पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट)मध्ये तयार केले. तसेच डिजिटल पुरावा गोळा केल्याबाबत कलम ६५ (बी) भारतीय पोलीस कायद्यान्वये प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आले. तपासाचे इनकॅमेरा चित्रीकरण करून गुन्ह्याचे कागदपत्र दोषारोपपत्रासहित तपासात केलेल्या चित्रीकरणाचे व्हिडिओ डिजिटल चार्जशिटमध्ये जोडण्यात आले. २७ एप्रिलला ही डिजिटल चार्जशिट तयार करून विशेष न्यायालयात ५ मे रोजी दाखल करण्यात आली.
तपासात महत्त्वाची भूमिका
विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज मेश्राम, सहायक फौजदार केशव राठोड, पोलीस नाईक अतुल शेंडे, महिला पोलीस शिपाई निकिता कांबळे, गीता भुते यांचा यासाठी हातभार लागला.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.