महावितरणतर्फे थकबाकीचा प्रश्न सोडविणे व ग्राहकांना आधुनिक सेवा पुरविण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या जात आहे. मोबाईल अॅपद्वारा वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर आता महावितरण ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन वीज बिल स्वीकारणार आहे.
ग्रामीण भागात वीज बिल भरणा केंद्र नसल्याने नियमित वीज बिल भरणा करण्यास ग्राहकांना अडचण येत असल्याने महावितरणने त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांना वीज बिल सहजरित्या भरता यावे, यासाठी वीजबिल भरणा मोबाईल व्हॅन म्हणजे फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयात मोबाईल व्हॅनचा समावेश करण्यात येणार आहे. चामोर्शी उपविभागातील घोट, नागभीड उपविभागातील पाहर्णी, राजुरा उपविभागातील देवाडा, वरोरा उपविभाग तसेच चंद्रपूर विभागातील चंद्रपूर ग्रामीण उपविभागात मोबाईल व्हॅन वीजबिल भरणा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत व ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद या मोबाईल व्हॅन वीज बिल भरणा केंद्रास लाभत आहे.
या वाहनात ग्राहकांना माहिती मिळण्यासाठी उदघोषणा करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. वीज बिल भरणा केंद्र नसलेली गावे, दुरवस्ती आणि दुर्गम भागातील गावे तसेच दाट लोकवस्ती व मोजकेच वीज बिल भरणा केंद्र असलेल्या गावांसोबतच समावेश करण्यात येणार आहे. ज्या गावातील वीज बिलाची वसुली क्षमता कमी आहे, अशा गावातूनही ही मोबाईल व्हॅन फिरविली जाणार आहे. महावितरणच्या या योजनेमुळे वीज ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
आठवडी बाजारतही फिरणार व्हॅन
लवकरच इतर उपविभागातसुद्धा वीज बिल भरणा मोबाईल व्हॅन सुरु करण्यात येणार आहे. साप्ताहिक बाजाराला आलेल्या विद्युत ग्राहकांना बाजारस्थळीच त्यांच्या वीज बिलाचा भरणा करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविल्या जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत निवडण्यात आलेल्या या उपविभागामधील साप्ताहिक बाजार तसेच सार्वजनिक ठिकाणांवर हे वाहन फिरविण्यात येणार असून या फिरत्या वीज बिल भरणा केंद्रामध्ये इंटरनेट, संगणक आणि प्रिंटर आदीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या या सुविधेला वीज ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादाचा आढावा तीन महिन्यांनंतर घेण्यात येणार आहे. मिळणाºया प्रतिसादानंतर त्या ठिकाणी ही सुविधा पुढे सुरु ठेवण्याबाबत व व्याप्ती वाढविण्याबाबत विचार केला जाणार आहे. या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घेऊन वीज देयकाचा भरणा करावा.