महाराष्ट्रातील आमदार जनसेवेचा दावा करतात. त्यासाठी वाट्टेल तो त्याग करण्यासाठी तयार असल्याचंही सांगितलं जातं. मात्र त्याचवेळी जनसेवेसाठी त्यांना मिळणारा पगार नेमका किती ते उघड करण्यासाठी ठाण्यातील आरटीआय कार्यकर्ते प्राजक्त झावरे-पाटील यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज केल्यावर मिळालेली माहिती धक्कादायक आहे.
प्राजक्त झावरे पाटील यांनी आमदारांचा एकूण पगार, मूळ पगार, महागाई भत्ता, इतर भत्ते यांची माहिती मागवली होती. महाराष्ट्र विधानमंडळाकडून त्यांना माहिती माहिती मिळाली. आमदारांना प्रत्येक महिन्याला 67000 मूळ पगार मिळतो. महागाईविरोधात आवाज उठवल्यानंतर सामान्यांना काही फायदा होताना दिसत नाही. पण आमदारांना मात्र महागाई भत्ता म्हणून 91,120 रुपये मिळतात. जियोच्या काळात सर्वांचीच फोन बिलं खंगलीत, मात्र आमदार महोदयांना जुन्या काळासारखाच दूरध्वनी खर्च म्हणून 8000 रुपये दिले जातात. ईमेल, व्हॉट्सअॅपच्या काळातही आमदारांना टपालासाठी 10000 मिळतात. एक खर्च योग्य वाटतो. तो म्हणजे संगणक चालकाच्या पगारासाठी मिळणारी 10000 रुपयांची रक्कम मिळते.