जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन जिल्ह्यातील ५१३ ग्रा.पं. स्वच्छ व सुंदर करण्याचा विडाच उचलला आहे. गत तीन महिन्यांंत जि. प. स्वच्छता विभागाच्या जिल्हास्तरीय गुडमॉर्निंग पथकाने ठिकठिकाणी पहाटे धडक देऊन सुमारे १० लोटाबहाद्दरांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे दंडात्मक कारवाई हिंगणघाट तालुक्यातील काजळसरा या गावात करण्यात आली.
शाश्वत स्वच्छता हा हेतू केंद्रस्थानी ठेवून जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनात व जि. प. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिक मेश्राम यांच्या नेतृत्त्वात जिल्हास्तरीय दोन गुडमॉर्निग पथक तयार करण्यात आले आहे. शिवाय जिल्ह्यातील आठ तालुक्यात प्रत्येकी एक असे तालुक्याचे गुडमॉर्निग पथकही तयार करण्यात आले आहे. सदर जिल्हास्तरीय गुडमॉर्निग पथकातील सदस्य गत तीन महिन्यांपासून प्रत्येक आठवत्यातील मंगळवार व गुरूवारी विविध गावात धडक देत लोटाबहाद्दरांना समज देत आहेत. तसेच उघड्यावर प्रात:विधीकरिता गेल्यास त्याचे आपल्या आरोग्यावर काय वाईट परिणाम होतात हेही पटवून देत आहेत. यंदाच्या एप्रिल महिन्यात हाती घेण्यात आलेला हा उपक्रम मे नंतर जून महिन्यातही राबविल्या जात आहे. तर पुढील तीन महिने हा उपक्रम पुन्हा नव्याने व प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना वरिष्ठांकडून जि. प. च्या स्वच्छता विभागाला प्राप्त झाल्या आहेत. शास्वत स्वच्छता या हेतूने व लोटाबहाद्दरांना समज देण्यासाठी गुरूवारी जिल्ह्यास्तरीय गुडमॉर्निंग पथकाने गुंजखेडा, हिवरा हाडके यासह देवळी तालुक्यातील इतरही गावांमध्ये धडक देत पथकातील विनोद खोब्रागडे, सचिन खाडे, संपदा बोधनकर, नरेंद्र येणोरकर, कैलास बाळबुधे, अंकुर पोहाणे, अशोक रत्नपारखी, महेश डोईजोड यांनी त्यांना उघड्यावर प्रात:विधीस जाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले. तर शुक्रवारीही अनेकांना सदर पथकाने समज दिली.
सहकार्य न करणाऱ्या ग्रा.पं.वर होणार कारवाई
जि.प. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने शास्वत स्वच्छतेसाठी गत तीन महिन्यांपासून विशेष प्रयत्न केले जात आहे; पण काही ग्रा.पं. सदर उपक्रमाला प्रतिसादच देत नसल्याचे दिसून येते. ज्या ग्रा.पं. लोटाबहाद्दूरांना समज देण्यासाठी व स्वच्छ गावाकडे पाठ करेल अशांचा अहवाल तयार करून तो योग्य कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे.
यापुढे थेट दंड
गत तीन महिन्यात जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जिल्हास्तरीय गुडमॉर्निंग पथकाने पहाटेच धडक देवून अनेक लोटाबहाद्दरांना समज दिली. परंतु, अनेक लोटाबहाद्दर उघड्यावर प्रात:विधीकरिता जातच असल्याचे निदर्शनास येत असल्याने उपक्रम राबविताना यापुढील तीन महिन्यात लोटाबहाद्दरांना समज देत थेट १०० रुपये ते १ हजार २०० रुपयेपर्यंत दंड ठोठावण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.