येत्या शनिवारचा दिवस नागपूर व विदर्भाच्या दृष्टीने ऐतिहासिक राहणार आहे. प्रथमच नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन हजार शेळ्या मेंढ्या आखाती देशांमध्ये निर्यात करण्यात येणार आहेत. या नवीन प्रकल्पाद्वारे शेळी-मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवी बाजारपेठ खुली होणार आहे व पुढील तीन महिन्यांत १ लाख शेळ्या-मेंढ्या विदेशात निर्यात करण्याचे उद्दीष्ट आहे, अशी माहिती खा.विकास महात्मे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेदरम्यान दिली.
गुरुवारी राजीव गांधी बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्थेमध्ये आयोजित पत्रकारपरिषदेमध्ये त्यांनी यासंदर्भात विस्तृत माहिती दिली. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आर्थिक विवंचनेतून होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पूरकव्यवसाय करम्यासाठी संधी व प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. याच विचारातून डॉ.महात्मे यांना शेळ्या-मेंढ्या विमानाने विदेशात निर्यात करण्याच्या योजनेची कल्पना सुचली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक-जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनीदेखील या योजनेला पाठबळ दिले. डॉ.महात्मे यांनी केंद्रीय उद्योग व वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांचीदेखील अनेकदा भेट घेऊन या योजनेचा पाठपुरावा केला. या योजनेअंतर्गत ३० जून रोजी दुपारी एक वाजता नागपूर विमानतळावरुन पहिल्या टप्प्यात दोन हजार शेळ्या मेंढ्या निर्यात करण्यात येणार आहेत. निर्यात होणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
मुख्यमंत्री, गडकरी, प्रभूंची उपस्थिती
नागपूर विमानतळावर ३० जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला तीन केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक-जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, केंद्रीय उद्योग व वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय कृषीमंत्री गजेंद्र शेखावत, राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, हे प्रामुख्याने उपस्थित राहतील, असे डॉ.विकास महात्मे यांनी सांगितले. केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय कृषी मंत्रालय, मिहान, एअर इंडिया यांच्या संयुक्त सहभागातून ही योजना आखली गेल्याचेदेखील डॉ. महात्मे यांनी सांगितले. निर्यातीचे काम खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे.
पशूधन ‘एटीएम’सारखे काम करेल
या नव्या प्रकल्पाद्वारे मेंढपाळ तसेच शेळी पालन करणाºया शेतकºयांना रोजगाराच्या तसेच आर्थिक उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून शेळी-मेंढी पालनाचा स्वीकार करतील. आर्थिक विवंचनेच्या काळात हेच पशूधन त्यांच्यासाठी ‘एटीएम’सारखे काम करेल, असा विश्वास डॉ.महात्मे यांनी व्यक्त केला.(लोसे)